चक्रव्यूह भाग 09

कधीच न घडलेली विलक्षण कथा


मागील भागात – रिक्षेत नायक बसला असताना रिक्षावाला सारखा त्याच्याकडे आरशातून पाहत असतो.त्याला नायकाचा चेहरा काळानिळा पडलेला दिसतो. रिक्षावाला प्रचंड घाबरून जातो. रिक्षावाला नायकाला अपार्टमेंटच्या खाली सोडतो. नायक रिक्षावाल्याला पैसे देत असताना रिक्षावाल्याचं शरीर थरथरू लागतं. आता पुढे –

     मला त्याची थरथरती नजर बोचत होती. त्याने थरथरत्या हाताने पैसे घेतले आणि तो निघून गेला. त्याची रिक्षा आता दूर जाताना पाठमोरी दिसत होती. मी bag उचलली आणि गेटच्या आत आलो. हळूच एक मागे नजर टाकली. लिफ्टच्या दारापर्यंत पोहचलो. 13 व्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट चं दार उघडलं. लिफ्ट मधून एक आज्जी माझ्याकडे विचित्र नजरेने बघत बाहेर पडल्या. अरे , काय नक्की चाललंय हे ? मी एवढंच म्हणत आत आलो. त्या बाहेर पडल्या आणि त्यांनी वळून माझ्याकडे बघितलं.. तोच लिफ्टचं दार बंद झालं. मी 13 नंबर चं बटण दाबलं. लिफ्ट 13 व्या मजल्यावर जाऊ लागली होती.  काय झालंय मला ? मी लिफ्टमधल्या आरशात स्वतः ला बघितलं. सगळे अवयव जागच्या जागी होते. चेहरा थोडा तेलकट होता. अंग घामानं थोडं भिजलं होतं , प्रवासाने कपडे थोडे मळलेले होते. यापेक्षा वेगळा काही बदल माझ्यात काही झालाय असं मला नक्कीच वाटत नव्हतं. लिफ्ट 13 व्या मजल्यावर आली. सामान घेऊन लिफ्ट मधून बाहेर पडलो. दारापाशी गेलो आणि बँग मधून घराची किल्ली हातात घेतली. दारावरच्या नेमप्लेट वर साचलेली धूळ हातानेच झाडली.दरवाजा उघडला. एक शिळी हवा अंगावर झोंबू लागली. घरात सर्वत्र अंधार होता. मोबाईलची टॉर्च ऑन करून घराच्या सर्व भिंतीकडे नजर टाकत मी आत जाऊ लागलो. बदल काहीच नव्हता. मी निर्माण केलेला हा पसारा होता. दबक्या पावलांनी मी आत आलो आणि लाईटची बटणं दाबली. संपूर्ण घर उजळलं. मी बँग घेऊन बेडरूम कडे गेलो. बँगमधून कपडे बाहेर काढले. टॉवेल घेऊन वॉशरूम मध्ये आलो. वॉशरूम मधल्या आरशात स्वतः ला बघितलं. चेहरा काळानिळा वगैरे नव्हताच. जवळजवळ 1-2 तास शॉवरखाली बसल्यावर मी बेडवर बसून राहीलो. मला पुन्हा एकदा एसटीतली ती तरूणी आठवत होती. तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. ओळख जरी नवी होत असली तरी तिचं आणि माझं नातं आहे असं सारखं वाटत होतं.

       तोच मला एक गोष्ट आठवली. मी माझ्या मोबाईल वरून डॉ. उपाध्येंना फोन लावला. त्यांनीही ताबडतोब उचलला.

“hello , डॉक्टर उपाध्ये ? मी जोशी बोलतोय ”

“ yes , yes बोला . जोशी. तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे ”

“ सॉरी. मी जरा उशीरा फोन केला.. ”

“ it’s ok.  बोला बोला.. ”

“ तुम्ही सांगितलेली ट्रिटमेंट सफल होत्ये .”

“ ohh. Great ”

“ मी गेलो होतो गावी. आत्ताच आलो. ”

“ मला वाटतं तुम्ही उघीच पुण्यात आलात. काही दिवस कोकणात राहीला असतात तर सगळं काही पूर्वीसारखं झालं असतं. ”

“ न.. ना.. नाही नको. ”

“ Any reason ? ”

“ मला माझ्या जुन्या आठवणी असह्य करतात. असं वाटतं की तो भूतकाळ नकोच. ”

“ हे बघा , मी पुन्हा एकदा तुम्हाला frankly सांगतो . तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणं गरजेचं आहे. I know त्रास होईल थोडासा. ”

“.पण डॉक्टर.. ” डॉक्टरांनी माझं बोलणं तोडलं.

“ मला वाटतं तुम्ही पळताय त्या जुन्या आठवणींपासून.. आणि याचा त्रास तुमच्या वर्तमान आयुष्यात होतोय.”.

“ मग मी काय करू ? ”.

“ तुम्ही परत तुमच्या गावी जा.. यावेळी सुध्दा एकटेच जा. तुम्ही मानसिकरित्या रिकव्हर झालेले आहात. तरीही गोळ्या वेळेत घ्या ”

मला कळत होतं की डॉक्टर माझ्याशी खोटं बोलत आहेत. मी अजूनही पूर्णपणे बरा झालेला नव्हतो. डॉक्टरांनी देखील माझ्यापासून अनेक गोष्टी लपवल्या होत्या. माझं गावाकडे घर आहे , पुण्यात माझं घर कुठाय , माझा जॉब याबाबत मी त्यांना अजिबात माहिती दिली नव्हती. ही व्यक्ती त्यांना दुसऱ्याच व्यक्तीने सांगितली होती. ही व्यक्ती नक्की कोण आहे ? अनेकदा डॉक्टरांना विचारण्याचा प्रयत्न केला पण  त्या व्यक्तीचं नाव योग्य वेळी सांगेन असं सांगून टाळाटाळ केली. माझं आयुष्य अगदी फिल्मी झालं होतं.

“ जोशी , तुम्ही बोलत का नाही ? आवाज येतोय ऐकू ?”

“ हा. येतोय. तुम्ही सांगताय तसं करतो डॉक्टर . जरा मला पुण्यात काम आहे. ते झालं की दोन एक दिवसात मी जाईन गावी. ”

“ प्लीज जा. आय नो की तुमच्यापुढे अनेक प्रश्न नाचत असतील आणि या situation ला ते योग्यच आहे. I mean हे चांगलं लक्षण आहे. तुम्ही थोडेदिवस गावाकडे थांबा. माणसांच्या संपर्कात राहा. एकलकोंडेपणा शरीराला आणि मनाला घातक असतो जोशी . आलं ना लक्षात मी काय म्हणतोय ते ? ”

“ येस डॉक्टर . ठेवतो फोन ”.

“ हो. टेक केअर . ”

फोन मधील संभाषण संपलं. डॉक्टरांचं ऐकण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय दिसत नव्हता. गोळ्या घेण्याची वेळ झाली होती. पटकन गोळ्या घेऊन टाकू असं मनातल्या मनात म्हणत पुन्हा bag उघडली आणि गोळ्यांचा ( औषधांचा ) डबा बाहेर काढला. जेवणाआधीची गोळी घेतली आणि लक्षात आलं की पुरंदरे काकूंना आजच्या डब्याचं सांगायचं राहीलं. आज जेवणाचा डबाच येणार नाही. म्हणजे आज भुकेल्या पोटी झोपायचं ? मी किचनमध्ये आलो. एक डबा उघडला. एका डब्यात फरसाण होतं , दुसरा डबा उघडला त्यात वेफर्स होते. आता ह्यावरच समाधान मानावं लागणार होतं. फरसाण , वेफर्स एका डिशमध्ये घेऊन मी हॉलमध्ये आलो. टिव्ही लावला . एका हातात रिमोट व दुसऱ्या हातात डिश घेऊन मी सोफ्यावर बसलो. एक चांगला पिक्चर शोधत होतो तोच स्क्रिनवर अमिर खान या अभिनेत्याचा चेहरा झळकला. म्हटलं अमिर खान खूपच म्हातारा दिसतो. तरीही काम खूप छान करतो. मी channel बदललं match लावली. भारत v/s ऑस्ट्रेलिया . दोन्ही संघात सगळेच खेळाडू नवीन होते निदान माझ्यासाठी . माझे आवडते सचिन तेंडुलकर ह्या match मध्ये नाहीत. सगळी काल आलेली पोरं. विराट कोहली का कोण तो कर्णधार होता. जडेजा , धोनी , रोहीत सगळेच नवीन होते. सचिन नाही म्हणून मी टिव्ही बंद केला. शांतपणे. खाऊ लागलो. एक क्षण मला वाटलं मी जगापेक्षा खूप मागे आहे. माझ्यासाठी जग थांबलंय. कदाचित मीच हे जग थांबलय. आपण जगापेक्षा खूप मागे आहोत हे फिलिंग खूप घाण आहे ना ? पण असं का वाटलं मला अचानक ? जाऊदे. मी खाणं संपवलं. डिश धुतली आणि रूममध्ये गेलो. पुन्हा गोळ्या घेतल्या. अवघ्या काही मिनिटात मला झोप आली.

         सकाळ झाली ती दरवाजाच्या बेलने. डोळे चोळत मी दरवाज्याशी गेलो. दरवाजा उघडला. दरवाज्यात दूधवाला उभा होता.

“ आगये साब ? कैसे हो ? ”

मी त्याला निरखून पाहू लागलो.

“ दूध लाया हूँ साब ! ”

मी आत जाऊन दूधाचं पातेलं घेऊन त्याच्यापुढ्यात ठेवलं. काहीच बोललो नाही. संयशीवृत्तीने त्याला निरखून पाहत होतो. त्यानं दूध पातेल्यात ओतलं आणि पातेलं माझ्या हातात दिलं. तो पुढे काही बोलणार तोच मी त्याच्या तोंडावर दार बंद केलं. किचनमध्ये येऊन gas वर दूध तापत ठेवलं. हॉलमध्ये आलो आणि भिंतीवरच्या घड्याळात 8:40 झाले होते. कपडे वॉशिंग मशीनला लावून मी ब्रश करू लागलो. किचनमध्ये जाऊन gas बंद केला. दूध फ्रिजमध्ये ठेवलं. आंघोळ करून झाली. मशीन मधून सुकून झालेले कपडे बाहेर काढले. नीटनेटका तयार होऊन , खांद्यावर बँग अडकवून ऑफिसला जाऊ लागलो. बिल्डिंग मधून बाहेर पडताच डोकं गरगरायला लागलं.

          10: 20 ला मी ऑफिसला पोहचलो. सगळा स्टाफ माझ्याकडे भयावह नजरेने बघत होता. मी राक्षस आहे का ? मी त्यांच्या नजरांना नजर देत माझ्या टेबलापाशी येऊन पोहचलो. खुर्चीत बसणार तर  काल एसटीतली ती राधा सारखी दिसणारी तरूणी माझ्या जागेवर बसून काम करत होती. ती इथे ? तेही माझ्या जागेवर ?

 

क्रमश :

®© – पूर्णानंद मेहेंदळे

🎭 Series Post

View all