Login

चक्रव्यूह भाग 28

काळाचं एक रहस्यमय चक्रव्यूह



मी – माझ्याकडूनच आप्पांचा खून झाला होता.. पण मी हे जाणूनबुजून नव्हतं केलं. तेव्हा आप्पा गेल्याचं दु:खं होतंच.. पण त्यांचा रागही येत होता. त्यांनी त्यांचा गुन्हा मान्यच केला नाही. आप्पांचा मृतदेह तेव्हा मी , विद्याधर काका , सदाकाकाने आणला घरी. घरात गणपती बाप्पा होते. 10 दिवसाचा गणपती देखील आम्ही लगेच विसर्जित केला. आप्पा गेले आणि घरचा आधारस्तंभ गेल्यासारखं झालं. आप्पांना पाडायचं नव्हतं मला. म्हणतात ना नशिबात जे असतं ते घडल्याशिवाय राहत नाही. आप्पांची भूमिका संपली. आप्पा जाऊन 2-3 महिने झाले तरीही मी त्या प्रसंगामुळे सावरलो नव्हतो. आप्पांची ती किंकाळी आजही कानी ऐकू येते. मला वाटलं कारस्थानामागचा सूत्रधार संपला पण नशिबात साडेसाती होतीच.

आराधना – आप्पा गेल्यावर तरी कुठे काय सुरळीत झालं तुझ्या आयुष्यात ?

मी – आप्पा गेल्याच्या दु:खाने निलाआत्या आजारी पडली. अंथरूणालाच खिळून होती. महागातलं औषध पाणी सगळं करून झालं पण काही उपयोग झाला नाही ती सुद्धा गेली.

आराधना – पण मला सांग , आसावरी तुझी बहीण माझी आत्या.. ती तर चंदू आजोबांची मुलगी ना ?

मी – हो.

आराधना – चंदू काका तुझ्या लहानपणीच घर सोडून गेला मग आसावरी कशी घरात ?

मी – चंदू काका व काकूला घरात प्रवेश बंद होता . आसावरीला नव्हता. आसावरी कधीना कधी घरी यायची राहायची.

आराधना – तरीच.

मी – काय ? तरीच काय ?

आराधना – नाही तू म्हटलास की राधाकडे निरोप आसावरी तर्फे गेला . म्हणून विचारलं की आसावरी आत्या कशी काय घरात राहत होती ते ?

मी – आप्पांची लाडकी होती आसावरी पण काही म्हण आप्पांना शेवटचं बघायला देखील चंदूकाका , काकू , आसावरी कोणीच नव्हतं आलं. बरं आसावरीला  कधीच घराचं दार बंद नव्हतं . आता कुठे असते ती ?

आराधना – अं ? नाही माहिती.

मी – एक मिनिट.. ती तिसरी व्यक्ती आसावरी आहे का ? खरं सांग हा.

आराधना – तुझ्यावर लक्ष्य ठेवायला लावणारी व्यक्ती लवकरच तुझ्या समोर उभी राहील. ते सोड.. आप्पा गेले त्यामुळे आणखी एक गोष्ट झाली ते तू विसरतोय्स !

मी – आत्ता कुठे नीटपणे मला सगळं आठवायला लागलंय. आप्पा गेल्यामुळे श्रीधर आणि राधाचा साखरपुडा लांबणीवर पडला आणि मी श्रीधरला माझ्या मनातलं सर्व काही सांगू शकलो..

      त्या दिवशी श्रीधर विहीरीपाशी रहाटाने पाणी काढत होता. सकाळचा पाऊस पडून गेला होता. आजूबाजूची झाडं ओली , हिरवीगार होती. म्हटलं आत्ताच सगळं बोलून घेऊ. मी त्याच्या दिशेने विहीरीपाशी आलो.

मी – श्रीधर , घाईत आहेस का ?

श्रीधर – नाही रे. आज राधाच्या घरी भेट द्यावी म्हणतोय. आप्पा गेल्यापासून राधाशी भेट झाली नाही. आज भेटून यायचं म्हणतोय.

मी – तुला राग येणार नसेल तर राधाविषयीच बोलायचंय..

श्रीधर गंभीर झाला. त्याने विहीरीतून पाणी काढलं व बादली विहीरीच्या काठावर ठेवली.

श्रीधर – काय बोलायचंय राधाविषयी ?

मी -  खरंतर हे खूप आधीच बोलायचं होतं पण घटना अशा घडल्या की नाही बोलू शकलो.

मी इकडेतिकडे पाहून बोलायला सुरुवात केली.

मी – मी आणि राधा... एकमेकांना खूप जवळून ओळखतो. ती माझी बालमैत्रिण आहे. आम्ही सोबत जायचो शाळेत , शाळेतून एकत्रच यायचो. एकमेकांच्या मनात काय चाल्लय हे आम्हाला पटकन कळतं. आम्ही एका वयात आलो आणि आमचं निरागस मैत्रीचं नातं एक पाऊल पुढे गेलं. ओठांवर रूळणारे शब्द एकमेकांच्या डोळ्यातूनच व्यक्त होऊ लागले. एकमेकांना अनुभवू लागलो.. आम्हा दोघांच्या नकळत आमच्यात एक नातं निर्माण झालं. एका क्षणी वाटलं , आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही कारण आम्ही एकच आहोत. हळूहळू आमच्यात तुझं माझं असं काही नाही. त्या वयात आम्ही एकमेकांत इतके गुंतून गेलो की शारीरिक आकर्षणाची ती ओढ.. त्यातही वाहवत गेलो.एकमेकांच्या स्पर्शात भावी आयुष्याची स्वप्नं पाहू लागलो. काही दिवसांनी राधा प्रेग्नंट राहीली. आजच्या परिस्थितीत तिच्या पोटात माझं मूल वाढतंय...

मी – मी आणि राधा... एकमेकांना खूप जवळून ओळखतो. ती माझी बालमैत्रिण आहे. आम्ही सोबत जायचो शाळेत , शाळेतून एकत्रच यायचो. एकमेकांच्या मनात काय चाल्लय हे आम्हाला पटकन कळतं. आम्ही एका वयात आलो आणि आमचं निरागस मैत्रीचं नातं एक पाऊल पुढे गेलं. ओठांवर रूळणारे शब्द एकमेकांच्या डोळ्यातूनच व्यक्त होऊ लागले. एकमेकांना अनुभवू लागलो.. आम्हा दोघांच्या नकळत आमच्यात एक नातं निर्माण झालं. एका क्षणी वाटलं , आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही कारण आम्ही एकच आहोत. हळूहळू आमच्यात तुझं माझं असं काही नाही. त्या वयात आम्ही एकमेकांत इतके गुंतून गेलो की शारीरिक आकर्षणाची ती ओढ.. त्यातही वाहवत गेलो.एकमेकांच्या स्पर्शात भावी आयुष्याची स्वप्नं पाहू लागलो. काही दिवसांनी राधा प्रेग्नंट राहीली. आजच्या परिस्थितीत तिच्या पोटात माझं मूल वाढतंय... आम्ही हे सगळं योग्य वेळी तुम्हा सर्वांना सांगणारच होतो पण आप्पांनी एक वेगळंच कारस्थान रचलं. त्यांनी मुद्दाम तुझं आणि राधाचं लग्न लावून द्यायचा घाट घातला. तुला आधी हे सगळं सांगणारच होतो पण सांगता येत नव्हतं. आप्पांच्या शब्दापुढे आपण बोललो तर तो गुन्हाच असायचा ना ? आप्पांनी मुद्दाम हे सगळं कारस्थान रचलं रे . त्यांचा यामागचा हेतू काय होता तेच समजलं नाही.

श्रीधर हाताच्या मुठी आवळून माझ्याकडे पाहत रडक्या चेहऱ्याने , रागाने थरथरत उभा होता. त्याने ती बादली डोकं शांत ठेवण्यासाठी त्याच्याच अंगावर ओतली .

श्रीधर – राधा कधीच कृष्णाची पत्नी होऊ शकली नाही तेच खरं पण आजन्म प्रेयसी बनून त्याच्याच सोबत राहीली.

मी – म्हणायचं काय आहे नक्की तुला ?

तो स्वतः ला भानावर आणत म्हणाला..

श्रीधर – मला सांग , सगळी परिस्थिती समजल्यावर सुध्दा मी राधाशीच लग्न केलं तर ?

मी – तर.. तर राधा शरीराने तुझी असेल पण मनाने मात्र माझ्यापाशी राहील.

श्रीधर – जर मनानेही राधा माझ्या जवळ राहणार नसेल तर राधाशी लग्न करून उपयोग काय ?

मी – म्हणजे ?

श्रीधर – कर लग्न राधाशी..

इतक्या सहज कसा बोलून गेला श्रीधर ? मला कळत होतं की तो आतून दुखावला गेलाय.

श्रीधर – राधा खरंच प्रेग्नंट आहे ?

मी – हो .

श्रीधर – राधा प्रेग्नंट आहे तेही तुझ्यामुळे म्हणून तू लग्न कर.. तिच्या पोटात तुझ्यामुळे जीव वाढतोय.त्या जीवावर मी कसा हक्क गाजवू ? माझ्या व्यतिरिक्त अजून कुणा कुणाला माहीत आहे ह्याबद्दल ?

एखादा माणूस खरंच इतका संयमी असतो ? कसं काय जमतं श्रीधर ला रागावर नियंत्रण ठेवायला ?

श्रीधर – अरे बोल..

मी – तिच्या घरी माहीत झालंय. म्हणजे तिनेच सांगितलंय. तिच्या घरचे आता का तुझ्यावाचून लपवत होते हे त्यांनाच माहिती. तिला घरचे म्हणत होते की अबोर्शन कर. ती नाही म्हणाली.

श्रीधर – ती नाही म्हणाली आणि तिच्या घरच्यांनी हे तिचं मत मान्यही केलं ?

मी – नाही.. मला वाटतं तिच्या वडीलांच्या डोक्यात काहीतरी भलतंच शिजतंय.. तिला नक्कीच अबोर्शन साठी बळजबरी करत असणार.. पण राधा नाही ऐकून घ्यायची त्याचं.

श्रीधर – हे बघ.. तिच्या आई बाबांना आधी समजवलं पाहीजे. मी आपल्या घरातल्यांना तुझ्या आणि राधाच्या नात्याबद्दल सांगेन पण तिच्या आईबाबांचं काय ? ते तुलाच निस्तरावं लागेल. तेव्हा मात्र मी फक्त तुझ्या सोबत असेन..

मी – एक विचारू तुला ?

श्रीधर – विचार ना ..

मी – तू इतक्या सहजासहजी माझं आणि राधाचं नातं स्वीकारलंस ?

श्रीधर – आतून थोडा दुखावलोय.. पण तू माझा जीव आहेस मन्या.. तुझ्यासाठी मी माझं आयुष्य पणाला लावेन. आपण एकत्र खेळलोय , भांडलोय.. एकमेकांना संकटकाळात साथ दिल्ये. जिथे आपल्या दोघांना समजून घेणारं कोणी नव्हतं तिथे आपणच एकमेकांचा आधार होतो ना रे, अजूनही आहोत.. आपल्यात फक्त एका लग्नामुळे फूट पडेल असं वाटतं तुला ?

मी – इथे अनेक घरात सख्खे भाऊ एकमेकांच्या उरावर बसतात.. तू चुलत भाऊ असूनही..

श्रीधर – प्रेमासाठी काहीही.. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव , इतका भोळा राहीलास ना तर कुणीही येईल आणि तुझं आयुष्य बरबाद करून निघून जाईल.. आंघोळ कर.. तयार हो .. थोड्या वेळाने आप्पांच्या मृत्यूपत्राचं वाचन आहे.

मी – आप्पांनी मृत्यूपत्र बनवलेलं ?

श्रीधर – मलाही हे कालच कळलं.. चल , आत.. आणि मृत्यूपत्राचं वाचन झालं की आपण आधी राधाच्या घरी जाऊ.. त्यांना समजवू..

मी – ठिक आहे. तू आहेस तर टेंशन नाही.

तो निघून गेला. आत्ता कुठे श्रीधर मुळे सगळं छान घडणार होतं. सर्व सुखं माझ्याकडे धावत येत आहेत अशी स्वप्न पडू लागली. तरीही आतून वाटत होतं काहीतरी आता भयंकर घडणार आहे..
क्रमशः
SWA membership no  . 51440 ®©Poornanand Mehendale