Oct 18, 2021
कथामालिका

चक्रव्यूह भाग 17

Read Later
चक्रव्यूह भाग 17
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now


    ती बाई आत आली आणि तिला बघून माझ्या पायाखालची जमिन सरकली. ती स्त्री दुसरी तिसरी कुणीच नसून माझ्यासोबत परवा बसमध्ये बसलेली , माझ्याच ऑफिसमध्ये माझ्याच जागेवर बसणारी , राधासारखी दिसणारी ती होती. तिच्यापाठून एक अनोळखी माणूस होता तिच्या वयाचा. ती माझ्यापाशी येऊन उभी राहीली.

“ तुम्ही इथे ? ” मी आश्चर्याने विचारलं. मी बसा म्हणण्यापूर्वीच ती खाली बसली. थोडावेळ माझ्याकडे आणि प्लँस्टर कडे बघत होती.

“ मी तुम्हाला विचारलं काहीतरी .. ”

“ एकेरी हाक मारलीस तरी चालेल.. ” ती अतिशय भावनिक होत म्हणाली.

“ त्यासाठी चांगले संबंध लागतात. आपलं कोण परकं कोण हे बघून मी वागत असतो.”

“ त्याच परक्या माणसांनी जीव वाचवला तुमचा.. ” तिच्या सोबत असलेला तिचा मित्र तिच्याकडे बोट दाखवून माझ्याशी चिडून बोलत होता. मी शांत बसलो. तिच्याकडे बघितलं तर ती त्याला नजरेने काहीतरी खुणवत होती. नंतर लगेच ती माझ्याकडे पाहत म्हणाली , “ मला वाटतं तुला आता सगळं सांगायला हवं ! ”

आता माझ्या मनाला खात्री पटली की हिच्या सांगण्यावरून डॉक्टर माझ्यावर लक्ष्य ठेवून असावेत. पण हिने असं सगळं का आणि कशासाठी केलं असावं.

“ बोला , काय सगळं सांगायचंय ? ” मीच विचारलं.

“ तू मला नक्कीच ओळखणार नाहीस हे माहीत आहे मला.. ”

“ कोड्यात टाकणं बंद करा आणि मुद्यावर या .. ”  मी कोरड्या आवाजात म्हणालो.

“ साधारण 28 वर्षापूर्वी तू हे घर सोडलंस आणि त्यावेळी माझा जन्म झाला. ”

तिने लगेच माझ्या हातावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात पुन्हा राधाचा भास होत होता. तोच दारातून बंडू आला. हातात पाण्याचा तांब्या होता..

“ मँडम , पाणी घ्या .. ” मालिकेत  एखादा सस्पेन्स सिन सुरू असताना टिव्हीवर जाहीरात लागावी तसा तो जाहीतरातीसारखा आला होता. तिने त्याच्या हाताततला तांब्या घेतला , घोटभर पाणी पिऊन झाल्यावर तोच तांब्या तिच्या मित्राने हातात घेतला. तिने पुन्हा माझ्यावर हात ठेवला आणि जाहीरात संपून सस्पेन्स सीन सुरू झाला. मी मात्र माझा हात बाजूला केला .

“ जे काही बोलायचंय ते लांबूनच बोला.. “ मी खडसावून सांगितलं.

“ ओके. फाईन . ऐक , माझ्याकडे बघिल्यावर तुला माझ्यात माझी आई दिसते ना ? ”

“ आई ? ” मी पूर्णपणे चक्रावलो. मला राधाच दिसत होती. कोण कुठली हिची आई ? आणि ती मला का म्हणून दिसेल ?

“ आय नो. तू गोंधळून गेलाय्स !  माझ्याकडे बघितल्यावर तुला तुझं पहिलं प्रेम म्हणजे राधा आठवते , माझ्यात राधाचा भास होतो ! राईट ? ” तिने पाणावलेले डोळे पुसत विचारलं.

“ तुम्हाला हे कसं कळालं ? माझ्या पहिल्या प्रेमाबद्दल तुम्हाला कसं माहीत ? “ असं विचारून मी बंडूकडे नजर टाकली. बंडूने चेहऱ्यावरचा घाम पुसत नकारार्थी मान हलवली.

“ नको , बंडूकाकांकडे नको बघूस. त्यांनी काहीच नाही सांगितलंय . मला माहित आहे तुझा भूतकाळ .. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट .. तुझी राधा हीच माझी आई. ”

आता तर मला हे ऐकून हसू आलं. शक्य आहे का हे ?

“ नाही ना विश्वास माझ्यावर ? कदाचित तुला आठवत नसेल की राधा आत्महत्या करण्यापूर्वी तुझ्या कृपेमुळे प्रेग्नंट होती ते . वयात येताना तुम्हा दोघांकडून घडलेलं पाप मी आहे. ”

1 मिनिटासाठी काळजाचे ठोके बंद पडले. काय ऐकलं मी हे नक्की ? माझ्या कानांवर माझा विश्वास बसेना . शक्य आहे खरंच ? ही माझी मुलगी ?

“ मी कसा काय विश्वास ठेवू तुमच्या.. तुझ्या.. तुमच्या ह्या बोलण्यावर ? ” माझी भंबेरी उडली.

“ तुझा तुझ्या भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विश्वास बसू शकतो ना ? ”

मी काही उत्तर दिलंच नाही. डोकं चक्रावलं होतं. प्रचंड प्रमाणात दुखत होतं. एखादी जुनी ट्रंक खोलावी आणि जुन्या गोष्टी आपल्या हाताला लागाव्या अशाप्रकारे तिने मला साधारण 29-30 वर्षांपूर्वी घडलेल्या भूतकाळाची जाण करून दिली होती. मी डोळ्यात जरी ह्या मुलीच्या बघत असलो तरी तिने मला माझ्या भूतकाळात नेलं होतं. आता मात्र मला भूतकाळात घडलेली राधा आणि माझी प्रेमकहाणी स्पष्टपणे आठवत होती... आणि आठवणारच ना ! पहिलं प्रेम कसंकाय विसरता येईल ? आयुष्यात केलेल्या अनेक पापांमधलं ते सर्वात महत्त्वाचं आणि भयंकर पाप माझ्याकडून घडलं होतं.

       त्यावेळी साधारण मी 21 वर्षांचा होतो. 13 वीत शिकत होतो. राधाही माझ्याच बरोबरीची. कॉलेजमध्ये आमच्या प्रेमप्रकरणाची चर्चा आमच्या मागून होत असे. त्यावेळी आमच्यात जवळीक वाढली होती. स़ा़धारण 1992-1993 चं साल. यावेळी मला सिगरेटचं , दारूचं व्यसन माझ्या मित्रमंडळींमुळे लागलं होतं. कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन होतं. राधा आणि मला ते स्नेहसंमेलन बघण्यात काहीच रस नव्हता. एकमेकांनी एकमेकांना पाहून लाजणं हेच काय ते आमचं संमेलन . यातूनच स्नेह टिकून राहतो म्हणे. स्नेहसंमेलन सुरू असताना तिने मला एक विशिष्ट खूण करून सभागृहाच्या बाहेर यायला सांगितलं. आम्ही दोघेही सर्वांची नजर चुकवत सभागृहाच्या बाहेर आलो.

“ किती सुंदर दिसतेस आज तू राधा ! “ मी तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो.

“ वेडा आहेस का ? हात काढ ! कुणीतरी बघेल . सर्वांना कळेल आपल्याबद्दल ! ” ती आजूबाजूला पाहत म्हणाली.

“ कुणीतरी बघेल म्हणून तुझ्यावर प्रेमच करायचं नाही का मी ? ”

“ नाही , तसं नाही ! ”

“ चल , ” मी तिचा हात पकडून एका रिकाम्या वर्गात तिला घेऊन आलो. बाहेर अंधार पडला होता आणि ह्या अंधाऱ्या जगात आम्ही दोघं एकत्र होतो.

“ आता नक्कीच कोणी पाहणार नाही आपल्याला “ मी लगेच दाराची कडी लावली.

“ अरे , इथे कशाला आणलंस ? नंतर उगाच आपण गोत्यात येऊ ! ”

“ मी असताना काहीच नाही होणार ! त्यामुळे तुझ्या ह्या कपाळावरच्या आठ्या नष्ट कर आणि चेहऱ्यावर एक गोड स्माईल आण ! ”

ती थोडी लाजली. तिच्या हातात माझा हात होता.

 क्रमश :
सदर कथेचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत. जर कथा स्वतः चं नाव वापरून शेअर केल्यास अथवा स्वतः चं नाव वापरून कथेचे कुठल्याही माध्यमात विनापरवानगी सादरीकरण केल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Membership no 51440
®© पूर्णानंद मेहेंदळे .

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Poornanand

Writer

Author