Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

कुछ तो लोग कहेंगे

Read Later
कुछ तो लोग कहेंगे


" कूछ तो लोग कहेंगे...लोगो का काम है केहेना..."
विराजच आवडतं गाणं गुणगुणत मीरा विचारांमध्ये हरवली होती...
किती सुंदर संसार चालला होता तिचा...विराज सारखा प्रेमळ आणि हौशी नवरा , करारी पण लाघवी सासूबाई वनिता आणि दोन गोड पर्या सुखदा आणि आनंदी ! कशाचीही ददात नव्हती.दोघांचा प्रेमविवाह म्हणून सुरुवातीला घरच्यांची नाराजी होती पण विराज आणि मीराने आपल्या लाघवी आणि गोड स्वभावाने सगळ्यांची मने जिंकली होती आणि सुखदाच्या आगमनाने तर घरचे सगळे पुन्हा खऱ्या अर्थाने एकत्र आले होते...काही वर्षांनी आनंदीचा जन्म झाला आणि घरचे गोकुळ झाले...
हसते खेळते घर आनंदाने भरून गेले .अगदी दृष्ट लागावा असा संसार होता दोघांचा.सगळं अगदी छान चालू असतानाच अचानक कोणाची तरी दृष्ट लागावी तसा विराज त्यांच्या आयुष्यातून अकस्मात निघून गेला आणि सगळं घर कधीही न सावरता येणाऱ्या अंध:कारात बुडून गेले.
वनिताबाई तर दुःखाने आजारीच पडल्या.मीरा तर अगदी धक्क्यातच होती .विराज निघून गेलाय हे तिच्या मनाने कधी मानलेच नाही.
चौदा वर्षांची सुखदा पार कोलमडून गेली , आठ वर्षांची आनंदी तर तिचा आनंद असणारा बाबा कुठे आणि का निघून गेला म्हणून रोज मीराला विचारत होती.तिच्या प्रश्नांना उत्तरे देताना मीराचा जीव कासावीस होत होता .
मनाने पूर्ण खचलेली मीरा मुलींसाठी आणि सासुबाईंसाठी पुन्हा एकदा जिद्दीने उभी राहू पाहत होती.भावाच्या मदतीने तिला नोकरी मिळाली.तिचं आयुष्य पुन्हा एकदा उभारी देत होतं.नोकरीच्या आदल्या दिवशी ती विराजच्या फोटोपुढे अश्रू ढाळत होती.हल्ली रडणही दुरापास्त होतं तिला .मुलींना आणि आईना त्रास होऊ नये म्हणून ती अगदी मुश्किलीने मनाला बांध घालत होती.
रात्री विराज तिच्या स्वप्नात आला.म्हणाला , " मीरा अगं अशी का राहतेस ? मला माझी राणी पहिल्यासारखी छान हसतमुख दिसायला हवी आहे.पुन्हा पहिल्यासारखे कपडे घाल आणि मला आवडतेस तशीच छान राहत जा.तू प्रसन्न राहिलीस तरच घर प्रसन्न राहील.वचन दे मला." मीराने विरजला वचन दिलं.
सकाळी मीरा सगळं आवरत होती.तितक्यात वनिताबाई आल्या.त्यांच्या हातात नवीन ड्रेस होता." मीरा बेटा , आज नोकरीचा पहिला दिवस तुझा.छान तयार हो बरं . हा ड्रेस घाल छान टिकली , बांगड्या घालून तयार हो.आणि घराची काहीच काळजी करू नकोस मी आहे ना.अग आपणच आपलं सावरायचं आता.तू अशी छान राहिलीस ना की लोकांच्या नजरा सुद्धा बदलतील बघ.एकटी निराश बाई म्हणजे आयते कोलीत सापडते लोकांना.तुला असं पाहिलं की कोणाची हिम्मत होणार नाही तुझ्याकडे वाईट नजरेने बघायची. इतके दिवस आपण विरजच्या मायेच्या आणि विश्वासाच्या चौकटीत सुरक्षित होतो पण आता मात्र आपणच हा संघर्ष करायचा आहे . लोक काय अनेक तोंडाने बोलतील पण तू हिम्मत ठेवायला हवी . आपल्या घरासाठी आपल्या पिल्लांसाठी आणि माझ्यासाठीही. तुला खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा ..! "
मीराने आईंच्या कुशीत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.आणि मग आनंदाने तयार होऊन एका वेगळ्याच आत्मविश्वासाने ऑफिसला गेली.
काही दिवसातच घर सावरलं. मीराला बघून मुलीही सावरल्या .
मीराला असं छान जगताना बघून अनेक लोक अनेक तोंडाने बोलायचे पण तिच्या सासूबाई आणि मुलींना आनंदात बघणं हेच तिच्यासाठी महत्त्वाचं होतं...शेवटी लोक तर काय काहीही केलं तरी बोलायचे थोडीच थांबतात...?शेवटी आपली चौकट आपणच तयार करायची आणि तिला सुरक्षित सुद्धा आपणच ठेवायचं . खरं ना ?


कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका.

तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing

//