Oct 24, 2021
कथामालिका

चक्रव्यूह भाग 26

Read Later
चक्रव्यूह भाग 26

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..चक्रव्यूह भाग 26

मी – चल निघूया ..

राधा – कुठे जायचंय ?

मी – तुला घरी सोडतो आणि सदाकाकाला पहिलं भेटतो.

राधा – मी पण येते तुझ्यासोबत.

मी – मी एकटाच जाणारे. तुझी तिथे काहीच गरज नाही .

राधा – पण तरीही..

मी – एकदा सांगितलं ना नको म्हणून ? आधीच संकटं कमी नाहीयेत.. त्यात आता पुन्हा दुसरं काही नकोय आणि काही निरोप वगैरे यापुढे कुठल्याही माणसाला द्यायला लावू नकोस.

राधा – परत असं नाही होणार...

मी – तसं झालं ना .. तर याद राख.. जीव घेईन मी तुझा. आधीच एकाचा जीव घेण्यासाठी माझे हात आसुसलेत. चल , आता....

राधा तेव्हा अशीच बघत उभी राहीली. तिला माझ्यात वेगळेपण जाणवत होतं. जशी परिस्थिती बदलत होती तसा आपसूकच माझ्यात बदल होत होता.

राधा – मी जाते एकटीच घरी. तू सोडायला आलास तर अजून काही ना काही घडेल..

मी पुढे काही बोलणार तोच राधा निघून गेली .. आता लक्ष्य एकच ते म्हणजे सदाकाका. त्याला भेटून सगळं काही विचारणं गरजेचं आहे. त्याने कुणाच्या सांगण्यावरून तर असं काही केलं नसेल ना ?

        मी धावत घरी आलो. सदाकाकाला शोधू लागलो. पडवीतल्या पायरीवर विद्याधर काका बसलेला होता.

मी – विद्याधर काका .. सदाकाका कुठाय ?

विद्याधर – अरे त्याला आप्पांनी मगाशी लागात पाठवलंय..

मी – मी सुध्दा जाऊन येतो लागात..

मी फटफटीवर बसलो आणि मी लागात आलो. पाऊस नुकताच पडू लागला. आजूबाजूला हिरवीगार आंबा , फणस  , काजूची झाडंच झाडं.. आमचा लाग तसा प्रचंड मोठा.. ह्या लागात स़ाधारण 100 गडीमाणसं तरी आंबे टिपतात. आंब्यांचा सिजन संपला होता.. आमची गाईगुरं घेऊन सदाकाका इथे लागातच यायचा. मी लागात येऊन सदाकाकाला शोधत होतो. आमच्या गाई दिसल्या पण सदाकाका दिसत नव्हता.

मी – सदाकाकाsss.  सदाकाकाss

एवढ्या मोठ्या लागात कसं शोधायचं त्याला ? मी पुढे पुढे चालत होतो. माझ्या हाकेला तो साद देत नव्हता.. कुठे असेल तो ? मी हळूहळू पुढे जात होतो. कानावर पक्ष्यांचा किलबिलाट व गुरांचं हंबरणं ऐकू आलं. पायाखाली चिखल व ओला झालेला पालापाचोळा. माथ्यावर रिमझिम पडत असलेला पाऊस.. आमचा लाग संपताच एक नदी लागते. नदीचं पाणी भरलं होतं.. पाण्याला जोरात वेग होता मला पाण्याची प्रचंड भीती असल्याने मी थोडा मागे सरकलो. पुन्हा त्याला हाक मारली. त्याला शोधता शोधता अख्खा लाग पिंजून झाला होता. हा कुठे गेला असेल ?  तोच समोरून तो आला.

मी – काय रे कुठे होतास ? किती हाका मारल्या तुला !

सदा – मी होतो इथंच. तिकडं आमराईत होतो म्हणून दिसलो नसेन. आज इथे कसं येणं म्हणायचं ?

मी – हे खिशात काय लपवलंय्स ?

सदाचा खिसा  फुगीर दिसत  होता..

सदा – काहीच नाही..

मी – अजून लपवाछपवी करू नकोस. काय लपवलंस ते दाखव मला..

सदाने खिशातली बेचकी बाहेर काढली.

सदा – पक्ष्यांची शिकार .

मी – किती वेळा सांगू तुला नको मारू मुक्या पशुंना.. आण ती बेचकी इथे..

मी त्याच्या हातातली बेचकी काढून घेतली.

सदा – हे आप्पांना नको सांगूस..

मी – अजून किती आणि काय लपवलय्स आप्पांपासून ? आप्पांच्या सांगण्यावरून किती कामं केलीस आजवर ?

सदा – असं का विचारतोय्स तू ?

मी – मी का असं विचारतोय हे तुला कळतंय पण वळत नाहीये. बोल , तू का वागलास माझ्या आणि राधा बाबतीत असं ? राधाची चिठ्ठी तू का नाही मला दिलीस ? का तू राधाशी खोटं बोल्लास ?

सदा एकटक माझ्याकडे पाहत उभा होता. मला त्याचा राग आला आणि मी त्याचा गळा आवळला.

मी – अरे बोल..तू आमचा विश्वासू नोकर असूनही का फसवलंस ?

सदा – मला तसं वागावं लागलं. माझा नाईलाज होता. सोड मला . सांगतो सगळं.

मी त्याचा गळा सोडला. तो थोडा खोकत होता.मी मात्र स्वतः ला सावरलं.

सदा – ऐक.. तुमच्या नात्याबद्दल आप्पांना सगळं माहीत झालंय. राधाने तुला दिलेली चिठ्ठी आप्पांच्या हाती पडली आणि आप्पांनी एक तुमच्या विरूध्द कट रचला.

मी – काय ते कळेल असं बोल आणि खरं बोल..

सदा – आप्पांनी ती चिठ्ठी वाचली आणि म्हणाले की राधा प्रेग्नंट आहे मनोहरमुळे. ते थोडे चिडले आणि त्यांनी बजावून सांगितलं की ह्या चिठ्ठी बद्दल , ह्या बातमीबद्दल घरात कळता कामा नये.

मी – आप्पांनी ही चिठ्ठी कुठे वाचली ?

सदा – इथे , लागात.. त्यावेळी मी लागात आलेलो म्हटलं घरी जाऊन तुला देऊया चिठ्ठी पण नेमकी चिठ्ठी माझ्या खिशातून पडली तेही आप्पांसमोर. आप्पांनी ती चिठ्ठी माझ्यासमोर वाचली. त्यांनी मला तेव्हा राधाला निरोप द्यायला सांगितला की मनोहर ला विसर , मनोहरला लग्न करायचं नाहीये , मनोहरच्या भावाशी लग्न कर असं सारं काही तुझं नाव घेऊन खोटं सांगायला भाग पाडलं त्यांनी मन्या. माझा नाईलाज होता रे. दुसऱ्या दिवशी आप्पा कुठंतरी राधाच्या बापाला भेटले. स्वतः ची लाज जाऊ नये . गोष्टी चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून आप्पांनी तुझं नाही तर श्रीधर चं नाव राधासाठी सुचवलं. आप्पांचा मान राखत त्यांनी त्याच संध्याकाळी राधाची पत्रिका दिली आणि लग्न आप्पांनीच जुळवून आणलं. मी ह्या खेळातलं प्यादं आहे रे. आपल्या सर्वांना खेळवणारे आप्पा आहेत आप्पा. तूच मला सांग , ज्यांच्या सोबत मी लहानाचा मोठा झालो , ज्याने मला स्वतः च्या भावासारखं समजलं, ज्यानं कधी मला नोकराचा दर्जा दिलाच नाही त्याला मी नाही कसा म्हणू शकतो म्हणून मला तसं वागावं लागलं . मला माफ कर.

मी – का ? काय बिघडवलेलं मी आप्पांचं ? माझा बापच माझं आयुष्य बिघडवतोय. माझ्या आयुष्यातील खलनायक माझा बापच आहे. लाज वाटते रे ह्या गोष्टीची. नेहमी त्यांच्यासाठी सर्कशीतल्या विदुषकासारखा वागलो. आप्पा म्हटले हस की हसायचं , आप्पा म्हटले रड की रडायचं. आप्पांशिवाय पान हलत नाही रे माझं. मी काय त्रास दिला त्यांना की ते माझ्याशी असं वागले..

मी त्यावेळी पहिल्यांदा सदाच्या मिठीत ढसाढसा रडलो. आधार कुणाचाच नव्हता तेव्हा. आपला बाप इतका नालायक कसा ? ज्या बापाला मी गाभाऱ्यातल्या देवासमान मानतो तो देव नाहीच ?

सदा – शांत हो ! मला आता फार तुझ्यापासून लपवता नाही येणार. मी तुला आणखी एक गोष्ट सांगणारे.

मी – कुठली ? अजून काय काय केलंय आप्पांनी ?

सदा – त्या वेळी म्हणजे ललितापंचमीच्या दिवशी चंद्याला आणि  वहिनींना घर सोडावं लागलं . आत्ता तुला आठवत नसेल . लहान होतास तेव्हा खूप.

मी – ते कसं विसरू शकतो मी. आठवतंय मला चांगलच..

सदा – त्यावेळी देवीच्या प्रसादात भांग मिसळली म्हणून आप्पांनी तुझ्या  चंदू काकाला मारलं , शुभदिनी घराबाहेर काढलं.. पण तेव्हा दोष चंद्याचा नव्हता.. आप्पांचा आणि माझा होता.

मी – म्हणजे ?

सदा – पूजेच्या आधीच्या रात्रीच आप्पांनी प्रसादात भांग मिसळण्यासाठी मला सांगितलं होतं. मी ठरल्याप्रमाणे सकाळी वहीनी आत शिरा बनवत असताना तिचं लक्ष्य चुकवून भांग मिसळली. तिला कळलंही नाही मी तिथे भांग मिसळून कधी गेलो ते.. नंतर वहीनीच्या मदतीसाठी चंद्या आत गेला आणि तिथेच फसला. आप्पांचा कट यशस्वी झाला. आप्पांनी चंद्याला अडकवलं.
क्रमश:
कथेचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.
SWA membership no.  51440
®© poornanand Mehendale

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Poornanand

Writer

Author