कुटुंबवत्सल योद्धा

लिहावं तितकं कमी, अनुभवावं तर अनुभवांची भली मोठी शिदोरी, चेहऱ्यावर कायम प्रसन्नतेचं हास्य, वाच

कुटुंबवत्सल योद्धा

अविरत वाहतो
कधी अडखळतो
कधी आटतो
तरीही नव्याने 
पुन्हा ज्यास मायेचा
झरा पाझरतो
अशीच तीही आहे साऱ्यांसाठी
मायेचा अलगद वाहणारा झरा
चैतन्याचा गाभारा.

लिहावं तितकं कमी, अनुभवावं तर अनुभवांची भली मोठी शिदोरी, चेहऱ्यावर कायम प्रसन्नतेचं हास्य, वाचायला घेतली तर आयुष्यातल्या चढ उतारांनी भरलेली आणि तरीही सकारात्मकतेनी परिपूर्ण अशी भली मोठी कादंबरी; असं माझ्या आयुष्यात अलीकडेच मला वाचायला मिळालेलं पुस्तक म्हणजे माहेरची जोगी अन् मिश्रीकोटकरांची सुन झालेल्या सौ.अश्विनी सुहास मिश्रीकोटकर.

‘अश्विनी’चा संस्कृत अर्थ म्हणजे ‘योद्धा’ आणि त्यांना ओळखण्याचा प्रयत्न केल्यावर लक्षात आलं की, काही व्यक्ती आणि नाव, हे एकमेकांना पुरेपूर साजेसे असतात.

हसरा चेहरा, मायाळू बोलणं, स्वभावातली सहजता, अनुभवी वाचक, लेखक असूनही त्याचा अवाजवीपणा वागण्यात कुठेच नाही, त्यांची मत त्या कधीच लादत ही नाही, पण समजुतदारपणे मार्गदर्शन नक्की करतात; अशा अश्विनी ताईंसोबत ओळख अर्थातच  ईरामुळे झाली. त्यांच्या प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याकडे बघितलं की आपल्यालाच समाधान जाणवेल इतकं गोड त्यांचं स्मितहास्य आहे.

बालपणापासून संगीताची आवड असलेल्या अश्विनी ताई संगीतात बी.ए. असून एक उत्तम गृहिणी आहेत; नुसत्याच उत्तम नाही तर कुटुंबवत्सल स्त्री म्हणता येईल. कुटुंबवत्सल यासाठी म्हणाले कारण आता सासू होणार असणाऱ्या आश्विनी ताईंच्या मनाचा एक कोपरा माहेरसाठी अजूनही तितकाच हळवा आहे; तर आई म्हणून, बायको म्हणून त्या तितक्यात समर्पित आहेत.

प्रवाहाची उपमा त्यांना देण्याच कारण इतकच की, मनाचा कुठलाच कोपरा ह्यांनी अमुक अमुक गोष्टींसाठी राखून ठेवलेला नाही; जो रंग साजेसा वाटेल तो अवडीनं वापरणार, कविता असो किंवा कथा, जे त्या क्षणाला छान जमतंय ते मनापासून कागदावर उतरवतात आणि त्यात रमणार.  रांगोळी, गायन, कविता, कथालेखन, परीक्षा कुठलीही असो भाग घेणार आणि मनापासून मायेने सगळ्यांची विचारपूस करणार, मग त्यात आवडती अन् नावडती हा भेदभाव न करता छान कौतुक सुद्धा करतात.  इतकं मोकळं, इतकं सहज आणि सगळ्यात रमून जाणं, सगळ्यांनाच कुठे जमतं? आणि तरीही मी काही वेगळं करते, सगळ्यांसोबत आपुलकीने वागते, असं कुठेही त्या कणभर जाणवू देत नाही. सांगायचं म्हणजे त्या आपुलकीनं स्वतः सगळ्यांना कॉल करून विचारपूस करतात. त्यातून त्यांच्या वयाचा, अनुभवाचा खऱ्या अर्थान मोठेपणा ह्या वागण्यातून जाणवत राहतो.

शाळेपासून वाचनाची आवड असलेल्या अश्विनी ताईना कौटुंबिक कथा लिहिणं खूप आवडत असलं तरी वेळ येईल तेव्हा तशी एखादी गोष्ट त्या छान रंगवतात, कविताही तितक्याच आवडीने करतात. त्यांच्या या लिखाणाच्या आवडीसाठी त्या जिद्दीने वेळ काढतात; अगदी आता मुलाच्या लग्नाच्या खरेदीत गुंतलेल्या असताना, घरातलं कार्य असूनही त्या त्यांच्या कथामालिकेसाठी वेळ काढतात. हेच कशाला अक्सिडेंट झालेला असतानाही ही मागल्या चॅम्पियन्स स्पर्धेत त्यानी भाग घेतलाच आणि योगदान ही दिलं; यातून स्वतःच्या कलेसाठी समर्पित असलेली लेखिका सहज माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली.

आयुष्य म्हटलं की सुखं दुःख दोन्हीही पाहुणे म्हणून असणारच, ही विचारसरणी असणाऱ्या अश्विनी ताई फार जिद्दीने एकापाठोपाठ एक येणाऱ्या संकटांसमोर उभ्या राहतात. मला जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांना मी सहज विचारलं, "ताई तुम्ही इतक्या सहजतेने पॉझीटीवीटी कुठून आणता? नेमकं तुमचं मोटीवेशन काय?" तेव्हा मिळालेल्या त्यांच्या उत्तराने खरच ऊर्जा निर्माण झाली; ते उत्तर होतं, "परिस्थिती." त्या म्हणतात "परिस्थिती कुठलीही असो, आपण त्यावर मात करण्याची जिद्द ठेवायची, हरायचं नाही. बस इतकं मनाशी ठाम ठरवायचं; मार्ग आपोआप मोकळे होतात."  त्यांच्या याच परिस्थितीशी दोन हात करण्याच्या स्वभावामुळे त्यांचा अपघात असो, यजमानांचा अपघात असो किंवा अचानक आलेलं किडनी स्टोनचं ऑपरेशन, एकपाठोपाठ एक होणाऱ्या आघातांतून त्या आणि त्यांचं सुखी कुटुंब सावरत गेलं.

पाप आणि पुण्य आपले चांगले वाईट कर्मच आपल्याला यश अपयश देत असतात आणि आपले चांगले कर्म आपल्याला कायम तरुन नेतात, यावर ठाम विश्वास असणाऱ्या अश्विनी ताई त्यांच्या पाठीशी भक्कम उभ्या असणाऱ्या मुलगा, लेक आणि यजमान यांचं कौतुक करण्याचेही स्वतःला विसर पडू देत नाही. शिक्षकी पेशा असलेले त्यांचे यजमान, त्यांना लिखाणात म्हणा किंवा आयुष्यात म्हणा, वेळोवेळी साथ देतात, हे सांगतानाचा त्यांच्याप्रती ताईंचा सार्थ अभिमान बोलण्यातून जाणवत राहतो.

कष्टाने, त्यागातून, आपुलकी जपून जो संसार इथवर पोहचलाय, त्या रोपट्याचं आता वृक्षात रुपांतर होतंय; कारण  सून लेकाचा नविन संसार, आता त्यांची मूळ रोवू पाहतील. तेव्हा पुढच्या आयुष्यात तुम्हाला जरासा निश्चिंत वेळ मिळो आणि तुमच्या लिखाणाच्या, फिरण्याच्या, संगीताशी निगडीत अपूर्ण राहिलेल्या ईच्छा पुर्ण करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळत राहो.

हरण्याची नाही तिला भीती
जिंकण्याचा ध्यास जिच्या मनी
न थकता
न थांबता
लढवय्यी बनून राहते जी ठाम उभी
ती ही अश्विनी
ती ही अश्विनी.

तुमच्या समाधानी हास्या इतकंच तुमचं उर्वरीत आयुष्य सुख, समाधान आणि लेखणीला सदैव वाचा फुटत राहिल, असंच संगीतमय जावो, हीच शुभेच्छा.