Oct 24, 2021
कथामालिका

चक्रव्यूह भाग 19

Read Later
चक्रव्यूह भाग 19

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
 

      पुन्हा तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेणं गरजेचं आहे असं वाटू लागलं पण ते सगळं सोडलं तर ही खरंच माझी मुलगी असेल ? आणि हिला माझ्या भूतकाळाबद्दल सगळी माहिती असावी ? मला हिच्याविषयी आपुलकी का नाही वाटत ? रक्ताचं नातं जरी म्हणत असली तरी मला ही मुलगी परकीच वाटत होती. त्यादिवशी राधा आणि मी डॉक्टरांकडे गेलो होतो. साधारण अर्धातास त्या काहीच न बोलता आम्हा दोघांकडेही पाहत होत्या.

मी – क. काय झालं ? अशा का पाहताय ?

डॉक्टर – राधा , राधाच बोल्लीस ना नाव ?

मी – अं. हो राधाच .

मी राधाकडे बोट दाखवून म्हणालो. त्यांनी माझ्याकडे जवळजवळ दुर्लक्ष केलं.

डॉक्टर – हा , तर राधा . तुला असं कधीपासून वाटतंय ?

राधा –झाले असतील दोन दिवस !

डॉक्टर – असतील ? हे सगळं घरी माहीत आहे का ?

मी – हो

राधा-नाही .

आम्ही दोघं एकसाथ हो आणि नाही बोलून मोकळे झालो. शेवटी प्रकरण मीच सावरलं.

मी – म्हणजे माझ्या घरी माहीत आहे पण तिच्या घरी नाही.

डॉक्टर – ओके मग तू तुझ्या घरच्यांना घेऊन ये !

मी – घरच्यांना ?

डॉक्टर – जरा एक मिनिट बाहेर जाऊन बस ! मला जरा हिच्याशी बोलायचंय !

मी – मी इथे बसलो तर काय जातंय ?

डॉक्टर – तिला प्रेग्नंट असल्यासारखं वाटतंय ना ?  तुलाही तू प्रेग्नंट असल्याचं वाटत असेल तर तू सुध्दा बस !

मी गप्पपणे बाहेर निघून आलो. काय बोलणं सुरू असावं आतमध्ये ? राधा खरंच प्रेग्नेंट असेल तर ? घरातले स्वीकारतील का आम्हा दोघांना ? काहीही झालं तरी मी राधाला साथ देणार . तोच राधा बाहेर आली.

मी -क.. काय म्हणाले डॉक्टर ?

राधा – उद्या सकाळी बोलावलंय. सोनोग्राफी पूर्वी काही तास काहीच खाऊन न यायला सांगितलंय.

मी – मी त्यांना पैसे देऊन येतो.

मी रिसेप्शन काऊंटरवर पैसे दिले आणि पुन्हा राधासमोर येऊन उभा राहीलो.

राधा – ह्या दोन गोळ्या दिलेत ! चल , निघूया..

आम्ही हॉस्पिटलबाहेर आलो.

राधा – आपलं शिक्षण पूर्ण झालं नसताना हे सगळं म्हणजे..

मी – आमच्या आप्पांनी वयाच्या 17 व्या वर्षी 13 वर्षांच्या बाईसोबत म्हणजे माईसोबत लग्न केलं आपण तर दोघे समवयस्क आहोत. 21 वर्षांचे.  यावर्षी शिक्षण पूर्ण झालं की लगेच लग्न.

राधा – आपलं शिक्षण पूर्ण व्हायला अजून 6-7 महिने आहेत. ह्या महिन्यात पोट दिसायला लागलं तर ?

मी – तू प्रेग्नंट आहेस हाच समज डोक्यात धरून का बसल्येस ?

राधा – अरे , माझी पाळी चुकल्ये , मध्ये मध्ये मळमळायला लागतं , मध्येच डोकं गरगरतं आणि ही सगळी प्रेग्नन्सी ची लक्षणं आहेत . आत्ताच डॉक्टर सुध्दा तेच सांगत होत्या.

माझं मन तेव्हा प्रचंड अस्वस्थ झालेलं होतं. काहीच सुचत नव्हतं. तिच्या मनातील भीती कमी करण्यासाठी चेहऱ्यावर खोटं का होईना हसू आणणं जास्त महत्त्वाचं.

मी – हे बघ नको काही टेंशन घेऊ. सगळं मी करेन सुरळीत .

तिच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हटलं.

राधा – तुला ना खोटं बोलता येत नाही आणि ना धड तुला खोटं हसताही येत नाही.

तिने माझा हात बाजूला केला .

राधा – निघते मी. उद्या भेटू इथेच आणि हो.. उद्या जास्त पैसे लागतील.. मी थोडेसे आणेन तुला जमेल का पैशांचं काही बघायला ? साधारण 1000 तरी लागतील.

मी – मी बघतो.. आणि तू पैसे आणायची गरज नाही. शांतपणे आत्ता घरी जा.

ती तिथून निघून गेली. मला तिची पाठमोरी आकृती दिसत होती. आता नवीन एक टेंशन. पैसे कसे काय मिळणार ? घरी असे मागू नाही शकत. विचार करत करत मी घरात आलो होतो. कुणाकडे पैशांची भिक मागणं हे मला आणि माझ्या घराण्याला कदापिही शोभून दिसलं नसतं. करावं काय ? आप्पा झोपाळ्यावर झोके घेत सुपारी कातरत खालच्या वाडीतल्या जम्या शिर्कशी बोलत होते.

आप्पा – आपण आपल्यापरिने प्रयत्न करायचे. भात जर चांगला झालाच तर बाजारात किंमत . मागचं जेव्हा पीक घेतलं तेव्हा

मी मध्ये पडलो.

मी – आप्पा .. मला तुमच्याशी बोलायचंय.

आप्पांनी कातरलेली सुपारी तोंडात टाकली.

आप्पा – बोल ..

मी – मी . म्हणजे मला . नै काही नाही. नंतर बोलू..

मी पावलं टाकत माजघरात आलो माजघरात आल्या आल्या एक कल्पना डोक्यात आली होती. प्रेमासाठी काहीही.. मी एक धाडसी निर्णय घेतला होता. त्या निर्णयापासून नशिबाचे फासे पलटले गेले. पुन्हा आधीचाच विचार मनात आला . मागेवत का पैसे ? कशासाठी विचारलं तर काय सांगू ? डॉक्टरांनी घरी सांगितलं तर ?

           सगळ्या गोष्टींचा विचार करता करता जेवणं होऊन रात्र झाली होती. बाहेर अंगणात आप्पा शतपावली करत होते. मी पुन्हा त्यांच्यासमोर जाऊन उभा राहीलो.

मी – आप्पा.. दुपारचं बोलणं अर्धवट राहीलं.

आप्पा – हा. काय म्हणत होतास ? सांग आत्ता.

मी – मला थोडे पैसे हवे होते..

आप्पा – कशासाठी आणि किती ?

मी – ह.. हजार..

आप्पा – एवढे ?

मी – अं. हो.

आप्पा – कशासाठी ?

मी – मित्राची आई आजारी आहे. त्याचे वडील नुकतेच वारले. त्याला पैशांची अडचण आहे तर मी त्याला म्हटलं की मी देईन पैसे !

आप्पंनी मला निरखून बघितलं.

आप्पा – म्हणजे तू निर्णय घेऊन मोकळा झालाच आहेस ! असो , तू तरी चांगलं काम करतोय्स.

आप्पांनी लगेच त्यांच्या जान्हव्याला हात लावला आणि जानहव्याला अडकलेली चावी काढून माझ्या हातावर ठेवली.

आप्पा – जा , तिजोरीतून घे पैसे..

मी धावत बाळंतीणीच्या खोलीत आलो. तिजोरी उघडली. तिजोरीत बरेच दागिने व पैसे होते. मला एक क्षण मोह आवरला नाही. पुढे गरज लागू नये म्हणून आत्ताच 3000 रूपये काढून घेतले. तिजोरी बंद केली , पैसे खिशात ठेवले . आप्पांना चावी देण्यासाठी खोलीचं दार बंद करून बाहेर आलो. आमच्या बाळंतीणीच्या खोलीला लागूनच माळ्यावर जाण्यासाठी जिना होता. माझी एका क्षणापूर्ती त्या जिन्याच्या पायऱ्यांकडे नजर गेली. अंधारामुळे कोण आहे तेच कळलं नाही. कोण असावं ?

मी – कोण आहे तिथे ?

एका स्त्री ची सावली मला दिसत होती. ती कोण होती ? माझ्या प्रश्नावर तिचं काहीही उत्तर येत नव्हतं. मी जिन्याची एक पायरी चढलो. ती सावली जागची हलल्यासारखी वाटली.

मी – जिथे आहेस तिथेच थांब ?

मी दोन पायऱ्या आणखी वर आलो. ती सावली जागच्या जागी उभी होती.. तोच आप्पांची हाक ऐकू आली.

आप्पा – काय रे ? आत्ता रात्री माडीवर कशाला जातोय.

मी वळून पाहीलं. आप्पा जिन्याच्या पायथ्याशी उभे होते. मी त्या सावलीकडे बोट दाखवत म्हटलं..

मी – तिथे कोणीतरी आहे आप्पा..

आप्पा – कुठे कोण ?

माझी नजर त्या सावलीच्या दिशेने गेली. तिथे कोणीही नव्हतं. होता फक्त रातकिड्यांचा आवाज..

आप्पा – काय रे ?

मी अंधारातच माळ्यावर गेलो. तोच माझा खांदा मला ओलसर वाटू लागला. मी खांद्याला हात लावला.. बहुतेक तेव्हा माळ्यावरच्या कौलाला लटलेलं वटवाघूळ मुतलं असावं असा अंदाज मनाशी बांधून घेतला.. मी घाबरल्याने आप्पा माडीवर येऊ लागले...अंधारात त्यांचे डोळे चकमकत होते.

 

क्रमशः

SWA membership no. – 51440

Written by Poornanand Mehendale

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Poornanand

Writer

Author