Oct 24, 2021
कथामालिका

चक्रव्यूह भाग 20

Read Later
चक्रव्यूह भाग 20

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

  अंधारात आप्पांचे डोळे चमकत होते. मी आप्पांना जिन्यातच अडवलं.

मी – आप्पा.. नाहीये कुणी इथे. मला कुणीतरी असल्याचा भास झाला.

आप्पा – नक्की ?

मी – हो आप्पा ! चला जाऊ खाली .

आप्पा – पैसे नीट घेतलेस ना तिजोरीतले ?

मी – हो घेतलेत.. ह.. हजार..

आम्ही बोलत बोलत खाली आलो. आप्पांनी माजघरात थांबून विचारलं.

आप्पा – माझ्यापासून तू काही लपवत नाहीस ना ? जर लपवत असशील तर खरं काय ते सांग मला.

मी – मी.. नाही काही लपवत आप्पा !

आप्पा – ह्या घरात आता काय तो तुझ्यावरच विश्वास आहे माझा . त्यामुळे तू माझा विश्वासघात करू नयेस असं वाटतं , म्हणून विचारलं की काही लपवत असशील तर सांग.

मी -खरंच काही नाही आप्पा !

आप्पा – ठिक आहे.

मी आप्पांना फसवून चूक तर करत नाही ना ? नाही . काही गोष्टी चांगल्यासाठी लपवाव्या लागतात. आप्पा एव्हाना झोपाळ्यावर बसून पत्रिका पाहत होते. श्रीधरच्या लग्नासाठी मुलीचा शोध सुरू झाला होता. इतक्यात मागच्या पडवीतून श्रीधरचा आवाज आला.

श्रीधर – मनोहर , जरा ये इथे.

मी – आलो.

श्रीधरने हाक मारल्या मारल्या त्याच्या समोर मी उभा राहीलो. श्रीधर वाळलेल्या सुपाऱ्या एका पोत्यात भरत होता.

मी – बोल दादा.

श्रीधर – सुपाऱ्या भरायला मदत कर .

खिशात नीट पैसे ठेवलेत ना ? तपासलं आणि त्याला मदत करू लागलो.

श्रीधर – मन्या , एक विचारू का रे ?

श्रीधर हळू आवाजात माझ्याशी बोलू लागला.

मी – हा . विचार.

श्रीधर – तू लपवाछपवी करायला कधीपासून शिकलास ?

मी – मी काय लपवलं ?

श्रीधर – हे पैसे नक्की आप्पांकडून कुठल्या कारणासाठी घेतलेस ?

घरातली कुठलीच गोष्ट घरातल्या माणसांपासून लपून राहत नव्हती. त्यामुळे त्याला हे पैशांबाबत कळलं सहाजिकच होतं.

मी – मित्राची आई आजारी आहे म्हणून !

श्रीधर – कुठल्या दवाखान्यात अँडमिट केलंय ? चल , मी येतो तुझ्यासोबत उद्या ..

मी – न.. नको. घरीच सगळ्या ट्रिटमेंट देत आहेत डॉक्टर !

श्रीधर – चल , मी पण येतो तुझ्यासोबत उद्या तुझ्या मित्राच्या घरी . त्याच्या आईला भेटायला !

मी – नको. तू माझ्यावर संशय घेतोय्स का ?

श्रीधर – संशय नाही. खात्री आहे माझी की तू खोटं बोलतोय्स. हे बघ मन्या , मी तुझा भाऊ कमी आणि मित्र जास्त आहे. लहानपणापासून आपण एकही गोष्ट कधीच एकमेकांपासून लपवली नाही आणि आज असं काय कारण आहे लपवाछपवी मागचं ? मी मागे एकदा तुला विचारलं होतं की तू कुणाच्या प्रेमात असशील तर सांग.. तेव्हाही तू लपवाछपवी केलीस. मी तुझ्यासाठी इतका परका झालो का रे ?

मी सुपाऱ्या भरणं थांबवलं. हात झटकले.

मी – काही नवीन नाती जोडण्यासाठी जुन्या नात्यांना परकं करावं लागतं !

श्रीधर – अस्तित्व संपून जाण्याएवढं परकं करू नये रे ! आणि नवीन नाती जोडताना जुनी नातीच कामी येतात .

मी – फालतूच्या गोष्टी ऐकण्यात वेळ नाही मला..झोपतो मी.

श्रीधर – ही लपवाछपवी थांबव. तुझ्या ह्या अशा वागण्याने तुझ्यावर जीव ओवाळणारी माणसं तुलाच परकं कधी करतील हे कळणारच नाही तुला कधी !

मी त्याचं पुढचं काही ऐकून घेतलं नाही. ऐकण्यासारखं काही नव्हतंच. त्यावेळी श्रीधर आणि माझं पहिल्यांदाच एकमत झालं नव्हतं. ज्याच्याशी मी माझ्या मनातलं सगळं सांगेन त्यालाच मी दूर करत होतो. राधा माझ्यासोबत असताना मला दुसरं कोणी नको. माझ्या घरातली माणसं सुध्दा नकोशी वाटू लागली. स्वतः च्या मनाला पटेल तेच करायचं असं मी ठरवून मोकळा झालो होतो.

          दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे राधा आणि मी गेलो. सोनोग्राफी करून झाल्यावर डॉक्टर म्हणाल्या ..

डॉक्टर – राधा , तू प्रेग्नंट आहेस. Congratulations !

ह्यावर खूष व्हावं कि ह्या गोष्टींचा पश्चात्ताप करावा ?

डॉक्टर – तुम्ही ह्या गोष्टीची कल्पना घरी द्या ! आणि मुळात लग्नाच्या आधी हे सगळं घडलंय . समाज काय म्हणेल ? घरचे काय म्हणतील ? ह्याची नका चिंता करू पण आपल्याला घरात ही गोष्ट नक्की सांगा. घरातलं कोणीच सोबत नसताना मी तुला चेक करणं मला चुकीचं वाटलं पण शेवटी मी माणूसकी दाखवत्ये. ह्या वयात असं घडू शकतं याची जाण आहे मला. प्रेग्नन्सी चा हा चौथा आठवडा आहे. मार्गिंग सिकनेस  , थकवा हे जाणवलंच असेल तुला...मी काही गोळ्या देते लिहून. त्या रोज घे. महिन्यातून एकदा इथे यावं लागेल. राधा , तू जरा बाहेर बस..

राधा माझ्याकडे बघत बाहेर निघून गेली.

डॉक्टर – दोघांनीही दोघांच्याबद्दल काही सांगितलं नाहीये. बरोबर ना ?

मी खाली मान घालून गप्प बसलो होतो.

डॉक्टर – डोन्ट वरी.. मी काही नाही सांगणार तुमच्या घरी. माझी एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर हे घरी सांगा.. आणि नेहमी तिच्याचसोबत राहा. ही जबाबदारी पेलवेल का तुम्हाला ? हा प्रश्नच मला नाही विचारायचाय. कारण तू होच बोलशील. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव. जसं सोप्पं दिसतंय तितकं हे सोप्प नाही. जबाबदारी निभवता येईल इतकं तुमचं वय नाहीये. जे झालंय ते तुम्हा दोघांच्या मर्जीने झाल्यामुळे मी यावर फार काही बोलायचं नाही.

त्यांच्या बोलण्यात कडवटपणा जाणवत होता. मी शेवटी विषय टाळला.

मी – तुमची फि ?

डॉक्टर – सगळं मिळून 1700 . लक्षात ठेव मी जे म्हणत्ये ते..

मी – हे धरा..

खिशातून नोटा काढत त्यांच्यापुढ्यात ठेवल्या.. त्यांनी रागाने बघत हातात रिपोर्ट दिला. मी रिपोर्ट घेऊन बाहेर आलो.

राधा – काय झालं ?

मी – काही नाही.

राधा – चिडलेला दिसतोस..

मी – हे रिपोर्ट धर.. चल निघू..

आम्ही आमच्या घराकडे वळालो..

राधा – ऐक ना , मी आज माझ्या घरी सगळं सांगणारे. फारवेळ मी असं नाही लपवू शकत. माझं मन खात राहील . आईबाबांना फसवून मला नवं आयुष्य नाही जगायचं.आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. सगळी आपली चूक . शिक्षण संपेपर्यंत दुनियेसमोर ही लपवाछपवी करावी लागणारच आहे. उगाच बाहेरून दुसरीकडून घरी कळण्यापेक्षा आपण सांगू ना घरात आपल्या तोंडाने..दुसरा मार्ग नाहीये आता आपल्याकडे.. अबोर्शन करायचं नाही म्हणतोस... आणि बरोबरच आहे ते.. तू ऐकतोय्स ना मी काय म्हणत्ये ते..

मी – तू शांत बस जरा.. आधीच डोकं आऊट झालंय..

मी पहिल्यांदाच भररस्त्यात तिच्यावर ओरडलो. तिच्या डोळ्यात आपसूकच पाणी आलं. ती काहीच न बोलता पटापट माझ्यासमोरून निघून गेली. तिला अडवायची हिंमतच माझी झाली नाही.

      खरंच एखाद्याचा भूतकाळ इतका घातक असू शकतो ? एक एक करून माझ्यासमोर भूतकाळ उलगडत जात होता. मी मेल्यातच जमा होतो. ती मुलगी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. लक्षात आलं की शरीर काळंनिळं पडलंय.. यावेळी मात्र तिच्या डोळ्यात माझ्या अशा रूपाची भीती दिसत नव्हती. ती फक्त मला निरखून पाहत असावी.

मी – काय ? अशी का पाहतेस ?

मुलगी – नाही काही खास नाही. तू लवकर बरा हो. बाकी सगळं सविस्तर सांगेन नंतर. आत्ता ही वेळ नाही सगळं काही सांगायची. आता काही दिवस मी इथेच थांबणार आहे.

मी – इथे ?

मुलगी – हो. काही प्रोब्लेम आहे ?

मी – नाही काही नाही.

सगळे खोलीतून बाहेर गेले. मी पुन्हा घडलेल्या घटनांची उजळणी करत बसलो. ह्या सगळ्यासाठी काळ जबाबदार होता. काळाचं हे चक्र कधी थांबणार ? नवीन रहस्य नव्याने समोर येत आहेत. माझी ही खरंच मुलगी असेल ? , माझ्यावर लक्ष्य ठेवणारी कोण असावी ती व्यक्ती ? जे काही सांगितलं ते सगळं काही तिने वरवरचं सांगितलंय. मला ह्या सगळ्याच्या मुळाशी जाणं गरजेचं होतं.

 

SWA membership no. 51440
®© Poornanand Mehendale

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Poornanand

Writer

Author