Jan 27, 2022
प्रेम

क्षणिक सुखापायी

Read Later
क्षणिक सुखापायी

©®शितल ठोंबरे (हळवा कोपरा )

 क्षणिक सुखापायी 

'काय गं रिया अशी का उदास दिसते आहे '.... रियाची ऑफिसमधली खास मैत्रीण सीमाने रिया चा उतरलेला चेहरा पाहून विचारले….

आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हसतंच रिया म्हणाली…' कुठे काय गं काहीच नाही…'

'काहीच नाही मग असा का चेहरा पडला आहॆस… काही टेन्शन आहे का??'... सीमा ने काळजीपोटी विचारले.

'तू पण ना काहीतरीच विचार करत बसते… काही असतं तर तुझ्या पासून असं लपवलं असतं का मी… आणि गप्पा काय मारत बसली आहेस बॉस ने पाहिलं तर उगाच नको ते ऐकवेल… चल लाग कामाला '... असं म्हणून रियाने  तो विषय तिथेच थांबवला आणि आपल्या कामाला लागली..

सीमा ही तिच्या डेस्क वर गेली पण आज तीच कामात लक्षच नव्हतं… रियाचाच विचार करत होती…

रिया आणि सीमा दोघीही गेली सहा वर्ष या ऑफिसमध्ये काम करत आहेत… आधी कलीग आणि नंतर अगदी जिवलग मैत्रीनी झाल्या… इतक्या की सुखाचे दुःखाचे सगळे क्षण त्या एकमेकींबरोबर शेअर करत होत्या… कधीच एकमेकींपासून काही लपवत नसतं…

गेली कित्येक दिवस रिया उदास होती….सतत कसल्या तरी विचारात असायची… आणि हे सगळं सीमाच्या नजरेतून सुटलं नव्हतं… आज लंच टाइम मध्ये काही करून रिया शी बोलायलाच हवं असा विचार करून सीमा आपल्या कामाला लागली…

लंच ब्रेक झाला… तसे सगळे कँटीन मध्ये गेले… सीमा ने मात्र रियाला मुद्दामच ऑफिसमधेच थांबवलं… हाचं वेळ होता जेव्हा त्या एकमेकींशी मोकळेपणाने बोलू शकल्या असत्या…

सगळे गेल्याची खात्री होताच सीमा रिया जवळ गेली… रियाचा हात आपल्या हातातं घेऊन म्हणाली….'रिया गेली सहा वर्ष आपण एकमेकींना ओळखत आहोत… अशी एकही गोष्ट नाही जी आपण एकमेकींपासून लपवली आहे…मग आज असं काय आहे जे तुला त्रास देतय आणि तुला मला सांगावसं ही वाटत नाही…हे बघ तू बोललीस तर मला समजेल… मी तुला काही मदत करून शकेन '

सीमाच्या त्या शब्दांनी रिया ला रडूच कोसळले… सीमाने रिया ला आधी पाणी प्यायला दिले… तिला शांत केले आणि म्हणाली… रिया एकदा सांगून तर बघ मला जमेल तशी मदत करेन मी तुला…'

सीमा कसं बोलावं… मला खरंच नाही समजत गं… या विषयावर कोणाशी बोलावं की नाही हेच कळत नाही आहे मला… तू काय विचार करशील माझ्या बाबत…… रिया रडत रडतच म्हणाली…

मी काही विचार करत नाही तू आधी सांग बरं काय झालंय??....सीमाला आता अधिकच काळजी वाटू लागली…

रिया म्हणाली…..'तुला तर माहीतच आहे… निकांश आता सात महिन्यांचा झाला आहे….त्याच्या प्रेग्नेंसी मध्ये कॉम्पलीकेशन आले आणि डॉक्टरांनी मला बेडरेस्ट सांगितली… त्यामुळे चौथ्या महिन्यातच मला आईकडे जावे लागले…राजेश च्या आणि माझ्या लग्नाला जेमतेम सहाचं महिने पूर्ण झाले होते तेव्हा...नुकतेच कुठे एकमेकांना ओळखायला लागलो होतो तोच आम्हांला एकमेकांपासून दूर जावे लागले…

निकांश पाच महिन्यांचा झाला आणि मी सासरी आले… घरच्यांची त्याला सवय व्हावी म्हणून कारण महिन्याभरातच मला ऑफिस जॉईन करायचे होते….

घरची कामे,ऑफिस, निकांश या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना मला राजेशला वेळ देता येतंच नाही… सकाळी कामाची घाई… संध्याकाळी निकांश मला जरा ही सोडत नाही… कारण त्याची मम्मी दिवसाभरातून त्याला भेटलेली असते… अगदी राजेश ला जवळ ही येऊ देत नाही…

रात्री जरा कुठे राजेश जवळ आला की… त्याला जाग आलीच समज… दोघांनाही आपलं मन मारावं लागतं… सुरुवातीला राजेश ने समजून घेतलं पण आता हे नेहमीचंच झालंय… कधी मी खूप थकलेली असते तर कधी निकांशनेमका त्याचं वेळी  जागा होतो… त्यामुळे मला राजेशला  हवं ते देताचं येतं नाही… आहे…

आधी थोडी चीड चीड करायचा तो…..पण….काल रात्री त्याने माझ्याशी वादचं घातला की मला त्याच्यात इंटरेस्ट नाही म्हणून मी त्याला जवळ येऊ देत नाही….मी त्याला खूप समजावलं पण तो काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतचं नाही…

काय करावं मला काही सुचत नाही आहे… निकांश ला वेळ देऊ की राजेशला…'आणि रिया पुन्हा रडू लागली…

अगं इतकंच ना वेडाबाई… रियाला जवळ घेत सीमा म्हणाली…प्रत्येक स्त्रीला या परिस्थितीतून जावंच लागतं… अश्यावेळी आपणच आपला मार्ग काढायचा… आता मी काय सांगते ते ऐक….. रियाला शांत करत सीमा म्हणाली…

उद्या ऑफिसमधून सुट्टी घे… राजेशला ही सांग… घरून ऑफिसला निघता त्यावेळीच निघा… माझ्या एका मित्राचा लॉज आहे पनवेल ला त्याला सांगून तुमच्या साठी रूम बुक करते… हवा तितका वेळ द्या एकमेकांना… सीमा आपला एक डोळा मिचकावत हसत म्हणाली…

रिया सीमा कडे पाहत लाजली…

'हे लाजणं उद्या साठी जपून ठेव… आधी राजेश ला कॉल कर… उद्याच प्लॅनिंग सांग त्याला….खुश होईल तो… 'सीमा रियाला छेडत म्हणाली

थँक्स सीमा मला समजून घेतलंस… मला सुचतच नव्हते काय करावे?? कोणाशी बोलावे??... रिया म्हणाली

'अगं थँक्स काय म्हणतेस….मैत्रीण न मी तुझी आणि खरं सांगू या सगळ्यातून मी गेली आहे...त्यामुळे तुझा प्रॉब्लेम आला माझ्या लक्षात काही काळजी करून नकोसं….एकमेकांना वेळ द्या सर्व ठीक होईल….. 'सीमा म्हणाली 

रियाने राजेशला कॉल केला….त्याला ही कल्पना आवडली… दोघांनीही आपापल्या ऑफिसमधून आजारी आहोत असं सांगून दांडी मारली…

 रात्री दोघांनाही झोप लागेना… उद्या मिळणाऱ्या एकांताच्या विचारानेच गुदगुदल्या होऊ लागल्या… ऑफिसला निघायच्या वेळेत दोघे घराबाहेर पडले…

राजेशने आधीच कॅब बुक केली होती… दोघे गाडीत बसले… खूप दिवसांनी ते फक्त दोघेचं होते… राजेश ने रियाचा हात आपल्या हातात घेतला… रिया ने ही अलगद राजेशच्या खांद्यावर आपले डोके टेकले…

सीमाने बुक केलेल्या लॉजच्या दारात गाडी थांबली… रिया आणि राजेश गाडीतून उतरले… काउंटर वरून आपल्या रूमच्या किल्ल्या घेतल्या… आणि दोघे रूमकडे रवाना झाले…

असा एकांत… निवांत पणा… गेली कित्येक महिने… कित्येक दिवसं दोघांनाही मिळाला नव्हता… रूम मध्ये जाताच दोघांनीही आपले कपडे चेंज केले…

रियाने मुद्दामून काल ऑफिस मधून घरी जाताना फिकट गुलाबी रंगाचा नाईट गाऊन घेतला होता… ज्यात ती अधिकच खुलून दिसतं होती….तिने मारलेल्या पर्फ्यूम चा मंद सुगंध सगळ्या रूम मध्ये दरवळलेला…

राजेश ला रिया चं ते रूप पाहून आता जराही धीर धरवत नव्हता… रियाला हलकेच ओढत आपल्या जवळ घेत तो तिच्यावर चुंबनाचा वर्षावं करू लागला…

रियाही राजेशच्या स्पर्शासाठी आसूसलेली होती…त्याच्या त्या प्रेमाला ती ही प्रतिसाद देऊ लागली… सारं काही विसरून दोघेही एकमेकांच्या मिठीत अगदी बेभान होऊन गेले होते….

हा क्षण फक्त दोघांचा होता...जो दोघेही भरभरून जगत होते… एकमेकांपासून वेगळं व्हायची दोघांची मुळीच इच्छा नव्हती… पण घरी तर जाणं भाग होतं…

आता रियाला निकांशची आठवण येतं होती… फ्रेश होऊन...कपडे बदलून दोघेही… बाहेर पडले… रियाने आपल्या तोंडाला स्कार्फ  बांधले होते….राजेश ने कॅब बुक केलेली पण  अजून आली नव्हती… म्हणून दोघेही वाट पाहत उभे होते…

तोच मागून कोणीतरी राजेशच्या खांद्यावर हात ठेवतं म्हणाले….क्या भिडू तू और यहा???….

राजेश ने चपापून मागे पाहिले… तो त्याच्या कॉलेजचा मित्र सुजय उभा होता…

राजेश ला काय बोलावे सुचेना… राजेश आणि रियाच्या लग्नातं सुजय आला होता त्यामुळे तो रियाला चांगलंच ओळखत होता… पण रिया ने स्कार्फ बांधल्याने सुजय तिला ओळखू शकला नाही…

राजेश च्या कानाजवळ जात … भाभी को खबर कर दू क्या???... इतनी प्यारी बीवी छोडकर तू ये किसके पीछे लगा हैं??... रिया कडे एक कटाक्ष टाकत सुजय  म्हणाला

रिया ला तर पळता भुई थोडी झाली होती… तोंड लपवले तरी अडचण आणि दाखवले तरी अडचण…

राजेश सुजय ला म्हणाला… अरे यार तू जो सोच रहा हैं ऐसा कुछ नही हैं…

मैं सब समझता हूँ….लोग ईस तरह से छिपकर ऐसे जगह क्यूँ आतें हैं… देख तू मेरा दोस्त हैं इसलिये समझा रहा हूँ… ये सब छोड दे.. अगली बार अगर तू मुझे ईस तरह दिखाई दिया तो मैं खुद जाके भाभी को सब बता दूंगा….एवढं बोलून सुजय तिथून सटकला…

पण रिया आणि राजेशला मेल्याहून ही मेल्यासारखे झाले… काही क्षणाच्या सुखासाठी आज नको ते बालंट त्यांच्या माथी लागले होते…

(कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पण लेखिकेच्या नावासहित )

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shital Prafful Thombare

Teacher

आयुष्य जगताना आलेल्या अनुभवांना शब्दांत मांडायला आवडते