कुली आबा आणि चाळीस चोर?

विज्ञान कथा
कुली आबा आणि चाळीस चोर?


फार नवी कथा आहे.अवंती नगराच्या घनदाट जंगलात कुलदीप नावाचा गरीब वैद्य लहानश्या झोपडीत राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव शांता त्यांना राधा व मीरा नावाच्या चुणचुणीत व हुशार जुळ्या मुली होत्या. त्या दोघी दिसायला सुंदर व हुबेहूब होत्या. त्यांच्यातली मीरा कोण?आणि राधा कोण?हे कधी कधी आई वडिलांना देखील ओळखणे कठीण जाई.

कुलदीप गरीब होता पण स्वाभिमानीं, इमानदार व मेहनती होता. तो रोज जंगलात जाई व वेगवेगळी औषधी वनस्पती आणून नगरातल्या लोकांचा इलाज करी. आपल्या वैद्यकीय व्यवसायावरच तो आपल्या कुटुंबाची गुजराण करत होता. त्याला मदत म्हणून पत्नीने शेळ्या, मेंढ्या व कोंबड्या पाळाल्या होत्या.शांता देखिल मेहनती होती.त्यामुळे कुलदीप कुटुंबाची गुजराण कशी बशी चालत होती.

कुलदीप जरी गरीब होता तरी देखील त्याच्या प्रेमळ आणि इमानदार स्वभावामुळे त्याला समाजात मान होता. सगळे त्याला कुलीआबा म्हणून मानाने हाक मारत.

कुलदीप एक दिवस जंगलात गेला असता. त्याला कसला तरी आवाज आला. त्याला वाटले एखादा हिंस्र पशु असेल. म्हणून तो आपली कुराड खांद्यावर घेऊन सावध झाला. त्याने हळुच त्या आवाजाच्या दिशेने पावले टाकली. झाडा-झुडपाच्या आड लपत छपत तो त्या आवाजाच्या दिशेने जात होता.जवळ गेल्यावर पाहतो तर काय? समोर एक गोलाकार असं घर होत.त्या घरातुन बरीचशी लोकं काहीतरी सामानाचे खोके उतरवत होती.

कुलदीपला प्रश्न पडला इतक्या घनदाट जंगलात ही कोण लोकं असतील? त्या खोक्यात कोणते सामान असेल? त्याचे कुतूहल जागृत झाले. तो आणखी तेथे काही वेळ लपून बसला. आणि पुढे काय घडते ते पाहु लागला.

सामानाचे खोके उतरवल्या नंतर काही वेळाने त्या गोलाकार घराचे दरवाजे आपोआप बंद झाले. त्यानंतर ते खोके घेऊन सगळे जण डोंगराच्या गुहेजवळ आले. त्यातल्या एकाने पुढे येऊन एक कळ दाबली व "रात्री झोपले घुबड दारा दारा लवकर उघड" असा मंत्र म्हंटला तसे गुहेचे दार उघडले. त्याच बरोबर त्या सगळ्यांनी आपपल्या हातातले खोके गुहेत नेले. सगळे आत गेल्यावर गुहेचे दार पुन्हा बंद झाले.

कुलदीप हे सगळ लक्ष देऊन पाहत होता. तो आजवर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी लाकडं तोडायला आला होता.पण हे गोलाकार घर त्याने आजच पाहिले. आणि ही गुहा उघडते हे देखिल त्याला आजच माहिती झाले.

अजुन काही माहिती मिळते का? म्हणून कुलदीप त्याच ठिकाणी लपून राहिला. बराच वेळ झाला तरी गुफा उघडली नाही. कुलदीप तेथेच लपून राहिला. संध्याकाळ झाली तरी गूफेचे दार उघडले नाही. तरी त्याने हार मानली मानली नाही. रात्र झाली तेंव्हा कुठे गुहेचा दरवाजा उघडला. त्याच बरोबर सगळी लोकं बाहेर आली. त्यातल्या एकाने कळ दाबली व "घुबडाने धरला नाग दारा दारा लवकर लाग" असा मंत्र म्हंटला तसा गुहेचा दरवाजा बंद झाला. सगळे लोकं त्या गोलाकार घरात शिरले. हे सगळ कुलदीप पाहत होता…

कोण असतील ती लोक? चोर असतील? नक्कीच चोर असतील कारण इतक्या घनदाट जंगलात दुसरे कोण येणार? त्या गुहेत त्यांनी चोरून आणलेली धन दौलत तर नसेल?..असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात आले. काय असेल ते उद्या पाहु कारण आता खुपच वेळ झाला आहे. घरी बायको व पोरी काळजी करत असतील! असा विचार करून तो घरी जायला निघाला.


आबा, आबा! करत राधा आणि मीराने कुलदीपला मिठी मारली. "अहो! किती उशीर? आम्ही सगळे किती काळजी करत होतो, तुम्ही हातपाय धुवुन घ्या मी जेवण वाढते. आम्ही सगळे जण तुमच्यासाठी थांबलो आहोत!"

" आबा, इतका उशीर का झाला तुम्हांला?"... जेवणाचा पहिला घास घेत मीराने विचारले. खरतर राधा आणि आई शांताला देखिल उत्सुकता होती..

"मी जे काही सांगतो त्या विषयी बाहेर कुणालाच समजता कामा नये!" असं सांगुन कुलदीपने आज जंगलात घडलेली सारी हकीकत तिघींना सांगीतली.कुलदीपने सांगितलेली गोष्ट ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.पण कुलदीपने सांगितलेल्या हकीगतीवर विश्वास ठेवणे भाग होते कारण कुलदीप कधीही खोट सांगणार नाही यांवर त्यांचा विश्वास होता.

"आबा ते चोर असतील?" -राधा

"काही माहिती नाही पोरी! पण जंगलात चोरांशिवाय दुसरे कोण येईल?"

"आबा गुहेत धन असेल?"- मीरा

"काही माहिती नाही पोरी! पण त्या खोक्यात नक्कीच काहीतरी मौल्यवान वस्तु असतील असा माझा अंदाज आहे. कारण ती लोकं फार जपुन ते खोके नेत होते!"


"अहो! मी काय म्हणते..आता तर आपले कस बस चाललंय पण पोरी मोठ्या झाल्यावर त्यांची लग्न वैगरे या साठी तर आपल्याला धनाची गरज लागेलच ना?"


"शांता, तूझ अगदी बरोबर आहे. पण त्या गुहेत आत शिरून बाहेर पडणे इतके सोपे नाही. आणि आत मध्ये धनच असेल कश्या वरुन?"

"आबा, उद्या आम्ही पण दोघी येतो तुमच्या बरोबर चालेल ना?"- राधा

"अहो, घेऊन जा उद्या दोघींना. मदत होईल तुम्हांला!"

"चालेल ठीक आहे. मात्र या विषयी गावात शेजारी पाजारी कोणाला काही सांगायचे नाही समजले?" कुलदीपने पुन्हा एकदा सगळ्याना बजावले.


दुसऱ्या दिवशी सकाळीच शोदोरी घेऊन तिघं जंगलात गेली. "पोरींनो, हिच ती गुफा जी काल उघडली होती. आणि या बाजुलाच ते गोलाकार घर होते. पण आज नाही. कुठे गेले असेल ऐका रात्रीत?"

"आबा, नक्की येथे घर होते?" -राधा

"हो ग पोरी येथेच होते!"

"मग ते आता कुठे गेले?"- मीरा

"अग पोरी मला काय माहिती?"

"आबा, पण येथे तर साध्या खाणाखुणाही नाही!"-राधा

"आबा, त्या माणसांचे पावलांचे ठसे देखिल नाही!"-मीरा

"आबा, तुम्हांला नक्की काहीतरी भ्रम झाला असेल!"-राधा

"हो आबा, मलाही असच वाटतंय!" -मीरा

"अग पोरींनो, इथे काहीच खाणाखुणा नाही हे खरं आहे पण मी तुमची शप्पथ घेऊन सांगतो मी खरंच येथे काल माणस पाहीली होती!"

तिथे कोणत्याच खाणाखुणा नाही तसेच ते गोलाकार घरही नाही. त्यामुळे आपल्या वडिलांना भास झाला असेल. असे त्या दोघींना वाटले…म्हणून त्यांनी वडिलांना समजावले व तोडलेली लाकडं घेऊन जायला निघाले. इतक्यात कालच्या सारखाच आवाज कुलदीपला आला. त्याने कालच्या जागीच पोरींना नेल तिथुन सर्व काही स्पष्ट दिसत होते.

कालच्या जागेवर पुन्हा एकदा अचानक प्रकट झालेले गोलाकार घर पाहुन तिघांनाही आश्चर्य वाटले. आज देखिल त्या घरातुन माणस खोके घेऊन गुहे जवळ गेली. त्यांतील ऐकाने गुहेची कळ दाबून "रात्री झोपले घुबड दारा दारा लवकर उघड" अस म्हंटल्यावर गुहेचे दार उघडले. सगळे आत गेल्यावर दार पुन्हा बंद झाले.

"आबा ,आम्हांला माफ करा आम्हांला वाटलं तुम्हांला भास झाला असेल पण तुम्ही सांगत होते ते खरं आहे!"दोघीही माफीच्या स्वरूपात म्हणाल्या

काल सारखी बराच वेळ वाट पहिल्यावर रात्री सगळे बाहेर आल्या नंतर एकाने कळ दाबून "घुबडाने धरला नाग दारा दारा लवकर लाग " हा मंत्र म्हंटल्यावर दरवाजा आपोआप बंद झाला. ती सगळी लोकं परत त्या गोलाकार घरात शिरली. काही वेळाने अंधारात ते घर कुठे दिसेनासे झाले.हे तिघांनाही समजले नाही.

"आबा,आपण गुहेत जायचे का?"- राधा

"पोरी! आणि ते परत आले तर?"

"नाही येणार आबा! ते आज आले त्याच वेळेला रोज येत असतील!" - मीरा

"ठीक आहे पोरी, चला तर मग!"

तिघंही हळू हळू गुहेच्या दरवाज्या जवळ पोहचली मीराने कळ दाबून "दिवसा झोपले घुबड दारा दारा लवकर उघड " असे म्हंटले त्याच बरोबर दरवाजा उघडला. तिघंही आत मध्ये गेल्यावर मीराने पुन्हा "घुबडाने धरला नाग दारा दारा लवकर लाग " म्हंटल्यावर दरवाजा बंद झाला.

गुहेच्या आत गेल्यानंतर तिघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ती गुहा त्यांच्या कल्पनेपेक्षा फार फार मोठी आणि लांबलचक होती. गुहेत सगळीकडे लख्ख प्रकाश होता. अगदी दिवसा असतो तसा. गुहेच्या भिंतीवर सगळीकडे रांगेत दिवे होते. ते आगीवर किंव्हा तेलावर चालत नव्हते तर आपोआप पेटले होते. वरती डोक्यात ठीक ठिकाणी तीन पात्या लावलेले यंत्र होती. भिंतींच्या बाजुला वेगवेगळी यंत्रे, माणसा प्रमाणे दिसणाऱ्या मुर्ती, गुहेतील सजावट अश्या प्रकारे होती की, ही एखादी गुहा आहे हे आतुन पाहणाऱ्याला समजणार सुद्दा नाही.

"आबा, ही वेगवेगळी यंत्रे काय कामाची असतील?"- राधा

"पोरी, मी देखिल अशी सजावट असे दिवे आणि यंत्रे पहिल्यांदाच पाहिले आहे. त्यामुळे मला माहिती नाही. मी अनेकदा कामानिमित्त आपल्या राजाच्या दरबारात गेलो आहे. पण तेथेही अशी सजावट अशी यंत्रे नाही!"

"आबा, ही इतकी यंत्र आहेत म्हणजे याचा नक्कीच काहीतरी उपयोग असेल"- मीरा

"हो पोरी, उपयोग तर असेल पण आपल्याला ते समजणार कस?"

इतक्यात मीरा ऐका यंत्राजवळ गेली तिथे एक शिरस्त्राण ठेवले होते ते तिने डोक्यावर ठेवले व त्यावर असलेली कळ दाबली..

"मीरा,मीरा! पोरी कुठे आहेस तु?"

"मीरा! तु कुठे आहेस?"- राधा

"अरे! ही काय तुमच्या समोरच तर उभी आहे!" मीरा म्हणाली

"अग कुठे समोर? तु आम्हांला दिसत नाहीस!"- राधा

मीराने शिरस्त्राणाची कळ पुन्हा दाबली तशी मीरा प्रकट झाली.

"पोरी, आता तु आम्हांला दिसतेस!"

मीराने गंमत म्हणून पुन्हा कळ दाबली तशी ती परत अद्रुष्य झाली.

"आबा, याचा अर्थ मिराच्या डोक्यावरचे शिरस्त्राण हे अद्रुष्य होण्याचे यंत्र आहे तर!"- राधा

मीराने ते यंत्र धनासाठी आणलेल्या पिशवीत भरले. गुफा फार मोठी होती तेथे अनेक मोठमोठी यंत्र होती ती घेऊन जाणे शक्य नव्हते.म्हणून ते फक्त गायब होण्याचे यंत्र घेऊन गुहे बाहेर पडले. बाहेर आल्यावर मीराने मंत्र म्हंटल्यावर गुहा बंद झाली.


"अहो! किती उशीर? मला तर फार काळजी वाटत होती कारण तुमच्या बरोबर पोरीही होत्या ना!" शांता काळजीत म्हणाली.

"हो, ग पण आपल्या पोरी चांगल्या हुशार आणि धीट आहेत!"

"काय हो मिळाल का धन?" शांताने आशेने विचारले.

"नाही ग, त्या गुहेत धन वैगरे काही मिळाल नाही. पण पोरी एक यंत्र घेऊन आल्यात!"

"पोरींनो! आता मात्र त्या गुहेत परत जायचे नाही कारण हे यंत्र सापडले नाही तर त्यांना संशय येईल. आणि तसही त्या गुहेततुन आणण्या सारखे काही नाही!"

"आबा! तिथे बरंच काही आहे. पण त्याविषयी आपल्याला माहिती नाही!"- राधा

"हो ग पोरी, म्हणूनच म्हणतोय मी!"

" गुहेतील ती माणस त्यांचे यंत्र शोधण्याचा नक्की प्रयत्न करतील. त्यामुळे आपण सावध राहिले पाहीजे!"-मीरा

"आबा! ही गोष्ट आपण महाराजांच्या कानावर घातली पाहीजे कारण त्या लोकांमुळे आपल्या अवंती राज्यावर संकट आले तर?"-राधा

"अगदी बरोबर बोललीस पोरी! आपण उद्याच जाऊन महाराजांना या बद्दल माहिती देऊ!"

दुसऱ्या दिवशी सकाळीच कुलदीप राधा- मीरासह राजवाड्याकडे निघाले. पुरावा म्हणून त्यांनी ते शिरस्त्राण यंत्र महाराजांना दाखवायला घेतले.

कुलदीपच्या वैद्यकीय व्यवसायामुळे त्याची दरबारातील काही अधिकाऱ्याशी ओळखी होत्या. त्यांना सांगुन त्याने महाराजांची खाजगीत भेट मागितली.

"नमस्कार महाराज, मी कुलदीपवैद्य मला कुलीआबा म्हणुन ओळखतात.आणि हया माझ्या दोन जुळ्या मुली राधा व मीरा!"

"कुलीआबा, हो तुमच नाव ऐकलय मी, माझी खाजगी भेट घेण्याचे कारण?"

"माफ करा महाराज पण कारणच तस आहे. महाराज,कदाचित आपल्या राज्यावर मोठ संकट येऊ शकते. म्हणून आपली खाजगी भेट मागितली!"

"संकट कसल संकट? कुलीआबा काय ते विस्ताराने सांगा!"

त्याच बरोबर कुलदीपने सुरवातीपासुन सगळ महाराजांना व्यवस्थित संगितले.

कुलदीपच्या कथनानंतर महाराज फार चिंताग्रस्त झाले.

त्यांनी लगेचच सल्लागाराला बोलावल. व सदर घटनेविषयी संगितले.

"महाराज, सध्या या विषयी बाहेर चर्चा नको नाहीतर उगाचच लोकांमध्ये भीती पसरेल.सुरवातीला ती लोक चोर आहेत की, आणखी कोणी आहेत. याची शहानिशा करून मग काय तो निर्णय घेऊ!"सल्लागार म्हणाले

"हो अगदी बरोबर पण ती लोकं कोण आहेत याचा तपास कसा करायचा?" महाराजांनी प्रश्न उपस्थित केला.

"महाराज, मी हे यंत्र घालुन त्यांच्या सोबत गुहेत गेले तर ते लोकं कोण आहेत याचा तपास करता येईल!" मीरा आत्मविश्वासाने म्हणाली.


"हो महाराज, मी देखील या कामी मीराला मदत करेन राधानेही आत्मविश्वास दाखवला.


"पोरींनो, तुम्ही लहान असुन तुम्हांला आपल्या राज्याची इतकी चिंता पाहुन फार बरे वाटले!" महाराजांनी दोघींचे कौतुक केले.

" पोरींनो,काम जोखमीचे आहे. तुम्हांला काय लागेल ती मदत सांगा केली जाईल!" महाराजांनी वचन दिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी कुलदीप राधा- मीराला घेऊन गुहे जवळ पोहचला.

"आबा, तुम्ही इथेच लपून बसा मी गुहेत आत जाते. मी आत अदृश्य असेन त्यामुळे ते मला पाहु शकणार नाही. ते काय बोलतात काय करतात ते समजेल. तो पर्यंत तुम्ही बाहेर लक्ष ठेवा!" मीरा समजवत म्हणाली.

मीरा गुहेजवळ पोहचली कळ दाबून मंत्र म्हणून आत शिरली.

काल प्रमाणे ते गोलाकार घर गुहेबाहेर अचानक प्रकट झाले.त्यातून सामानाची खोके घेऊन लोकं उतरली. राधाने ती मोजली बरोबर चाळीस लोकं होती.



"आबा! तुम्ही लक्ष ठेवा मी त्या गोलाकार घरात जाऊन काही माहिती मिळते का पाहते!"

राधा त्या गोलाकार घरा जवळ पोहचली.त्या घराचा दरवाजा उघडाच होता. राधा आत शिरली घरात अनेक यंत्र होती. एक पडदा होता त्यांवर अनेक चित्र दिसत होती. ती सारखी बदलत होती. ती सगळे निरिक्षण करत असताना अचानक सगळी लोकं घरात परत आली. इतक्या लवकर ही लोकं परत घरात कशी आली याचे राधाला आश्चर्य वाटले. ती तशीच ऐका मोठ्या यंत्रांच्या मागे लपून राहीली. दरवाजा बंद झाला. तसा राधाला ते घर अचानक हवेत उडाल्याचा भास झाला.


काही वेळाने मीरा गुहे बाहेर आली..

"आबा! राधा कुठे आहे?"

"अग पोरी! ती त्या घरात माहिती काढायला गेली होती. पण अचानक ती माणस लगेचच गुहेबाहेर आली.त्यामुळे राधा त्या घरातच राहीली.आणि आता ते घर तेथे नाही!"

"काय?"


"राधा त्या घरात गेली होती? अरे, बाप रे! आता ?"


*राधाच पुढे काय होईल? मीरा राधाला वाचवण्यासाठी काय करेल? वाचा पुढील भागात

क्रमशः