Oct 26, 2020
प्रेम

लेबल

Read Later
लेबल

लेबल:- 

"आज मैं उपर , आसमां नीचे , आज मैं आगे, जमाना है पिछे। " आनंदात बेधुंद होत मोठ्याने गाणे म्हणत सोनाक्षी आज वावरत होती. खूप खुश दिसत होती ती आज!
कोणी परक्यानेही बघितले असते तर नक्कीच आज ही मुलगी आनंदात आहे हे तो म्हणला असता.
छानसा पिच रंगाचा तिचा आवडता  वनपीस घालून, थोडासा  मेकअप करून ती कुठेतरी निघाली होती आणि काहीतरी नक्कीच वेगळे आहे ,ती खूप आनंदात आहे हे बघणाऱ्याला कळत होते.
"आई मी बाहेर जाते आहे , मला वेळ होईल . मी तुला फोन करेन " म्हणत ती तिच्या ऍक्टिव्हा ची किल्ली घेवून निघाली .
" सोनाक्षी, अग कुठे निघाली आहेस? मी तुला अडवत नाहीय पण निदान सांग तरी!"
गोड हसत आणि काही न सांगता, तशीच ती गडबडीने निघाली. आज कुठे जातेय , कोणाला भेटतेय हे तिने काहीच सांगितले नव्हते कारण नंतर तिला सगळ्यांना सरप्राईज द्यायचे होते. मुख्य म्हणजे आईला! 
खूप प्रेमाने, कष्ट घेऊन आईने तिला मोठे केले होते. त्यांचं नाते हे आई मुलीपेक्षा मैत्री असेच जास्ती होते. 
वडीलांबद्दल ते हयात नाहीत एवढेच तिला माहीत होते , यापलीकडे तिला कधी विचारावेसे वाटले नाही आणि आईने सांगितले पण नाही. एक ट्रॅव्हल कंपनी मध्ये आई जॉब करत होती. सिंगल परेंट अशीच तिची ओळख होती. पण खूप छान संगोपन केले होते आईने आणि संस्कार सुद्धा जे विचारात होते तेच  वागण्यात होते.
सोनाक्षी जिथे पोचली ते अगदी आधुनिक असे ऑफिस होते , तिथे फ्रंट ला जी बाई होती तिला परिचय देऊन आणि  येण्याचे करण सांगून ती सोफ्या वर येऊन बसली. 15 मिनिटे झाली आणि त्या लेडी ने तिला केबिनमध्ये जायला सांगितले.
'अभिमन्यू कारखानीस' नावाची पाटी तिने पहिली आणि आत्मविश्वासाने
"सर , आत येऊ का?" केबिनचे दार नॉक करत तिने विचारले.
"येस , कम इन. " 
आत साधारण पंचेचाळीस वय असेल असा एक व्यक्ती तिला दिसला. शांत पण करारी अशी त्यांची मुद्रा तिला भासली. विलक्षण तेज चेहऱ्यावर होते आणि ते निर्विवाद हँडसम होते.
ती आत आली तसे " बस " असे शब्द तिने ऐकले. खुर्ची वर बसून थोडी रिलॅक्स झाली .
"मिस ?" 
"सोनाक्षी कुलकर्णी. "
" बोला मिस सोनाक्षी ."
" सर , मी सायन्स ग्रॅज्युअट आहे. शिक्षण गरजेचे म्हणून पूर्ण केले पण मला खरा इंटरेस्ट आहे तो कलेमधे. मला पेंटींग जमते , शिक्षण घेतले असे नाही पण मला गाणं म्हणता येते आणि सगळ्यात प्रभुत्व म्हणाल तर माझ्या बोलण्यावर मला वाटते. मला मराठी , हिंदी , इंग्रजी आणि गुजराथी या चार भाषा येतात."
ते व्यक्ती खुप बारकाईने ऐकत पण होते आणि निरीक्षण पण करत होते ,जणू मनाचा ठाव घेत होते आणि त्यांची स्वछ पण भेदक नजर खूप काही बोलत होती.
" मिस सोनाक्षी, तुम्ही ऑडिशन दिले आहे का कधी?"
" खर सांगायचं तर नाही सर ! हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. "
"तुम्ही बायोडाटा आणला आहे का?"
पर्स मधून तिने बायोडाटा काढला आणि त्यांच्या समोर ठेवला. त्यांनी हातात घेऊन एक नजर फिरवली आणि तिच्याकडे पाहिले.
" यात 5.3' उंची , रंग , डोळे याचे स्पेसिफिकेशन का मांडलेत?" त्यांनी एकदम विचारले.
"सर आजकाल कलेपेक्षा ह्या बाह्य गोष्टी जास्त बघतात असे मला माझ्या मैत्रीणिने सांगितले ,  फॉर्मल म्हणून मी ते मांडलेत."
तिच्या स्पष्ट पण मोकळ्या बोलण्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल आले आणि पुढे "ठीक आहे , मला याची गरज भासत नाही उद्या सकाळी 10 ला ऑडिशन ला या."
ऐकून थोडी आनंदली आणि गडबडली पण , त्यांच्या हे लक्षात आले " अगदी नॉर्मल आहे हे , फक्त उभे राहायचे आणि मनापासून म्हणून दाखवायचं बस!"
थोडा धीर वाटलं तिला " थँक्स सर !" म्हणून ती बाहेर पडली.
तिथून बाहेर निघून सरळ गणपतीच्या देवळात गेली , बाप्पाला मनापासून नमस्कार करून "यश दे" अशी प्रार्थना केली आणि थोडा वेळ बसली. नंतर थेट घरी गेली तेव्हा आई तर ऑफिस मध्यें गेली होती. फ़्रेश झाली आईने तिच्या आवडीचे थालीपीठ केले होते ते मायक्रोवेव्ह मध्ये गरम केले आणि TV बघत  जेवण आटोपले.
उद्या आपले पाहिले ऑडिशन आहे या विचारात त्या तयारीला लागली. तिच्या आवडीची गाणी हेड फोन लावून ऐकली आणि  काही व्हिडिओ बघितले. तोपर्यंत 5 वाजले होते, आईच्या यायची वेळ झाली होती.
 आईला आवडतो तसा छान आलं घालून चहा करायची तयारी केली आणि डिश मध्ये बिस्किटे काढून ठेवली. थोड्याच वेळात दाराची बेल वाजली ," आई" म्हणत दारातच आईच्या गळ्यात पडली. आईला थोडे नवल वाटले पण तसे न दाखवता " अगं आत तर येऊ दे" म्हणत पर्स बाजूला ठेऊन सोफ्यावर बसली. 
आत जाऊन फ्रेश होऊन येईस्तोवर मस्त चहा चा कप आणि बिस्किटे समोर आली.
" काहींतरी विशेष आहे आज!" दोघींनीही चहा घेतला आणि थोड्या इकडल्या तिकडच्या गप्पा झाल्या.
" बोल , कुठे गेली होतीस सकाळी इतक्या घाईने ? सगळं ठीक आहे ना?"
"आई रागावू नकोस पण मी तुला न सांगता एक म्युझिक कंपनी मध्ये गेले होते. मला जॉब नाही करायचा , मला माझं करीयर आवडीच्या क्षेत्रात करायचे आहे . एकदा प्रयत्न करू देना plz!"
"सोनू, मी कायम तुझ्या सोबत आहे . मनापासून प्रयत्न कर , पण हो जपून हां!  प्रत्येक क्षेत्रात  चांगले आणि वाईट असे दोन्ही असते."
"थँक्स आई" म्हणत सोनाक्षीने आईला घट्ट मिठी मारून  अनुभव कसा आला  हे सांगत होती "अभिमन्यू कारखानीस , नाव बघ कस वजनदार वाटते ना . मला ते हुशार , चाणाक्ष आणि खूप चांगले वाटले. पहिल्याच भेटीत एक आदर वाटला बघ मला त्यांच्या बद्दल. उद्याचा दिवस माझी खरी परीक्षा आहे."
" मनापासून प्रयत्न कर , मी आणि तुझा बाप्पा तुझ्या पाठिशी आहोत." म्हणत आई उठली आणि संध्याकाळच्या तयारीला लागली.
कस होईल, काय होईल , मिळालेला चान्स याचा आनंद अश्या  सगळ्या एकत्र भावना यांचा विचार करत  तिची उरलेली संध्याकाळ गेली. रात्री जेवण करून जरा लवकरच झोपली.
सकाळी लवकर जाग आली तशी रूम बाहेर आली तर आईची नेहमीप्रमाणे कामाची गडबड सुरू होती . ती फ्रेश होईपर्यंत आईने चहा तयार ठेवला आणि स्वतःचा डबा भरून बाकी तयारीला लागली.
" देवाला नमस्कार कर , ऑल द बेस्ट " म्हणत तिची एक पापी घेऊन आई कामावर गेली.
स्वतःचे नीटसे आवरून , छानसा गेट अप करून ती वेळेच्या 15 मिनिटे आधीच तिथे पोहचली. पहाते तर कारखानीस सर तिच्या आधीच तिथे हजर होते, तिला खूप नवल पण वाटले आणि रिस्पेक्ट पण की हे किती डेडिकेटेड आहेत. जसजसा वेळ जात होता ती थोडी नर्व्हस होत होती. तिला अनिरुद्ध सर ने केबिन मध्ये बोलावले "मग मिस सोनाक्षी तयार ना? "
"हो सर !" असे थोडे बिचकत म्हणाली खरी पण टेन्शन चेहऱ्यावर दिसत होते. " रिलॅक्स , डोळे बंद करा आणि तुला मनापासून जे आवडते ते गाणं तू म्हण. कोण ऐकतय , बोलतय बघतय याचा विचार करू नकोस"
"थँक्स " म्हणून ती ऑडिशन रूम ला गेली. तिथे लिस्ट चेक केली तर तिच्या आवडीचे एक गाणे होतेच , ते म्हणू का असे तिने विचारले तर समोरून हो ऐकून ती खुश झाली.
देवाचे स्मरण करून तिने डोळे बंद करून बिट्स कॅच करत सुरु केले आणि खरच कोणताही विचार तिच्या मनात आला नाही . आपल्याच नादात ती गात होती , एकदम मुसिकं थांबले तशी ती भानावर आली.  ऑडिशन रूम बाहेर येऊन बसली , काय होईल , कसे झाले असेल असे ना ना विचार मनात येत होते. साधारण अर्ध्या तासानंतर तिला बोलावणे आले . जाऊन बघते तर कानाला हेड फोन लावून अभिमन्यू काहीतरी ऐकत होते , आणि थोड्या वेळाने ते स्वतः गाऊ लागले. बिना म्युझिक चे त्यांच ते गाणं तिला खूप भावलं , त्यांचा आवाज खूप छान होता. ती तशीच थांबली काही वेळाने  ते  गायचे थांबले आणि समोर सोनाक्षी ला बघून थोडे  चकित झाले.
" तुम्ही कधी आलात ? "
" सर सॉरी पण मला बोलावले असा निरोप मिळाला म्हणून मी आत आले. तुमचं गाणं मी ऐकलं ,खूप छान गाता तुम्ही आणि आवाज खूप छान आहे तुमचा."
हलकीशी स्माईल देत " सोनाक्षी तुम्ही पण छान म्हणालात , त्याबद्दल शिक्षण नाही घेतले हे खरे वाटत नाही. थोडं काही आत्मसात केले आणखी आपल्याला पुढे जायला हरकत नाही. शिकायची तयारी आहे का?"
"हो सर ,मी नक्की शिकेन!"
"ठीक आहे , उद्यापासून तुमचं ट्रेंनिग सुरू करू.  त्यात जर तुम्ही योग्य करू शकला तर नक्की चान्स देता येईल पुढे.
 हो माझे नियम मात्र पाळावे लागतील."
त्यांच्याशी बोलून तिने त्यांचे नियम , त्यांचं काम करण्याची पद्धत समजून घेतली .
दुसऱ्या दिवशीपासून तीचे ट्रेंनिग सुरू झालं. सर स्वतः हे सगळं घेतात हे बघून तिला नवल वाटले. रोज नवीन काही शिकायचे त्याची प्रॅक्टिस करायची , एक दिवस कसूर झालेली त्यांना चालायचे नाही. त्यांच डेडिकेटेड असणं , कडक असणे, खूप भावत होत तिला. त्यांचा तो आपलेपणा , परफेक्शन,  समजावण्याची पद्धत आणि घेत असलेली मेहनत बघून तिला अभिमन्यू कारखानीस हे व्यक्तिमत्त्व खूप आदरणिय वाटत होते .
असा, जवळजवळ 6 महिन्याचा काळ गेला. त्यांच्या वागण्याबद्दल ती खूप सहज पणे समजून घेत होती आणि तेही तिच्यासोबत बरेच फ्रेंडली वागत असत. नकळत थोडी जवळीक निर्माण झाली होती , एक दिवस ती म्हणाली " सर, एक विचारू का तुम्हाला?"
" बोल ना " .
"तुमचा स्वतःच आवाज इतका छान आहे , तुम्ही इतके शिकले आहेत याबद्दल मग तुम्ही का नाही पुढे गेलात यात?"
तिचा प्रश्न ऐकून ते थोडे स्तब्ध झाले आणि म्हणाले,
 " मी आणि माझी त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती. मला हे  हवे होते पण काही कारणांमुळे शक्य झाले नाही , त्यामुळे जिथे मला टॅलेंट वाटतो तिथे मदत करावी हे मी ध्येय बाळगले. पैसा  भरपूर आहे माझ्याकडे पण तरी कुठे तरी काही तरी कमी वाटते." नकळत बोलून गेल्यावर ते एकदम ठाम5ले आणि पटकन उठून गेले.
ती पण आपल्या विचारात हे असे का बोलले , काय कमी असेल या नादात घरी आली .
आईला आता हे नवीन नव्हते , सोनाक्षी मध्ये बदल होतोय हे त्या अचूक हेरत होत्या पण ती आता मोठी झाली नी तिला योग्य वाटेल  तेव्हा बोलेल म्हणून गप्प राहिली.
सोनाक्षीच्या मनात अभिमन्यू सरांबद्दल आदर तर होताच पण आता कुतूहल निर्माण झाले होते. त्यांनी सांगावे त्यांच्याबद्दल माहीत करावे असे तिला वाटायला लागले होते. त्यांची सोबत हवी , ते भेटावे याकडे तिचा कल वाढला होता . त्यांच्या नकळत ती कायम त्याच प्रयत्नात असे. त्यांचे व्यक्तिमत्व , समजूतदारपणा , चांगुलपणा तिला हवाहवासा वाटत होता.
आता तिचे ट्रेंनिग संपायला आलं होतं , आपण इथे येऊ की नाही , भेटु की नाही असे विचार तिला अस्वस्थ करायला लागले होते. 
एक दिवस "  सर , मला तुमच्याशी बोलायचे आहे तुम्हांला वेळ आहे का?"
" बोल ना " म्हणत ते पुन्हा काहीतरी ऐकत गुंतले.
ते अगदी सहज म्हणाले होते कदाचित तिच्या वागण्याची त्यांना कल्पना सुद्धा नव्हती.
" सर , योग्य की नाही ते मला माहित नाही पण मला वाटतंय मी तुमच्या मध्ये गुंतत चालली आहे . तुम्ही माझ्याशी खूप छान वागता, बोलता तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटते?"
हे ऐकून ते एकदम चपापले. " सोनाक्षी तुला काय माहीत आहे माझ्याबद्दल? तू एक छान , निरागस आणि हुशार मुलगी आहेस. तुला तुझं भवितव्य घडवायचं आहे. या नादात तू स्वतःला गमावशील."
"सर plz सांगा न मला तुमच्याबद्दल."
"मला नसते हट्ट नकोत सोनाक्षी, चल मला एक मीटिंग आहे आपण निघूयात ." म्हणत ते सरळ बाहेर पडले. काय  झालं एकदम हे तिला कळले नाही पण त्यांच्यामागे ती बाहेर पडली आणि सरळ घरी आली. 
तिचा पडलेला चेहरा बघून आईने तिला जवळ बसवले आणि विचारले "  काय झाले? आजकाल तू नादात असतेस. सगळं ठीक आहे ना?"
ती एकदम रडायला लागली आणि काय घडले , काय बोलणे झाले ते तिने आईला सांगितले.
आई म्हणाली " सोनाक्षी, आज मला तुला काही सांगायचे आहे. तू कधी बोलली नाही आणि मी सांगितले नाही पण तुझे बाबा हे आजही जिवंत आहेत. माझं सुदधा लव्ह मॅरेज झालं होतं. आई वडिलांच्या मनाविरुद्ध मी  पळून जाऊन लग्न केलं. पण जेव्हा काही दिवसात प्रेमाचं ढोल फुटला आणि कळलं की काय घोडचूक केली होती मी आयुष्यात. तुझा बाबा आणि त्याची कायमची प्रेम प्रकरणं,  व्यसनी असणे, सारखी दारू पिणे, सिगारेट ओढणे मला असह्य झालं होतं.पण लग्न केलं होतं मी म्हणून सहन करत होते.  पण जेव्हा तू काही महिन्यांची असताना तो तुझ्या जीवावर उठला तेव्हा मात्र मी ठाम निर्णय घेऊन शहर सोडलं आणि इथे आले. माझ्या मैत्रिणीच्या आणि तिच्या नवऱ्याच्या मदतीने आयुष्यात उभी राहिले . आता ती दोघे परदेशात आहेत पण ते होते म्हणून आज आपण आहोत."
सोनाक्षी हे ऐकून सुन्न झाली , काही न विचारता आईच्या मांडीवर डोकं ठेऊन शांत पडून राहिली.
त्या दिवसानंतर ती एकदम शांत झाली , अभिमन्यू सर असो की कोणीही ती कामापूर्ती बोलत असे आणि ते आटोपले की घरी निघून येई. तिच्यासारख्या गोड मुलीचे हे असे झालेले पाहून सर सुदधा विचार करायचे. तिला या ना प्रकारे हसावणे , बोलणे, गुंतवणे हे त्यांनी करून पाहिले पण सगळे प्रयत्न फोल ठरत होते.
एकदा ते स्वतः तिला घेऊन लंच ला आले , म्हणाले " सोनाक्षी, तुझ्यातला हा बदल योग्य नाहीय. तू उद्याची कलाकार आहे. पुढल्या आठवड्यात तुला एक संधी मिळाली आहे त्याच तू सोने कर. तू नावाप्रमाणे आहेस तशीच खूप छान राहा."
"मग सर तरी तुम्ही का काही सांगत नाही मला. काहीतरी नक्की आहे हे मला जाणवत पण ते काय हे तुम्ही सांगावं असे वाटते. "
"सोनाक्षी मी एक लग्न झालेला पण एकटा असलेला व्यक्ती आहे. माझं आयुष्य खूप विचित्र आहे. 
मी माझ्या बायकोवर खूप प्रेम केले पण ती दुसऱ्या कुणाचा हात पकडून निघून गेली. तिच्या या अश्या वागण्याने माझ्या आयुष्यात कोणतेही प्रेमाचे नाते येत नाही मी येऊ पण देऊ शकत नाही कारण मला त्याला नावच देता येणार नाही. मला तुझे आयुष्य खराब करायचा अधिकार नाही. तू तुझ्या आयुष्यात यश मिळावं आणि आनंदाने राहावे. माझ्या बेस्ट विशेष कायम तुझ्या सोबात आहेत. जगात कोणताही नाते असो त्याला समाजात नावं लागते आणि ते मी देऊ शकणार नाही." 
तिने आपल्या आई आणि बाबांबद्दल त्यांना सगळं सांगितले. " सर मला वाटते की भावना ही जास्त महत्वाची आणि मोठी असते. कोण काय म्हणेल , कोण काय विचार करेल यापेक्षा आपल्याला काय वाटते हे जास्त महत्वाचं. जग हे नाव ठेवते.  चांगलं करा किंवा वाईट आणि खरंतर त्यांचा काहीच सहभाग नसतो.  आईने लग्न केलं म्हणून सहन केले का तर तिला ती तिची गरज वाटली माझ्या साठी नाव द्यायला. पण जेव्हा तिने शहर सोडले आणि इथे आली, पायावर उभी राहिली तेव्हा जगाचा काही संबंध आला का?
माझं म्हणाल तर मला व्यक्ती , त्यांच्यावरचे प्रेम आणि विश्वास महत्वाचा वाटतो. ते असेल तर कुठेही कोणाशीही टक्कर देत येईल पण फक्त ते नाव द्यावं ते एक लेबल लावावं म्हणून आयुष्यातील सुख गमवावे हे मला मान्य नाही.
आज तुम्हाला जर माझ्याबद्दल काही वाटत असेल तर ते महत्वाचे आहे मला बाकी काही नाही. माझं मत हे स्पष्ट आहे आणि ठाम सुद्धा! तुम्ही नीट विचार करा मला तुम्ही महत्वाचे आहात बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. माझी आई म्हणाल तर माझा आनंद या पलीकडे तिचे जग नाही. ती मला समजून घेईन तिला तुमच्याकडून माझ्याबद्दल मिळालेला विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचं ठरेल."
तिच नेहमीवरमाणे स्पष्ट बोलणं , मत व्यक्त करणे ऐकून अभिमन्यू सर  स्तब्ध झाले.  जर मी मनाने प्रामाणिक राहणार असेल तर नात्याचे 'लेबल' महत्वाचे की त्याचे प्रेम ज्याने आयुष्य निभावून जाते हा विचार त्यांच्याही मनात डोकावून गेला.  
"यावर पुन्हा विचार कर " म्हणून ते गप्प झाले.
"सर ,मी उद्या तुमची घरी 11 वाजता वाट बघेन. आई ला उद्या सुटी आहे , जर माझे बोलणे पटत असेल तर आणि माझ्याबद्दल च्या भावना खऱ्या वाटत असेल तर नक्की या." म्हणून ती बाय म्हणून तिथून निघाली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ते आश्चर्याने बघत राहिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी 11 ला सोनाक्षी च्या घराची बेल वाजली , तिच्या आईने हसतमुखाने स्वागत केलं तसे अभिमन्यू सर आत आले. ते काही बोलणार त्याच्या आतच त्या म्हणाल्या "माझा माझ्या मुलीवर आणि तिच्या विचारांवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही येणार की नाही याची खात्री नव्हती पण आलात यावरून तुम्हाला माझ्या मुलीबद्दल वाटणारे प्रेम मला महत्वाचं वाटत. ती आनंदात असावी हे माझे स्वप्न आणि ध्येयं आहे. तुम्ही तिला कायम आनंदात  ठेवाल एवढेच मला फक्त वचन द्या इतकीच माझी माफक अपेक्षा आहे."
तिच्या आईचे हे एकदम असे बोलणे अभिमन्यू  ला अपेक्षित नव्हते , त्यांचे बोलणे सुरु असेपर्यंत सोनाक्षी बाहेर आली नाही. तिच्या आईला खात्री वाटल्यानंतर त्यांनी हाक दिली तशी  साडी नेसून तयार असलेली सोनाक्षी हसतमुखाने बाहेर आली.
आपल्या मनाशी आणि प्रेमाची प्रामाणिक असलेल्या सोनाक्षी ने आयुष्याचं नात्याचं 'लेबल' नावाच  खूळ बाजूला सारून नवीन आयुष्याकडे वाटचाल सुरु केली आणि तिला तशीच प्रेमळ साथ देण्याचे वचन देऊन अभिमन्यू ने तिच्या करीयर मध्ये तिला साथ दिली.
त्यांचे आयुष्य पुढे चालत राहिले पण कुठल्याही फॉर्मल गोष्टीची  त्यांना कधीच गरज भासली नाही कारण जगातील सगळ्यात श्रेष्ठ अशी भावना जिला 'प्रेम' असे म्हणतात ती त्यांच्या मनात , आचरणात होती आणि ते टिकवण्यासाठी त्यांना कुठल्याही 'लेबल' ची आवश्यकता भासणार नव्हती!
©®अमित मेढेकर

Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!