चक्रव्यूह भाग 02

Twisted sorry

     मी चांगले कपडे घालून शाळेच्या दिशेने वळालो. पटापट पावलं शाळेच्या फाटकापाशी आलो. आमची शाळा टेकडीवर होती. तिथे जाण्यासाठी चांगला रस्ता व रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंब्याची झाडं.. मी रस्ता कापत वर आलो. या शाळेत साने गुरूजी , रँग्लर परांजपे असे अनेक थोर पुरूष शिकले होते. याच शाळेत आज मी तब्बल 30 वर्षांनी आलो होतो. आज शाळेला सुट्टी होती. आज get – together सादर करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिकांकडून परवानगी मिळाली होती त्यामुळे शिपाई वगैरे आज शाळेत होते. त्यांनी वर्ग आमच्यासाठी खुले ठेवले होते. मी आमच्या दहावीच्या वर्गात आलो. आल्या आल्या माझी नजर वर्गाच्या शेवटच्या बेंचवर गेली. माझी पावलं शेवटच्या बेंचकडे वळाली. शाळेत असताना प्रत्येकाची शेवटच्या बाकावर बसण्यासाठी शर्यत असायची. काहीजणं शाळेत लवकर येऊन शेवटच्या बाकावर कब्जा मिळवायचे. या शर्यतीत मी सुध्दा होतो. शेवटच्या बाकावर बसून सतत तिला पाहत बसायचो. ते एक वेगळंच सुख होतं. काहीजणं झोपण्यासाठी , शिक्षकांची नजर चुकवून डबा खाण्यासाठी , शिक्षक प्रश्न विचारू नयेत म्हणून शेवटच्या बाकाखाली लपून राहण्याची सगळे शेवटचा बाक पकडण्यासाठी धडपडायचे. माझी धडपड माझ्या पहिल्या वहिल्या प्रेमाला शेवटच्या बेंचवरून पाहण्यासाठी असायची. आज वर्ग रिकामा होता तरी या रिकाम्या वर्गात जुन्या आठवणी गोठून राहील्या होत्या.  त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. या बेंचवर बसल्यावर मला सर्वात जास्त राधाची आठवण येत्ये. ती त्या सहाव्या बेंचवरून मला चोरून बघायची. तिचे ते गालावर रूळणारे केस मला जाम आवडायचे. तिच्या त्या डोळ्यांमुळे मला वाचनाची आवड लागली. राधासोबत आमचं एकमेकांना चोरून भेटणं देखील जागं झालं. काळानुसार खूप बदल झाले होते शाळेत , पर्यायाने वर्गात सुध्दा. वर्ग पाहण्यात 5 वाजले तरी कोणी मला दिसलं नव्हतं. मी सर्वांना शोधू लागलो .. वर्गातून बाहेर पडलो तोच शिपाई दिसला.. मी त्याला हाक मारली , “ ओ , दादा .. ते गेट टू गेदर साठी कोणी आलंय का इथे ? ”



शिपाई मला निरखून पाहू लागला व शाळेच्या हॉलकडे बोट दाखवून म्हणाला , “ ते बघा , तिकडे जमलेत सगळे . ”



मी समाधानी होऊन त्याचे आभार मानले व हॉलकडे निघू लागलो.. पूर्वी या हॉलच्या जागी मैदान होतं. या मैदानात आम्ही कबड्डी , खो – खो खेळायचो. मी चालत हॉलकडे जाताना मला आतमध्ये असलेल्या मित्रपरीवाराचा कल्ला ऐकू आला. मला तो क्षण चुकवायचा नव्हता . मी त्यांना भेटण्यासाठी आतूर झालो.. धावत धावत हॉलमध्ये आलो. माझ्याकडे माझ्या परममित्राची म्हणजे नितीनची नजर वळाली आणि त्याने जोरात हाक मारली , “ ए विलासss.. ” तो हसऱ्या चेहऱ्याने माझ्याजवळ आला आणि मला मिठी मारली. एरवी  whatsapp च्या डिपी मध्ये दिसणारा तो अनेक वर्षांनी माझ्यासमोर उभा होता... त्याच्यासोबत अनेक जणांनी मला मिठ्या मारल्या. साधरण आम्ही 25 जणं तिथे नक्कीच होतो. त्यावेळी बारीक असलेले आता जाडजूड झालेले होते आणि लठ्ठ असलेले आता बारीक झालेले दिसले.. सर्वांशी मनसोक्त गप्पा मारत होतो. आठवणींना उजाळा देत होतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या उंचीवर कार्यरत होते. कोणी गायक , वादक , लेखक , कवियत्री , बँक मँनेजर , शिक्षक , डॉक्टर , वकील अशा विविध क्षेत्रात सर्व होते. मी पुण्यात एका IT कंपनीमध्ये काम करतो. सध्या 2-3 दिवसांसाठी गावी आलो. या मित्र-मैत्रीणींमध्ये गुंतून जाण्यासाठी. कदाचित इथून माझा प्रवास बदलणार होता.. एका रहस्यमय वाटेकडे माझी वाटचाल सुरू होणार होती याची मला जराही कल्पना नसल्याने मी सध्यातरी मी मित्र मैत्रिणींसोबत गप्पा मारण्यात वेळ घालवत होतो. या सर्व मैत्रिणी राधाच्या खूप जवळच्या पण राधा मात्र इथे अजिबात नव्हती . तिचीच उणीव भासत होती.



        आम्ही थोडावेळ गाण्याच्या भेंड्या खेळलो . मी गाताना मला सूर सापडत नव्हता. माझ्या गाण्याला सूर देणारी राधा होती. तिच्यामुळे मी आजही अविवाहित आहे. असो , गाण्याच्या भेंड्या संपल्या आणि फोटोसेशन वगैरे सुरू झालं. आम्ही सर्वांनी एक सेल्फी घेतला. त्या सेल्फीत राधा हवीच होती. माझ्यासह सर्वांनीच राधाची आठवण काढली. त्यानंतर खाणंपिणं झाल्यावर एकमेकांच्या गळ्यात गळे मिळवून आम्ही पुन्हा उद्या भेटायचं ठरवलं आणि घराकडे वळालो..



           सगळ्यांना भेटून बरं वाटलं होतं. मी घराकडची वाट चालू  लागलो. अंधार पडला होता. राधाची अजूनही आठवण येत होती. भूतकाळ मला सतत साद घालत होता. राधा गेल्यावर मी मुद्दाम पुण्यात निघून गेलो होतो व इथे त्यादिवसानंतर आजच आलो होतो. तिच्या विचारांचं काहूर माजलं होतं. मी तिचा गुन्हेगार होतो. तिच्यामुळे त्यावेळी खूप मोठं रामायण झालं. कुणाच्याही आयुष्यात येऊ नये अशी माणसं व असंभव घटना माझ्या आयुष्यात त्यावेळी होत्या. असं म्हणतात की , पाप पुण्याचे हिशोब इथेच चुकवावे लागतात.



       घरी जाता जाता माझं डोकं तिच्या विचारांमुळे दुखू लागलं. माझी चाल मंदावत होती.. आयुष्य भूतकाळात जात होतं. त्या भूतकाळाच्या चक्रव्यूहात अडकत होतं.. ही वादळापूर्वीची शांतता अचानकपणे मला भासू लागली. मी त्यावेळी राधाला आमच्या त्या विहीरीत ढकलून दिलं होतं.. मीच माझ्या पहिल्या प्रेमाचा खून केला होता.. राधाचा आणि राधामुळे अनेक जणांचा खून माझ्याहातून झाला होता.



क्रमश :



®© पूर्णानंद मेहेंदळे



7507734527


🎭 Series Post

View all