Oct 18, 2021
कथामालिका

चक्रव्यूह अखेरचा भाग

Read Later
चक्रव्यूह अखेरचा भाग
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now


श्रीधर – तू कधी ना कधी तुझं राधावर प्रेम आहे हे सांगणार मला माहीत होतं . जेव्हा तू माझ्याजवळ व्यक्त झालास ना तेव्हा माझ्या डोक्यात एक प्लँन आधीच तयार होता... आणि हो , ते मृत्यूपत्र.. आप्पांनी हे घर , ही बाग तुझ्याच नावे केली होती हे आम्हाला ते वकील होते आप्पांचे खानविलकर यांच्याकडून कळलं आणि मृत्यूपत्र बदलून टाकलं. आप्पांची खोटी सही बाबांना करता येत होती त्यामुळे ते मृत्यूपत्र आप्पांनीच केलंय असं सगळ्यांना वाटलं आणि स्पेशली तुझ्या नजरेत आप्पा वाईट झाले.. तू राधाकडे जाण्यासाठी तयार होत असताना राधाला तू येत असल्याचा निरोप बंडूकडून पोहचला होता. आपण जेव्हा तुझ्या एम ए टी वरून जात होतो ना राधाकडे तेव्हा तिचं असं अचानक समोर येणं हा देखील काही योगायोग नव्हता दोस्ता . राधाने भर रस्त्यात धावत येणं वगैरे तो सुध्दा एक प्लँन होता. मग मंदीरात तुम्हा दोघांचं लावून दिलेलं लग्न.. ते सुद्धा ठरवून केलेलं होतं.. आणि राधाचे बाबा राधाला त्रास देत नव्हते.. तू पाहीलंस का तिच्या बाबांना तिला त्रास देताना.. ते देखील मुद्दाम तुझ्या मनात वाईटसाईट भरवण्यात आलं. तिच्या वडीलांनाही आणि आईलाही धोका दिला.. त्यांना सांगितलं की मी करेन राधाशी लग्न पण मी मुद्दाम तुझ्या गळ्यात घातली तिला.. कारण तिचा उपभोग घेऊन झाला होता माझा. आता तिच्या पोटात माझं बाळ वाढत होतं. तुमचं लग्न लावून तुम्हाला घरात आणलं..राधा तुझी पत्नी कायदेशीर रित्या काही दिवसाने झाली पण ती नेहमी म़ाझीच होती . तुला वाटत होतं आणि तुझा सुखी काळ सुरू झालाय पण खरा सुखी काळ आमचा सुरू झाला होता.. राधाला काही गोष्टी खटकल्या पण तिचा नाईलाज होता. तिच्या पोटात माझं बाळ वाढत होतं आणि मी माझ्या बाळाला असं मरून देणार नव्हतो. मध्ये मध्ये तिचे बाबा यायचे ना .. तो तुला त्रास द्यायला नाही तर सत्य सांगण्यासाठी यायचे पण माझं नशीब की तू त्यांचं काही ऐकून घेत नव्हतास.. काही दिवसांनी राधाला मुलगी झाली आणि ती मुलगी म्हणजेच ही.  आराधना !

आराधना – मी तुझी नाही.. ह्या माणसाची म्हणजे श्रीधर प्रभाकर जोशी यांची मुलगी आहे.. तू जिच्यावर मनापासून प्रेम केलंस ती राधा माझीच आई.

श्रीधर -  बाबांनी बंडूसाठी मुलगी बघितली.. बंडूचं लग्न झालं.. बंडूची बायको प्रेग्नंट झाली.. काही महिन्यात बंडूला मुलगा झाला.. अशातच राधाचे बाबा दारू पिऊन आले.. पुन्हा तुला सत्य सांगू लागले पण पुन्हा एकदा माझं नशीब की तू त्यांना काही सांगितलं नाहीस.. आणि मला ही एक गोष्ट माहीत होती की तुझा स्वतः च्या रागावर ताबा ठेवता येत नाही. रागाच्या भरात तू समोरच्या माणसाचा जीव सुध्दा घेऊ शकतोस.. आणि झालंही तेच.. रागाच्या भरात तू राधाच्या वडीलांचं डोकं आपटलंस .. तिचा बाप गेला.. बाय द वे तिच्या आईला मी नाही मारलं.. तिच्या आईला राधाचे बाबा मारायचे.. माझ्यावरचा राग ते त्या बिचाऱ्या माऊलीवर काढायचे.. असे मार खाऊनच राधाची आई गेली..जेव्हा तू राधाच्या बापाला मारलंस ना तेव्हा तुला सहज जेलमध्ये टाकता आलं असतं.. पण आम्हाला तुझा वापर करायचा होता. तुला आमच्या ताटाखालचं मांजर करायचं होतं. आमच्या हाताने नरकात पाठवायचं होतं.. तू आधीच तापट होतास.. मेंदूत अक्कल नावाची गोष्ट तुझ्या लहानपणीच नव्हती.. आणि दुसरी गोष्ट.. जी तुला आठवत नाहीये.. राधाने जीव नव्हता दिला.. तू तिला विहिरीत ढकललं होतंस. तुला तुझा अर्धवट भूतकाळ आठवतोय म्हणून सांगतोय हे तुला. त्यारात्री अंधारात राधा तुझा हात पकडून विहीरीपाशी घेऊन आली. तुला माझं , बाबांचं सगळं सत्य सांगितलं. ती तुझ्यात गुंतत चालली होती. तुला अजून फसवणं तिला अवघड वाटत होतं. तिने तुला सत्य सांगितलं पण तिने तुला फसवलं , तिने तुझ्या प्रेमाचा खेळ केला ह्या गोष्टीचा तुला राग आला.. आणि तू ढकलून दिलंस तिला विहीरीत.. हे सगळं मी माड्यावरच्या खिडकीतून लपून बघत होतो.. तिच्या किंचाळण्याचा आवाज देखील आला.. सगळे तेव्हा उठले. आराधना रडू लागली.. आणि तू मागल्या पडवीत येऊन बेशुद्ध झालास.. तुला लहानपणापासूनच अनेक वेळा फिट यायची.. तू बेशुद्ध पडलास आणि मी एक चिठ्ठी लिहीली.. तुला वाटलं ती राधाने लिहील्ये पण ते माझं अक्षर होतं. तुला तर साधं माझं अक्षरही ओळखता आलं नाही रे ! तू दुसऱ्या दिवशी विहिरीपाशी गेलास तेव्हा तुला वाटलं की राधाने आत्महत्या केली.. कारण फिट येण्याआधी तुझ्या आयुष्यात काय घडलंय हेच तुला आठवायचं नाही.. याचाच हा फायदा... आणि एक गोष्ट सांगायची राहीली.. बंडूची बायको..

बंडू – माझ्या बायकोला मीच ढकललं विहीरीत.. तिला आमचं खरं रूप तुझ्यासमोर आणायचं होतं ! दिलं ढकलून.. तिलाही..

श्रीधर –  पण ह्या सगळ्यात आमचं एका व्यक्तीकडे दुर्लक्ष झालं.. विद्याधर काका.. त्याला आमचं खरं रूप कळलं होतं.. आणि आमचा प्लँन सुध्दा. त्याला कळलं होतं की आम्ही तुला मारून टाकणार आहोत. त्यानेच आमच्या नकळत आसावरीला आमच्याबद्दल सगळं सांगितलं..

मी – पण मीच तिला म्हटलं होतं की मला ह्या घरात नाही रहायचं म्हणून. तेव्हा म्हणूनच ती मला असं म्हणली श्रीधरला काही सांगू नको..नंतर काही तासांनी तिने तुमच्या नकळत पुण्यात नेलं.

श्रीधर – तिथेच सगळा डाव आमचा फिस्कटला... नंतर आम्हाला कळलं की विद्याधर काकाला आणि त्याच्या बायकोला आमचं खरं रूप कळलंय.. त्यानेच आसावरी आणि तुला इथून कुठेतरी पाठवलेलं पण कुठे हेच कळलं नव्हतं. त्याला आणि त्याच्या बायकोला आम्ही वीजेचे झटके दिले तरीही सांगत नव्हते. आमचं लक्ष्य चुकवून दोघं एकदा घरातून पळू लागले पण सदाकाकाने विद्याधर काकाला पकडलं आणि पोटात चाकू खुपसला आणि तोच चाकू सदाकाका बेसावध असताना विद्याधर काकाने त्याला खुपसला आणि मग विद्याधर काका मेला. काकूला देखील आम्ही मारून टाकलं. अख्खं घराणं बरबाद झालं होतं.. आता घरावर आमचं राज्य ! पण अशातच एक बॉम्ब पडला. आप्पांनी बनवलेल्या मृत्यूपत्राची नक्कल व मृत्यूपत्राची नोंद रजिस्टर करण्यात आली होती त्यामुळे आम्ही बनवलेलं मृत्यूपत्र फेटाळण्यात आलं.. आता ह्या मृत्यूपत्रानुसार तू मालक होतास.. तुझं हक्कसोड पत्रक बनवून घेण्यासाठी तू हवा होतास.. आणि तुला मारूनही टाकायचं होतं मला.. पण तडफडून मारायचं होतं.. तुझा तेव्हा शोध सुरू झाला.. कसलीही खबर आम्हाला मिळत नव्हती. आसावरीच्या सासरच्या घरी देखील कुलूप होतं.. तुझा खूप शोध घेतला आणि तेव्हा तर तू लगेच सापडायला सोशल मीडिया तर नव्हतच.. अनेक वर्ष वाट बघितलेली तुझी.. खूप शोधलं तुला.. ह्याच काळात ही निलिमा माझ्या आयुष्यात आली.. ही सुद्धा ह्याच गावची.. आपला तो रघ्या इंदुलकर होता ना.. त्याची ही मुलगी. मी हळूहळू शेअर मार्केट मध्ये पडू लागलो.. तुझा शोध सुरू होताच. माझं पुणे – मुंबई , नागपूर , कोल्हापूर सगळीकडे येणंजाणं असायचं. मला काळांतराने एका मोठ्या कंपनीत जॉब मिळाला पण तिथे मी शेअर्सचे घोटाळे केले..ती कंपनी लॉसला गेली. पुन्हा कोकणात आलो. तेव्हा बाबा गेले.. बाबांच्या निधनाचा धक्का बसला आणि आई काही महिन्यांत गेली . ह्याच दरम्यान मला चारूहास झाला. मुलांचं शिक्षण , बायकोची स्वप्नं , माझी स्वप्नं मला पूर्ण करायची होती.. मी  पुण्यात नोकरीसाठी बायकोला आणि मुलांना घेऊन आलो. तिथेही चांगल्या केमिकल कंपनीत अकाउंटट म्हणून काम करू लागलो.. तिथे हिशेबात मी मुद्दाम घोटाळे केले.. त्या घोटाळ्यांतून मला चिकार पैसे मिळत गेले. मी बंडूला कोकणच्या घरात ठेवलं. त्याला आणि त्याच्या मुलाला पैसे देऊ लागलो. माझे घोटाळे बॉसला कळाले.. त्याने मला जेलमध्ये पोहचवण्याची पूर्ण व्यवस्था केली होती . मला जेलमध्ये पाठवेपर्यंत त्याची कंपनी कधीच उध्वस्त झाली.. गैरव्यवहाराप्रकरणी बॉसलाच खडी फोडायला जावं लागलं कारण मी ज्या चेकवर , अकाऊंट बुकवर आकडे मांडायचो ना तिथे बॉसच्या सह्या होत्या.  ती कंपनी बंद झाली पण मला नोकरी गेल्याचा काहीच फरक पडला नाही.. मी काही महिन्यांनी एका कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि मी पुण्यातल्याच एका कंपनीचा बिझनेस पार्टनर झालो.. हळूहळू मी भूतकाळ विसरत जात होतो असं अजिबात नाही. बाबांचं स्वप्न मी पूर्ण करणार होतो. साधारण 25-26 वर्षांनी कळलं की तू सुध्दा पुण्यात आहेस. आसावरी कोकणात आल्यावर तिने आणि तिच्या नवऱ्याने बंडूला सगळं सांगितलं कि तू कोमात कसा गेलास , कुठे आहेस वगैरे वगैरे ! तिला वाटत होतं की बंडू सामिल नाहीये आमच्यात..आणि तुझा पत्ता मला मिळाला.. तुझ्यापर्यंत सहजासहजी पोहचता नाही रे आलं मला. आसावरीने स्वतः चा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून तू ज्या घरात राहत होतास ना तिथे सीसीटीव्ही बसवले होते.. आणि तुझ्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी एक डॉक्टर होता.. ती अधूनमधून येत होती. तुझ्या प्रत्येक हालचालीकडे तिचं बारीक लक्ष होतं. ती तुझ्यासमोर का आली नाही माहीतीये ? तिला पुण्यात तुझ्यासमोर उभं राहणं सेफ वाटत नव्हतं. कारण त्या डॉक्टरला आम्ही एकेदिवशी घेरलं आणि जास्त पैसे देण्याचं आमिष दाखवलं. तो मान्यही झाला. तो आम्ही जसं सांगू तसंच करायला लागला.. तू बरा होऊ नयेस म्हणून त्याने माझ्या सांगण्यावरून बदल केला.. तुला चुकीच्या गोळ्या देत गेला पण नंतर तोच डॉक्टर डबल गेम करू लागला. त्याने आसावरीला सांगितलं की मी पुण्यात आहे ते.. माझी दोन्ही मुलं त्यावेळी मोठी झाली होती.. त्यांना माझ्याबद्दल , आपल्या सॉरी आमच्या घराण्याबद्दल सर्व माहीती दिली. माझ्या बाबांना कसा कमीपणा आला.. राधाला कसं तू मारलंस , मी आणि बाबा कसे बरबाद झालो आप्पांमुळे सर्वकाही नीट सांगितलं.

मी – थोडक्यात तू बिघडवलंस ह्यांना.

श्रीधर – बिघडवलं नाही रे.. जाण करून दिली त्यांना त्यांच्या कर्तृत्वाची. मी त्या डॉक्टरला गोळ्या बदलायला भाग पाडलं. त्या गोळ्यांमुळे तुझी मेंदूची स्मरण शक्ती नाजूक झाली. चुकीच्या गोळ्यांमुळे तुला चक्कर येऊ लागली आणि त्याच गोळ्यांचा इफेक्ट तुझ्या बॉडीवर होतोय.. तुझं शरीर हे असं काळंनिळं पडतं.. फार जुन्या गोळ्या होत्या त्या.. प्रचंड दुर्मिळ . वाळवीच ती.. माणसाचा मेंदू पोखरणारी. तुला डॉक्टर गोळ्या तर देत होता पण तू शुध्दीवर देखील आलास. मरणाच्या दारात होतास इतकी वर्ष. आसावरी आणि तिच्या नवऱ्याच्या कृपेने वाचलास. तुला तुझा भूतकाळ आठवावा म्हणून आसावरीने इतक्या वर्षांनी तुला कोकणात आणलं गेटटूगेदर च्या निमित्ताने.. तुला आपलं कोण परकं कोण हेच कळत नव्हतं रे. तुला आठवतंय का ? तू जेव्हा गेटटूगेदर साठी शाळेत गेलास तेव्हा तुझ्या मित्राने विलास अशी हाक मारली . तू हाकेला साद घातलीस.. तेव्हा मी तिथेच होतो.. तू तर तेव्हा एका क्षणासाठी स्वतः चं नावही विसरून गेलास.. तेव्हा म्हटलं की तुला कुठे काय आठवणार पण आसावरीने औषधं बदलली तुझ्या नकळत. तू रिकव्हर होत गेलास.. तुला तुझा भूतकाळ नकोसा झाला म्हणून पुन्हा गेलास पुण्यात.. तेव्हा मी मुद्दाम तुझ्यावर लक्ष ठेवायला आराधनाला त्या एसटीत बसवलं.. तुला पुण्यात गेल्यावर डॉक्टरांनी आसावरीच्या सांगण्यावरून  कोकणात जायला सांगितलं..ती तिसरी व्यक्ती आसावरी होती. आसावरी तुला पैशांची बंडलं डॉक्टरांद्वारे द्यायची.. आणि हे सगळं आसावरीनेच सांगितलंय मला.. समोरासमोर पुण्यात भेटण्यात तिला धोका जाणवत होता म्हणून तिने कोकणात तुझ्या समोर यायचं ठरवलं होतं पण खरा धोका कोकणात होता. डॉक्टर डबल गेम खेळत होता आमच्याशी म्हणजे जास्त पैसे घेऊन आमची माहिती आसावरीला आणि आसावरीची माहिती आम्हाला देत होता.. त्याच्यामुळे आम्ही अडचणीत येणार होतो म्हटलं ह्याला संपवलं पाहिजे आणि तुझ्यासोबत त्या डॉक्टरला उडवायचा प्लँन माझा झाला. म्हणून गाडीचे ब्रेक त्यावेळी फेल करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर आमच्याशी पैसे मागत होता जास्तीचे आणि म्हणूनच

निलिमा – म्हणूनच तुम्ही कोकणात जात असताना पैशांची बँग घेण्यासाठी आमच्या बिल्डिंगपाशी तो आला.. माझा कोणीच नाही हा तो.. कुणीच नाही. हा फार फार तर पाळलेला कुत्रा म्हणू शकतोस..

श्रीधर – आता शेवट.. ती फोटोतली बाई कोण ? ती फोटोतली बाई तुझी आई आहे..

मी – नाही शक्यच नाही हे !

श्रीधर – बंडू ! सांग त्याला समजवून ..

बंडू – ती आप्पांसोबत फोटोत असणारी बाई ही तुझी आणि माझी सुध्दा आई !

श्रीधर – काहीतरी काय ? वेड लागलंय तुला.

बंडू – ह्या फोटोतल्या बाईचं नाव – उषा . आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून माझा बाबा आणि आई संगमेश्वरातून इथे येऊन चाकरी करू लागले. का माहीतीये ? माझ्या आजोबांची आणि तुझ्या नानांची खास मैत्री . तुझ्या नानांनी आमच्या शेतीला , घराला , आम्हाला प्रचंड आर्थिक मदत केली.. आणि एक पैसा तेव्हा परत मागितला नाही कारण परतफेड करूच शकत नव्हतो इतका पैसा ते आम्हांला देत होते. तुझे नाना म्हणजे अख्या पंचक्रोशीतले खोत. पुढे शेतजमिनीच्या एका व्यवहारात माझ्या आजोबांनी काहीतरी गडबड केली आणि नाना आणि आजोबांमध्ये भांडणं झाली . नानांनी रागाच्या भरात केलेली आर्थिक मदत आर्थिक स्वरूपातच परत मागितली तेही व्याजासकट.. आजोबांना ती रक्कम उभ्या जन्मात फेडता आली नसती.. ते आजारी पडले आणि बाबांकडून एक वचन मागितलं की नानांकडे आयुष्यभर चाकरी करशील आपल्या बायको सह.. काही दिवसांनी आजोबा गेले आणि बाबाला आणि आईला तुमची चाकरी करावी लागली. अनेक वर्ष चाकरी करत असताना नाना गेले तरीही बाबा इथेच थांबले कारण त्यांना बदला घ्यायचा होता. अशातच आप्पांची वाईट नजर आईवर पडली . आईला अमिष दाखवलं ह्या घरची मालकीण बनण्याचं. ती तर नालायक निघाली. आप्पांनी दाखवलेल्या स्वप्नात रमली आणि एक वेगळीच प्रेमकहाणी एका छताखाली निर्माण झाली. माई कधीच आई होणार नाही ह्याची आप्पांना खंत होती. आई आणि आप्पांची वाढती जवळीक बाबांच्या लक्षात येत होती आणि अशातच ती प्रेग्नंट झाली . तुझा जन्म झाला.. त्यानंतर 2 वर्षांनी माझा जन्म झाला.. आप्पांनी तुला स्वतः चा पोरगा म्हणून स्वीकारलं.. माईनेही घराण्याचा वारस म्हणून तुलाच कुशीत घेतलं. मी काय गुन्हा केला होता रे ? मी नाही का ह्या घराण्याचा वारस ? नोकरच राहीलो आजपर्यंत ह्या क्षणापर्यंत ह्या घरचा.. ह्यापेक्षा किती मोठा अपमान सहन करू मी ? आणि तो माझा मुलगा.. तुला हे सगळं सांगायला निघाला होता..

श्रीधर – त्यालाही आम्ही मारून टाकलं आत्ताच.. जा बागेत जाऊन बघ.. जा..फेकून दिला त्याचा मृतदेह .

बंडू – आता जगून कुणालाच उपयोग नाही. तुला मारल्यावर मी स्वतः ला गोळी मारणारे. सगळी सुखं तुझ्या वाटाल्या आली आणि माझ्या वाट्याला काय ? तुझं खरकटं. तुला मारण्याचं सुख मला घेऊदे मी जाताना.

मी – किती नीच आहात तुम्ही ? लहान मुलाला मारलंत ?

श्रीधर – आम्ही कुणालाच नाही सोडत..

बंडू – आता मी पण मारून घेणारे स्वतः ला.. माझ्यानंतर त्याचं काय झालं असतं ? म्हणून आधीच मारलं गण्याला. तुला काही कळू नये म्हणून मी मारहाण करत होतो गण्याची.

आराधना – आता मरायला तयार राहा मिस्टर मनोहर जोशी !

ते नातेवाईक कमी आणि अतिरेकी जास्त वाटत होते.. आता माझं म्हणून ह्या जगात कुणीच उरलं नव्हतं..  पण ह्यांना मारणं गरजेचं आहे.. स्वार्थासाठी अजून किती लोकांचा खून करतील हे ? श्रीधर मोठमोठ्यानं हसत होता.. बेसावध होता. मी पटकन त्याच्या हातातील गन खेचली आणि श्रीधर च्या कपाळावर रोखली..

मी – म.. म . मागे व्हा सगळे.. मी मारेन ह्याला.. मागे व्हा.. आता मला कुणाचंही काही ऐकून नाही घ्यायचं. चल ए.. चल..

मी श्रीधर ला बंदूकीचा धाक दाखवत बागेत आणलं..

मी – माझी काहिच चूक नसताना मला अडकवलंस.. माझ्या मानसिक परिस्थितीचा फायदा घेतलास.. खूप जीव लावलेला मी तुझ्यावर.. आता मी जीव घेणार.. मागे व्हा सगळे नाहीतर उडवेन ह्याला.

श्रीधर – मला मारून तू जिवंत नाही वाचणार.

मी – मला जगायचंय कुठे ? मी मरण्याआधी तुला मारतो..

मी समोर बंदूका रोखून उभ्या असलेल्या आराधना , बंडू , निलिमा आणि चारूहासवर गोळ्या चालवल्या.. सगळे आडवे झाले.. गनला सायलेंसर होता म्हणून आवाज मोठा आला नाही..

मी – धोका दिलास आयुष्यभर श्रीधर . तुम्ही नेहमी पाठीत वार करत आलात.. आज तुझ्या समोर मी वार करणारे..मर आता.

श्रीधर – हे बघ नको वागू असा..

मी त्याच्या अंगावर तीन चार वेळा गोळ्या झाडल्या.. त्याचं रक्त माझ्या शरीरावर उडालं. मी सर्व मेले ना ह्याची खात्री केली.. मी त्या विहीरीपाशी जाऊ लागलो. जाताना गण्या मृत अवस्थेत दिसला.. त्याला पाहून अंगावर काटा आला. माझ्या सारख्या साध्या , भोळ्या माणसाचा सर्वांनी फायदा घेतला होता आयुष्यभर. आता जगण्यासाठी कुठलंही नातं शिल्लक नव्हतं. मी विहिरीच्या काठावर उभा राहीलो.

मी – राधा .. तूही फसवलंस मला..

माझं डोकं पुन्हा जोरात दुखायला लागलं .  शरीर काळंनिळं पडू लागलं. नात्यांच्या आणि काळाच्या चक्रव्यूहात अडकून गुन्हेगार झालो होतो. मी माझ्या कपाळावर बंदूक ठेवली आणि ट्रिगर ओढला.. आणि मी विहीरीच्या पाण्यात कोसळलो..हा जन्म माझा संपला..

    जोशी कुटुंबाला जोशांनीच मारून टाकलं.. सगळेच जणं स्वार्थाच्या चक्रव्यूहात अडकून गेले. आता हे घर , ही बाग अशा सर्व गोष्टी  जोशी कुटुंबातल्या व्यक्तींची साक्ष देत , रक्तरंजित होऊन नात्यांच्या चक्रव्यूहात गुंफून  गेल्या  कधीच चक्रव्यूहातून बाहेर न पडण्यासाठी.

 

समाप्त
कथेचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन..
कथा कशी वाटली ते comments द्वारे नक्की कळवा.
SWA membership no 51440
®© poornanand mehendale

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Poornanand

Writer

Author