Oct 18, 2021
कथामालिका

चक्रव्यूह भाग 34

Read Later
चक्रव्यूह भाग 34
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now    माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.. खोलीतून बंडू , आराधना आणि तिचा मित्रही माझ्या पाठोपाठ येऊन माझ्यासोबत तिघेही उभे होते आणि माझ्या डोळ्यांसमोर ती डॉक्टरांची बायको आणि माझा सख्खा चुलत भाऊ , जवळचा मित्र श्रीधर तब्बल 28 वर्षांनी  उभा होता.. मी त्या दोघांच्या जवळ गेलो.

मी – श्रीधर तू ? आणि वहीनी तुम्ही ?

श्रीधर – हं आम्हीच.

श्रीधरच्या बोलण्यात कडवटपणा होता.

मी – अरे कुठे होतास इतकी वर्ष आणि कसा होतास ? किती बदल झालाय तुझ्यात ! खूप धष्टपुष्ट झालाय्स आणि त्यावेळी फाटका शर्ट घालणारा तू आता चक्क सुटाबुटात ? एखाद्या कंपनीचा मालक वगैरे वाटतोस.. आणि वहीनी तुम्ही इथे कशा ? म्हणजे त्यादिवशी आपण पहिल्यांदाच एकमेकांना बघितलं आणि आज असं समोरासमोर आलोय आपण.. आणि डॉक्टरांच्या बाबतीत खरंच खूप वाईट झालं. सर्व काही बदलून गेलं त्यांच्या जाण्याने अर्थात तुम्हाला जास्त फरक पडतो. मी तुमच्या दु:खात सहभागी आहे. झालं गेलं विसरा . आता एक नवीन सुरुवात करायला हवी.

मी एकदम वेड्यासारखं बोलायला लागलो होतो.. त्या दोघांना असं समोर बघून मी भान हरपून बोलत होतो.

मी – अरे बोलत का नाही तू काहीच.. खूप वर्षांनी भेटलो रे आपण.. आणि तू ती तिसरी व्यक्ती असशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तुझ्याकडे मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं असतील असं अजिबात वाटलं नव्हतं.. पण वहीनी तुम्ही इथे ह्याच्यासोबत कशा ?

मी खूप वेळ त्या दोघांच्या चेहऱ्याकडेच पाहत राहीलो. घरात एक शांतता पसरली होती.

मी – तुम्ही बोलत का नाही आहात काही ? मला उत्तरं हव्येत.. आता अजून ताणून नको ठेवू गोष्टी.

त्याने वहीनींच्या खांद्यावर हात ठेवला. दोघे माझ्याकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहू लागले.. हा श्रीधर असा काय परक्या बाईच्या खांद्यावर हात ठेवतोय ?

मी – श्रीधर काय करतोय्स हे ?

श्रीधर – तू ज्यांना वहीनी म्हणतोस ना ती माझी एकुलती एक बायको आहे भावा..

मी – काय ? चल.. काहीतरीच..

श्रीधर – माहीतीये आम्हाला की तुझा विश्वास नाही बसणार ते..

त्याने खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि त्याने त्यांच्या लग्नाचा फोटो दाखवला.

श्रीधर – बसला का विश्वास ?

मी – नाही बसला कारण डॉक्टर मला म्हणाले होते कि ही बाई त्यांची बायको आहे म्हणून !

श्रीधर – कोण डॉक्टर ? मी नाही ओळखत डॉक्टर ला वगैरे !

मी – अहो बाई.

श्रीधर – निलिमा नाव आहे तिचं..तू वहीनी म्हण..

मी – वहीनी.. त्यादिवशी नाही का मी गाडीत मी बसलेलो आणि एक व्यक्ती  तुमच्याकडून बँग घेऊन गाडीत बसली.. तुम्ही तुमच्या सोसायटीच्या गेटपाशी उभ्या होतात . माझ्याकडे पाहत होतात..

निलिमा – ओह ! अच्छा . तुम्ही सुभाष बद्दल बोलताय का ?

मी – सुभाष ? कोण सुभाष ? अहो नाही .. मी तुमच्या मिस्टरांबद्दल म्हणजे डॉक्टरांबद्दल बोलतोय..

निलिमा – पण माझे मिस्टर हे आहेत.. आणि हे सुद्धा डॉक्टरच आहेत !

मी – हा नाही.. मी डॉक्टर उपाध्यें बद्दल बोलतोय मी ..

निलिमा – अहो कोण उपाध्ये ? मी अशा कुणालाच ओळखत नाही..

माझ्या डोक्याला झिणझिण्या यायला सुरुवात झाली.. मी त्या दोघांचं बोलणं ऐकून रडूच लागलो.. सगळं काही डोक्यावरून जात होतं.

श्रीधर – ए .. रडू नको.. रडण्यासारखं काही झालं नाहीये..

निलिमा – हे काय लहान मुलासारखं रडताय !

श्रीधर – कारण लहान बनवलंय आपण त्याला ! नव्हे नव्हे.. वेडं बनवलंय आपण त्याला..

मी – म्ह.. म्ह णजे ?

श्रीधर – तुझ्या आयुष्यातला खरा खलनायक मी आहे मी..

आणि त्याने पटकन बंदूक माझ्या माथ्यावर टेकवली.. डोळ्यात माझ्याविषयी प्रचंड राग दिसून येत होता. त्याचे डोळे लालसर झाले होते..

मी – हे काय बोलतोय्स तू श्रीधर ? वेडा झालाय्स तू ! आणि हे पिस्तूल वगैरे काय आहे सगळं ?

श्रीधर – आता तुला सगळं सविस्तर सांगितलंच पाहीजे.. सर्वात पहिली गोष्ट.. तू ज्या मुलाला आराधनाचा मित्र समजतोय्स ना तो माझा मुलगा आहे..

मी – काय ?

मित्र – नमस्कार काका .. मी चारूहास श्रीधर जोशी ! आराधनाचा भाऊ.. तुमचा.. सॉरी तुझ्यासारख्या वेड्याचा पुतण्या..

हे सगळं ऐकूनच काळजाचे ठोके वाढले होते.

श्रीधर – तो अब हम शुरू से स्टार्ट करते है ! बोले तो फ्लँशबँक ... तू आणि आसावरी आमच्या नकळत पुण्यात गेलात.. आणि तू तिच्या मिस्टरांच्या नव्याकोऱ्या फ्लॅट मध्ये राहू लागलास.. तुझ्यासोबत आसावरी आणि तिचे मिस्टर. तू पुण्यात गेल्यावर दोन दिवसांनी ती तुला हॉस्पिटलमध्ये नेत होती आणि रोड क्रॉस करताना तुझा अँक्सिडेन्ट झाला आणि तुझा अक्कल नसलेला मेंदू कोमात गेला.. तू हॉस्पिटलमध्येच पडून होतास 5-6 महिने. ऑपरेशन झालं तुझं सक्सेसफुल आणि आसावरीने तुला तिच्या नव्याकोऱ्या फ्लॅटमध्येच कायमचं ठेवून घेतलं.. गेली 28 वर्ष तू तिथेच झोपून होतास.. तुझा अँक्सिडेन्ट झालाय , तू कुठे आहेस हे मला कळलंच नव्हतं.. पण 4-5 वर्षांपूर्वी आसावरीचा नवरा आला इथे कोकणात.. तेव्हा समजलं मला की तू पुण्यात आहेस , तुझा अँक्सिडेन्ट होऊन तू कोमात गेलाय्स ते.. आणि हे सगळं विद्याधर काकाला माहीत होतं तरीही त्या भिकारड्याने मला सांगितलंच नाही कारण त्याला माझं आणि बाबांचं खरं रूप कळलं होतं.

मी – म्हणजे प्रभाकर काका सुध्दा .

श्रीधर – अरे तुझ्या प्रभाकर काकासाठीच मला बदलावं लागलं रे ! आतून असे तडफडत होते बाबा इतकी वर्ष आप्पांमुळे.. प्रत्येक माणसाला मी आणि बाबाच संपवत आलो..

मी – का आणि कशासाठी ?

श्रीधर – मिळणार ! सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथेच मिळणार !

चारूहास – अरे डँडा , ह्याला सुरूवातीपासून सांग ना .. तू काय म्हणतोस ते कळत नाहीये ह्या येड्याला..

श्रीधर – ठिक आहे.. आपण अजून मागे जाऊया.. मी असा का ? हे पहिलं आधी सांगावं लागेल ना ? ऐक , तुझा बाप प्रंचड नालायक होता. तो भावंडांमध्ये मोठा म्हणून नानांनी त्याला घर चालवण्याचे अधिकार दिले खरे पण नाना गेल्यावर आप्पा भावंडांवर अधिकाराच्या जोरावर दादागिरी करू लागले . स्वतः च्या मर्जीने जगताच येत नव्हतं. सतत आप्पांचा धाक , आप्पांची हुकमत. ह्या सगळ्यात पिचले गेले माझे बाबा. बाबा मला सांगत असत की त्यांच्या लहानपणापासूनच कधीच नानांनी लाड केले नाहीत बाबांचे. इतर भावंडं हुशार , तू बिनडोक , तू बिनकामाचा म्हणून नाना बाबांना टोमणे मारायचे आणि त्याचमुळे नानांनी नेहमी बाबांना डावललं. काय चूक होती रे बाबांची ? मुलगा कमी आणि आश्रित जास्त अशी परिस्थिती झाली होती बाबांची .. म्हणून मग त्यांनी नाना आजारी असतानाच नानांच्या तोंडावर उशी दाबली आणि मारून टाकलं नानांना . त्यानंतर आप्पांची हुकमत चालू झाली ह्या घरावर , ह्या घरातल्या माणसांवर. बाबांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आप्पा डावलत असत. चंदू काकाच्या बाबतीत सुध्दा असंच झालं पण चंदू काका गप्प बसला कारण चंदूकाकाला ह्या घरात किंमत तरी होती. बाबांकडे सगळेच दुर्लक्ष करायचे. आता हे कधी तुझ्या लक्षातच आलं नसेल ना ? कारण आप्पा म्हणजे तुझ्यासाठी देव होते. त्यांच्यामुळे माझे बाबा हक्क आणि अधिकारापासून दूर राहीले. ते दोघं लहान होते ना तेव्हा खोड्या तुझे आप्पा काढायचे आणि स्वतः ची चूक बाबांवर टाकायचे आणि म्हणूनच नानांकडून लहानपणी बाबांना मार खावा लागायचा.. एकदा म्हणे कचेरीत बाबांनी लाच घेतली तर आप्पांनी लगेच नानांना येऊन सांगितलं आणि नानांनी चाबकाने मारलं रे बाबांना.. बाबांचं नखा एवढं सुखही बघवलं नाही तुझ्या आप्पांना. सतत पाय खेचत राहीले बाबांचे.. असे अनेक किस्से मला बाबांनी लहानपणीच सांगितले होते आणि पुढे हेही सांगितलं होतं की मी जे सुख अनुभवलं नाही ना , मला जो मान मिळाला नाही ना तो तू मिळव.. बाबा जिवंत राहूनही मरण यातना भोगत होते. रोज रात्री रडताना पाहिलंय त्यांना..दिवसभर ओढून ताणून चेहऱ्यावर हसू आणायचे.. मी देखील ठरवलं की आता आपण गोड बोलून सगळ्यांना उध्वस्त करणार.. अधिकार , हक्क , मानसन्मान जे काही बाबांना मिळालं नाही ते सगळं मिळवून दाखवायचं ह्या ना त्या मार्गाने.. सर्वांना तडफडून मारायचं. तुला आठवतंय का रे ललितापंचमीच्या वेळी प्रसादात भांग मिसळण्यात आली होती ते ? ती भांग सदाच्या मदतीने माझ्या बाबांनी म्हणजे तुझ्या लाडक्या प्रभाकर काकाने मिसळली होती आणि चंदू काकाने केलेल्या आजवरच्या पराक्रमामुळे आप्पांनी चंदूकाका व काकूवर आळ घेतला आणि त्यांना घरातून हाकलून दिलं..बाबांनी एक प्यादं उडवून दिलं. काही वर्षांनी तुला सदाकडून कळलं की आप्पांनी भांग मिसळायला लावली तर ते त्यानं सांगितलेलं सगळं खोटं होतं.. आप्पांनी असं भांग वगैरे मिसळायला सदाकाकाला सांगितलंच नव्हतं . तुझ्याशी असं बोलायला मात्र मीच सदाकाकाला असं बजावून सांगितलं की त्याला सांग की आप्पांनी भांग मिसळली म्हणून. जेणेकरून तुझ्या नजरेत आप्पा वाईट ठरतील..

आराधना – आई विषयी सुध्दा सांगून टाक ह्या थेरड्याला..

मी – आराधना , तू सुध्दा ह्यात सामिल आहेस ?

तिने देखील माझ्या कपाळावर बंदूक रोखली..

आराधना – सामिल आहे म्हणून तर तुझ्या समोर उभी आहे ना ? आणि सर्वात मोठी ब्रेकींग न्यूज म्हणजे मी तुझी मुलगी नाही...

मी – काय ? फसवलंस मला... 

क्रमशः
SWA membership no. 51440
®© poornanand Mehendale

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Poornanand

Writer

Author