Oct 24, 2021
कथामालिका

चक्रव्यूह भाग 16

Read Later
चक्रव्यूह भाग 16

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


   हाताच्या बोटांसह पायाची बोटं  हलली . एक पाय हलवता येत नव्हता . अंगात आता त्राण आले होते. हळूहळू डोळे उघडले गेले. डोळ्यासमोर बंडू , त्याचा मुलगा दिसले. त्या दोघांची नजर माझ्याकडे खिळली होती. हा कुठे आलो मी ? कसा आलो ? कोणी आणलं ? मी अंथरूणातून उठून बसलो.. माझ्या डोक्यात एक कळ गेली आणि एका क्षणापुरते ते दोघं अंधूक दिसू लागले. मी आजूबाजूला नजर फिरवली. घरच्या भिंती , दारं , खिडक्या सगळं ओळखीचं होतं. मी माझ्या कोकणातल्या घरी आलो होतो. मला बाळंतीणीच्या खोलीत ठेवलं होतं. मला जाग आली पाहता क्षणी बंडूने माझ्यासमोर पाण्याचं भांडं ठेवलं. पाण्याचं भांडं हातात घेण्यासाठी हात पुढे केला तर वीजेचा प्रवाहच हातातून जातोय असा करंट बसला. वेदना झाल्या आणि मी कळवळलो. हाताकडे बघितलं , हातात प्लँस्टर होता , पायाकडे बघितलं तर डाव्या पायात प्लँस्टर . दुसऱ्या पायाच्या बोटांवर पट्टी बांधली होती आणि थोड्याफार प्रमाणात खरचटलेलं दिसत होतं. माझ्या कपाळाला देखील एक पट्टी असावी.

“ बंडू ? मी इथे कसा ? ”

बाप – लेकाने भयाण नजरेने एकमेकांना पाहीलं.

“ अरे , बोला ना.. ! ”

तो अँक्सिडेन्ट मला पुन्हा पुन्हा आठवत होता. मी माझा मृत्यू माझ्या डोळ्यांनी बघितला होता. अरे , डॉक्टर कुठे आहेत ? त्यांचं काय झालं ?

“ अरे , बोला ना काहीतरी.. बोलत का नाही तुम्ही ? मला कुणी आणलं इथे ?” मी आवाज चढवतच विचारलं. ते वेड्यासारखं माझ्याकडे बघत होते.

“ दादा , ते.. त्या मँडम आल्या तुम्हाला घेऊन ! ”

आता हा काय ट्विस्ट ? “ कोण मँडम ? नाव वगैरे काही असेल  ना त्यांच ? ”

“ नाही. नाव वगैरे नाही सांगितलं. तुमची अवस्था एवढी बिकट झाली की त्यांची माहिती घेणं विसरलो. आत्ता अर्ध्या तासापूर्वी गेल्या इथून ! ”

“ काय म्हणाल्या त्या बाई ? ”

“ म्हणत होत्या की तुमची गाडी दरीत कोसळली. त्यांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या मित्राने तुम्हाला वाचवलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. तुमचा शेवटचा फोन मला आला होता त्यामुळे त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं. ”

“ कुठलं हॉस्पिटल ? ”

“ भोर जवळचं होतं. ”

“ तू इथून भोर आलास ? आणि इतक्या लगेच घेऊनही आलास ? ”

“ हो , परवा दुपारीच आणली तुम्हाला इथे ! ” त्याचं बोलणं ऐकून मी हादरलोच.

“ म्हणजे ? अरे मी काल रात्री पुण्यातून निघालो रे ... ”

“ दादा , तुमचा accident होऊन आज आठवडा झाला ! ”.

आता मात्र माझ्या पायाखालची जमिन सरकणं शिल्लक राहीलं होतं. केवढा तो ट्विस्ट ?

“ म्हणजे मी एक आठवडा .. ”

“ बेशुद्ध होतात एक आठवडा... ” बंडू डोळे मोठे करून बोलत होता. हे सगळं असंभव आहे. पण डॉक्टरांचं काय झालं असावं ?

“ काय रे , माझ्यासोबत एक माणूस होता गाडीत त्याच्यबद्दल तुला काही माहीत आहे का ?”

“ माणूस ? हां त्या मँडम म्हटल्या की , तुमच्या गाडीत असणारा तो माणूस जागच्या जागी गेला. ”

म्हणजे डॉक्टर गेले ? मला वाटत होतं काहीतरी अघटीत घडणार आणि ते घडलंच. मला त्या दिवशीचं डॉक्टरांचं बोलणं आठवलं. “ मी जोवर जिवंत आहे तोवर काही नाही होणार ” आता माझ्यावर लक्ष्य ठेवणारं कुणीच नसणार का ? पण मग मी त्या व्यक्तीपर्यंत कसा पोहचणार ? डॉक्टर ह्या जगात नाहीत ह्यावर माझा अजूनही विश्वास बसतच नव्हता.

“ थोडक्यात वाचलात तुम्ही दादा . तुमच्या आयुष्यातली ही दुसरी वेळ आहे कोमात जायची.”

बंडू बोलतोय त्यात तथ्य होतं. दोन वेळा कोमात गेलेला माणूस वाचतो ? हा सुद्धा एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल . झिणझिण्या आल्या सारखं झालं.. पण नाही. आता आजारी पडून चालणार नाही. नियतीने आखलेला हा खेळ आपणच संपवायला हवा.

“ मला सांग , त्या मँडम आत्ता कुठे गेल्यात ? ”

“ न. नाही माहिती . पण थोड्या वेळाने येणारेत. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र सुध्दा आहे ! ”

आता ही कोण असेल बाई माझ्या आयुष्यात आलेली ? कशाचाच कशाशीही संबंध नाही.  म्हणजे नसावा असं मला तरी वाटतं. पण मी खरंच 1 आठवडा असेन बेशुध्द ? न असायला काय झालं ? गेली अनेक वर्ष अंथरूणात पडूनच होतो. त्या वर्षांपुढे हा एक आठवडा काहीच नाही. हा एक आठवडा मला एखाद्या दिवसासारखाच वाटतो.

“ बंडू , मला जरा एकांत हवाय.. तुम्ही जरा बाहेर जा.. “ मी माझ्या वेदना आवरत म्हणालो. दोघे गप्पपणे तिथून निघून गेले. पुन्हा पुन्हा तो अपघात माझ्या डोळ्यांना दिसत होता.  डॉक्टर जाताना माझ्यापुढे अनेक प्रश्नांचं भांडार ठेवून गेले. त्या व्यक्ती पर्यंत पोहचण्याचा मार्गही आपसुकच बंद झाला होता..पण ती व्यक्ती माझ्यावर आणि डॉक्टरांवर लक्ष्य ठेवून होती. डॉक्टर गेले याची त्या व्यक्तीला नक्कीच माहिती कळली असणार. कदाचित आत्ताही ती माझ्यावर लक्ष्य ठेवून असेल का ? डॉक्टर मेल्याने त्या व्यक्तीला नक्कीच काही फरक नाही पडणार कारण डॉक्टर तिच्या खेळातलं हे एक प्यादं असणार असं मला वाटतं. एक मि. मला हॉस्पिटलमध्ये नेणारी बाईच माझ्यावर लक्ष्य ठेवून असेल.

      मी ह्या बाळंतीणीच्या खोलीत असाच तर्क लावत बसलो. खरं काय खोटं काय हे कळत नव्हतं. इथून उठण्याची माझ्यात ताकद नव्हती. आता पुन्हा एक प्रश्न पडला मी बेशुद्ध असूनही मला त्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी लगेच discharge  दिला ? बंडू धाडदिशी खोलीत आला.

“ काय रे ? तुला सांगितलं ना इथे येऊ नको म्हणून ? ” – मी रागातच म्हणालो.

“ दादा , त्या मँडम आल्यात. ”

“ आल्या का त्या ? पाठव आत त्यांना . ”

तो निघून गेला. आता त्या मँडमची मी आतुरतेने वाट पाहू लागलो. कोण असेल ? कशी असेल ? मला का तिने वाचवलं असेल ? सर्व प्रश्न माझ्या मनात साचले गेले.

“ या आत या ” बाहेर असलेल्या बंडूचा आवाज खोलीत अस्पष्टपणे मला ऐकू आला. तिच्या पायातल्या पैजणांचे आवाज ऐकू येत होते. हळू आवाजात बाहेर कसलीतरी कुजबुज सुरू होती. खोलीच्या दारापाशी आली आणि तिने दार वाजवलं..

“ येऊ का आत ? ” त्या बाईचा आवाज मला ओळखीचा वाटला.

“ उघडं आहे दार . या आत. “ मी असं म्हणता क्षणी क्षणाचाही विलंब न करता ती हसऱ्या चेहऱ्याने आत आली आणि तिला पाहता क्षणी माझ्या पायाखालची जमिन सरकल्यातच जमा झाली..

कथा कशी वाटत आहे ते नक्की कळवा...
क्रमशः

Membership no. 51440

®© पूर्णानंद मे्हेंदळे .

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Poornanand

Writer

Author