गोष्ट आहे माझ्या मैत्रिणीकडच्या कुशाभाऊची. माझी एक मैत्रिण त्यांचा खूप मोठा आंबा व्यवसाय होता आणि त्यासाठी माणसांची गरज लागायची. तर कुशाभाऊ त्यांच्याकडे कामाला होता. तसे बरेच नोकर चाकर माणसे त्यांच्याकडे रहात असत. त्यातलाच एक कुशाभाऊ तो खूपच गप्पाळू ( म्हणजे खूपच गप्पा मारणारा). दिवसभर अशी ही माणसे काम करत असत आणि वर्षानवर्षे राहत असल्यामूळे त्यांचा गावातल्या लोकांबरोबर जवळचा संबंध येत असे. अशातच कुशाभाऊची ओळख गावातल्या "हौशी" नाटक कंपनीमध्ये झाली. ही मंडळी गावातल्या एखादया सण समारंभामध्ये, देवळामध्ये काही कार्यक्रम असला की नाटक बसवायची, तेवढीच त्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळायची.
तर या नाटक कंपनीमध्ये कुशाभाऊने आपली वर्णी लावली. त्याच अस झालं की, कुशाभाऊला गप्पा मारता मारता नाटकात रोल मिळाला. त्याने तस आपल्या मालकांना म्हणजेच आजी आजोबांना सांगितल की, त्याला रात्री एक दोन तासांसाठी नाटकाच्या तालमीला जायचय. आजीला खूप गंमत वाटली कुशाभाऊची. तिने त्याला परमिशन देवून टाकली. मग मात्र कुशाभाऊ रोज नित्यनेमाने तालमीला जाऊ लागला. रोज सगळ्यांना सांगू लागला की आमच नाटक बघायला सर्वांनी याच.
या आंब्याच्या व्यवसायातना दिवस रात्र कामं असतात आणि तीन ते चार महिन्यांच्या अवधीत, पावसाळा संपायच्या आधी सगळी काम उरकून घ्यावी लागतात. पण कुशाभाऊच्या आग्रहाखातर सगळे जायला तयार होतात.
तर नाटकाचा दिवस उजाडतो. कुशाभाऊ सकाळपासूनच खूप घाईत असतो. घाइघाइने तो नाटकाच्या तालमीला निघून जातो. सगळेजण आपापली कामे उरकून, तयार होण्याच्या धांदलीमधे असतात. रात्री नाटक बघायला सगळे तयार अगदी आजी आजोबा सुद्धा.
अशा रितीने नाटक सुरु होत..... सगळ्यांची घालमेल, कुशाभाउच नाटक, मग त्याच काम कस असेल?.... कुशाभाऊ कसा दिसत असेल?.... सगळेजणं आतुर कारण सकाळपासून कुशाभाऊ भेटलेलाच नाही कुणाला त्यामुळे तो कुठल्या रोलमध्ये दिसणार हे सुद्धा कुणी विचारलेल नसत. आजी खूप उत्सुक कुशाभाऊ आता दिसेल..... आता दिसेल..... पण कुशाभाऊ नाटकाचं मध्यांतर आल तरी दिसेना......
मग सगळे पुढच्या भागात तो दिसेल अशी वाट बघत बसले. पुढचा भाग चालू झाला..... सगळ्यांची उत्सुकता पणाला लागलेली.... तरी कुशाभाऊ काही दिसेना. मग तर अक्षरशः नाटक संपत आल होत....... आजीचा पुरता हिरमोड झाला. संपूर्ण नाटकात कुशाभाऊ काही दिसलाच नाही. मग हा कसली तालीम करायला जायचा?......
एवढी उत्कंठा शिगेला पोहोचलेली असताना, नाटकात शेवटी एक दोन कडव्यांच गाण होत. त्या गाण्यामध्ये शेवटच्या ओळीत कुठेतरी कुशाभाऊ मेकअप वैगरे करुन खुशी खूशीत गाण म्हणत होता..... हुश्श....!!!! दिसला एकदाचा कुशाभाऊ असे म्हणत सगळ्यांची हसून हसून पुरेवाट....
अशा प्रकारे इतक्या दिवसांच्या तालमीच सार्थक झाल्यासारखं वाटलं कुशाभाऊला.