Oct 24, 2021
कथामालिका

चक्रव्यूह भाग 18

Read Later
चक्रव्यूह भाग 18

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


STORY

चक्रव्यूह भाग 18

Language – Marathi

 

      ती लाजली . माझा हात तिच्या हातात होता. मी तिला आता मात्र मिठीत घेतलं.

राधा – अरे , नको कोणीतरी येईल..

मी – मी असताना कशाला घाबरतेस ?

राधा – तू माझ्यासोबत आहेस म्हणूनच घाबरतेय !

मी – तू उगाचच फार विचार करतेस जगाचा. हा समाज काय म्हणेल वगैरे वगैरे ! नको ना इतका विचार करू.

राधा – तुला नाही कळणार !

मी – हो , सगळं तुलाच कळतं. बास्स ?

राधा – ऐक ना , आईला संशय आलाय.

ती लगेच माझ्या मिठीतून दूर झाली.

मी – संशय ?

राधा -हो .मी प्रेमात पडल्याचा तिला संशय आलाय.

मी – मग काय झालं ? सांगून टाक की तू माझ्या प्रेमात पडल्येस.

राधा – तुला प्रत्येक गोष्ट सोप्पी वाटते इथेच चुकतोस तू. घरात तुझ्या प्रेमात आहे असं सांगितलं की काय रामायण घडेल याची तुला जाणीव नसली तरी मला आहे. चल , मी निघते.

मी – हे बघ..

राधा – उगाच आपल्यात त्या गोष्टीवरून नको वाद. आपण उद्या समुद्रावर भेटूयात दुपारी. दुपारचं कोणी नसतं समुद्रावर.

तिने दरवाज्याची कडी काढली. दरवाजा उघडला. इकडे तिकडे पाहत तिथून ती निघून गेली. तिचं बोलणं बरोबर होतं. आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय ह्याची कल्पना मलाही होती पण तिला खूष ठेवण्यासाठी तिला मी बोलून दाखवत नव्हतो.

      दुसऱ्या दिवशी दुपारी  आम्ही समुद्र किनारी आम्ही दोघं आलो. दुपारची वेळ असल्याने ऊन कडकडीत होतं. समुद्राला भरती आली होती. लाटा वेगाने किनाऱ्यावर आपटत होत्या. आम्ही  तिथेच एका खडकावर समुद्राच्या त्या लाटा पाहात बसलो. ती आज जरा शांतच दिसत होती.

मी – काय झालंय ?

राधा – काही नाही.

मी – तू आजकाल इतकी अस्वस्थ का असतेस ? कसली ना कसलीतरी चिंता तुझ्या मनात असते. काय झालंय राधा ?

राधा – त्या दिवशी आपल्यात कॉलेज ट्रिपला जे काही झालं त्याची भीती वाटत्ये आता. आपण नकोत्या वयात नको ते करून बसलोय. उगाच पुढे जाऊन ह्याचे विपरीत परिणाम नको व्हायला आयुष्यात.

मी – तू ना स्वतः टेंशन घेतेस आणि मलाही टेंशन देतेस ! हे बघ आपल्यात जे काही झालं ते दोघांच्या मर्जीने झालंय... आणि काय गं काल तर तू ह्या बाबतीत काही बोल्ली नाहीस भेटलेलो तेव्हा.

राधा – तेव्हा हे सांगण्याची योग्य वेळ नव्हती आणि काल रात्रीपासून मला एक वेगळीच शंका येत्ये..

मी – कसली ?

राधा – बहुतेक मी प्रेग्नंट आहे.

हे ऐकून मी अवाक झालो.

मी – मस्करी नको करू..

राधा – मस्करी नाही करत आहे. तुझी शपथ.

मी – आपली तर त्या ट्रिपनंतर भेटही झाली नव्हती. आईला आलेल्या संशयाबद्दल तुला काल सांगता आलं पण तुझ्या मनातली ही भीती नाही का काल माझ्यासमोर व्यक्त करता आली ?

राधा – अरे , काल सांगितलं काय नि आज सांगितलं काय ? परिस्थिती बदलणार आहे का ? तुला हे सगळं सांगण्यासाठी मी इथे बोलावलं.

मी – मग ? आता काय करायचं ठरवलं आहे तू ?

राधा – सगळं मीच ठरवायचं आहे का ? तुझं म्हणून असं काहीच नाहीये ना ?

मी – डोकं सुन्न झालंय माझं हे ऐकून.

राधा – आपण एक काम करू.. आपण अबोर्शन करू.

मी – सॉरी. मी हे नाही होऊ देणार ! तुझ्या पोटात वाढणाऱ्या एका जीवाला मारून टाकण्याचा विचार आलाच कसा मनात ? आपल्या वर्गातला तो मनिष आहे ना , त्याची आई डॉक्टर आहे. उद्या त्यांच्याकडे जाऊन सोनोग्राफी करून पहिली खात्री करून घेऊ.

राधा – मूर्ख आहेस का तू जरा ? अरे , आपण सांगणार काय त्यांना ? मी प्रेग्नंट आहे ? आणि तेही ह्या वयात ?

मी – एवढेही लहान नाही आहोत आपण !

राधा – मग एखाद्या जीवाची जबाबदारी घेण्याएवढे मोठेही नाही आहोत ना रे ! चल मानलं , उद्या समज डॉक्टरांनी चेक केलं आणि जर डॉक्टरांकडून घरात कळलं तर ? माझ्या मनातली ही शंका खरोखरच खरी ठरली तर खूप प्रोब्लेम होतील . जास्त करून मला.

मी – हे बघ , जर ही शंका खरी असेल तर आपण  थांबूया. आपण तसंही शेवटच्या वर्षाला आहोत. एकदा पास झालो की एकमेकांच्या घरी सांगून लग्न करता येईल .

राधा – इतकं सोप्प असतं ना तर कधीच सांगून मोकळी झाले असते मी.

मी – तू का सतत नकारात्मक बोलतेस यार ?  विचार कर ना जरा , तू आणि मी एकाच जातीतले , एकाच धर्माचे , आमचं घराणं मोठं , हातात पैसा खेळता राहतोय . अजून काय हवंय ?

राधा – लग्न होण्यासाठी एवढंस पुरे असतं का ? मुळात म्हणजे आपण आधी खूप मोठं पाप करून बसलोय.

मी – आपण उद्या जाऊयात डॉक्टरांकडे.. जे व्हायचं ते होईल. आत्ता घरी जाऊ.

राधा – अरे पण..

मी – प्लीज नको कटकट करू. मी सांगतोय तसं करायचं असेल तरच माझ्यासोबत राहा..

तिच्या डोळ्यातून ओघळणारं पाणी मी माझ्या हातांनी पुसलं.. माझ्या एका हातात सायकल होती. तिला घेऊन मी चालत चालत तिच्या घरासमोर आलो. आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात बघितलं.

राधा – जाऊया उद्या सकाळी डॉक्टरांकडे ...

हिचे निर्णय असे पटापट कसे काय बदलतात हेच मला कळत नव्हतं. 10 मिनिटांपूर्वी वेगळा निर्णय आणि आता वेगळा निर्णय ?  मुलींच्या मनात काय चाललं असतं ते ओळखता येत नाही हेच खरं.. ती माझ्याकडे नजर टाकून तिच्या घराकडे जाऊ लागली. माझी नजर तिच्या घराच्या माळ्यावर गेली .. माळ्यावरून तिची आई माझ्याकडे बघत होती. मी बघूनही न बघितल्या सारखं करत तिथून पळ काढला..

         डोक्याला भूतकाळामुळे झिणझिण्या आल्या होत्या . मान वर करून पाहीलं तर मी काय बोलतोय हे ऐकण्यासाठी ती मुलगी म्हणजे माझ्या आणि राधामुळे जन्माला आलेली मुलगी आस लावून बसली होती.  राधाच्या आठवणीत अश्रु डोळ्यातून वाहत होते.

मुलगी – डोळ्यासमोर उभा राहीला ना भूतकाळ ? मला सगळं माहीत आहे की तुला भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी नाही आठवत पण ही आठवली ! का ? कशी काय आठवली ही घटना ?

मला पूर्णपणे आठवली नव्हतीच ती घटना पण राधा तेव्हा लग्नाआधीच प्रेग्नंट होती हे नक्की !

मुलगी – मला असं समोर बघून तुझ्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले असतील ना ! डॉक्टरांकडून काही कळलं नाही तुला याची जाण आहे मला. मी त़ुझी मुलगी असल्याचा माझ्याकडे फक्त एकच पुरावा आहे तो म्हणजे तुझा भूतकाळ. ह्या गोष्टी बाबत डॉक्टरांना देखील माहीत होतं. आता तुला वाटत असेल की तुझ्यावर डॉक्टरांना लक्ष्य ठेवायला सांगणारी व्यक्ती मी होते. तर नीट ऐक , ती व्यक्ती मी नव्हे. डॉक्टरांप्रमाणेच मलाही त्या व्यक्तीने तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. त्या व्यक्तीमुळेच तू माझा बाप आहेस हे मला कळलं !

हे ऐकून भिंतीवर डोकं आपटून जीव द्यावा असं वाटू लागलं. गुंता सुटत चाललाय असं वाटतानाच अजून एक ट्विस्ट..

मी – कोण आहे ती व्यक्ती ? त्या व्यक्तीवर तू कसा विश्वास ठेवलास ?

 क्रमश :
कथेचे हक्क लेखक पूर्णानंद मेहेंदळे यांच्या स्वाधीन.

Membership no. 51440
®© Poornanand Mehendale

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Poornanand

Writer

Author