कुंकू-टिकली

सासूने सुनेसाठी मोडलेली एक चौकट




कुंकू-टिकली


"काय बाई ही शालूची सून, मान्य आहे कुंकू नाही लावत आजकाल कोणी तर एखादी टिकली तरी लावायची ना.… छोटीशी तरी..."! सुनंदा काकु


"हो ना सुनंदावहिनी, गळ्यातही मंगळसूत्र तर असं घातलंय! मंगळसूत्र आहे का नुसती साखळी आहे कळतसुध्दा नाही." संगीता आत्या


"पण मी काय म्हणते संगीतावन्सं, अहो कमीत कमी चार लोकांत तरी जरा धड राहावं...! शोभतं का हो हे असं...! काय तो ढिल्ला पायजमा आणि त्याच्यावर तसलं ते टी-शर्ट...! आपण कुठे गेलोय... कोणाकडे गेलोय काही बघायचं नाही... मनात येईल तसे कपडे घालायचे...!" ज्योती काकु


"हो ना, बघ तर...! शालू वहिनी अगदी काहीच बोलत नाही सुनेला...!" संगीता आत्या


"पण मी काय म्हणते... तिने शालूच्या बोलण्याची वाट बघायची कशाला...? आपलं आपल्याला कळू नाही का? आता माझीच सून बघा... मान्य आहे साडी नाही घालत; पण छानसा पंजाबी ड्रेस, हातात बांगड्या, मंगळसूत्र आणि टिकली...! बरं दिसतं की चार लोकांत..." सुनंदा काकु


"हो की... तुमची सुन सगळं करते हो...! नाही तर शालू वहिनीची सून... सकाळी उठलं की ते लॅपटॉपचं डबडं घेऊन बसते... काय तर म्हणे वर्क फ्रॉम होम...! काम करते का त्या लॅपटॉपवर गेम खेळत बसते काय माहिती... अन् बरोबर संध्याकाळचा स्वयंपाक झाला की हिचं काम संपतं... म्हणजे सकाळी काही करायचं काम नाही आणि संध्याकाळी पण काही करायचं काम नाही... शालू वहिनीच तिच्या मागे असतात... चहा घे, नाश्ता घे, जेवून घे…! बरंय बाई... आमच्या सासूने आम्हाला कधीच विचारलं नाही जेवली का म्हणून? उलटं जेवायला बसलं की सासूबाई डोळे मोठे मोठे करून बघायच्या..." संगीता आत्या


देशमुख वाड्यात स्वयंपाक घरात जमलेल्या सगळ्या बायकांचा संवाद सुरू होता.  यावर्षी उन्हाळ्यात सगळेजण ठरवून जमले होते... कोरोनामुळे दोन वर्ष कोणाच्या भेटी गाठी नव्हत्या... म्हणून मग मुद्दाम सगळे चार-पाच दिवसांच्या सुट्ट्या घेऊन आले होते. 


तेवढ्यात शालूताई तिथे आल्या. घरातल्या बायकांचं बोलणं त्यांच्या कानावर पडलं होतं.


"शालू वहिनी, अहो, काही नाही, आम्ही म्हणत होतो की मंदारच्या लग्नात कोणाला येता आलं नाही ना... त्यामुळं तुमच्या सुनेसोबत कोणाची ओळख नाही फारशी..." संगीता आत्याने विषय बदलला.


"हो... लग्नाची तारीख ठरवली आणि लॉक डाऊन लागलं... मग काय मुलाचे आई वडील आणि मुलीचे आई वडील एवढ्यांनाच परवानगी होती तेव्हा... मग आपण जाणार तरी कसं ना..." ज्योती काकुही विषयांतर करू लागत होत्या.


"पण काहीही म्हण शालू, तू फारच डोक्यावर बसवलंस सुनेला... कपडे घालण्यावरून तर काही बोलयचं सोड... तूच तिच्या मागे-पुढे करत राहतेस..." सुनंदा काकु बोलल्याच. त्यांचं बोलणं ऐकून शालूताई तडक तिथून निघून गेल्या आणि आपल्या सुनेचा हात धरून तिला तिथे घेऊन आल्या.


"ही सृष्टी, तुमच्या भाषेत माझी सून! मंदारसाठी हिला बघायला आपण गेलोच होतो ना... लग्नाची तारीख काढली आणि लॉक डाऊन लागलं... तुम्ही कोणीच येऊ शकला नाहीत लग्नाला... त्यानंतर आमच्या आयुष्यात काय झालं, याची चौकशी करावी वाटली का तुम्हाला? म्हणायला तुम्ही नातलग...! मंदारला कोरोना झाला हे कळल्यावर तुम्ही नंतर फोनसुद्धा केला नाहीत... जसं की फोनवर बोलल्याने तुम्हाला कोरोना होणार होता... ही पोरगी... फक्त सहा महिने झाले होते घरी येऊन... तिने मात्र ते सर्व केलं जे कोणीच करू शकलं नसतं... मंदारला कोरोना झाला आणि त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणा हवं तर... त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या... डायलिसिस वर होता तो... डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांट हा शेवटचा पर्याय सांगितला होता... मी शुगर पेशंट तर मंदारचे बाबा हार्ट पेशंट! आमची इच्छा असूनही आम्ही कोणी किडनी देऊ शकलो नाही... कोणी डोनर सुद्धा सापडत नव्हता... जेमतेम सहा महिनेच झाले होते मंदारच्या लग्नाला.... या पोरीने अगदी मागचा पुढचा कसलाच विचार न करता मंदारला स्वतःची किडनी दिली... तुमच्या स्वतःत आहे का एवढी हिम्मत की तुम्ही स्वतःच्या मुलांसाठी असं काही कराल...? नुसतं मंगळसूत्र घातलं, साडी घातली की सौभाग्य, नवऱ्याविषयी प्रेम असतं का? ते विचारांमध्ये, तुमच्या कृतीत असावं लागतं... 


अजून काय म्हणत होतात तुम्ही? साडी घालत नाही… बांगड्या घालत नाही… टिकली लावत नाही, हो ना? काय वाईट आहे या ड्रेसमध्ये… सगळं अंग तर व्यवस्थित झाकून आहे… अगदी तुमच्या साड्यांपेक्षा जरा जास्तच झाकून आहे… आणि टिकलीचं म्हणाल ना, तर तिच्या नवऱ्यासाठी तिने जे केलंय ना, त्यासमोर हे टिकली वगैरे काहीच नाहीये... आणि घेते मी माझ्या सुनेची काळजी... तिने माझ्या मुलाला किडनी दिली म्हणून नाही तर... एक माणूस म्हणून.... का आपण कायमच त्या चौकटीत राहायचं...? आपल्या सासूने आपल्याला त्रास दिला म्हणून आपण आपल्या सुनांना त्रास द्यायचा! आपण तिला जीव लावला तर ती आपल्याला जीव लावेल ना! आपल्या मुलाच्या, नवऱ्याच्या हातात देतोच की आपण सगळं... ते कमवून आणतात म्हणून देतो ना... माझी सूनही माझ्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून कमावते... मग आपण तिला थोडा सपोर्ट केला तर काय बिघडतं हो? चांगले धड-धाकट हात पाय आहेत आपले, तरी फक्त सून आलीये म्हणून काहीच करायचं नाही, असं का? आपण तिला आईचं प्रेम देऊ तरच ती आपल्याला लेकीची माया देईल ना? चल गं सृष्टी, या कुंकू-टिकलीच्या चौकटीत मला तुला अडकवायचंच नाहीये…तुला हवे तसे कपडे तू घाल, हवे तेव्हा आणि हवे ते दागदागिने घाल… कोणत्याच प्रकारच्या बंधनांच्या चौकटीत मी तुला बांधून ठेवणार नाही…" शालूताई सृष्टीला तिथून घेऊन गेल्या.


सगळ्याजणी मात्र न दिसणाऱ्या आणि शालूताईंनी मोडून काढलेल्या चौकटीकडे बघत उभ्या होत्या.


समाप्त

फोटो- गुगलवरून साभार

© डॉ. किमया मुळावकर