चक्रव्यूह भाग 27

रहस्यमय कथा


चक्रव्यूह भाग 27

मी – पण आप्पांनी कशासाठी अडकवलं चंदूकाकाला ?

सदा – आप्पांना स्वतः चा मनमानी कारभार चालवायचा होता. सर्व हक्क , अधिकार आप्पांना हवे होते. चंदू काका आणि वहीनी हक्क आणि अधिकाराबाबत लुडबुड करायचे म्हणून आप्पांनी हे सगळं तेव्हा जाणूनबुजून कारस्थान रचलं. त्यांना आपल्यापासून , आपल्या घरापासून मुद्दाम वेगळं केलं.

माणूस इतका खालच्या थराला जाऊ शकतो ? खरंच ? अजून किती आणि काय काय लपवलं असेल आप्पांनी ?

सदा – मी तुला आप्पांबद्दल सांगितलंय हे कुणालाही कळता कामा नये.. नाहीतर जीव जाईल रे माझा.

मी – नको घाबरू. कुणाचाही जीव जाणार नाही. आप्पा असे वागतील असं खरंच मला वाटलं नव्हतं.

मी तिथून रागाच्या भरात आप्पांना भेटण्यासाठी निघू लागलो तेवढ्यात मला सदाकाकाने अडवलं.

सदा – मन्या , रागाच्या भरात आप्पांना काही बोलू नकोस . योग्य वेळी त्यांना जाब विचार.

मी – काय आता जाब विचारायचा राहीलाय ? सगळं काही आता स्पष्ट कळालेलं आहे. ह्या गोष्टींची शहानिशा करायची मला काही गरजही नाही वाटत. मी बघतोय ना रोज डोळ्यासमोर.. आप्पा बोलतात तीच पूर्वदिशा. आप्पांसमोर आम्ही शांत बसायचो . का ? कारण आप्पा म्हणजे हुकूमशाहा. जरा त्यांच्या विरूध्द वागलो तर कोणत्या थराला जातील ह्याची शाश्वती देता येत नाही.. पण मी आता त्यांच्या समोर शांत बसणारच नाही. ह्या नालायक माणसाला कायदेशीर शिक्षा सुद्धा करणार नाही मी.. कारण ओळखीवर आप्पा लगेच सुटतील. आप्पांना शिक्षा मी करणार. वेळ आली तर मारूनही टाकीन..

सदा – मला वाटतं तू जरा इथे शांत बस. काहीतरी बरळतोय्स.. बस जरा इथे. रागाच्या भरात काहीतरी चुकीचं नको वागू. एक गोष्ट लक्षात ठेव.. चक्रव्यूह रचणारे आणि चक्रव्यूहात अडकवणारे आपलीच लोकं असतात.

मी – मला तुझं तत्वज्ञान ऐकण्यात रस नाहीये..

सदा – मी काय सांगतोय ते ऐकून घेईना झालास तू.. अरे , वडील आहेत ते तुझे. कसेही असले तरी. योग्य वेळी त्यांच्या विरोधात निर्णय घे. ही ती वेळ नव्हे त्यांना शिक्षा करण्याची.

मी – खरंच कोणी इतकं वाईट असू शकतं ?

सदा – तुला अजून जगाचा अनुभव नाही म्हणून तू हा प्रश्न विचारतोय्स. ह्यापेक्षा जास्त खतरनाक लोकं पाहील्येत मी. म्हणून सांगतोय.. आत्ता आप्पांना काही बोलू नकोस. कधी तुला फाडून खातील ना तुझं तुलापण कळणार नाही. शांत हो. आवर राग. चल घरी..

आम्ही दोघेही तिथून निघू लागलो. सदाकाका गुरांना गोठ्यात नेण्यासाठी गुरांसोबत गेला... मी थोडासा विचारात पडलो आणि सदाकाकाकडे आलो.

मी – सदाकाका .. आत्ता चंदू काका आणि काकू कुठे राहतात ?

सदा – ते गेले कधीच गाव सोडून.. कुठे गेले ? कसे आहेत ? काही माहीत नाही.

हे एवढंच विचारून मी निघालो.. सदाकाका गुरांसोबत येणार होता. मनात आप्पांचा प्रचंड राग येत होता..  मी आप्पांची दादागिरी सहन करायची नाही हे ठरवून दिलं , त्यांनी सांगितलेलं एकही काम करायचं नाही. स्वतः शी बडबड करत मी घरी आलो. घरात आप्पा नव्हतेच. आप्पा काही वेळापूर्वीच तातडीने संगमेश्वर ला जाण्यासाठी निघाले होते. मला ना सतत एक प्रश्न पडायचा की आप्पांचं संगमेश्वर ला काय सारखं काम असतं ? ना धड तिथे आपल्या नात्यातलं ना गोत्यातलं मग संगमेश्वर ला काय असतं एवढं त्याचं काम ? कधीतरी ह्या गोष्टीचा सुध्दा शोध मला घ्यायचा होता.

आराधना – त्या दिवसापासून तुझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला. असं म्हटलं जातं की परिस्थिती नुसार माणसाचा स्वभाव बदलतो. तू त्याला काही अपवाद नव्हतास. तू सुध्दा स्वतः मध्ये बदल घडवून आणलास. आप्पांचं काही ऐकायचं नाही. सगळं काही मनाला पटेल तेच करायचं वगैरे वगैरे ठरवून मोकळा झालास.

मी – हं. ठरवणं आणि करणं ह्यामध्ये फरक असतो ना .

आराधना – तेही आहेच म्हणा !

       आप्पा दुसऱ्या दिवशी लगेच संगमेश्वरातून आले होते. मला काही करून आप्पांशी बोलायचं होतं. त्यांनी मला , राधाला वेगळं करण्याचं कारण मला विचारायचं होतं. आप्पांविषयी प्रेम , आपुलकी , आदर सर्व काही नष्ट होऊन तिरस्कार जागृत झाला होता. आप्पा दुपारी आले आणि जेवायला बसले . म्हटलं ह्यांचं जेवण झालं की विषय काढू.. सदा काका च्या सांगण्यावरून असा किती वेळ , किती दिवस शांत राहणार होतो मी ? माजघरात आत्या निरांजनाच्या वाती तयार करीत होत्या. मी आप्पांचं जेवण होईस्तोवर माडीवर जाऊन बसलो. सदाकाकाने सांगितलेलं सारं काही आठवत बसलो. देह असल्याहून नसल्यासारखा झाला होता. आप्पांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसताच येणार नव्हतं. मी खूप वेळ माडीवर बसल्यावर पुन्हा खाली येऊन आप्पांना शोधत होतो. आप्पा घरात दिसले नाहीत.

मी – अगं निलाआत्या , आप्पा कुठे गेलेत ?

निलाआत्या – दादा गेलाय टेकटीवर म्हणत होता जरा एकटं रहायचंय ! आणि काय रे , काल पासून पाहत्ये मी तुझा चेहरा कशाला इतका मावळलेला ? अरे , इथे घरात गणपती बाप्पा आलेत , श्रीधरचं लग्न होतंय.. सगळं मंगलमय होत असताना तू का रे असा ? काय झालं ? ये इथे सांग मला.. कोणी काही म्हणालं का तुला ?

मी – मला काहीच झालेलं नाहीये . खूष आहे मी. मला काही होऊच शकत नाही. मी निघतो.

निलाआत्या – कुठे जातोय्स ?

मी – जाताना कुठे जातोय्स हे विचारू नये.. असं  तूच म्हणतेस ना ! मग कशाला आता विचारलंस ?

मी त्यावेळी पहिल्यांदाच माझ्या लाडक्या निलाआत्या वर चिडलो. ती फक्त माझ्या कडे बघत बसली. तिने तिच्या डोळ्यातलं पाणी लपवलं. मला तिच्यापेक्षा आप्पांकडे जाणं गरजेचं होतं.

        मी टेकडीकडची वाट पकडली. टेकडीकडचा रस्ता खडबडीत होता. मी फटफटी टेकडीचा चढ सुरू होण्याआधी लावली आणि मी चालत चालत टेकडीवर आलो. टेकडीवर गवत प्रचंड होतं आणि सोसाट्याचा वारा होता. एका बाजूला भलेमोठे कातळी दगड.. व एक खोल दरी. त्या दगडांवर उभं राहीलं की अर्ध गाव आणि समुद्र दिसायचा. आप्पा त्या दगडांवर एकटेच बसलेले होते. मी त्यांच्याकडे जाऊ लागलो. कदाचित त्यांना कोणीतरी आल्याची चाहूल लागली असावी . त्यांनी मान वळवून मागे बघितलं. मला बघताक्षणी ते उठले आणि माझ्या समोर येऊन उभे राहीले. आम्ही टेकडीच्या काठावर येऊन बोलू लागलो. त्यांनी माझ्या डोळ्यातला राग पाहीला असावा.

आप्पा – काय रे ? इथे काय करतोय्स ? का आलास इथे ?

मी – तुम्ही माझ्या आणि राधाच्या बाबतीत का असं वागलात आप्पा ?

आप्पा – तुझ्या आणि राधाच्या बाबतीत ? अरे काय बरळतोय्स तू ? राधा आणि तुझा काय संबंध ?

मी – ओ आप्पा.. बास . बास झाला हा ढोंगीपणा. मला सगळं कळालंय तुमच्याविषयी.

चंदूकाकाला तुम्ही मुद्दाम त्या भांग प्रकरणात अडकवलंत , आत्ता राधा आणि मला वेगळं केलंत. मुद्दाम श्रीधर आणि राधाचं लग्न जुळवायला निघालात. तरीच मला प्रश्न पडला की आप्पांना श्रीधर साठी राधाच का योग्य वाटली. तुम्ही हे सगळं मुद्दाम ठरवून केलंत.

मी तेव्हा माझ्याच बापाच्या कानाखाली मारलं.

आप्पा – तू कुणाला मारतोय्स ते लक्षात आलंय का तुझ्या ? बाप आहे मी तुझा. अरे सावर स्वतः ला. भानावर ये.. तुला कोणीतरी फसवलंय.

मी – मला फसवणारा चेहरा माझ्यासमोर आहे.

आप्पा – अरे ऐक माझं राधा आणि तुझ्यातलं नातं मला नव्हतं माहीत. तू आत्ता बोल्लास तेव्हा लक्षात आलं.

मी – खरंच बास आप्पा ! नको आता लपवाछपवी. वडील आपल्या बाळाचं आयुष्य घडवतो पण तुम्ही तर असे बाप आहात की माझं आयुष्य बिघडवून ठेवलंत. वडील आपल्या मुलांच्या आयुष्याला रंग देतो . इथे माझ्याच बापानं माझं आयुष्य बेरंगी केलंय. कधी मायेने तुम्ही जवळही घेतलं नाहीत. कधी कौतुकाचे दोन शब्द बोलला नाहीत. सतत तुमचा धाक , तुमची दादागिरी.. मला कंटाळा आलाय ह्या सगळ्याचा. आप्पांना विचारल्याशिवाय हे करायचं नाही , ते करायचं नाही . का ? तुमची बंधनं का माझ्या आयुष्यावर ? काय केलंत माझ्या आयुष्याचं ? माझ्या राधावरचा हक्क देखील गमावला मी तुमच्यामुळे !

आप्पा – ऐक.. उगाच डोक्यात नको राग घालून घेऊ.. माझ्या डोळ्यात बघ. खरंच तुला वाटतं तुझा हा बाप तुला फसवेल म्हणून ? मान्य आहे , मी माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होण्यासाठी काहीतरी पाप केलं असेल पण स्वतः च्या मुलाचं आयुष्य बरबाद करण्याएवढा गुन्हा नाही रे करणार तुझा हा बाप. तू मला एकदा म्हटला असतास तर मी माझ्या हातानं तुझं आणि राधाचं लग्न नसतं का लावून दिलं ? तुझ्या मनात माझ्याविषयी कुणीतरी काहीतरी भरवलंय आणि हे मी तुझ्या डोळ्यात बघून सांगू शकतो. तू माझ्यावर विश्वास ठेवू नये इतकं आपलं नातं तकलादू आहे का रे ? आणि काय तर माझा धाक , माझी दादागिरी ? माझी बंधनं ? हो आहे धाक , असणार माझी दादागिरी असणार माझी तुच्यावर बंधनं. जोवर ह्या बापाची बंधनं तुझ्यावर लादली आहेत तोवर तू सुखरूप आहेस.. कारण ह्या बंधनातच माया , आपुलकी सगळं काही दडलंय..

मी – बास करा.. खरंच बास करा . नको मला तुमचं तत्वज्ञान . मला माहीती आहे की तुम्ही सूत्रधार आहात ह्या कटकारस्थानाचे. हे तुमचं नाटकी रूप मी जगासमोर आणेन. तुम्ही ह्मा जगातले नालायक , हलकट वडील आहात. राधा आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचेही तुम्ही गुन्हेगार आहात. आम्हाला तुम्ही वेगळं केलंत. चंदू काका आणि काकूला स्वार्थापोटी घराबाहेर काढलंत.. देव चांगली शिक्षा देणार तुम्हाला. मला तर आता असं वाटतंय की तुम्ही माईला मारलं असावं.

आप्पा – अरे बाळा ऐक माझं... तुला कोणीतरी फसवलंय. आपल्यात कुणीतरी भांडणं लावतंय..

आप्पांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला.. मी त्यांना हात काढून घेण्यासाठी ढकललं.. ते स्वतः ला सावरू शकले नाहीत.. आप्पा काठावरून दरीत पडले. त्यांना वाचवताच येऊ शकत नव्हतं. माझा चुकून धक्का लागला आणि ते पडले. मी माझ्या वडीलांचं मरण माझ्या डोळ्यांनी बघितलं.
क्रमशः
SWA membership no. 51440
®© पूर्णानंद मेहेंदळे

 

🎭 Series Post

View all