Oct 24, 2021
कथामालिका

चक्रव्यूह भाग 31

Read Later
चक्रव्यूह भाग 31

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

चक्रव्यूह भाग 31

मी – आम्ही सर्व गावकरी धावत घरी आलो होतो. राधाच्या पोटात दुखत होतं. तिला वेदना असह्य होत होत्या.. ह्यापुढे मला नाही आठवत आहे काही .. मला प्रचंड आता वेदना होत आहेत . वाचव मला..

मी खुर्चीवरून खाली पडलो.. मला हे असं अचानक काय झालं परत ? मी खाली पडल्यावर मग पुढे काय झालं तेच आठवत नाहीये मला.

        जाग आली तेव्हा हाताच्या पायाच्या वेदना कमी झाल्या होत्या. डोळ्यांसमोर तीच माणसं. बंडू , तिचा तो मित्र , ती .. बंडूचा मुलगा. माझ्या मेंदूत प्रचंड वेदना होत होत्या. मला पुन्हा बाळंतीणीच्या खोलीत ठेवलं होतं.. ती कुणाशीतरी फोनवर बोलत होती.

आराधना – हो.. नाही आता तो बरा आहे. हो आलाय. इथे बघते मेडीकल ला नाहीतर तुम्ही घेऊन येता का ? बरं. बघते. हो आलाय शुध्दीवर.. डोन्ट वरी.

तिने फोन कट केला.

आराधना – बंडूकाका , मी लिहून देते ती औषधं आणाल का मेडीकल मधून ?

बंडू – हो.. आणतो की.

तिने त्याला कागदावर लिहून दिलं आणि पर्समधून काही पैसे दिले. तिचा मित्र माझ्याशी बोलू लागला..

मित्र – कसं वाटतंय आता ?

मी – काय झालेलं मला ?

मित्र – टेंशन घ्यायचं काही कारण नाही हा ! सगळं आता व्यवस्थित होणारे. जस्ट एक चक्कर आली होती तुम्हाला.

मी – कशामुळे ?

आराधना – तू खूपवेळ डोक्याला ताण देत तुझा भूतकाळ आठवून आठवून सांगत होतास ना त्याचा हा परिणाम..  

मी – अजूनही डोकं प्रचंड दुखतंय..

आराधना – एक इंजेक्शन देते तुला.. बरं वाटेल.

मी – तू सुध्दा डॉक्टर आहेस ?

आराधना – नाही.

मी – मग तू कशी काय डॉक्टरांना ओळखायचीस ?

आराधना – प्रकृतीत आता थोडी सुधारणा वाटत्ये तुझ्या.

मी – मला कधी कळणार आहेत माझ्या प्रश्नांची उत्तरं ?

आराधना – तू मला मान्य केलस का तुझी मुलगी म्हणून ?

मी – का मान्य करू ? राधा आणि तुझ्यात साम्य आहे म्हणून ? पुरावा काय?

आराधना – ओह ! तुझ्या माहीतीसाठी सांगते.. ह्याचा पुरावा आहे माझ्याकडे..

मी – काय आहे पुरावा ?

आराधना – तू बरा तर हो आधी !

मी – काय आहे पुरावा ते सांग आत्ताच्या आत्ता मला..

मित्र – चिल ! हायपर होऊ नका जास्त.. मेंदूवर पुन्हा ताण देताय तुम्ही . आणि हे खूप घातक ठरू शकेल.

मी – तू आहेस कोण रे नक्की हिचा ? मित्र की त्यापेक्षा अजून काही ?

आराधना – तू इतक्या काळजीने का विचारलास रे हा प्रश्न ? म्हणजे तुलाही आतून कुठूनतरी वाटतंय ना की मीच तुझी मुलगी आहे ते !

मी – मी सहजच चौकशी केली. मला काय फरक पडतो ? तू माझी मुलगी असल्याचा काय पुरावा आहे ते सांग मला . तेवढंच काय ते ऐकायचंय !

आराधना – ह्या प्रश्नाचं उत्तर खूप साधं आणि सोप्पं आहे ! तू पूर्ण बरा झालास ना की आपण DNA टेस्ट करूया ना ! टेस्ट मधून क्लिअर होईल की मीच तुझी मुलगी आहे ते.. हाच काय तो साधासोप्पा पुरावा !

मी – तू खरंच मुलगी आहेस माझी ?

तिने होकारार्थी मान डोलावली. मी अजून मेंदूला ताण दिला.. वीजेचा करंट बसल्यासारखं झालं. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तिचा तो स्पर्श आपुलकीचा होता. तिच्या एका हातात इंजेक्शन होतं. तिने लगेच मला खुपसलं . थोडसं दुखलं मला.

मी – हे कसलं इंजेक्शन दिलस मला ?

आराधना – होतं एक..

मी – मी एक निरीक्षण केलंय.. तू प्रत्येक गोष्ट सतत का माझ्यापासून लपवतेस.. आणि बस इथे..

मी तिचा हात पकडून माझ्या समोर तिला बसवलं.

मी – तू माझी मुलगी असशील तर इतकी वर्ष का समोर नाही आलीस गं माझ्या ? एक बाप आपल्या मुलीला थेट मोठं झालेलं पाहतो ?

आराधना – म्ह.. म्हणजे ? तू मला तुझी मुलगी म्हणून ..

मी – हो. तुझ्या डोळ्यात मला खरेपणा जाणवला.

तिचे डोळे पाणावलेले होते. तिने मला एक गच्च मिठी मारली. खूप वेळ ती मला बिलगून होती. तिच्या त्या स्पर्शानं मला तो भूतकाळातला दिवस आठवला.

मी – तू जन्मलीस ना तेव्हा शिमगा होता.. राधाच्या पोटात जोरात दु : खू लागल्याने तिला आम्ही अँडमिट केलं पण इथे घरी बंडूची बायको वेड्यासारखं वागू लागली होती. मी तेव्हा राधासोबत हॉस्पिटलमध्ये होतो. तुझा जन्म झाला तेव्हा. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तुझा हा जीव जगवण्यासाठी आम्ही 9 महिने आमचा जीव धोक्यात टाकला होता.. जास्त करून राधाने. त्यावेळी काही तासांनी तुला पाहण्यासाठी मी आत गेलो. राधा शेजारी पाळण्यात होतीस तू रडत.. तुझा तो इवलुसा आवाज.. आणि इवलुशी तू.. तुला मी पाळण्यातून उचलून माझ्या कुशीत घेतलं आणि ठरवलं की आता फक्त तुझ्या भल्यासाठीच जगायचं. तुझ्यासोबत रहायचं. तेव्हा तुला माझ्या भावना कळल्या नसतील म्हणून मला इतकी वर्ष सोडून राहिलीस ना ? सांग ना कुठे होतीस इतके वर्ष.. काय करत होतीस ? खूप हाल झाले असतील ना तुझे ? त्या दिवशी एसटीत आपली भेट झाली ना तेव्हाच मला राधा आणि तुझ्यात काहीतरी नातं असणार ह्याचा अंदाज आला होता पण मला मुलगी झाली होती हे सुद्धा मी विसरून गेलो होतो गं ! आता हळूहळू काही महत्त्वाच्या गोष्टी आठवताय्त मला.. तू झालीस आणि घरच्या विहीरीत बंडूच्या बायकोनं आत्महत्या केली. तिने असं का केलं ते नाही माहीत मला.. एक चांगली गोष्ट घडत असताना एक वाईट गोष्ट घडतेच गं माझ्या बाबतीत.. आणि हे चक्र आजही सुरू आहे माझ्या आयुष्यात.

आराधना – तुला ए बाबा म्हटलं तर चालेल ना ?

मी – तू मला बाबा म्हणत्येस हे खूप आहे गं माझ्यासाठी.

आराधना – आता मी आहे तुझ्यासोबत.. तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम असे नष्ट करून टाकेन. तुझ्या आयुष्यात फक्त सुख असेल ह्यापुढे..

मी – मला सांग किती वेळ हा खेळ चालणार ? कोण आहे हा तिसरा व्यक्ती ? आणि माझी माणसं कुठाय्त गं ? चंदू काका , भारती काकू , आसावरी  , प्रभाकर काका , सुलभा काकू , विद्याधर काका , भार्गवी काकू .. श्रीधर ? कुठाय्त सगळे ? बास गं ! खरंच बास थकलो आता मी . मला नाही सहन होत आहे हे माझ्या भोवती असणारं हे रहस्यांनी भरलेलं चक्रव्यूह..

आराधना – तुला आई कशी गेली ते आठवतंय ?

मी – मी अठ्ठावीस वर्षांनी जेव्हा इथे आलो ना ह्या घरात तेव्हा मी त्या विहीरीपाशी गेलो तेव्हा खूप अंधूक पणे आठवत होतं की राधाने त्या विहीरीत जीव दिला म्हणून..

आराधना – पूर्णपणे आठवतच नाही का काही ?

मी – तसं आठवतंय मला.. म्हणजे मी राधाच्या वडीलांचा खून केला ते आठवतंय..

त्यावेळी तिचे वडील बऱ्याच दिवसांनी घरी आले.. तू तेव्हा नुकतीच पाळण्यात झोपली होतीस. राधा आणि मी तुझ्या भावी आयुष्याची स्वप्न पाहत होतो आणि…

क्रमशः
SWA membership no.51440
Written by POORNANAND PRAMOD MEHENDALE

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Poornanand

Writer

Author