चक्रव्यूह भाग 07

विलक्षण रहस्यमय कथा... Unpredictable Story



 

मागील भागात – कथेचा नायक राधाची किंकाळी ऐकून हादरतो. त्याला भूतकाळ राधाच्या आठवणींत घेऊन जातो.. तो वर्तमानकाळात आल्यावर माळ्यावर आप्पांची डायरी शोधू लागतो. डायरी शोधत असताना त्याला फोटोफ्रेम सापडते. त्यात आप्पांसोबत एक बाई असते. ही बाई नक्की कोण ? हा त्याला प्रश्न पडतो.

        ह्या बाईंचं आणि आप्पांचं नातं काय ? आप्पांनी अनेक गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या होत्या. त्या गोष्टींमध्ये ही गोष्ट देखील असावी का ? मी ती फोटोफ्रेम बाजूला काढली. ट्रंक बंद केली. फोटोफ्रेम घेऊन माळ्याच्या पायऱ्या उतरत असताना कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे असं वाटू लागलं. मी झटकन मागे वळून पाहीलं.. कोणीही नव्हतं. होती फक्त भयाण शांतता. मी पटापट पायऱ्या उतरण्याच्या नादात ती फोटोफ्रेम माझ्या हातून सटकली आणि पायरीवर पडली. फोटोफ्रेमच्या काचेचे तुकडे झाले आणि तोच बंडू battery घेऊन धावत आला.

“ कोण आहे ? ” असं म्हणत चंदूने battery चा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर टाकला. मी गांगारून जात म्हणालो, “ मी आहे.. ”

“ दादा , तुम्ही इथं इतक्या रात्री काय करताय ? ”

त्याला आता काय उत्तर द्यायचं हा विचार करत असतानाच त्याने अजून एक प्रश्न विचारला , “ दादा , हा फोटो कुणाचा ? ” मी अंधारातच तो फोटो कसाबसा उचलला.

“ काय झालं दादा ? बोलत का नाही तुम्ही ? ”

त्याच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देणं गरजेचं होतं , “ झोप नव्हती रे येत..मग म्हटलं की माड्यावर काही आप्पांच्या आठवणी आहेत का ते पाहाव ”

बंडू माझ्याकडे आश्चर्यांने पाहत असावा..तो शांतच होता.

“ बंडू , तुझी झोपमोड झाली का ? ”

“ नाही . मला मेल्याला कसली झोप लागत्ये ? ”

बंडूने battery तुटलेल्या फोटोफ्रेम च्या काचांकडे वळवली.. “ दादा , तुम्ही शांत झोपा. मी इथल्या काचा उचलतो. ”

आता मलाच बंडूचं आश्चर्य वाटलं. माझ्या हातातल्या फोटोबद्दल त्याने चौकशी का केली नाही ? त्याला या फोटो मधील आप्पांच्या बाजूला असलेल्या बाईबद्दल माहीत असेल का ? मला अंधारात त्याच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट दिसत नव्हते. मी थोडा बिथरतच माजघरात आलो. तो बहुतेक जिन्यात काचा गोळा करत असावा. मी तातडीने माझी bag उघडली अन् तो फोटो bag मध्ये ठेवला. Bag नीट बंद केली ना याची खात्री करून अंथरूणावर आडवा झालो. मोबाईल ची टॉर्च बंद केली व डोळे मिटले.  

   डोळे मिटूनही मला बंडूची चाहूल जाणवत होती. सारवलेल्या जमिनीवर स्वतः चे पाय घासत बंडू चालत असल्याचं जाणवलं.. कानात पंख्याच्या पात्यांचा आवाजही घुसत होता. मला डोळे मिटूनच जाणवलं की बंडू माझ्या दिशेने चालत येतोय. त्याच्या हातात सुरा आहे , डोळे लालबुंद , जणू ते एक पाळीव जनावरच.

त्याने माझ्या पोटावर सुरा खुपसणार तोच मी डोळे उघडले. समोर काळाकुट्ट अंधार दिसला. बंडू नव्हताच. मी बंडू ला हाक मारली , “ बंडू.. ”

बंडू मागच्या पडवीतून आत आला , “ हा दादा ? ”

हाक तर ह्याला मारली पण बोलायचं काय ? काहीतरी सुचवत म्हणालो , “ झोप आता. ”.

बंडूने हो म्हणत त्याच्या हातातल्या battery चा दिवा मालवला. तो झोपण्यासाठी निघून गेला . पुन्हा एकदा डोक्यावर फिरणाऱ्या पंख्याचा आवाज ऐकू येत होता. मी परत डोळे बंद केले आणि तो फोटो डोळ्यासमोर आला. आप्पा आणि त्या बाईंचा चेहरा डोळ्यात उतरला गेला होता. ह्या घरात आल्यावर मी भूतकाळात का एवढा रमत होतो ? मला यातून बाहेर पडणं गरजेचं होतं. ते विचार मनातून धुसर करत मला गाढ झोप लागली..

           सकाळ झाली.गजांच्या खिडकीतून थोडीबहुत सूर्यकिरणे माझ्या अंथरूणात शिरत होती. सारवलेल्या शेणाचा वास येऊ लागला. बहुतेक बाहेर बंडू सारवण करीत असावा. झोपाळ्याचा आवाज देखील ऐकू येत होता. बहुतेक बंडूचा मुलगा झोपाळ्यावर झोके घेत असावा. डोळे चोळत मी अंथरूणातून उठलो. भिंतीवरल्या घड्याळात एक हलकीच नजर टाकली. 9:42 वाजले होते. बाजूला असलेला मोबाईल चार्जिंग ला लावला आणि bag मधून ब्रश काढला , पेस्ट काढली. बेसिनपाशी जाऊन ब्रश करू लागलो.

         आता पुन्हा पुण्यात जायचं होतं. ह्या इथल्या गोष्टींमध्ये अडकून पडण्यात काहीच इंट्रेस्ट नव्हता. सर्व आवरून मी आता इथून निघणार होतो. नाश्ता करून झाल्यावर मी बंडूच्या हातावर 10 हजार रोख ठेवले. दर महिन्याला मी 20 ,000 त्याला देतच असतो. यावेळी 10,000 जास्त दिले. बंडूचा आणि त्याच्या मुलाचा निरोप घेतला. पुन्हा जुन्या आठवणी उगाळत बसलो नाही. ताबडतोब तिथून निघू लागलो. अंगणात आलो. बंडूने अंगण सारवलंय हे दिसलं. तुळशीवृंदावनाला नमस्कार केला. येथील तुळस मीच लावली होती. पुन्हा कधीच इथे यायचं नाही हे पक्क केलं होतं . मी पटापट पावलं टाकत बसस्थानकावर पोहचलो. पुण्यात जाणारी बस दिसत नव्हती. स्थानकावर फारशी वर्दळ नव्हती. स्पीकर मधून कर्कश घोषणा ऐकू येत होत्या. आज दुपारी पुन्हा आम्ही जुने सवंगडी भेटणार होतो पण मला आता त्यांनाही विसरणं गरजेचं होतं. फेसबुकच्या एका भिंतीवर , what’s app च्या ग्रुप वर त्यांचं माझं संभाषण होणार होतं तेवढंच काय ते बास झालं !

      मी बसस्थानकावर जवळपास 1 तास बसलो असेन. मोबाईलमध्ये किती वाजलेत ते बघितलं . मोबाईल मध्ये आत्ता 9:52 वाजले होते. मगाशी तर घरात 9:42 वाजले होते. आता मला इथे उभं राहून 1 तास झाला होता मग फक्त 9:52 कसे वाजले ? बहुतेक घरातलं घड्याळ बंद झालं असणार. घाईघाईने सेकंद काटा फिरतोय का तेच पाहणं विसरलो मी. एवढा कसा वेडा मी ? मी माझ्यावरच हसत होतो. एवढा बावळटपणा माझ्याकडून ? शक्यच नाही. तोच एसटी आली. मी धावत जाऊन सीट पकडली. खिडकीपाशी बसलो. चेहऱ्यावरचा घाम पुसला. केस नीट केले. माझ्या पुण्यातल्या मित्राला फोन लावला . त्याचा फोन स्वीच ऑफ होता. मी त्याला मेसेज केला. “ hii , मी इथून निघतोय. रात्री पोहचेन . ” मेसेज सेन्ट झाला आणि मी मोबाईल स्वीच ऑफ केला. पुन्हा मला त्या फोटोची आठवण झाली. ती बाई पुन्हा डोळ्यासमोर आली. कितीही नाही म्हटलं तरी मला त्या बाईचा शोध घ्यायचा होता. माझ्या पासून लपवण्यात आलेल्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या होत्या. माझ्या अंगातली ती खाज होती पण या सगळ्यामुळे पुन्हा भूतकाळाच्या चक्रव्यूहात अडकलो तर ? तर काय होईल ? माझ्या आयुष्याचा जीवघेणा प्रवास सुरू होईल. नाही , मला शोध घ्यायचा होता. तेवढीच भीती वाटत होती. काय करावं ? हा शोध घेऊन मला काय मिळणार ? फक्त मानसिक समाधान ?

“ तुमच्याकडे सुट्टे आहेत का ? ”

माझी नजर बाजूला बसलेल्या एका तरूणीकडे वळाली. डोळ्यात वेगळीच चमक होती. तिचे डोळे राधा सारखे होते. फक्त 2 क्षण तिच्या डोळ्यांमध्ये गुंतलो. तिच्या हातात 500 ची नोट होती. चेहऱ्यावर मंद हास्य होतं. एक क्षण वाटलं ही दुसरी तिसरी कोणी नाही तर माझी राधा आहे.

 

क्रमश:

®©पूर्णानंद मेहेंदळे


    

🎭 Series Post

View all