बंध प्रेमाचे...भाग ३

सागर उठून आत प्रीतीच्या रूम मध्ये गेला. रूमचा डोअर उघडा होता. त्यानी डोअर वर नॉक केलं.
प्रीतीला भेटून घरी निघतानाच त्याने त्याच्या आई वडिलांना “ मला मुलगी आवडली” असं कळवल सुद्धा,
आणि प्रीती घरी पोहचेपर्यंत, सागरच्या बाबांनी तिच्या घरी होकार पण दिला होता....

प्रीती, प्रियाचा निरोप घेऊन घरी पोहोचली. तिला बघून आनंदीने म्हणजे तिच्या आईने तिला दारातच मिठी मारली. प्रीतीला कळतं नव्हतं काय झालय ते.?

सुभाषराव म्हणजे प्रीतिचे बाबा, ते कोणाशीतरी फोन वर बोलत होते.

प्रीती घरात आली, हातातली बॅग खुर्चीवर ठेवली आणि सोफ्यात बसली. तितक्यात आनंदी पाणी घेऊन आली.

आनंदी: काय हो काय म्हणालेत?

सुभाषराव: हो म्हणालेत.

आनंदी: अगं बाई, आवरायला हवं, प्रीती तू पण जा लवकर फ्रेश हो आणि बाहेर ये. आणि हो घरातले कपडे नको घालूस, चांगला ड्रेस घाल हो.

सुभाषराव: तासाभरात येणार आहेत ते, आवरा लवकर.

आनंदी: अगं बसलीस काय अशी बघत, जा आवर, मी चहा करते तुझ्यासाठी तोपर्यंत.

प्रीती: चाललय काय? कोणी सांगेल का मला? मघापासून बघतेय, कसली गडबड सुरू आहे.? आणि आई तू काय अशी दारातच मिठी मारलीस मला? खूप वर्षांनी भेटल्या सारखी, सकाळीच भेटलो होतो आपण. काय हे सगळं? अगं चाललीस कुठे?
प्रीती बोलत होती पण आनंदी किचन मध्ये निघून गेली.

सुभाषराव: प्रीती तू दमली असशील, तू फ्रेश हो आणि चहा घे, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. त्यामुळे आवर आणि आईला स्वयंपाकात मदत कर. जा बाळा आवर...

असं बोलत सुभाषराव सुद्धा बाहेर निघून गेले, जाताना...

“ आनंदी काही हवं असेल अजून तर लगेच फोन कर बरं, येतोच मी लगेच जाऊन”.

प्रीतीला काहीच समजत नव्हते. ती आपली बडबडत उठली.
‘ कोणी काही सांगत नाही, काही नाही, पाहुणे येणार आहे, पण कोण? कुठले? कशाला? काहीच सांगत नाही. मला काय मी होते तयार. आई येते फ्रेश होऊन.’ असं म्हणत तिच्या रूममध्ये निघून गेली.

थोड्यावेळात फ्रेश होऊन ती बाहेर आली. आनंदीने चहा तयार करून ठेवला होता, तो घेत प्रीती विचारू लागली ..

प्रीती: आता तरी सांग कोण येणार आहे?

आनंदी: अगं थांब कळेलच तुला.

प्रीतीने उत्तर ऐकून जरा तोंड वाकडं केलं.

प्रीती: बरं स्वयंपाकाला काय करायचं आहे? आणि असं अचानक का कोणाला बोलावलं जेवायला?

मला वाटलं होतं, तुम्ही माझी वाट बघत असाल. पण तुमचं तर वेगळंच सुरू आहे काही.

प्रीतीच्या बोलण्यावर आनंदी गालातल्या गालात हसत होती. जे प्रीतीला अजूनच खटकत होतं.

आनंदी: हे बघ बाबा श्रीखंड, गुलाबजाम, आणि आईस्क्रीम आणायला गेले आहेत. म्हणजे स्वीटचा प्रश्न संपला, मी कांदे भजींची तयारी करून ठेवली आहे, आता जीरा राइस करू, दाल तडका, मटर पनीर आणि... आणि..... भरली भेंडी, पुऱ्या. झालं इतकचं. आणि हो कोशिंबीर, सोबतीला पापड तळू. कोथिंबीरीच्या वड्या केल्या असत्या पण आता वेळ कमी आहे.

प्रीती आनंदीचं बोलणं ऐकून डोळे मोठे करत म्हणाली....

प्रीती: बास अजून काही नाही? आई इतकं कोण येणार आहे ज्यांच्या साठी पंच पक्वान्न बनवायचे आहे.

आनंदीने प्रितीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिला
“मदतीला ये, प्रश्न नंतर विचार” असं सांगितले.तशी प्रीती उठली आणि कामाला लागली. थोड्यावेळात सुभाषराव पण आलेत.

सुभाषराव: प्रीती हे घे सगळं फ्रिज मध्ये ठेव, आणि जेवण झाल्यावर ही पानं द्यायला विसरू नकोस.

प्रीती काही बोलणार तितक्यात डोअर बेल वाजली.

आनंदीने प्रीतीला दार उघडायला सांगितले. तशी आधीच रागात असलेली प्रीती, तन-तन करत दार उघडायला गेली. दार उघडताच तिला समोर सागर दिसला, त्याच्या सोबत त्याचे आई बाबा आणि बहिण होती. सागरला असं अचानक बघून प्रीती चक्रावून गेली. पण त्यांना बघून तिच्या लक्षात आलं की, घरात जे काही साग्रसंगित सुरू आहे ते ह्या पाहुण्यांसाठीच.

तिने हसत त्यांचे स्वागत केले. सगळे घरात आले. नीलूने म्हणजे सागरच्या आईने प्रितीच्या हातात मिठाईचा बॉक्स दिला आणि तिच्या चेहेऱ्यावरून हात फिरवत म्हणाली...

नीलू: खरंच खूप सुंदर आहे हो मुलगी, म्हणूनच आमच्या सागरला पाहताक्षणीच आवडली.

आता प्रीतीच्या हळू हळू सगळं लक्षात येत होतं की काय घडतंय ते.

सुभाषराव आणि अजयराव एकमेकांना मिठी देत
“ व्याही होणार आता” असं म्हणत खुशीत होते.

नीलू आणि आनंदी पहिल्यांदाच भेटत होत्या, पण त्या ही “विहिणबाई कशा आहात ?” असं बोलत होत्या.

प्रीती सगळं बघत होती, तिला सुचत नव्हतं काय बोलावं. तितक्यात सागरची बहिण, (स्नेहा)

“दादा चॉईस एक नंबर हा”

म्हणत प्रीतीला त्याच्या जवळ घेऊन गेली.

प्रीतीच्या डोळ्यात मात्र अनेक प्रश्न होते. सागरला ते स्पष्टपणे दिसत होतं. ती पूर्ण भांबावून गेली होती. तिला कोणीच बोलूदेत नव्हतं.

काय करावं कसं करावं ह्या विचारात ती होती.
सगळे, सोफ्यात बसले. आणि प्रीती धावत आत निघून गेली..

ती अशी गेलेली बघून सगळे एकदम शांत झाले, एकमेकांकडे बघत होते, कोणाला कळत नव्हतं की ती अशी का निघून गेली.
पण सागरला मात्र समजत होतं.

सागर: काका इफ यु डोन्ट माईंड, मी बघू का काय झालंय ते? मी बोलतो तिच्याशी...

सुभाषरावांनी आनंदी कडे बघितलं, तिने डोळ्यांनीच होकार दिला.

सुभाषराव: हो चालेल, बघ बाबा तूच. असं कधी वागली नाही ती या आधी, असं अचानक काय झालं बघ तूच.

सागर: काळजी नका करू, मी प्रयत्न करतो बोलायचा.
सागर उठून आत प्रीतीच्या रूम मध्ये गेला. रूमचा डोअर उघडा होता. त्यानी डोअर वर नॉक केलं.

प्रीती खिडकी जवळ उभी होती, तिने मागे वळून बघितलं...

सागरला बघून ती जरा चकित झाली. पण तिने लगेच त्याला आत येण्याची परवानगी दिली. ...

पुढच्या भागात बघू, काय होतं ते, प्रीती हो म्हणेल की नाही?



क्रमशः

🎭 Series Post

View all