बंध प्रेमाचे...भाग १३ ( अंतिम)

तितक्यात परत दार वाजतं. सागरने दार उघडून अमरला आत येण्यास सांगीतले. अमर अवघडलेल्या पावलांनी आत

मागील भागात आपण बघितले...

प्रीती तिच्या खोलीत एकटीच होती. आरशात स्वतः ला बघत होती. पण तिला अमरच दिसत होता. तिला त्याचे शब्द आठवत होते. तिने कान घट्ट दाबून धरले.

आनंदी पटकन प्रियाला घेऊन एका खोलीत गेली. तिथे तिने प्रियाजवळ एक बॉक्स दिला आणि सांगितले.

“ तू जा पाठराखीन म्हणून प्रीती सोबत. मावशी पण असेल तुमच्या बरोबर. आणि तिथे सत्यनारायण झाला की हा बॉक्स प्रीतीला दे.”

असं सांगून आनंदी जवळ जवळ पळतच निघून गेली.

नंतर प्रिया सुद्धा प्रितीच्या खोलीत निघून गेली.

आता पुढे...

चार वर्षांनंतर....( ऑस्ट्रेलिया मधील पर्थ शहर)

सागर त्याची कार चालवत घरी जात होता. जाताना तो फोन वर बोलत होता. तितक्यात त्याला रस्त्याच्या कडेला गाडीजवळ प्रीती उभी दिसली. त्याने बोलता बोलता गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि प्रीतीजवळ गेला. त्याला बघून प्रीती एकदम दचकली.

सागर: “तुझी कार खराब झाली वाटतं. मी गाडी गॅरेजला पाठवायची व्यवस्था करतो. चल घरी जाऊ इथे असं इतक्या वेळ थांबणं बरं नाही.”

प्रीती: “ नाही अरे मी थांबते गाडी सुरू झाली की जाईल घरी.”

सागर: “ माझं ऐक तुला माहित आहे इथे सगळं लवकर बंद होतं. त्यात हा रस्ता रहदारीचा नाही. तू माझ्या सोबत घरी चल.”

असं म्हणत सागर प्रीतीला घरी घेऊन गेला. घर जवळच होतं त्यामुळे ते लवकरच घरी पोहोचले. सागरने त्याच्याकडे असलेल्या चावीने दार उघडले. प्रीती त्याच्या मागोमाग अडखळकेल्या पावलांनी आत गेली. घर छान आवरलेले होते.

सागर: “ तू फ्रेश हो मी कॉफी बनवतो.”

तशी प्रीती हॉलला लागून असलेल्या बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेली. तो पर्यंत सागर सुद्धा फ्रेश होऊन आला आणि त्यांनी कॉफी करायला घेतली.

प्रीती: “ मी करू कॉफी?”

सागर: “ नको तू बसं. मीच करतो.”

प्रीती: “ सागर मला इथे असं ऑड वाटतं आहे.”

सागर: “ मी समजू शकतो. पण काळजी करू नकोस आपलंच घर समज.”

प्रीतीने पुन्हा एक नजर घरावरून फिरवली. ओपन किचन असल्यामुळे सागरला ती आणि तिला सागर दिसत होते.

प्रीती: “ तू इथे कसा? म्हणजे तू तर लंडनला जाणार होतास ना?”

सागर: “ जाऊन आलो मी आता गेले वर्षभर इथेच आहे. नवीन जॉब मिळाला इथे.”

प्रीती: “ अच्छा. तू लग्नं नाही केलंस?”

प्रीती जरा संकोचीत आवाजात विचारत होती. तिच्या प्रश्नाने सागरला जरा हसू आले. तो गालातल्या गालात हसला. त्याच्या लक्षात आले की प्रीतीला अजून हॉलमध्ये एका कोपऱ्यात लावलेला फोटो दिसला नाहीये.

सागर: “ हो केलं की.”

प्रीती: “ कुठे आहे मग ती? तिला माहित आहे माझ्याबद्दल?"

सागर: “ घाबरु नकोस ती मला सोडून पळून नाही गेली. इथेच आहे. ऑफिसला गेली आहे. येईलच इतक्यात. आणि तिला सगळं माहित आहे.”

प्रीती: “ सागर मी जाते, उगाच मला बघितलं इथे तर तिचा गैरसमज होईल.”

सागर: “ काही होणार नाही. तिला माहित आहे तू इथे आहेस ते. खरं तर तिनेच मला सांगितलं तुला घरी घेऊन यायला. तू दिसलीस तेव्हा मी तिच्याशीच बोलत होतो. आणि एकंदरीत तुझ्या हावभावावरून मला समजलं की तुझं घर लांब असेल. म्हणून तिच्या सांगण्यावरून तुला घरी घेऊन आलो.”

सागर बोलत होता. कॉफी पण तयार झाली होती. तो ती कॉफी कपात ओतत होता. तितक्यात दाराची घंटी वाजली. तसं सागर हसला. आणि दार उघडायला गेला. पण प्रीतीच्या मनात मात्र आता भीती वाढली होती.

“ कोण आहे ह्याची बायको.? कशी रिएक्ट करेल मला बघून?”

असे कितीतरी विचार एका क्षणात तिच्या डोक्यात येत होते. तोपर्यंत सागरने दार उघडले सुद्धा. सागरने तिच्या हातातली बॅग घेत तिला आत घेतले. ती आली आणि प्रीतीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला बघून प्रीती एकदम उभी राहिली. ती दुसरी तिसरी कोणी नसुन तिची प्रिया होती.

प्रियाजवळ धावतच प्रीतीकडे गेली. पण तिला धावता येत नव्हतं. दोघी एकमेकींच्या समोर उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. प्रियाने पटकन प्रीतीला मिठी मारली. दोघी खूप रडल्या. पण सागर प्रियाजवळ गेला आणि दोघींना

“ रडू नका” असं समजावलं.

सागर: “ प्रिया शांत हो. आता भेटली ना तुझी मैत्रीण तुला. आता रडू नकोस जास्तं. अशा परिस्थितीत तू रडणं योग्य नाही.”

तशी प्रिया शांत झाली. ती आठ महिन्यांची प्रेग्नेंट होती. सागरच्या ह्या बोलण्याने प्रीतीला हे लक्षात आलं. आधी तिने फक्त प्रियाचा चेहराच बघितला होता. तसं तिने पटकन प्रियाच्या पोटाला किस केलं आणि तिला हात देऊन सोफ्यात बसवलं. सागरने सगळ्यांसाठी कॉफी आणली. कॉफी हातात घेत प्रिया बोलू लागली. तिला खूप बोलायचं होतं.

प्रिया: “प्रीती अगं कुठे होतीस इतके वर्ष? आम्ही खूप शोधलं तुला. तू एकदा तरी फोन करशील म्हणून मी आणि घरच्यांनी कधीच नंबर बदलला नाही. तुला एकदा सुद्धा आम्हाला फोन करावासा वाटलं नाही का?”

प्रीती: “ वाटलं खूप वाटलं, पण हिम्मत नाही झाली. मी जे केलं त्यानंतर माझा कोणी स्वीकार करणार नाही असं वाटतं होतं.”

प्रिया: “ पण तू असं का केलंस? मी फक्त पाच मिनिटांसाठी गेले होते. परत आले तर तू खोलीत नव्हतीस. आरशाजवळ तुझं पत्र मिळालं. वाचून मला धक्काच बसला. तू एकदा तर सांगायचं होतं मला. विश्वास नव्हता का माझ्यावर.?”

सागर: “ प्रीती, मी तुला विचारलं होतं तेव्हा सुद्धा तू सांगू शकली असतीस मला.”

प्रीती: “ मला माफ करा. पण खरंच सांगते प्रिया, मी अमर वर प्रेम करते ह्या गोष्टीची जाणीव मला लग्नाच्या दिवशी झाली. त्या आधी मी खूप प्रयत्न केला स्वतः ला त्याच्या पासून दूर ठेवायचा. पण त्या दिवशी मी स्वतः ला अडवू नाही शकले. तो एक शेवटचा चान्स होता माझ्याकडे.”

 प्रीती बोलत होती.

“ अमर त्या दिवशी तिथे आलेला होता. तू गेलीस त्या नंतर तो रूम मध्ये आला. आणि त्याला बघून काहीही विचार न करता मी त्याच्यासोबत निघून गेले “

प्रिया: “ तुझी खूप काळजी वाटत होती आम्हाला. तुला मी एक गोष्ट सांगितली नाही ह्याचा पश्चाताप होत होता मला. आणि अजून पण होतो.”

प्रीती: “ माहीत आहे मला. अमर तुला बघायला आला होता ना? सांगितलं त्यानी मला. तुझ्याशी लग्न करून माझ्या जवळ राहता येईल असं वाटतं होतं त्याला. सगळं सांगितलं त्यानी मला.”

सागर: “ पण आता अमर कुठे आहे. तू त्याला सांगितलं का की तुझी गाडी बंद पडली.”

प्रीती: “ हो त्याला माहीत आहे. येईल तो मला घ्यायला.”

प्रिया: “ तुम्ही इतके वर्ष कुठे होतात?”

प्रीती: “ पळून गेल्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्हीसुद्धा मंदिरात लग्नं केलं. त्याच्या घरच्यांनी माझा स्वीकार केला नाही मग आम्ही मुंबई सोडून पुण्याला आलो. तिथे दोन वर्ष जॉब केला आणि इथे आता दोन वर्ष झालीत येऊन.”

प्रिया: “ तो तुला सुखात ठेवतो ना? तू खुश आहेस?”

प्रीती: “ हो तो खूप सुखात ठेवतो मला. प्रिया आई बाबा कसे आहेत? त्यांना येते का माझी आठवण? आणि तुमचं लग्नं कधी झालं.?”

प्रीतीने एका दमात सगळे प्रश्न विचारले.

प्रिया: “ तू निघून गेलीस आणि माझं आयुष्य बदललं. काका काकू अगदी खचले होते. दारात वरात होती पाहुणे होते. सगळ्यांच्या समोर हस तर होणारच होतं. पण त्या पेक्षा मुलीचं लग्नं बघता येणार नाही म्हणून काकुंना जास्तं वाईट वाटत होतं. माझ्या आई बाबांशी बोलून काकांनी माझ्या लग्नाची संमती मिळवली. सागरचे आई बाबा सुद्धा तयार झाले. मग काय घरच्यांच्या इज्जतीसाठी, त्याचं दिवशी त्याचं मांडवात आम्ही लग्नं केलं.”

“मला खूप राग येत होता तुझा. पण हळू हळू समजलं की तू जे केलं ते प्रेमापोटी.”

“सोपं नव्हतं आमच्यासाठी एकमेकांचा स्वीकार करणं. सुरुवातीला आमच्यात एक वेगळच अवघडपण होतं. आम्ही बोलत सुद्धा नव्हतो. पण नंतर आम्ही हळू हळू मित्र झालो आणि आमच्या नात्याचा स्वीकार करायला लागलो. जवळ जवळ वर्ष लागलं आम्हाला हे सत्य स्वीकार करायला.”

तितक्यात परत डोअर बेल वाजली. सागरने दार उघडलं. डिलिव्हरी बॉय होता. त्यानी पार्सल घेतलं. डिनर आणि केक आला होता .

प्रीती: “ केक? आज काही विशेष आहे का?”

सागर: “ हो. आमचं लग्न जरी त्या दिवशी झालं असलं तरी आम्ही आमच्या लग्नाचा वाढदिवस आजच्या दिवशी साजरा करतो. म्हणजे आजच्या दिवशी आम्ही आमच्या नात्याला स्वीकारून, नवरा बायको म्हणून नवीन आयुष्य सुरू केलं होतं.”

प्रीती: “ अरे वाह छानच. पण मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालं.”

सागर: “ झालं गेलं विसरून जा. शेवटी बंध प्रेमाचे असतात.”

प्रीती: “ खरं आहे. पण मी जे वागले ते योग्य नव्हतच. प्रिया सांग ना आई बाबा कसे आहेत.? माझी आठवण काढतात का?”

प्रीतीच्या प्रश्नाने प्रियाने सागरकडे बघितलं. त्याला काहीतरी खुणावले तसा तो उठून आत गेला. प्रीतीच्या लक्षात येत नव्हत की काय सुरू आहे?

प्रीती: “ प्रिया सांग ना? ते खूप रागावले असणार नक्कीच.”

प्रिया: “ सांगते थांब.”

तितक्यात सागर आतून एक लाकडाचा बॉक्स घेऊन आला. त्यांनी तो प्रियाला दिला. प्रिया तो बॉक्स प्रीतीला देत बोलू लागली.

प्रिया: “ काकू मला त्यांच्या सोबत घेऊन गेल्या होत्या ते हा बॉक्स देण्यासाठी. हा तोच बॉक्स आहे जो काकूंनी तुझ्यासाठी दिला होता मला. मी हा बॉक्स आजपर्यंत उघडून बघितला नाही. तो मी जपवून ठेवला होता. प्रीती काकू आता आपल्यात नाहीत. सहा महिन्यापूर्वीच त्या गेल्या. “

प्रीती त्या बॉक्सकडे बघत होती त्यावर हात फिरवत होती जणू तिच्या आईचा स्पर्श तिला जाणवत होता. आई या जगात नाही ऐकून प्रीती खूप रडली. रडता रडता तिने तो बॉक्स उघडला. त्यात तिच्या बालपणीच्या काही गोष्टी होत्या. तिचा ड्रेस होता. तिची बाहुली होती. तिचा पहिला शूज होता. तिने केलेले पाहिले पेंटिंग होते. अशा खूप गोष्टी होत्या त्यात. आणि सगळ्यात खाली तळाशी आईच्या हस्ताक्षरातले पत्र होते. जे त्यांनी प्रीती साठी लिहिले होते. प्रीती ते वाचत होती. तिचे अश्रू थांबत नव्हते. खूप दिवसांनी ती मोकळी होत होती. त्यामुळे प्रिया आणि सागरने तिला अडवले नाही.

थोड्यावेळाने प्रीती शांत झाली. तितक्यात अमरचा फोन आला. प्रीतीने त्याला प्रियाच्या घराचं पत्ता सांगितला.

प्रीती: “ आणि बाबा?”

प्रिया: “ काका आता खूप एकटे पडले आहेत. तुझी आठवण करतात. तुझी वाट बघतात. कधीतरी तू येशील या आशेवर जगत आहेत. काकूंनी सुद्धा खूप वाट बघितली तुझी पण.”

सागर: “ प्रीती आता तरी घरी जा काकांना भेट.”

प्रीती: “ कुठल्या तोंडाने जाऊ मी?”

सागर: “ त्यानी तुला कधीच माफ केलं. तू मुलगी आहेस त्यांची. आता कमीत कमी काकांना भेटून त्यांची इच्छा पूर्ण कर. माफी माग त्यांची.”

प्रीती: “खरं आहे. मी नक्की जाईल लवकरच.”

तितक्यात परत दार वाजतं. सागरने दार उघडून अमरला आत येण्यास सांगितले. अमर अवघडलेल्या पावलांनी आत येत होता. त्याच्या सोबत त्याची तीन वर्षांची मुलगी होती. त्याला बघतच प्रीतीने त्याला मिठी मारली. ती रडत होती.

प्रीती: “ अमर माझी आई गेली कायमची सोडून. मला एकदा दिसली सुद्धा नाही रे.”

अमरला सुद्धा वाईट वाटलं ऐकून. आर्याला म्हणजे प्रीतीच्या मुलीला बिचारीला काही कळत नव्हतं की तिची आई का रडते आहे.? अमरने प्रीतीला शांत केलं.

आर्य तिच्या आईला चिकटून बसली होती. तिच्या कडे बघत प्रियाने तिला जवळ घेतलं. आर्य सुद्धा लगेच तिच्या जवळ गेली. तिच्या बोबड्या भाषेत प्रियाशी बोलत होती.

आर्य: “माझं नाव आल्या. तू पिया मोशी ना? मला मम्मा चांगते."

तिचं बोलणं ऐकून प्रियाने तिला घट्ट जवळ घेतलं तिचे खूप लाड केले.

थोडावेळ सगळे गप्प होते. मग अमरनेच बोलायला सुरुवात केली.

अमर: “ प्रिया माफ कर त्या दिवशी जे वागलो ते बरोबर नव्हतं. पण प्रीतीच्या नकारामुळे मी काय वागतो आहे हे माझं मलाच कळत नव्हतं. सागर तू ही माफ कर मला.”

प्रिया: “ जे झालं ते झालं. आता पुढे बघायचं.”

सागर: “ खरं आहे. तू प्रीतीला तिच्या बाबांच्या भेटायला घेऊन जा लवकरात लवकर. आणि तुझ्या घरीसुद्धा जा. त्यांना भेट कदाचित त्यांचा राग सुद्धा गेलेला असेल. जर नसेल झालं तर नातीला बघून नक्कीच तुम्हाला माफ करतील.”

अमर: “ हो मी पुढच्याच आठवड्यात जातो.”

त्या नंतर सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या प्रिया आणि आर्याची छान गट्टी जमली होती.

सागर आणि प्रियाने केक कापला. सगळ्यांनी डिनर केलं. उशीर झाला म्हणून आग्रहाने प्रिया आणि सागरने त्यांना थांबवून घेतलं. ती रात्र मुक्कामी थांबून अमर आणि प्रीती निघून गेले. पण परत आणि नेहमी भेटत जाऊ या बोलीवर.

पुढच्या आठवड्यात प्रीती आणि अमर आर्यला घेऊन भारतात गेले. प्रीतीच्या वडिलांना भेटले. त्यांना प्रीतीला बघून खूप आनंद झाला. एकमेकांना बोलून दोघे मोकळे झाले. नाती सोबत सुभाषराव मनसोक्त राहिले.

अमरच्या घरच्यांनी सुद्धा त्यांना स्वीकारले. नातीचे लाड करून ते थकत नव्हते.

प्रीती आणि अमर प्रियाच्या आई बाबांना सुद्धा भेटले.

रेवती आणि रमेशरावांनी प्रीतीचं माहेरपण अगदी तसं केलं जसं आनंदीने केलं असतं.

काही दिवस राहून प्रीती अमर परत ऑस्ट्रेलियाला निघून गेले त्यांच्या सोबत रेवती आणि रमेशराव सुद्धा आले. प्रियाच्या बाळंतपणासाठी.

प्रीती आणि रेवतीने, प्रियाचे डोहाळे जेवण केलं आणि बाळंतपण देखील केलं.

धन्यवाद....

तुम्हाला माझी कथा कशी वाटली नक्की सांगा. आणि लाईक करायला विसरू नका.  पुन्हा भेटू एका नवीन कथेसह.

🎭 Series Post

View all