कुंबलगी नाईट्स..एक नितांत सुंदर अनुभव..

चित्रपट हा वास्तविकतेचा आधार घेऊन प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतो..तेंव्हा तो अनुभव जगणं हा आनंद शब्दातीत असतो.. जगण्याची व्याख्या बदलणं जमवलंय कुंबलंगी नाईट्स या सिनेमानं जरुर पहावा असा ..सिनेमा..


माणसाचा स्वभाव आणि त्याचं समाजातलं वावरणं यांवर तो कसा आहे त्याचं एकूणच व्यक्तीमत्व कसं आहे हे फक्त आपल्या त्याच्या विषयीच्या कल्पनांवर, अंदाजांवर अवलंबुन असतं..
प्रत्यक्षात तो तसाच असेल असंही सांगता येत नाही ..बाहेरच्या जगांत वावरतांना फसवे मुखवटे चढवणारा आतून पार ढासळलेला असू शकतो किंवा जगण्याची असोशीच घालवून बसलेला असतो...
बालपणातल्या कित्येक प्रसंगांनी खोलवर झालेल्या जखमांचे व्रण तो आयुष्यभर वागवत रहातो.. वरवर दिसणाऱ्या या जखमा कधीच भरून न येणाऱ्या असतात.. ती ठसठसती ओल कायम रहाते..जरासा ही भावनिक धक्का लागला की पुन्हा हिरवीकच्च होते.. पण या सगळ्या संभावित विचारांना छेद दिला \"कुंबलंगी नाईट्स \" या सिनेमाने.. या वर्षी बरेच सिनेमे घरांतच आवर्जुन पाहिले..पण वेगळा ठसा उमटवणारा आणि आयुष्याचं गणित मांडू तसं आहे अपेक्षित उत्तरं हवी असतील तर ..बुद्धी बळातल्या डावांसारखं तिरके नियम पाळायला हवेत.. उंट अडीच घरं जाणार आहे माहीती आहे.. हत्ती सरळ पण एखादं प्यादं ही वरचढ ठरतं..नाकेनऊ आणतं पण त्याला कह्यात आणणं हे ही चालीतला एक भागच असतो..
सिनेमा सुरु होतो तेंव्हाचं हे जाणवायला लागतं काहीतरी हटके पहायला मिळणार.. शांत नितळ पारदर्शी पाण्याच्या प्रवाहावर सोनेरी वर्खाची पखरण आणि त्यांत फेकलेलं जाळं ते ही नजाकतीनं.. पाण्याचा पृष्ठभागही थरारु नये ईतक्या शिताफीने..
इथे कमाल त्या कसबाची वाटते.. पाण्यावर उठणारे तरंगही वेगवेगळी आवर्तन उठवतात पण अतिशय देखणेपणांत..
मानवी भावनांचे पडसाद इतक्या अलवार हळुवार पद्धतीनं दाखवणं कमाल आहे कमाल..
मनाचा तळही गाठू न देता साध्य साधायचं.. चमचमणारी ती मासोळी ही स्वतःचं जगणं विसरुन जावी.. आपला मृत्युही या भुलाव्यांत सहज सोपवावा..

साजी,बोनी ,बॉबी आणि फ्रँकी या आईवडिलांविना जगणाऱ्या भावांची गोष्ट.. केरळच्या कोची जवळच्या अतिशय लहानशा गावांत घडणारी.. \"कुबंलंगी नाइट्स\"
केरळ हे बेटाचं शहर .. पाण्यावर तरंगणारं ..आपला जीवन निर्वाह याच पाण्यावर अवलंबून.. हे पक्कं ठाऊक असणारे चौघे भाऊ.. लहानपणीच बापाचा विक्षिप्तपणा ,आईचं मुलांची जबाबदारी झटकून नन होणं आणि या नशीबानं गटांगळ्या खात जगायला लावलेल्या आयुष्याची सुरुवात करणारी भावंडं .आहे म्हणायला घर.. चार वीटांच्या भींती त्याही नात्यांचा तोल न धरु शकणाऱ्या ..पापुद्रे कधीचे सुटलेले..दरवाजा ही खिळखिळा कुणाला आत येण्याची परवानगी नसलेला ..आपापल्या मनांचे ही भावनांचे ही दरवाजे मिटलेले..
आपापली बेटं निर्माण केलेली ही भावडं एकमेकांवर कुरघोडी करणं आणि वादा वादी यांतच मश्गुल .. आईच्या मायेचा परिसस्पर्श न झालेलं हे कुटूंब गावातलां उकीरडा बरा ईतक्या अस्वच्छ रहाणी मानांत आयुष्य कंठत असतात..
नंतरची प्रत्येकाच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी पहाण्याजोगी..आपापलं बेट सोडून एकमेकांसाठी काहीतरी करणं ही एक कर्तव्यभावना रहातच नाही..तो प्रवास ईतका हळवा आणि सहज सुंदर दाखवलाय.. की पुछो मत..
भावनांचे चढ उतार ,एकमेकांशिवाय जगायचं ठरवलेले ,एकमेकांना कंटाळलेले हे चौघे नंतरच्या घटनांनी जगणं स्विकारतात हा पैलु लखलखित करणारा.. मी पणा सोडून एकमेकांच्या आयुष्याशी जोडून घेणं.. त्या साठी समोरच्या पेक्षा स्वतःला बदलणं.. नियती आणि समाजानं अव्हेरलेल्या या शुष्क ,कोरड्या ठक्क बेटांना प्रवाहीत करणारे ओहोळ आणि स्तब्धपणा ला चैतन्य आणणारे ही..हे पहाणं निव्वळ सुंदर..
केरळचा निसर्गरम्य परिसर ,तिथलं जगणं.. आपण कधी या चौघांच्या घरातले होतो समजतही नाही..
शेन निगम, सोबिन साहीर,फहाद फासिल आणि
श्रीनाथ भासी.. यांचे अभिनय तिथल्या लोकांना परिचित आहेतच नावाजलेल्या या प्रथितयश अभिनेत्यांनी बाजी मारलीय.. कुठेही कृत्रिमपणा नाही.. अभिनयाची खरी उंची फहाद फासिल नं शेवटच्या दहा मिनिटांत गाठली आहे.. नुसत्या नजरेवर अभिनयाचं सारं कौशल्य पणाला लावणारा हा अभिनेता विवक्षित मनोरुग्णाचा अभिनय करतो ..तोडतो अक्षरशः
नवोदित अभिनेत्री .. प्रेमातलं नवखेपण आणि त्यातल्या प्रियकराच्या लहरीपणाला तीचं सांभाळून घेणं ..वाह.. ताजेपणा आणि रसरशितपणा अभिनयांतला या नवोदितेनं साकारणं फक्त चेहेरा हेच सौंदर्य नाही हे पटवून देतं..
पैसा ,प्रतिष्ठा आणि सुखलोलुपते साठी कोणताही मार्ग अवलंबायची तयारी गुंडागर्दी ,हिंसकपणा दाखवणं आणि चमकोगिरी करणं हे हिंदी अभिनेत्यांनी सोडावं आता.. विवाहबाह्य संबंध आणि त्याचं उदात्तीकरण दाखवून नीती मत्ता वळचणीला बांधणाऱ्या OTT वरच्या वेब सिरीज .. समाजाचं काहीतरी देणं लागतो, नवीन पीढीला आपण काय देतो आहोत याचं भान सुटलेली प्रसार माध्यमं दिसताहेत.. अशांतच हे असे वास्तववादी सिनेमें थंडगार वाऱ्याची झुळुक होतांत..
अमेझाँन प्राइमवर हा सिनेमा जरुर पहा..
©लीना राजीव.