Feb 28, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

कुलकर्णी मॅडम

Read Later
कुलकर्णी मॅडम
त्या दिवशी रविवार होता. स्मिताने आधीच सिनेमाची तिकीटे काढली होती. कितीतरी दिवसांनी राहुलसोबत वेळ घालवायला मिळेल म्हणून ती खूप आनंदी होती. दोघेही वेळेवर घरातून निघाले. सिग्नल लागल्यावर राहुलने कार थांबवली. तेवढ्यात एका भिकारी स्त्रीने काच आपटली. स्मिता थोडी घाबरलीच. अंगावर फाटके कपडे घातलेली ती म्हातारी भिकारी बघून कुणीही घाबरणारच. विचित्र केविलवाणे इशारे करत ती भीक मागत होती. राहुलची नजर तिच्यावर पडली. क्षणार्धात त्याच्या नेत्रातून आसवे गळू लागली.

" काय झाले राहुल ?" स्मिताने विचारले.

राहुल काहीच बोलला नाही. सिग्नल सुटले. राहुल भानावर आला. त्याने आसवे पुसली. कार रस्त्याच्या कडेला नेऊन थांबवली. कारमधून उतरून तो त्या भिकारी स्त्रीजवळ गेला.

" कुलकर्णी मॅडम तुम्ही या अवस्थेत ?" राहुलने विचारले.

ती भिकारी स्त्री अचानक गंभीर झाली आणि पळू लागली. राहुलने हाक मारली , पाठलाग केला पण ती स्त्री अजून जोरात पळत होती. शेवटी एका दगडाला लागून ती रक्तबंबाळ झाली. राहुलने तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. ती स्त्री म्हणजेच कुलकर्णी मॅडम जेव्हा भानावर आल्या तेव्हा त्यांच्या डोक्यावर पट्टी बांधलेली होती. अंगावर ते जुने फाटके , दुर्गंध येणारे कपडे नव्हते. तर नवीन कपडे होते. शरीरावरच्या असंख्य जखमांवर औषध लावलेले होते. कुलकर्णी मॅडमनी एका नर्सला हाक मारली.

" माझे कपडे कुणी बदलले ? कुणी केलं हे सर्व ?" कुलकर्णी मॅडमने विचारले.

" तुमचेच विद्यार्थी आहेत जुने. त्यांनी अगदी मुलासारख सर्व केलं. आजच्या काळात असे विद्यार्थी कुठे बघायला भेटतात. " नर्स कौतुकाच्या स्वरात म्हणाली.

" आजच्या काळात असे शिक्षकही बघायला भेटत नाहीत. " राहुल खोलीत प्रवेश करत म्हणाला.

" तू ?" कुलकर्णी मॅडमनी विचारले.

" मी राहुल देशमुख. मला विसरलात मॅडम ? असो. मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. मी दहावीला नापास झालो होतो. घरच्यांचे रागावणे , नातेवाईकांचे टोमणे या सर्वांना कंटाळून मी आत्महत्येचा निर्णय घेतला होता. मी बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या करणार होतो. पण त्याक्षणी तुम्ही मला वाचवले. मला धीर दिला. समजावले. पुढे वर्षभर तुम्ही मला मोफत शिकवणी दिली. मी दहावी चांगल्या मार्क्सने पास झालो. आज मी जिवंत आहे आणि एक स्थापत्य अभियंता आहे ते फक्त तुमच्यामुळे. " राहुल म्हणाला.

" तुझे खूप उपकार झाले. पण मला आता निघायला हवं. " कुलकर्णी मॅडम म्हणाल्या.

" पण तुमची ही अवस्था कुणी केली ? तुमच्या घरचे कुठे आहेत ? तुमचा हा विद्यार्थी जिवंत असेपर्यंत मी तुम्हाला भीक मागू देणार नाही. " राहुल म्हणाला.

कुलकर्णी मॅडमचे डोळे पाणावले.

" काय सांगू ? इतक्या विद्यार्थ्यांना घडवले पण पोटच्या मुलाला घडवू शकले नाही. पतीच्या मृत्यूनंतर माझ्या मुलाने आणि सुनेने माझ्यावर अत्याचार करून , मला धमकी देऊन सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करवून घेतली. मग मला घरातून हाकलले. रस्त्यावर भटकत असताना एका टोळीच्या जाळ्यात अडकले. कुठलाच पर्याय नव्हता म्हणून त्यांच्यासोबत नाईलाजाने भीक मागून जगू लागले. तू जेव्हा मला ओळखले तेव्हा तुझ्या मनातील माझी प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून धावत सुटले. " कुलकर्णी मॅडम रडू लागल्या.

" मॅडम , तुमची प्रतिमा अजूनही पूजनीयच आहे. तुम्ही माझ्या घरात चला. मी तुमचा सांभाळ करेल. " राहुल म्हणाला.

" नाही. मला असं कुणाच्याही घरी नाही जाता येणार. हवं तर वृद्धाश्रमात माझी सोय कर. " कुलकर्णी मॅडम म्हणाल्या.

तेवढ्यात तिथे स्मिता आली.

" मॅडम , तुम्ही आमच्या आईच्या वयाच्या आहात. आम्हा दोघांनाही आईचे प्रेम भेटले नाही. दोघांच्याही आई लहानपणीच वारल्या. तुम्ही आमच्यासोबत राहिल्या तर आम्हाला आईची सेवा केल्याचे पुण्य भेटेल. आईवडील मूल दत्तक घेऊ शकतात पण मुले आईवडिलांना का दत्तक घेऊ शकत नाहीत ?" स्मिता म्हणाली.

" मॅडम , ही माझी गुरुदक्षिणा समजा. प्लिज. " राहुल कळवळीने विनंती करू लागला.

" ठिके. त्या दिवशी मी तुला नवीन जीवन दिले आणि आज तू मला नवीन जीवन देतोय. देव करो असा शिष्य सर्वाना भेटो. " कुलकर्णी मॅडम आनंदाश्रू गाळत म्हणाल्या.

( ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे.
अश्या गुरूशिष्य जोडीला मानवंदना.? )

©® पार्थ धवन
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सुकृत

Engineer

जय श्री राम

//