कुठे हरवला देश माझा

This entire blog is my own opinion. So don't take it wrongly if you not agreed with this. I sincerely hope that our country should have unity. We should not be considered our country in different castes and each one should call himself as an Indian.

कुठे हरवला देश माझा ?

         काय चाललंय आपल्या देशांत ? कुठे हरवलाय भारत माझा ? कुठे हरवलाय महाराष्ट्र माझा ? देशांत सगळीकडे जात -धर्मावरून अराजकता का माजतीये ? जो तो फक्त आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे याच्याबद्दल का बोलतोय ? कुठे हरवलाय या देशाचा तरुण ? त्याला ऐन करिअरच्या काळात या जात धर्माच्या लढाईत का भाग घेऊ वाटतोय ? आपापल्या धर्मातले महापुरुष व त्यांच्या मोठेपणासाठी हा तरुण एकमेकांत का भांडतोय ? अरे ज्या महापुरुषांनी कायम जातिव्यवस्थेला विरोध केला आज त्यांनाच आपण आपापल्या जात धर्मात का वाटून घेतोय ? सोशिएल मीडियावर दर दिवसाआड एक तरी जातीयवाद पेटवणारी पोस्ट आपण का टाकतोय ? का ? कशासाठी हे सगळं ? कुणाचं मोठेपण सिद्ध करताय तुम्ही ? ज्यांनी आधीचं आपल्या कामाने आपलं आभाळाएवढं मोठेपण सिद्ध केलंय.... त्यांचं ?
           मित्रांनो, हात जोडून सांगतो प्लीज लक्षात घ्या. पृथ्वीवर आपलं अस्तित्व फारचं थोड्या दिवसांकरीता राहिलेलं आहे. उरलेला मानव समाज फार थोड्या दिवसांचा पाहुणा आहे या पृथ्वीतलावर. आपल्या पृथ्वीवर पाऊस पडण्यासाठी जेवढ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईडची गरज लागते त्यापेक्षा कितीतरी जास्त अरब टन पटीने आपण हा वायू आपल्या वातावरणात दरवर्षी सोडतोय. त्यामुळे पृथ्वीचं तापमान दरवर्षी प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि याची जाणीव तुम्हांलाही होतं असेलचं. एक दिवस तापमान वाढून पृथ्वी नष्ट होणार आहे आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मग असं असताना सुद्धा तुम्ही कशासाठी आपापसांत जात धर्माच्या क्षुल्लक गोष्टीवरून भांडत आहात ? 
          मित्रांनो ज्या महापुरुषांच्या नावाचा वापर तुम्ही सगळे करत आहात त्यांनी त्यांचं काम केलंय. त्या त्या काळात लोकांवर अन्याय  झाला म्हणून त्यांनी आवाज उठवला. लोकांना न्याय दिला. त्यांचं टारगेट फक्त आपल्या लोकांना आनंदात ठेवणं एवढंच होतं. आता वेळ आपली आहे तसंच काहीतरी या समाजासाठी करण्याची. त्यांचा आदर्श जरूर डोळ्यासमोर ठेवा पण त्यांची नावं वापरून त्यांच्यात मोठं कोण असे बचकाने अन जीवघेणे खेळ खेळू नका. आपल्या आयुष्याचा खेळ करू नका. सध्या आपल्या लोकांना आपल्या देशाला आपल्या जगाला कोणत्या प्रश्नांना सामोरं जायचं आहे त्याचा विचार करा. तशी पाऊलं पुढे टाका. समाजाचे प्रश्न सोडवा. समाजापुढे अजून प्रश्न निर्माण करू नका. इतिहास साक्षी आहे.. ह्या जात धर्माच्या भांडणात फक्त जीव जातो तो माणसांचा. जातीचा किंवा धर्माचा नाही. जात आणि धर्म ही चिरंजीव शस्त्र आहेत. त्याला मृत्यू नाही. आपण त्याला फक्त आपल्या माणुसकीच्या आड येऊन द्यायचं नाही. बस !
        बघा विचार करून. आपल्या लोकांसाठी जीव तुटतो म्हणून सांगतोय. राजकारणासाठी तर अजिबात या शस्त्रांचा वापर आपल्या लोकांविरुद्ध करायचा नाही. कारण ह्यांत फक्त आपलीचं जीवाभावाची माणसं मारली जातात. जोवर लोकांना चांगला वक्ता आणि चांगला नेता यांतला फरक कळत नाही तोवर भारतात खऱ्या लोकशाहीचा विजय होणार नाही. त्यासाठी तुम्ही नवीन संकल्पना जन्माला घाला. त्यांचा पाठपुरावा करा. रोजगार मिळवा. व्यवसाय वाढवा. अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात केलीत तरी चालेलं पण वाईट शब्द वापरून आणि भडकावू पोस्ट करून आपला समाज अजून खोल दरीत ढकलू नका. देवावर श्रद्धा ठेवा पण त्याचं श्रद्धेने विज्ञानाची कास धरा.

लक्षात ठेवा जोवर आपण सगळे “ भारतीय ” ही एकमेव “ जात ” आपल्या नावापुढे लावत नाही तोवर आपला देश “ महासत्ता ” होवू शकणार नाही. 

---- विशाल घाडगे ©™