लाभले आम्हांस भाग्य

सन्मान मराठी भाषेचा

लाभले आम्हांस भाग्य 

        ज्येष्ठ कवी, कादंबरीकार, लेखक कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर, यांच्या जन्मदिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिवस साजरा केला जातो. कुसुमाग्रजांचे महाराष्ट्राच्या भाषा, साहित्यात मोलाचे योगदान आहे.

         देवनागरी लिपीत लिहिली जाणारी मराठी भाषा अत्यंत समृद्ध आहे. ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा, तर गोवा, दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीप, तसेच दमण आणि दीव यांची अधिकृत सहराजभाषा आहे. सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा भारतात तिसरा क्रमांक लागतो.मराठी भाषा संपन्न होण्यात साहित्याचा आणि साहित्यिकांचा मोलाचा वाटा आहे आणि याच मराठी भाषेचा, मराठी साहित्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

          आजच्या काळात जसं भाषा जपणं महत्त्वाचं आहे, तसंच त्या भाषेतील साहित्य सुद्धा जपायला हवं. भाषेचा वारसा पुढच्या पिढीला सोपवणं देखील महत्त्वाचं आहे आणि हे आजच्या एका दिवसासाठी नव्हे, तर रोज घडायला हवं. कारण मराठी भाषेचा योग्य तो गौरव केवळ एका दिवसाच्या भाषणांनी नाही, तर दररोज केलेल्या सन्मानानेच होईल. 

“लाभले आम्हांस भाग्य,

बोलतो मराठी,

जाहलो खरेच धन्य,

ऐकतो मराठी...”

लहानपणापासूनच सुरेश भटांच्या कवितेच्या या ओळी ऐकणं आणि बोलणं खूप सुखावणारं वाटतं. अभिमान वाटतो मराठी असण्याचा! पण आज खरंच प्रत्येकाच्या मनात या ओळी आधीसारख्याच अधिराज्य गाजवतात का? उत्तर देताना काहीसा विचार करावा लागणारच, कारण कळत नकळतपणे मराठी भाषेकडे होणारं दुर्लक्ष, आपलं मन नक्कीच मान्य करेल.

       इथे वादाचा मुद्दा नाहीच. कारण इतर भाषा शिकणं काही चुकीचं नाहीये; पण म्हणून आपल्या भाषेला डावलणं योग्य आहे, असंही नाही आणि म्हणूनच आपली मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी, आपणच पुढाकार घ्यायला हवा. अगदी एकाएकी बदल घडवून आणणं खरंतर शक्य नसतं; पण आपण प्रयत्न केले, तर भविष्यात ते प्रयत्न नक्की सार्थकी लागतील‌. आता नक्की उपाययोजना काय करणार, हा महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो.

       वाचनसंस्कृती! हो, आजच्या या आधुनिक युगात वाचनसंस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे आणि हे बरेचदा प्रकर्षाने जाणवतं. एक वेळ अशी होती, जेव्हा पुस्तकांसाठी लहानथोर अगदी भुकेलेले असायचे. वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या पुरवण्या असोत किंवा मग मासिके, लहानमोठी पुस्तकं असोत किंवा मग इतर कोणतंही उपलब्ध साहित्य असो. वाचण्याची आवड स्वस्थ बसू देत नव्हती; पण आज हे चित्र तसंच पाहायला मिळत नाही. असं नाही, की वाचनाची आवड असणारे नाहीतच; परंतु बऱ्याच अंशी हे प्रमाण कमी होताना दिसतं. व्हिडिओ गेम्स, कार्टून्स, सोशल मीडियाचा वापर या अशा गोष्टींमुळे कुठेतरी पुस्तकांमध्ये रमणं कमी होत आहे. हे सुद्धा खरं आहे की आवड असणारे तंत्रज्ञानाचा वापर करून देखील वाचनाची आवड जोपासत आहेत; पण मग बाकीच्यांचं काय? आपल्या मराठीत जो अपार साहित्याचा ठेवा आहे, तो सर्वांपर्यंत काही अंशी तरी पोहोचायला हवा ना? शेवटी, साहित्य म्हणजे भाषेचं भांडार आहे. म्हणूनच, मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी मराठी साहित्य घरोघरी आणि मनोमनी पोहोचणं आवश्यक आहे. आपल्या जवळच्या लोकांना, ओळखीच्या लोकांना वाचनासाठी प्रेरित करणं हे भाषा वृद्धिंगत करण्यासाठीचं एक महत्त्वाचं पाऊल ठरेल.

       मराठी भाषेचा प्रवास फार सुंदर आहे. बोलीभाषा असो किंवा मग प्रमाणभाषा, वेळेनुसार त्यात बरेच बदल झालेले दिसून येतात. भाषा ही भाषा असते. बोलीभाषा असो नाहीतर प्रमाणभाषा, तिचं अस्तित्व जपणं महत्त्वाचं! जेव्हा एखाद्या भाषेचा योग्य तो वापर केला जाईल, तेव्हाच ती भाषा वृद्धिंगत होण्यास मदत होईल. ठिकाण, प्रसंग, व्यक्ती, गरज, इ. नुसार भाषेचा वापर बदलतो. भाषेला कित्येक वळणं मिळतात; पण याचा अर्थ आपल्या भाषेचा वापर करताना इतर शब्दांचीच गर्दी जास्त व्हावी, असंही नाही. याला परकीय आक्रमणचं म्हणावं लागेल. मान्य आहे की शीतकपाट म्हणण्याऐवजी आपल्याला फ्रीजची सवय आहे; पण जिथे शक्य आहे, तिथे नक्कीच आपण आपल्या भाषेचा वापर करू शकतो. सरसकट दुसरी भाषा वापरात आणण्यात कसलं आलंय शहाणपण!

       आजच्या काळात इतर भाषेचा वापर करावा लागतो. तो करायलाच हवा; पण गरज नसताना आपण आपल्या मराठीला दुय्यम स्थानी ठेवणं कितपत योग्य आहे, कुणास ठाऊक! इतर कोणी काय करतंय, यापेक्षा मी माझ्या परीने माझी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी काय करतोय, हे पाहणं कधीही उत्तम आहे. कसं असतं ना, जोपर्यंत आपण स्वतः स्वभाषेची कास धरत नाही, तोपर्यंत त्या भाषेचा विकास होण्याचा मार्ग अडथळ्यांनी भरलेला असतो. म्हणून हे अडथळे दूर लोटण्याचं काम, आपण स्वतःच करायला हवं.

       आज अनेकदा असं पाहायला मिळतं, की बऱ्याच जणांना एखादा शब्द हा मराठी शब्द आहे, हे सुद्धा माहीत नसतं. मराठी भाषा जर या वळणावर येऊन ठेपली असेल, तर मग भविष्य काय? आणि म्हणूनच मराठी भाषेचा वापर वाढवणं ही आजच्या काळाची गरज झाली आहे. जर आज यासाठी प्रयत्न केले, तर आणि तरच पुढे जाऊन मराठी भाषा टिकून राहायला मदत होईल.

       शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं, हा सर्वस्वी पालक आणि पाल्यांचा निर्णय आहे; परंतु कोणत्याही माध्यमातून शिकताना आपल्या मातृभाषेची, मराठीची नाळ कायम जुळलेली राहील याची काळजी घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपण स्वतःच जर मराठी भाषेला डावलायला लागलो, तर इतरांकडून अपेक्षाच कसली करणार!

       मुळात दिखावा म्हणून एखादा उपाय अवलंबणे म्हणजे भाषेचा विकास होतोय, असं अजिबात नाही. ते उपाय तितकेच कळकळीचे असावेत. जोपर्यंत भाषा संवर्धन आणि वृद्धिंगत करण्याचा विचार अगदी मनापासून प्रत्येकाच्या मनात रुजत नाही, तोपर्यंत त्या उपाययोजनांना अर्थ नसावा असं मला तरी वाटतं. जेव्हा मला स्वतःला माझ्या भाषेचा अभिमान, आदर, कळकळ वाटेल, तेव्हाच मी त्या भाषेचा यथोचित सन्मान करून तिचा अवलंब करू शकते.

       सौंदर्याने नटलेली आपली मराठी भाषा अतिशय सुंदर, संपन्न आहे. शब्दभांडाराला जितकं जाणून घेऊ, तितकं तिचं वैभव समजतं. मराठी भाषा जशी वळवायचा प्रयत्न कराल, तशी वळत जाते. इतर भाषांच्या तुलनेत या गोड भाषेला नीट समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर हिची खरी गंमत कळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिकता बदलायला हवी. कारण आपणच मराठी भाषेला कमी लेखलं, तर आपसूकच तिचं अस्तित्व जपणं कठीण होईल. मराठीकडे संकुचित नजरेने बघणं बंद व्हायला हवं. मराठीतून बोलणं कमीपणाचं लक्षण का बरं समजावं? मान्य आहे, वेळेनुसार, परिस्थितीनुसार आपल्याला इतर भाषेचा वापर करावा लागतो; पण म्हणून आपल्या मराठी भाषेला कमीपणाचं लक्षण समजणं अर्थातच चुकीचं आहे. आपण मराठी भाषेला प्राधान्य द्यायला कुठेतरी कमी पडत आहोत, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. 

“माझ्या मराठीची गोडी,

मला वाटते अवीट.

माझ्या मराठीचा छंद

मला नित्य मोहवीत!”

या ओळी म्हणजे मराठी भाषेची गोडी उमजलेल्या व्यक्तीच्या मनातले शब्द असणार. 'माय मराठी' म्हणताना, तिला खरंच मातेप्रमाणे वागवायला देखील हवं ना! आपण आईला ज्या स्थानी ठेवतो, तेच स्थान मराठी भाषेला दिलं तर तिचं स्थान कधीच डळमळीत होऊ शकत नाही. असं नाही की, मराठी भाषा अगदीच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे; पण काही ठिकाणी ती जशी इतर भाषांच्या सावलीखाली झाकोळली जाते आहे, तिथे तिचं स्वतःचं वेगळं अस्तित्व अजून उठावदार होणं गरजेचं आहे. भविष्याच्या दृष्टीने घेतलेली एक साधीशी खबरदारीच समजा हवं तर!

नुसतं मराठी मराठी हे शब्द बोलून मराठी भाषा वृद्धिंगत होत नाही, तर त्यासाठी प्रयत्न देखील गरजेचे असतात आणि हे आपल्या हातात नक्कीच आहे.

अंतिमतः इतकंच म्हणेन की, मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी जर काही उपाययोजना करण्याची गरज आहे, तर त्यातील सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी म्हणजे मराठी भाषेचं स्थान ओळखणं. तिचं स्थान ओळखून, तिचा अधिकाधिक वापर करणं हे भाषा वृद्धिंगत करण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल ठरेल. शेवटी आपण तिचा यथोचित सन्मान केला तरच भविष्यात ती मानाने मिरवू शकते.

दुसरं कोणी सुरुवात करण्याची वाट न पाहता, आपण स्वतःच प्रयत्नशील असायला हवं. आपण तिची कास धरली तर आपसूकच समोरची व्यक्ती देखील तिला आपलंसं करण्यासाठी पुढाकार घेईल. म्हणूनच आजच्या या दिवशी मराठी भाषेला दिला जाणारा सन्मान, केवळ आज पुरता मर्यादित न राहता, नेहमीच राखला जाईल याची काळजी घेण्याचा प्रयत्न करूया.

-© कामिनी खाने.