Oct 24, 2021
कथामालिका

चक्रव्यूह भाग 15

Read Later
चक्रव्यूह भाग 15

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


       “ आता मला खात्री पटल्ये की तुम्ही माणूस नाही तर भूत वगैरे आहात ! ” मी जोरजोरात हसू लागलो. त्यांनी गाडीचा वेग कमी केला .

“ तुमचा भूताप्रेतांवर वगैरे विश्वास आहे का ? ” डॉक्टरांनी हा प्रश्न गंभीरपणे विचारला होता.

“ का ? असं का विचारताय ? ”

“ माझ्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या ! ”

“ नाही ! भूतप्रेत हे सगळं भंपक आहे . माणसाने माणसासाठी निर्माण केलेल्या कल्पना आहेत सगळ्या. जे डोळ्यांना दिसत नाही ते असूच शकत नाही ! ”

“ हवा दिसते डोळ्यांना ? पण तिचं अस्तित्व जाणवतं ना ? ”

“ पण भूत नाही दिसत , ना त्याचं अस्तित्व जाणवत ! तुमचा असल्या गोष्टींवर विश्वास आहे वाटतं ! ”

“ मी विचारलेला प्रश्न मलाच का विचारताय ? ”

“ का विचारायला नको हवा होता का ? ”

“ नै. तसं नाही ! ”

“ मग कसं ? ”

“ ह्या ट्राफिकमुळे कोकणात पोहचायला सकाळच होईल असं दिसतंय ” – डॉक्टरांनी विषय बदललाय हे जाणवलं.

“ विषय बदलणं खूप चांगल्या प्रकारे जमतं . मानलं पाहीजे तुम्हाला ! ”

“ तसं काही नाही हो ! बरं ऐका , 5 वर्षांपूर्वी माझ्या बायकोच्या अंगात एक विचित्र , अद्भुत अशी शक्ती जागृत झाल्याचं जाणवलं. मी भूत नाही म्हणणार त्याला पण ते जे काही होतं ते विचित्र होतं. आम्हा डॉक्टरांच्या हातात देखील त्यावर कसलाही इलाज नव्हता . ती सतत वेड्यासारखं बोलायची , विचित्र हावभाव तिच्या चेहऱ्यावर होते. विचित्र घटना तिच्या आयुष्यात घडत होत्या . ”

“ म्ह.. म्हणजे कशा घटना ?” मी त्यांना मध्येच तोडत विचारलं.

“ खूपच विचित्र घटना होत्या त्या. नंतर कधीतरी सांगेन मी ”

“ आत्ता का नको ? ”

“ आत्ता सांगण्याची गरज नाही वाटत. ”

“ किती लांबवता तुम्ही सस्पेन्स . ” मी खोटं हसणं चेहऱ्यावर आणलं.

“ आयुष्यात रहस्यमय वळणं असतील तर आयुष्य जगण्यात मज्जा असते जोशी ” त्यांच्या बोलण्यात मी गुंतलो गेलो. तोच ते गाणं गुणगुणू लागले.. “ जिंदगी एक सफर है सुहाना , यहाँ कल क्या हो किसने जाना ! ”

“ आवाज छान आहे डॉक्टर तुमचा ! ” काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलून गेलो. शांतता पुन्हा पसरली होती. खिशातून फोन काढला आणि बंडूला फोन लावला.

“ हा बंडू , उद्या येतोय मी . ”

“ इतक्या लगेच ? ” – बंडू .

“ हो . काम आहे म्हणून येतोय . तुला काही प्रॉब्लेम ? ”

“ न.. नाही . या तुम्ही ! ” बंडूचं थरथरतं बोलणंही अंगावर काटे उभं करणारं होतं. मी फोन कट करून खिशात टाकला.. आत्ता कुठे पुणे सोडलं होतं. डॉक्टर शांतपणे गाडी चालवत होते. एकदा ती व्यक्ती भेटली की तिला मारायचं म्हणजे सुटलो मी. मग माझ्या वर लक्ष्य.ठेवणारं कोणीच नसेल. फक्त माझा मीच. ह्या डॉक्टर ला आत्ताही मारता येईल पण हा एकच रस्ता आहे त्या व्यक्तीपर्यंत जाणारा त्यामुळे ह्याला आत्ता मारून टाकणं चुकीचं होईल.

        सतत जाणवत होतं कि आपल्या डोळ्यांना जसं दिसतंय तसं आपल्या आयुष्याचं चित्र नाही. माझ्या आयुष्याचं चित्र मी नाही तर दुसरंच कुणीतरी रेखाटतंय. एवढी वर्ष कोमात होतो म्हणून मला तसं वाटत असेल. मी कोमात कसा गेलो ते अजूनही कळलं नाहीये. माझी जवळची माणसं दुरावली गेली एवढं नक्कीच कळतंय. म्हणजे ह्याची जाणीव होतीये. उत्कंठा प्रचंड वाढत चालली होती माझा भूतकाळ जाणून घेण्याची .

“ काय हो , इतके शांत का झालात ? ” – डॉक्टर.

“ सहजच. कधी कोकणात पोहचतोय असं झालंय ?”

“ आणि कोकणात गेल्यावर कधी पुण्यात परततोय असंही होईल ! ”

“ तेही खरंच आहे म्हणा ! एक सांगू ? ”

“ काहीतरी वाईट घडणार असं मला सारखं वाटून राहीलंय ! ” – मी शांत आवाजातच बोलत होतो.

“ असं वाटतंय तुम्हाला ! अजून घडलं तर नाही ना ? जेव्हा घडेल तेव्हा बघू ! तुम्ही ना उगाचच निरर्थक गोष्टींना चघळत राहता आणि याचा त्रास तुम्ही स्वतः ला करवून घेता. तुम्ही नका टेंशन घेवू. काहीच वाईट घडणार नाही. का विचारा ! ”

“ का ? ”

“ कारण तुमच्या आयुष्याचा रस्ता त्या व्यक्तीने आधीच आखलाय ! आणि ते तसंच घडणार . मी मध्यंतरी एका मोठ्या लेखकाची कथा वाचली होती. त्यात कथेच्या नायकाचं आयुष्य कधी संपणार हे एका सामान्य व्यक्तीने निश्चित केलेलं असतं. दरम्यानच्या काळात तो मरणाच्या दारातून परत येतो. त्या नायकाला मरणाच्या दारातून परत आणणारी ती व्यक्ती जिने त्याचं मरण निश्चित केलेलं असतं मला वाटत की तुमचंही थोडं तसंच आहे . ”

“ छे ! किती भंपक कथा आहे हि ! काहीच लॉजिक नाहीये. कसंय ना , काल्पनिक विश्वातल्या गोष्टी कधीच सत्यात उतरत नाहीत. ”

“ गैरसमज आहे हा तुमचा . नव्हे . हा विचारच चुकीचा आहे ! ”

डॉक्टरांनी गाडीचा वेग वाढवला . रस्ता सुनसान होता . गाडी घाट चढत होती . मागे एक चारचाकी गाडी असल्याचं जाणवलं.

“ काय गंमत आहे पाहा डॉक्टर , आपले विचार पटत नसले तरी आपल्याला एकत्र राहावं लागतंय . ”

आलिया भोगासी असावे सादर असं मनातच म्हणून मोकळा झालो.

“ आलिया भोगासी असावे सादर “ पुन्हा हसू लागले. मी हबकलोच. डॉक्टर मनकवडे आहेत की काय ? काय ध्यान आलंय माझ्या आयुष्यात ! कधीतरी ह्याची कुंडली मांडली पाहीजे.

“ माझी कुंडली मीच तुम्हाला सांगेन . त्यासाठी तुम्हाला वेगळे कष्ट घेण्याची गरज नाही पण माझी कुंडली मांडण्यापेक्षा तुमच्या कुंडलीतले ग्रह फिरलेत ते बघा ! ”

मी निशब्द झालो होतो. काय बोलू आता मी ? खरंच एक माणूस दुसऱ्या माणसाच्या मनात काय चाललंय हे ओळखू शकतो ?

“ माणसाने ठरवलं तर माणूस काहीही करू शकतो. ” – डॉक्टर.

ह्या माणसात काहीतरी दैवी शक्ती का काही म्हणतात ना ते संचारलंय. मागे असलेल्या गाडीचा हॉर्न वाजला. डॉक्टरांनी आता गाडीचा वेग अजूनच वाढवला. मला आता मात्र झोप येऊ लागली होती. मी गाडीची सीट मागे केली आणि डॉक्टरांना एकही प्रश्न न विचारता डोळे मिटून घेतले. डोळे बंद केल्यावर Eigengrau पापण्यात निर्माण झाले होते. डोक्यात मात्र विचारांचं चक्र सुरू होतं. हेच विचार आता मला एका चक्रव्यूहात अडकवणार याची मला जाण जरादेखील नव्हती. चक्रव्यूहात आता कुठे प्रवेश होत होता.

“ नका इतका विचार करू.. झोपा शांतपणे. मी असताना काहीच नाही होणार तुम्हाला. मी डॉक्टर असण्यापेक्षा तुमचा बॉडीगार्ड आहे असं समजा. ज्या क्षणी मी मरेन , तेव्हा मात्र तुमचे प्रॉब्लेम सुरू होतील आणि काळाच्या चक्रव्यूहात अडकून बसाल. वाचवणारं कुणीच नसेल. ती व्यक्ती सुध्दा नसेल. ”

मी डोळे उघडले. डॉक्टर गंभीरपणे बोलत होते आणि मी पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं. गाडी घाट उतरू लागली.. मी पुन्हा डोळे मिटले. काही क्षणांनी गाडी धक्के खाऊ लागली. खड्यांतून उडत असल्याचं जाणवलं. गाडीचा जोरात हॉर्न वाजला.

“ जोशी … उडी मारा sss ” मी खडबडून जागा झालो. बघतोय तर गाडी दरीत कोसळत होती. समोर रस्ता नव्हताच. धुक्यातून समोरची झाडझुडपं अंधूक दिसू लागली. गाडी खोलवर जाऊ लागली. बहुतेक ब्रेक फेल झाले होते. ब्रेक असूनही फरक पडला नसता. गाडी वेगाने दरीत कोसळू लागली तसे ह्रदयाचे ठोके जोरजोरात वाढू लागले.

 
क्रमशः
कथा कशी वाटत आहे ते नक्की सांगा...

Membership No 51440

Written by Poornanand Mehendale

Date – 13 April 2021

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Poornanand

Writer

Author