Login

चक्रव्यूह भाग 13

कथेच्या नायकाला त्याचा भूतकाळ आठवत आणि त्यामुळे त्याचं वर्तमानकाळातलं आयुष्य रहस्यमय वाटेवरून कसं जाऊ लागतं आणि तो कसा भूतकाळाच्या चक्रव्यूहात अडकतो..यासाठी वाचा चक्रव्यूह


 

  मी चिडल्याने डॉक्टर लगेच लांब झाले आणि चमत्कारिक नजरेने माझ्याकडे बघत उभे राहीले.

“ हे कसं शक्य आहे ? ” डॉक्टरांनी विचारलं.

“ काय ? ”

“ जोशी, तुमचा चेहरा…. तुमचा चेहरा असा का ? ”

“ म्हणजे काय झालंय माझ्या चेहऱ्याला ? ” मी हादरून लगेच आरशासमोर उभा राहीलो. आरशात माझा चेहरा नीटनीटका दिसत होता. चेहऱ्यावर फक्त कसलेतरी काळेनीळे डाग होते.

“ डॉक्टर , हे काय होतंय मला ?”

डॉक्टर माझ्याकडे आश्चर्याने पाहत उभे होते. मी पुन्हा आरशात नजर टाकली. ते डाग एका क्षणात गायब झाले होते.

“ जोशी , हे खूप विचित्र आहे सगळं ! ”

“ माझं आयुष्यच विचित्र झालंय माझ्या भूतकाळामुळे .. ”

तोच डॉक्टरांना कुणाचातरी फोन आला.. माझ्यापासून थोडं लांब जाऊन डॉक्टरांनी तो फोन कानाला लावला. फोनवर एकही शब्द ते बोलत नव्हते. फक्त ‘ हं , ओके , ठिक आहे , चालेल ” या पलीकडे जाऊन ते काहीच म्हणाले नाहीत. त्यांनी फोन कट करून खिशात ठेवला . माझ्याजवळ आले.

“ जोशी , गोळ्या घेतल्यात ? ”

“ कुणाचा फोन होता ? ” मी संशयास्पद नजरेने विचारलं.

“ मि.. मित्राचा होता. ” मला समजत होतं की डॉक्टर माझ्यापासून काहीतरी लपवताय्त.

“ डॉक्टर , हा चेहरा काळानिळा.पडणं. ” त्यांनी माझं बोलणं तोडलं.

“ अं. माझ्याही काहीच लक्षात येत नाहीये . तुम्ही गोळ्या घ्या ना ! ”

“ डॉक्टर , तुम्हाला माझ्या आयुष्यात घडत असलेली प्रत्येक गोष्ट माहीत आहे ना ? आणि ही गोष्ट नेहमी नाही माहीत ? का माहीत नसल्याचं नाटक करताय ? खरं सांगा डॉक्टर , हा त्रास का होतोय मला ? असं काय झालंय मला ? तुम्ही का हा विषय टाळताय ? ”

“ मी खरंच हा विषय नाही टाळत आहे . ट्रस्ट मी. वेळ आली की नक्कीच कळेल. तुम्ही गोळ्या घ्या. जरा फ्रेश व्हा . मी सुध्दा तुमच्यासोबत कोकणात येतोय.  आपण माझ्या कार ने जाऊ !”

मला आता एक वेगळीच शंका येऊ लागली . डॉक्टर या खेळातलं एक प्यादं आहेत. खरा सूत्रधार कुणी वेगळाच आहे . गोष्टी अजूनच अवघड बनत जात होत्या. सोल्यूशन कुठेच नव्हतं.

“ डॉक्टर , मला प्लीज तुमचा मोबाईल मिळेल ?  ”

“ का ? “ डॉक्टर मला आता घाबरलेले दिसले.

“ फोन लावायचाय बंडू ला ! माझा फोन जरा बिघडलाय… ”

“ बरं ! घ्या .. ”

आता तर माकडाच्या हातात कोलित मिळाल्यासारखं झालं होतं. डॉक्टरंना मगाशी कुणाचा फोन आला ते पाहायचं होतं. मी त्यांची कॉल लिस्ट चेक करू लागलो. ते लगेच मोठमोठ्याने हसू लागले…

“ काय जोशी , वेडा नाहीये मी. मला माहित होतं की तुम्ही तो फोन कुणाचा हे नक्की पाहणार. ”

त्यांनी खिशातून त्यांचा दुसरा मोबाईल काढला..

“ ह्या मोबाईल मध्ये आहे तो नंबर. आणि तो कॉल कुणाचा हे तुम्हाला एवढ्यात नाही कळणार. मी एवढंच सांगेन की तुम्ही आमच्यासोबत सेफ आहात.. ”

“ ते मला वाटलं पाहीजे ना डॉक्टर ? मला नाही वाटत तुमच्यासोबत सेफ? ”

“ खरंच ? ” – डॉक्टर.

“ हो. तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं माझ्यासाठी करत आहात हे कळल्याशिवाय मी कोकणात येणार नाही. आता तर मला नकोत त्या भूतकाळाच्या आठवणी. मला हवं तसं आयुष्य जगूच देत नाही आहात तुम्ही.”

मी पहिल्यांदाच डॉक्टरांवर आवाज चढवला.

“ शांत व्हा तुम्ही . मी सांगतो आत्ताच . ह्या सगळ्यामागे तुमच्या आयुष्यातली सर्वात जवळची व्यक्ती आहे . ”

“ जवळची ? नाव काय त्या व्यक्तीचं ? “

“ सॉरी . ते नाही सांगता येणार. याचा शोध तुम्हालाच घ्यावा लागेल. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला कोकणात भेटू शकते. मी तर म्हणतो भेटेलच. ”

“ पुढील पाच दिवसात जर ती व्यक्ती माझ्या समोर नाही ना आली तर मी तुमचा जीव घेईन हा. आजवर इतके खून केलेत . अजून एक दोन खून करणं माझ्यासाठी अवघड नाहीयेत.. ” मी डॉक्टरांना कळकळीची धमकी दिली खरी पण ते घाबरले नाहीत. अगदी निर्भिडपणे उभे होते माझ्या डोळ्यात बघत. बहुतेक माझ्या डोळ्यात त्यांना खुनशी भावना दिसली होती.

“ असे का पाहताय ? ” मीच घाबरत घाबरत त्यांना विचारलं.

“ मला असं का वाटतंय की तुम्ही नाटक करताय ? ” त्यांनी डोळे मोठे करत शांतपणे विचारलं.

“ म्हणजे ? काय म्हणायचंय तुम्हाला ? ”

“ तुम्हाला तुमचा सगळा भूतकाळ आठवतोय पण तरीही काहीही माहिती नसल्याचं नाटक करत आहात जोशी !”

“ जर अख्खा भूतकाळ मला आठवत असता तर तुमच्यासमोर उभा असतो का मी डॉक्टर ? मुळात असं असतं तर तुम्हाला मी माझ्या आयुष्यात येऊच दिलं नसतं. मला माझा भूतकाळ अंधूकपणे आठवतोय. ज्या दिवशी मला माझ्या बाबतीत काय काय घडलंय हे कळेल ना तेव्हा पहिला जीव मी तुमचा घेतलेला असेन. ” हे ऐकल्यावर डॉक्टर पुन्हा हसले.

“ नका चिंता करू. एवढा वेळ मीच नाही जगणार.. जा , गोळ्या घ्या ! ”

मी निमूटपणे गोळ्या घेतल्या. बँग मध्ये कपडे भरले. बँग पँक केली. डॉक्टरांकडे एक नजर गेली. डॉक्टर कुणालातरी काहीतरी मेसेज करत होते. आता मीच दुर्लक्ष केलं. मी कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला काहीच कळणार नाही.

“ डॉक्टर , तुम्हाला मी सोडून दुसरे पेशंट नसतात का ?नै , 24 तास एखाद्या सिसीटिव्ही सारखे माझ्यावर वॉच ठेवून असता म्हणून विचारलं.

“ असतात. क्षणोक्षणी पेशंट ! अगदी तुमच्यासारखे ! ”

मी गांगारून गेलो , “ तुमच्यासारखे म्हणजे ? मला समजलं नाही ! ”

“ जोशी , आता तेच तेच सांगून मी कंटाळलो. जा फ्रेश व्हा. ”

“ त्या एसटीच्या तिकीटाचं काय ? ”

“ झालं कँन्सल ! ” – डॉक्टर .

“ ठिक आहे . मी जातो फ्रेश व्हायला ! पण डॉक्टर कोकणात गेल्यावर सगळं सुरळीतपणे होणार ना ? ”

“ ते सगळं तुमच्या हातात आहे. गेल्या काही वर्षात नक्की काय घडलं ते तुम्हाला शोधावं लागेल ! ”

मी विचार करत करत बाथरूममध्ये आलो. बाथरूममध्ये आरशात स्वतः ला पाहीलं. लगेच जाऊन कमोडवर बसलो. आता का कुणास ठाऊक भविष्यात काही ना काही भयानक घडणार याची झळ आत्ताच लागत होती. पण नक्की काय ? ह्या जगात एवढं खराब नशीब फक्त माझंच असणार. असं वाटत होतं की मी नर्काच्या वाटेवर चालत जातोय. त्या वाटेवर कुणीतरी थांबलंय माझी वाट पाहत. माझ्या आयुष्यावर एक चांगली कादंबरी होईल नाही का ! मीच लिहेन. अलगदपणे माझी नजर दरवाजावर गेली. भिंतीवर एक  काळं भोक दिसलं. आजूबाजूला नुकतंच लावलेलं सिमेंट ! मी फ्लशचा नळ सुरू करून त्या काळ्या भोकाकडे तसाच एकटक पाहीलं. हळूहळू त्या भोकाच्या जवळ गेलो. तिथल्या बाथ टेबलावर चढलो. आता बघतो तर ते साधंसुधं काळं भोक नव्हतं.. हा तर माझ्यासोबत झालेला ‘ डिजिटल बलात्कार ’ होता.

 

क्रमशः