Login

चक्रव्यूह भाग 30

काळाचं एक विलक्षण चक्रव्यूह



       राधाला फटफटीवर बसवून आम्ही श्रीधरच्या सांगण्यावरून देवळात आलो. श्रीधर मागून धावत धापा टाकत येत होता. तो येईपर्यंत आम्ही देवळात थांबलो.

राधा – मला खूप भीती वाटते रे.. मला आता पुन्हा बाबांपाशी नाही जायचं पण तरीही मला आईची काळजी वाटत्ये. तिला मारून टाकतील रे बाबा.

मी – असं काही नाही होणार..

राधा – कुठे तरी लांब निघून जाऊया आपण.. कारण इथे थांबलो तर भीतीदायक आयुष्य जगावं लागेल..

मी – खरंतर चूक तुझी आहे.. तू घरी सांगितलं नसतंस तर असं काही नसतं झालं.

राधा – तुला वाटतं तसं . 

मी – आता काय करायचंय ? आणि हा श्रीधर का आला नाही अजून ? एवढसच तर अंतर आहे..

राधा – घरी चिठ्ठी लिहून पळून आले मी.. म्हटलं मला शोधू नका . बाबा काय ऐकणाऱ्यातले नाहीत. ते मला शोधून काढतील.. मला त्यांचा त्रास , ते करत कसलेला छळ नव्हता रे सहन होत. माझे हाल माझ्या आईला बघवले नाहीत म्हणून तिने मला पळून जाण्यात साथ दिली.

मी – आता काय करायचंय ते सांग..

तेवढ्यात श्रीधर धावत आला.त्याने आम्हा दोघांचा हात पकडून देवासमोर उभं केलं.देवासमोर ठेवलेलं कुंकवाचं ताट त्यानं उचललं आणि त्याने माझ्या हातात ठेवलं.  

मी – हे काय ?

श्रीधर – तिला तुझ्या नावाचं कुंकू लाव.. देवाच्या साक्षीने..

मी – काय पोरकटपणा आहे हा ?

श्रीधर – हे बघ दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. कोर्ट मँरेज करायला आधी अर्ज भरावा लागतो. मग त्यानंतर काही दिवसांनी नोटीस आल्यावर कोर्ट मँरेज होईल. आत्ता इथे भिक्षुकी करणाऱ्यांना बोलवून , गळ्यात मंगळसूत्र घालून ,अग्निभोवती सात फेरे घेऊन लग्न करण्यात वेळ नाही आपल्याकडे.. इथे तिचे बाबा तिला शोधत कधीही येतील. कुठल्या हक्कानं तू तिला तुझ्यापाशी ठेवून घेणारेस ? निदान तू तिच्या कपाळावर तुझ्या नावाचं कुंकू लाव.. देव आहे साक्षीला. मी घरी काय सांगायचं ते पाहीन ना.. तू नको काळजी करू.. हा तुझा भाऊ जिवंत असेपर्यंत तुझ्या जीवाला धोका नाही. मृत्यूच्या दारातून परत आणेन मी तुला.

राधा – मन्या ,मला वाटतं ऐकू आपण त्याचं !

मी – अगं हा पोरकटपणा आहे गं !  हे असं फक्त तुझ्या कपाळी माझ्या नावाचं कुंकू लावल्याने समाज आपल्याला नवरा बायको म्हणून स्वीकारेल ? समाजाचं सोड , माझ्या घरचे ? तुझे आई बाबा ?

राधा – लग्न हे फक्त मंगळसूत्राच्या धाग्यावर नसतं ना रे अवलंबून ! लग्न हे विश्वासाच्या नाजूक धाग्यावर असतं अवलंबून ! आपण देवासमोर शपथ घेऊ.. आपण पुढील अनेक जन्म एकमेकांसोबत राहू म्हणून.. समाजाचं काय ? घरच्यांचं काय ? ह्यापेक्षा आपलं काय ह्याचा विचार कर ना !

मी – हे तू बोलत्येस राधा ?

राधा – परिस्थितीच तशी आहे तर असं बोलावं लागतंय.. तुला माझ्या सोबत राहायचंय ना ?

मी – ही धडपड मी उगाच करतोय का ? माझ्या वडीलांनी बिघडवलेलं सारं निस्तरतोय ना मी ! मला श्रीधर सांगतोय ते मान्य नाही ! तरीही मी लावतो तुला कुंकू..

दोघांच्याही फालतू आग्रहामुळे मी तिला कुंकू लावलं.. मला वाटलं श्रीधर काहीतरी भन्नाट आयडिया शोधून काढेल.. तोच त्याने खिशातून मंगळसूत्र बाहेर काढलं.

श्रीधर – आता हे तिच्या गळ्यात घाल..

मी – एक मिनिट.. हे कसं काय तुझ्याकडे मंगळसूत्र आलं ?

श्रीधर – तुला उगाच पुढे व्हायला नाही सांगितलं..

राधा – म्हणजे ?

श्रीधर – बाजारात जाऊन हे खोटं मंगळसूत्र घेऊन आलो.. खरं कुठून आणणार ना एवढ्यात ? हे मंगळसूत्र आणायला गेलो म्हणून वेळ लागला .. मग हारवाल्याकडे गेलो.. त्याचा हार तयार होईना . शेवटी मीच हार मानली आणि आलो इथे पटकन…धर , घाल तिच्या गळ्यात. खोटं असलं तरी घाल.. नंतर खरं बनव तिच्यासाठी.

आता त्याची आयडिया लक्षात येत होती माझ्या.  मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निरागस आनंद होता.

मी – श्रीधरची आयडिया कामी आली होती.. मी राधाला घेऊन त्यावेळी घरात आलो. श्रीधर , मी आणि राधाने घरच्यांना सगळी परिस्थिती समजून सांगितली. विद्याधर काका आणि प्रभाकर काकाने आरडाओरडा केला. त्यांना आणि दोन्ही काकूंना आमचं नातं पसंत पडलं नाही . का ? कारण आम्ही शेण खाल्लं होतं. श्रीधर माझ्या बाजूने उभा राहीला म्हणून प्रभाकर काका त्यालाही ओरडला. राधा लग्नाआधीच प्रेग्नंट आहे तेही माझ्यामुळे म्हणून सगळे शांत झाले. त्यांनी आम्हाला घरात राहण्याची परवानगी दिली.. सून म्हणून शेवटी स्वीकारलं राधाला. राधा आमच्या घरी राहते ही बातमी जेव्हा त्यांना कळली तेव्हा तिचे बाबा मात्र मला दिवसेंदिवस त्रास देऊ लागले मला मारून टाकायच्या धमक्या देऊ लागले. ह्यामुळे राधाच्या तब्येतीवर परीणाम होत होता. त्याच दरम्यान राधाची आई गेली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मी राधाला घेऊन गेलो तर तिच्या बाबांनी मला आणि तिला हाकलून दिलं.. गोष्टी अशा पटापट घडत होत्या..आम्ही कोर्ट मँरेज करून मोकळे झालो . बरेच दिवस झाले राधाच्या वडीलांनी आम्हाला त्रास दिला नव्हता. म्हटलं बहुतेक आता त्यांनी आमच्या नात्याचा स्वीकार केला असावा.. मी इंजिनिअरिंग ची डिग्री मिळवली , यावेळी घरात एक नवीन सून आली.. बंडूचं लग्न झालं आणि इथे काही महिन्यात राधाला नववा महिना लागला.. मला आठवतंय की तेव्हा शिमगा

आराधना – आणि तेव्हा आयुष्याची एक नवी सुरुवात होणार होती..

मी – आम्ही होळीच्या नेमाशी असताना ताई ओरडत धावत आली..

आराधना – ताई ? ताई कोण आता ?

मी – ताई म्हणजे आसावरी.. ती माझ्यापेक्षा लहान असली तरी मी लाडानं तिला कधीतरी ताईच म्हणतो.. तर आमच्या गावातल्या लोकांचा तो शिमगा.. आम्ही गावातली पुरूष मंडळी होळीच्या नेमाशी होतो. होय पुरूष मंडळीच. होळीचे पहीले नऊ दिवस आम्ही पुरूष मंडळी होळीवर जायचो व दहाव्या दिवशी बायकांना मोठ्या होमाला नेमावर यायची मुभा असायची. आम्ही सर्व पुरूष बोंबलू लागलो.. तोच नेमावर आसावरी धावत आली..

आराधना – एक मिनिट.. चंदू आजोबा गाव सोडून गेले होते ना ? म्हणजे आसावरी सुध्दा जायला हवी होती तर ती तिथे कशी ?

मी – नाही. म्हणजे चूंदू काका , काकू गाव सोडून गेले ते बरोबर पण आसावरीचं लग्न लावून दिलं आणि मग गेले ?

आराधना – कुणाशी ?

मी – तुला खरंच माहिती आहे ना माझा भूतकाळ ?

आराधना – मी विचारलंय त्याचं उत्तर दे..

मी – तुला माहीत नाही ?

आराधना – इथे तुला तुझ्या भूतकाळाचा विसर पडलाय म्हणून विचारत्ये मी.

मी – माझा मित्र मनोज दामले सोबत झालं लग्न.. आसावरीची माहेरी महिन्यातून चक्कर असायचीच..

आराधना – तर शिमग्याचं काय म्हणतोस ?

मी – हा तर त्यावेळी ताई ओरडत ओरडत होळीच्या नेमावर आली. सगळे गावकरी चिंतेत पडले..

आम्ही होळीच्या नेमावर बोंबलत होतो..

आसावरी – मन्या … मन्या..

मी – काय गं ताई ? काय झालं ?

आसावरी – राधा.. राधा वहिनी..

मी – काय झालं राधाला ?

क्रमशः
SWA membership no. 51440
Written by poornanand Mehendale