चक्रव्यूह भाग 12

Unpredictable Story


      त्या काळोख्या अंधारातून मी बाहेर आलो. माझ्या डोळ्यासमोर असलेले चेहरे धुसर दिसत होते. एक चेहरा आनंदाने माझ्या डोळ्यांसमोर हात फिरवत होता. मी स्वतः चे डोळे चोळत बघितलं तर तो चेहरा डॉक्टरांचा होता. डॉक्टर माझ्या डोळ्यांसमोर हात फिरवत होते. मी आजूबाजूला बघितलं मी माझ्याच खोलीत माझ्या बेडवर आडवा पडलो होतो. डोक्याला हात लावून मी उठू लागलो.

“ मी.. मी इथे कसा आलो ? ”

डॉक्टर मला उठण्यासाठी अडवू लागले.

“ जोशी, झोपा तुम्ही . उगीच ताण नका घेऊ ! झोपा झोपा. ”

“ डॉक्टर ! मी इथे कसा काय ? ”

“ सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आत्ताच मिळणं गरजेचं आहे का ? तुम्ही प्लीज आराम करा बरं ! ”

डॉक्टरांच्या बोलण्यात आपुलकीचे स्वर होते. खरंच किती करतात डॉक्टर माझ्यासाठी ! आणि मी मात्र त्यांना त्रासच देतो.

“ जोशी , तुम्ही प्लीज कसलंही टेंशन नका घेऊ ! लवकरच आता सगळं सुरळीत होईल. ह ज्युस पिऊन घ्या . ”

डॉक्टरांनी मला सफरचंदाचं ज्युस दिलं. मी ज्युस पिता पिता विचार करीत होतो.. इतकं का करत आहेत डॉक्टर माझ्यासाठी ?

“ डॉक्टर , दुपारी मी वॉचमनशी बोलत असताना माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला होता. मी जमिन कोसळलो आणि पुढे .. ”

मी मेंदूला ताण देऊ लागलो तोच डॉक्टर बोलले , “ आणि पुढे वॉचमेनने तुम्हाला इथे आणलं. त्यानंतर मी आलो. एक सलाईन झालं लावून तुम्हाला. आता जर थोडं बरं वाटत असेल तर खाऊन घ्या थोडसं. रात्री जायचंय ना ? ”

मला बरं वाटत नसूनही डॉक्टर मला कोकणात पाठवताय्त ? मी आराम करावा असं का नाही सांगत ? कुठला डॉक्टर आहे हा ? कोणी केलं ह्याला डॉक्टर ? मी डॉक्टरांकडे पाहतच राहीलो.

“ काय झालं असे का पाहताय ? ”

“ नाही . काही नाही. मी बसतो जरा ! ”

“ हा. आणि हे खाऊन घ्या… ”

त्यांनी माझ्यासाठी नवीन डबा आणला होता. मी हळूहळू बेडवर बसलो..ताट आणलं , डबा उघडला. त्यात ब्राह्मणी पध्दतीचं जेवण. मी अधाशासारखा जेवू लागलो.

“ अहो , सावकाश जेवा . जेवण कुठे पळून नाही जाणार .. ” डॉक्टर हसरा चेहरा करून म्हणाले. मी डॉक्टरांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत जेवू लागलो.

“ सकाळ पासून पोटात अन्नाचा कण नसल्याने तुम्हाला चक्कर आली होती . आता बरं वाटेल. बाय द वे , आता तुम्हाला जेवून लगेच स्टँन्डला निघावं लागेल. मी सोडतो तुम्हाला. बस सुटायला 1:30 तास उरलाय . ”

मी डॉक्टरांचं बोलणं ऐकतच जेवत होतो. आता माझ्यात प्रचंड शक्ती एकवटली होती. एखाद्या पेहलवानाला आडवा पाडेन एवढी होती ती शक्ती ! पण तरीही मला खरंच कोकणात जाणं गरजेचं होतं का ?

“ डॉक्टर , मला खरंच तिथे जाणं गरजेचं आहे का ? ”

“ तुम्हाला तुमचं भविष्य सुखात घालवायचं असेल तर तिथे जाणं गरजेचं आहे.. तुम्हाला तिथे जाऊन सर्व काही नक्की आठवेल असं वाटतं मला. तिथल्या गोष्टी , तिथली माणसं , तिथे घडत असलेल्या दैनंदिन घटना तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवण्यासाठी नक्की मदत करतील ! खात्री आहे मला . ”

“ हं. मी परवा गेलो तशी मला माझं बालपण आठवू लागलं. बालपणी घडून गेलेल्या काही महत्त्वाच्या घटना आठवल्या मला.. ”

“ म्हणूनच सांगतोय मी ! पुन्हा एकदा जा. थोडे दिवस तिथेच थांबा. तसंही नोकरी गेलीये. इथे थांबून करणार तरी काय ? तिथे थोडे दिवस जरी राहीलात ना , तुमचा भूतकाळ तुम्हाला लख्खपणे आठवेल . काही विपरीत घडलं तर मी आहेच कि ! ”

“ डॉक्टर , तिथेही तुम्ही माझ्यावर नजर ठेवून असणार का ? ”

“ off course ! ”

“ मग माझ्याबरोबर सोबतच का नाही येत तुम्ही ? उगाच लपूनछपून नजर ठेवण्यापेक्षा माझ्या बाजूला उभं राहून ठेवा की माझ्यावर लक्ष्य ! ”

“ जोशी ! खूप हुशार आहात हा तुम्ही .. मी असं का करतो हे हळूहळू जाणून घेण्याचा प्रयत्न करताय तुम्ही ! येत्ये तमची चाल माझ्या लक्षात .. “ डॉक्टर हसत म्हणाले.

मी आता नजर खाली घालून मुकाट्याने जेवू लागलो होतो..

“ Don’t worry जोशी . आता हा लपवाछपवीचा खेळ फार दिवस नाही चालणार. लवकरच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार.. मी फक्त एक निमित्त आहे. माझ्याकडून कोणीतरी हे सगळं करवून घेतंय . त्या व्यक्तीचं नाव मी सांगू नाही शकत सॉरीँ. मला वाटतं सध्या इतकी माहिती पुरे ! ”

आता ती व्यक्ती कोण ? पुन्हा विचार माझ्या मेंदूशी खेळू लागले.मी रिकाम्या ताटात घास उचलण्याची कृती करू लागलो . तंद्री भलतीकडेच लागली होती .

“ ताटातलं , डब्यातलं जेवण संपलं जोशी ! “

“ अं ? ”

“ जेवण संपलं ” – डॉक्टर.

“ डॉक्टर , मी त्या व्यक्तीला ओळखतो ? ”

“ सॉरी . मी नाही काहीच सांगू शकत ! ” डॉक्टर चेहरा वाकडातिकडा करीत म्हणाले. मी रिकाम्या झालेल्या डब्याकडे बघितलं डबा बंद केला , ताट आणि हात धुण्यासाठी बेडवरून उठलो. पाय लादीवर टेकले तेव्हा मी शक्तिमान आहे की काय असं वाटू लागलं.

    एका हातात ताट घेऊन मी बेसिनपाशी आलो. ताट धुवून ते बाजूला ठेवलं. हात धुवून पुन्हा बेडरूम मध्ये येऊन पाहतो तर काय .. डॉक्टर माझी कपड्यांची बँग भरत होते. कपाटातून एक एक कपडा काढून बँगमध्ये भरत होते. मी मध्ये पडलो , “ अहो , तुम्ही का हे करताय , सोडा हे सगळं..लांब व्हा. लांब व्हा .. ”

मी चिडल्याने डॉक्टर लगेच लांब झाले आणि चमत्कारिक नजरेने माझ्याकडे बघत उभे राहीले.

“ हे कसं शक्य आहे ? ” डॉक्टरांनी विचारलं.

“ काय ? ”

“ जोशी, तुमचा चेहरा…. तुमचा चेहरा असा का ? ”

 

क्रमश :

लेखन – पूर्णानंद मेहेंदळे

🎭 Series Post

View all