बंध प्रेमाचे... भाग ६

आता प्रीतीच्या डोळ्यात पाणी होतं. तिने प्रियाला तिच्या आईच्या तब्बेतीबद्दल सांगितले आणि ती र??

मागील भागात आपण बघितले...

सागर जाणार नाही ह्याचा आनंद सगळ्यांनाच झाला, पण प्रीती मात्र अजून सुद्धा जरा विचारात होती, ही गोष्ट प्रियाच्या लक्षात आली. सागर गेल्यावर प्रिया प्रीतीला घेऊन बाहेर गेली.

आता पुढे....

प्रिया आणि प्रीती बाहेर गेल्या. दोघी त्या जवळच्या पार्क मध्ये नेहमीच्या जागी जाऊन बसल्या. “ मी आलेच एक मिनटात “ असं म्हणत प्रिया जवळ जवळ पळतच पार्कच्या बाहेर गेली. समोर बसलेल्या भेळवाल्याकडून दोन भेळ घेतल्या आणि तशीच धावत परत आली.

एक भेळ प्रीतीला देत म्हणाली, “ घे तुझी आवडती भेळ. आता सांग काय झालंय? तोंडावर बारा वाजल्यासारखं दिसतंय."

प्रीतीने भेळ हातात घेतली, एक घास खाऊन झाल्यावर प्रियाकडे बघत म्हणाली “ अगदीच तसं काही नाहीये गं, पण माझ मलाच कळतं नाहीये इतकचं.'

प्रिया: “ आता नीट सांग काय झालं ते? उगाच घुमुन फिरून बोलू नकोस."

प्रीती: “ प्रिया सगळं खूपच फास्ट होतंय असं वाटतं गं."

प्रिया: “ हो फास्ट तर झालंच आहे. पण मला सांग तुला सागर आवडला नाही का?”

प्रीती: “ तसं नाही गं, सागर मला छान वाटला. पण खरं सांगू तर मला थोडावेळ हवा होता."

प्रिया: “ अगं मग सांगायचं ना तसं काका काकूंना नाही थोडीच म्हणाले असते ते."

प्रीती: “ कोणीच जबरदस्ती नाही केली प्रिया, उलट आता सुद्धा सागर तेच सांगायला आला होता की, तू हवं तर अजून वेळ घे निर्णय घ्यायला."

प्रिया: “ मग काय प्रॉब्लेम आहे?”

आता प्रीतीच्या डोळ्यात पाणी होतं. तिने प्रियाला तिच्या आईच्या तब्बेतीबद्दल सांगितले आणि ती रडू लागली. प्रियाला ऐकून धक्काच बसला, तिला सुद्धा रडू येत होतं. आनंदी आणि तिचं नातं खूप वेगळं होतं.

प्रीती: ‘” मी हा निर्णय आईसाठी घेतला. सागर आणि त्याच्या घरचे खरंच खूप चांगले आहेत, त्यात काही वादच नाही. पण हे सगळं इतक्या झटपट होतंय की मला काही सुचत नाहीये.”

प्रिया: “ म्हणजे? नीट सांग मला."

प्रीती: “ सागरने काल सांगितलं की तो बघताच क्षणी माझ्या प्रेमात पडला. मला तो चांगला वाटला पण प्रेमात पडेल का मी हा प्रश्न आहे?"

प्रिया: “ तू डोक्यावर पडली होतीस का गं लहानपणी? अजून काल तुम्ही भेटलात. त्याच्या फीलिंग्ज त्यानी तुला सांगितल्या. तुला त्याच्याबद्दल काही वाटणार की नाही हे तू आत्ताच कसं ठरवू शकतेस?”

“ त्याला वेळ दे, होईल सगळं हळू हळू. आणि अरेंज मॅरेज मध्ये आधी लग्नं आणि मग प्रेम होतं.”

प्रीती: “ हो ते बरोबर आहे पण हे सगळं पचनी पडायला थोडा वेळ लागेल मला."

प्रिया: “ तू आई साठी निर्णय घेतला आहेस ना, मग तू विचार पण केला असशीलच की. उगाच निर्णय घेणारी तू नाहीस. आणि आता तू निर्णय घेतला आहेस तर आहे ते मान्य कर आणि पोझिटीवली घे. उगाच नसते विचार डोक्यात आणून अजून प्रॉब्लेम्स का तयार करतेस?”

प्रीती: “ हो खरं आहे. आता जे आहे ते आहे. मेन म्हणजे सागर चांगला आहे. त्याला माझ्या करिअरचा सुद्धा काही प्रोब्लेम नाही.”

“मीच उगाच नको ते विचार करते आहे."

प्रिया: “ गूड गर्ल. आता मस्त हसत रहा. काकूंना पण बरं वाटेल. आणि आता सागरला वेळ दे, त्याला समजून घे. समजलं?”

प्रीती: “ येस बॉस. बरं वाटलं तुझ्याशी बोलून. आता ब्रेन वॉश झाला माझा."

प्रीती आता खरंच फ्रेश दिसत होती. तिच्या डोक्यातले विचार निघून गेले होते. थोडावेळ दोघी तिथेच बसून होत्या. इकडच्या तिकडच्या गप्पा, हसणं बोलणं झाल्यावर दोघी परत घरी जायला निघाल्या. जाताना एकमेकींना मिठी मारली. आणि हसून आप आपल्या घरी परतल्या.

प्रीती घरी पोहोचली तितक्यात सागरचा फोन तिला आला.

सागर: “हॅलो”

प्रीती: “ हाय, पोहोचलास् घरी?”

सागर: “ हो अग केव्हाच पोहोचलो. मी तुला विचारायला कॉल केला की, तू उद्या फ्री आहेस का तर संध्याकाळी भेटू आपण?”

प्रीती: “ हो, पण मला आधी बाबांना विचारावं लागेल."

सागर: “ अगं माझं बोलणं झालय काकांशी त्यांची काही हरकत नाहीये."

प्रीती फोन वर बोलत होती आणि तिचे बाबा समोरच उभे होते, त्यानी तिला खुणेनेच सांगितलं की तू जा म्हणून.

प्रीती: “ ओके मग मी ऑफिस मधून निघाले की सांगेल तुला."

सागर: “ नाही नको, त्यापेक्षा मी तुला ऑफिस जवळ घ्यायला येतो."

प्रीती:” चालेल."

सागर: “ संध्याकाळी पाच वाजत भेटू मग."

प्रीती: “ ओके ."

असं म्हणत दोघांनी फोन ठेवला. प्रीती जरा लाजली. उद्या येतोय ऑफिस जवळ घ्यायला असं बाबांना सांगून आत पळाली. सुभाषराव आणि आनंदी तिला हसत होते.

*******************************************

दुसरीकडे...

प्रीतीला बाय करून प्रिया घरी पोहोचली. तोच तिचा लहान भाऊ पराग हॉलमध्ये नाचताना दिसला. नाचत कसला उड्याच मारत होता. प्रियाला बघून धावतच तिच्याकडे आला, तिला हाताला धरून हॉलमध्ये घेऊन गेला आणि तिच्याभोवती नाचू लागला. तिला कळत नव्हतं की काय झालंय..

समोर सोफ्यात तिची आई रेवती आणि बाबा रमेश बसले होते.

तिने त्यांना विचारलं “ काय झालं याला? रिझल्ट होता का कोणता ह्याचा? “

त्यावर पराग जोरात हसला “ तायडे रिझल्ट नव्हता गं कोणता, पण एक गोष्ट होणार आहे आता म्हणून मला खूप आनंद झाला आहे ."

पराग: “विचार विचार काय होणार आहे?”

प्रिया: “काय?”

तिने असं विचारताच परागने एकदम बेसूऱ्या आवाजात गायला सुरुवात केली.

पराग: “ गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी."

प्रिया: “ ओय, काय बडबडतो आहेस..? अरे मी नाही तुझी प्रीती ताई होणार आहे नवरी."

पराग काही बोलणार तितक्यात रेवती बोलू लागली...

रेवती: “ पराग एक मिनिट, आम्हाला बोलुदेत तिच्याशी."

पराग: “ बरं, पण...गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी."

असं परत नाचायला लागला. रमेशरावांनी त्याला जरा रागवल तसा तो गप्प खाली बसला तरी सुधा गालातल्या गालात हसत होता. प्रियाला त्याचं ते वागणं फार इरीटेटिंग वाटत होतं. पण ती शांत होती . रेवती पुढे बोलू लागली. प्रीती बद्दल विचारणा केली. प्रियाने सगळं सांगितलं की प्रीतीच्या आईला कॅन्सर आहे. सागरची पण भेट झाली, तो पण चांगला आहे.

आनंदी बद्दल ऐकून रेवती आणि रमेशरावांना सुद्धा वाईट वाटले. पण सागर बद्दल ऐकून आनंद झालं. सगळं बोलून झाल्यावर रेवतीने विषयाला सुरुवात केली.

रेवती: “ हे बघ प्रिया, आता प्रीतीचं लग्नं होणार, आम्हाला सुद्धा आता असं वाटतं की तुझ्या साठी सुद्धा मुलगा बघायला सुरुवात करावी."

प्रिया: “ आई काहीही काय? तिचं लग्न होणार म्हणून मी पण लग्नं करायचं हे कोणतं गणितं आहे?”

रमेशराव: “ प्रिया अगं, ह्या गोष्टी काही एकदम घडतं नसतात, वेळ लागतो त्याला. प्रीतीचं एका दिवसात लग्नं ठरलं म्हणजे तुझं पण लगेच ठरेल असं नाही."

प्रिया: “ पण काय घाई आहे इतकी?”

रेवती: “ घाई नाही आम्ही तुला फक्त सांगतोय, बाकी योगाच्या गोष्टी असतात हया. सगळ्या गोष्टी योग्य वेळेत व्हायला हव्यात."

रमेशराव: “ आम्हाला फक्त इतकाच विचारायचं होतं की, तुला कोणी आवडतं असेल तर सांग, आम्ही भेटू त्याला."

प्रिया: “ बाबा असं काही नाहीये, असतं तर मी सांगितलं असतं तुम्हाला."

रमेशराव: “ आम्हाला माहीत आहे की तुझं असं काही नाही तरी एक पालक म्हणून तुला विचारणं कर्तव्य आहे आमचं."

रेवती: “ प्रिया तू तुझ्या करिअर वर लक्ष दे, आम्ही आमचं काम करतो. आला एखादा मुलगा लक्षात की सांगू तुला. तू तुझं काम कर आम्ही आमचं काम करतो. मग तर झालं?”

प्रिया: “ ठिक आहे. करा काय करायचं ते."

असं म्हणत प्रिया मनातल्या मनात प्रीतीला शिव्या देत तिच्या खोलीत निघून गेली.

 बेड वर पडल्या पडल्या तिने प्रीतीला मेसेज केला...

“ तू भेट उद्या, मग बघते तुला. सगळं तुझ्यामुळे होतंय.”

तितक्यात पराग परत मोठ्याने गाणं म्हणत त्याच्या खोलीत गेला “गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी."

आता मात्र प्रिया चिडली होती, तिने उठून खाडकन तिच्या खोलीचा दरवाजा लाऊन घेतला.

परत बेड वर आडवी झाली तोच तिला प्रीतीचा मेसेज आला..

“ उद्या मला लेट होईल यायला, सागर भेटणार आहे संध्याकाळी. काय झालं? का चिडलिस इतकी? आपण परवा भेटू नाहीतर रात्री भेटू जमलं तर, ओके?”

प्रियाने मेसेज वाचला. सागर भेटणार वाचून तिला छान वाटलं, पण प्रीती तिला भेटणार नाही म्हणून जरा नाराज झाली. तरी प्रीतीला “ओके” चा मेसेज करून तशीच पडून राहिली..

पुढच्या भागात बघू प्रीती आणि सागरची भेट, प्रियाची चिडचिड, वाचत रहा बंध प्रेमाचे...

क्रमशः

प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला माझी कथा कशी वाटली, नक्की सांगा, तुमचा अभिप्राय हा लेखकाचे प्रोत्साहन वाढवतो. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. वाचत रहा... बंध प्रेमाचे..

🎭 Series Post

View all