चक्रव्यूह भाग 04

Twisted story

       राधा आयुष्यात येण्यासाठी मी सुद्धा कालांतराने या राजकारणात समाविष्ट होणार होतो. या गोष्टीची लहान असताना कल्पना नव्हती..



        माझ्या कानांवर बंडूची हाक ऐकू आली , “ दादा , ओ दादा .. ” मी बालपणातून बाहेर पडून वर्तमानात आलो.. मी डोळे उघडले. बंडू माझ्या समोर उभा होता. खांद्यावर एक पंचा होता. त्या पंचानेच त्याने कपाळावर आलेला घाम पुसला.. माझ्याही अंगावर घाम आला होता..



“ दादा , जेवायला चला.. पान वाढलंय ”



“ अं ? ” माझं डोकं भिरभिरलं होतं.



“ जेवण.. वाढलंय ” बंडू मला निरखत होता..



“ हा . आलो. ”



मी झोके घेणं थांबवलं. बंडू आत निघून गेला.. मी झोपाळ्यावरून उठलो आणि स्वयंपाक घराकडे जाऊ लागलो.. माजघरात गण्या मोठमोठ्याने पाढे पाठ करत होता. मी स्वयंपाक घरात आलो.. त्या चविष्ट जेवणाच्या सुवासाने मी दिर्घ श्वास घेतला. पाटावर बसलो.. मी वेगळ्याच विचारात होतो त्यामुळे त्याला तू जेवलास का हे विचारणं राहून गेलं.. मी हळूहळू जेवत होतो. त्या बालपणातच गुंफलो होतो..



        त्यादिवशी भांडणानंतर ललितापंचमीच्या पूजेसाठी आप्पा पाटावर बसले. बाजूला आई देखील बसली. काकू प्रसादासाठी शिरा बनवत होती. सकाळी 7 वाजता पूजा सुरू होती. चंदू काका हळूच स्वयंपाक घरात जाताना मी पाहीलं होतं.. तो कशासाठी गेला ते नंतर समजलं .. म्हणजे झालं असं की पूजा संपल्यावर काका सर्वांना प्रसाद देऊ लागला..त्याने आत्याच्या हातावर प्रसाद ठेवला. आत्याने प्रसाद घेतल्यावर ती वेड्यासारखी वागू लागली.. तोच प्रसाद आमच्या आसावरीने खाल्ला ती देखील वेड्यासारखी वागू लागली.. दोघी जोरजोरात हसू लागल्या.. आम्ही प्रसाद घेतलाच नाही.. काकाने प्रसादासाठी मला हात पुढे करायला सांगितला. मी अतिहुशार असल्याने सांगितलं , “ नंतर घेईन . ”



      आता सर्वांना शंका आली की प्रसादात काहीतरी गडबड आहे. आप्पांनी काकाला जवळ बोलावलं , “ चंद्या , इथं ये.”



काका उत्साहाने आप्पांसमोर उभा राहीला.. आप्पांनी त्याचे डोळे बघितले. उपर्ण नीट केलं. काकाच्या डोळ्यात खोटेपणा ठळकपणे दिसत असावा. आप्पा काही बोलणार तोच आत्या प्रसादाच्या झिंगेमुळे काहीतरी बरळू लागली..



“ ए , आप्पा बघ , कसे दिसताय्त ! उघडा बंब ! ध्यान आहे नुसतं ध्यान ” ती जोरजोरात हसू लागली. आई नजर लपवून उभी होती. आप्पा रागीट नजरेने आत्याकडे पाहत होते. आप्पा म्हणाले , “ सुलभा वहिनी , हिला आणि आसावरीला जरा बाळंतीणीच्या खोलीत न्या. ” आसावरी व आत्या मोठमोठ्याने हसत सुलभा काकूसह बाळंतीणीच्या खोलीत गेल्या. आप्पा चंदू काका कडे रागाने बघत होते.. चंदूकाका निरागस चेहरा करून बोलू लागला , “ अरे , अशा का वागताय्त दोघी ? काय झालंय त्यांना ? ”



“ काय झालंय ते तुलाही चांगलंच माहीत आहे.. ”



“ तिला डॉक्टर कडे नेऊ चल.. ”



“ तो प्रसाद खा.. ” आप्पा काकावर आवाज चढवत म्हणाले..



“ क.. क..काय झालं ? ” काका जरा घाबरू लागला..



आप्पांनी सर्वांसमोर थेट त्याच्या कानशिलात लगावली आणि म्हणाले , “ तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं स्वप्नात सुध्दा वाटलं नव्हतं. आजवर आम्ही सर्वांनी तुझे अपराध पोटात घातले पण तू आज तर देवाच्या देवाऱ्यातच क्रूरपणे वागलाय्स .”



काका गाल चोळत विचारू लागला , “ अरे, मी काहीच केलं नाहीये यावेळी तरी ”



“ अरे किती खोटं बोलशील ? ” आप्पांनी पुन्हा हात उगारला पण मध्ये आई आली..



“ अहो , आपण शांतपणे बोलू.. आजच्या या चांगल्या दिवशी अभद्र नको काही घडायला. ”



आप्पा रागाने लालबुंद झालेले होते. रागाचा पारा चढला होता, “ अजून काय अभद्र होणं बाकी आहे ? या माणसाने देवाच्या प्रसादात भांग मिसळली..यापेक्षा अभद्र काय असेल ? ”



हे ऐकून काकाचा देखील आवाज चढला , “ अनंता , डोकं आहे का ठिकाणावर? काय बरळतोय्स हे लक्षात येतंय का तुझ्या ? ”



आम्ही थरथरत त्यांचं भांडण पाहत होतो.. त्यापलिकडे आमच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता.



“ मगाशी वहीनी आत प्रसाद बनवत असताना तू गेला होतास आत हे बघितलंय मी .. ”



“ अच्छा ! म्हणून ही भांग मी मिसळली ? ”



“ अरे , तुझ्या आजवरच्या पापांचा धडा वाचला तर हे कृत्य आम्हाला त्रास देण्यासाठी तूच करू शकतोस.. एकदा गावातल्या मालिनीची छेड काढलीस , सदूकाकांची आमराई रागाच्या भरात जाळून टाकलीस , आपल्या आईला धमकी देऊन मृत्यूपत्रात बदल केलास , आईचा छळ केलास , बाबांचे कचेरीतले कागद चोरलेस , आईचे दागिने चोरलेस अशी अनेक पापं मी पोटात घातली पण हे पाप नाही.. तुला पूजेचा मान मिळाला नाही म्हणून असं वागलास ? ”



चंदूकाका आप्पांकडे आश्चर्याने पाहत म्हणाला , “ अरे मान्य आहे ना मला अनेक पापं केली असतील मी.. पण देवाच्या गाभाऱ्यात मी असं मुळीच वागणार नाही. निदान या शुभप्रसंगी तरी.. अरे , माझा राग तुझ्यावर आहे रे देवावर नाही. मी आत गेलो याचा अर्थ मीच हे केलं असं नको समजू. मी असं कधीच नाही करू शकत. ”



“ तू काय करू शकतोस नि काय करू शकत नाहीस ते चांगलं माहित आहे मला . ”



“ अरे , तू समजून का घेत नाहीयेस ? अरे , मी तिला काय हवं नको ते पाहायला गेलो रे ”



“ एरव्ही तर जात नाहीस.. आजच नेमका ढवळाढवळ करायला गेलास. ”



“ जसं दिसतं तसं नसतं अनंता.. ”



आप्पा त्याच्याकडे हात दाखवत म्हणाले , “ म्हणूनच जग फसवतं ”



“ तुला सांगून विश्वास बसणारच नाही रे ”



“ हो ना ? मग पुरावा दे की हे तू केलं नाहीस याचा. जर तू केलं नसशील तर तुझ्या बायकोनेच केलं असणार कारण प्रसाद तिनंच बनवला होता.. ”



काकू या भांडणात मध्ये पडली , “ बाई बाई बाई बाई .. मी कशाला बाई असं करेन ? उगाच नाहीते आरोप सहन नाही करून घ्यायची मी ”



आप्पांनी पुन्हा आवाज चढवला , “ अहो मग पुरावा द्या ना ”



काकूने पण  आवाज चढवला , “ तुम्हाला वाटतं ना आम्ही केलंय मग आम्ही हे केल्याचा तुम्ही द्या पुरावा. ”



आप्पांनी समोर बोट दाखवला , “ हा काय पुरावा.. माझ्या समोर जिवतंपणे उभा आहे ”



      तोच मला कुणीतरी हलवू लागलं.. भानावर आलो . समोर जेवण वाढलेलं दिसलं आणि मान वर केल्यावर घाबरलेला बंडू दिसला .





क्रमश :



®© पूर्णानंद मेहेंदळे


🎭 Series Post

View all