क्षण अवचित येता...!! ( टीम - प्रेषित )

Love story

ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 

क्षण अवचित येता......

टीम - प्रेषित 

" तुला वेळच नसतो माझ्यासाठी... संपली नाहीत का काम तुझी अजुन... जा कर मग... " निखिल आज चांगलाच चिडला होता. 

" सॉरी ना रे. मी काही मुद्दाम नाही करत. आईंचे पाय दुखतात त्यांना नाही झेपत. अप्पांना पण वेळेत लागतं सगळं माहितेय ना तुला...?? " ती आपली बाजू मांडत होती.

" हो.. पण या सगळ्यात मी पण आहे गं. पिल्लू झाल्यापासून तर तुला अजिबातच वेळ नाही. जाऊदे. " दोघेही आवाज बाहेर जाऊ नये म्हणुन दबक्या आवाजात भांडत होते. 

पण रूममधून बाहेर आल्यानंतर त्याचा त्रासलेला चेहरा कोणापासूनही लपला नव्हता. तो नाश्ता न करताच निघुन गेला. ती मात्र मुसमुसत राहिली. खरंच आपलं दुर्लक्ष होतंय का निखिलकडे...?? एकीकडे आंतरजातीय विवाहामुळे माहेर दुरावलेलं. त्यात सासर देखील अगदी कडक शिस्तीचं मिळालं. नाही म्हणायला निखिलचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं आणि तो तिला तितकंच जपत ही होता. पण संसार म्हटला की वाद भांडणं व्हायचीच त्या शिवाय संसाराला गोडी नाही. निखिलला ऑफिसमध्ये खूप काम होतं. त्यामुळे घरी यायला देखील त्याला उशीर व्हायचा. या सगळ्या स्ट्रेसमध्ये आपल्या माणसासोबत दोन क्षण प्रेमाने घालवावे एवढीच त्याची माफक अपेक्षा होती. 

पण एकत्र कुटुंब असल्याने त्यांना दोघांना त्यांचा क्वालिटी टाईम मिळत नव्हता. तिला देखील ते कळत होतं पण करणार काय...?? विचारांच्या तंद्रीतच तिचा फोन वाजला.

" हॅलो , आज भेटूया का...?? " त्याने पलीकडून विचारलं. 

" आज....?? बघते जमलतर.. शक्यतो नाहीच... " आधीच निखिल सोबतच्या भांडणाने तिचा आवाज रडवेला झाला होता.

" काही झालंय का...?? " 

" नाही काही नाही. " तिने त्याला सांगणं टाळलं.

" हम्म... आज भेट मग दुपारी. मी वाट बघतोय. " तो म्हणाला.

" आज नाही रे शक्य. मी घरी काहीच बोलले नाहीये. लगेच कसे पाठवतील...?? " ती 

" का...?? तुला काय कोंडुन ठेवलंय का तिथे....?? " त्याचा स्वर जरा उंचावला होता.

" तसं नाही रे. मी बघते. येते... तू शांत राहा. " कोणाची तरी चाहुल लागली तसा तिने पटकन फोन बंद केला. कोणीतरी येऊन खांद्यावर थाप मारली तशी ती दचकली.

" काय गं सुनबाई का दचकलीस अशी....?? " सासूबाईंनी विचारलंच

" अम्म्म....... ते पटकन आलात ना तुम्ही म्हणून.... " तिने ठोकुन दिलं. पण तरीही त्यांना ते पटणारं नव्हतंच.

" सगळं ठीक आहे ना...?? कोणाचा फोन होता...? " पुन्हा प्रश्न..

" आई ते... पूर्वी आणि बाकीच्या आमच्या मैत्रिणी बाहेर जाणार आहेत तर मलाही बोलावलंय. जाऊ का...?? " तिने धीर करून विचारलं...पण ते ही खोटंच..!!! 

" ठीक आहे जा. पण वेळेत घरी ये म्हणजे झालं. नाहीतर हे ओरडतील मला. तुला ठाऊक आहे ना यांचा स्वभाव... " त्यावर तिने फक्त मान हलवली. खोलीबाहेर जाता जाता त्याला मेसेज केला ' मी येतेय '.

दुपारच्या जेवणाचं काम बऱ्यापैकी आटपल होतं. साडेअकरा वाजले होते.तिने सासूबाईंना सगळं सांगून ठेवलं. तिच्या पिल्लुला दूध पाजून तिला झोपवलं आणि ती आपलं आवरायला खोलीत पळाली. पाच वर्षात एक दोनदाच त्यांची भेट झाली होती. पण तीही लपत छपतच.  ' घरी कळलं तर काय....? ' एक भीतीची लकेर तिच्या चेहऱ्यावरून विरून गेली. तोच तिचा फोन वाजला.

" मी वाट बघतोय. आपल्या नेहमीच्या ठिकाणी. लवकर ये." असं बोलून त्याने फोन कट केला. 

तिने मग पटापट आवरलं. पिंक आणि यलो कलरचा ड्रेस पिंक कलरची चंदेरी किनारीची ओढणी.. केस क्लिप लावुन मोकळे सोडले. आवरून ती निघाली. बाहेर ती हॉल मध्ये आली तोच पेपर वाचणाऱ्या सासऱ्यांनी चष्म्याच्या वरून डोकावत तिला झापलच..

" काय सुनबाई...?? कुठे एवढं नटून निघालात...?? " आधीच त्यांच्या शिस्तीने आणि बोलण्याने ही बावरून जायची त्यात त्यांनी विचारल्यावर तिची तर दातखिळीच बसली. इतक्यात सासुबाई बाहेर आल्या. 

" अहो ... जाऊद्या तिला. पुर्वीचा फोन आला होता. तिने बोलावलंय... जा गं तू... " त्या म्हणल्यावर तिने मान डोलावली आणि जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली पळाली सुद्धा..

...............................

अंतरा आणि निखिल यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली होती. चार वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात ऋत्विची  नाजूक पावलं उमटली होती.  सासु ,सासरे ,दिर ,जाऊ अशी एकत्र मोठी फॅमिली. दिर आणि जाऊ दोघेही ऑफिसला जात त्यामुळे घरचं सगळं तिलाच बघावं लागे. त्यात सासरे देखील कडक शिस्तीचे आणि काहीसे रागीट स्वभावाचे. त्यांच्या समोर कोणाची बोलायची फारशी हिंमत व्हायची नाही. चार वर्षात तिचं फारसं बाहेर जाणं येणं झालंच नव्हतं. गेलीच तर कधी भाजी आणायला तर कधी मुलीला घेऊन डॉक्टर कडे. तेव्हा त्याची भेट व्हायची. पण आज खोटं बोलून ती  पहिल्यांदाच अशी बाहेर पडली होती.ती जरा उशिराच त्यांच्या ठरलेल्या जागेवर पोहचली. तो आधीपासूनच बाईक घेऊन तिथे उभा होता. 

" किती उशीर........?? " त्याने त्रासून विचारलं.

" बोल.. कशाला बोलवलं आहेस मला....?? मला जायचंय घरी लवकर. फार वेळ नाही थांबु शकत. " ती आजूबाजूला बघत म्हणाली.

" माहीत आहे मला. बस लवकर गाडीवर.. खूप बोलायचं आहे तुझ्याशी... " त्याने बाईक चालू केली तशी ती पटकन गाडीवर बसली. 

त्याने सिनेमाची तिकीट्स काढून आणली. दोघांचाही फेव्हरेट मुव्ही पाहायला ते गेले. पॉपकॉर्न , बर्गर , सँडविच खात ते सिनेमाचा आनंद लुटत होते. कोणीतरी बघेल ही भीती कायम मनात होती. पिक्चर संपला दोघेही बाहेर आले. तिने घड्याळात पाहिलं तर साडेतीन वाजले होते. त्याने मग पिझ्झा सेंटरकडे गाडी वळवली. खूप दिवसांनी त्यांनी पिझ्झा खाल्ला. कॉलेजला असताना तर कायम पार्टी व्हायची. पण सासरी गेल्यापासून बाहेरचं काही खायचं नाही त्यामुळे कधी पिझ्झाही खाता आला नाही. सगळं घरीच करावं लागे. 

................................

दोघेही मग शहरापासून लांब अशा एका रस्त्याला आले. समोरच फेसळता समुद्र त्यांची वाट बघत होता. त्याने गाडी पार्क केली आणि ते बीचवर आले. ती तिथेच मग वाळूत रेघोट्या ओढत बसली. उगीच काहीतरी लिहत बसायचं तिला आवडायचं. तो आपला उगीचच तिच्याकडे बघत हसत होता. तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं.

" का हसतोस.....?? " तिने विचारलं.

" अजुन काही वाळूत लिहायची सवय गेली नाही तुझी...लहान आहेस का...? " तो हसुन म्हणाला. 

" हो. तुला काय....? " तेवढ्यात तिला कणीसवाला दिसला. 

" राजस... जा ना कणीस घेऊन ये. मला हवंय.... " तिने बळेबळेच त्याला पाठवलं आणि आपण मात्र मावळत्या सूर्याच्या छटा बघत राहिली. 

" घ्या मॅडम. त्याच्याकडे एकच होतं. " तोही तिच्या बाजूला वाळूत बसला. 

" आणि तुला....?? " 

" तू मला न देता खाणार का...?? " 

" खा. बाबा खा. नाहीतर पोटात दुखेल माझ्या. घे." त्यावर दोघेही हसले. 

त्याने मग खिशातून एक बॉक्स काढून तिच्यासमोर ठेवला. 

" काय आहे यात....?? " तिने उत्सुकतेने विचारलं.

" तूच बघ." तो म्हणाला. त्यात बारीक नक्षीच्या बांगड्या होत्या.

" खूप मस्त आहेत...! " ती

" माझ्या पहिल्या पगारातून आणल्या आहेत. मला माहित होतं तुला आवडतील. " तो हसून म्हणाला

" खरंच...?? खूप सुंदर आहेत. मग कसं आहे नवीन ऑफिस ? " तिने विचारलं.

मग तोही त्याच्या जॉब बद्दल , नवीन कामाबद्दल भरभरून बोलत राहिला. त्याच्यासाठी ती त्याची सगळ्यात जवळची व्यक्ती होती. 

मग त्याच्या पहिल्या पगाराची  पार्टी म्हणुन मस्तपैकी पाणीपुरी हादडून झाली. बीचवरची बाकीची माणसं देखील आता हळूहळू पांगली.अचानक अंधारून यायला लागलं.वारा वाहू लागला. ढग देखील एकमेकांवर आपटु लागले. मग ते घाईने तिथून निघाले. तिला आता घरची आठवण येत होती. गडगडायला लागलं की ऋत्वि फार घाबरायची. तिचा जीव कासावीस झाला होता. त्यांच्या बिल्डिंगच्या थोडं अलीकडेच तिने त्याला गाडी थांबवायला सांगितली. तोच पलीकडच्या रोडवरती निखिल गाडी बाजूला घेऊन फोनवर कोणाशी तरी बोलत होता. फोन ठेऊन त्याने इकडे तिकडे नजर फिरवली आणि समोर पाहिलं. तर अंतरा एका मुलासोबत  बोलत असताना त्याला दिसली. ' मी कधी बाहेर जाऊ म्हटलं तर वेळ नसतो हिला आणि आता कोणासोबत फिरतेय.' त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू राग पसरू लागला. त्या मुलाची निखिल कडे पाठ होती. त्याने अंतराला कसली तरी पिशवी दिली आणि तो गाडी वळवुन निघाला. तोच त्याचा चेहरा निखिलला दिसला.

" हा......?? " त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते.

त्याला वाटत होतं जाऊन अंतराला हाक मारावी. पण त्याने ते टाळलं. पावसाचे टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली. त्याने मग आईस्क्रीम घेतलं आणि गाडी वळवून तो तसाच घरी आला. तो ही बऱ्यापैकी भिजला होता. त्याने जवळच्या किल्लीने दार उघडलं. तोपर्यंत अंतरा जिने चढून वरती आली. घरी यायला तिला उशीर झाला होता. त्यात ती भिजली होती. त्यामुळे गेल्या गेल्या आपल्यावर तोफ डागली जाणार हे तिला दिसत होतं. घरात येताच समोर तिला निखिल दिसला. त्याला समोर बघुन ती घाबरली आणि आत जाऊ लागली. भिजल्यामुळे ती आधीच कुडकुडत होती.

" अंतरा थांब... " ती जागीच थबकली.

" तू पूर्वीकडे गेली होतीस ना आई म्हणाली मला. पण मी पूर्वीकडे फोन केला होता तू नव्हतीस तिथे. " निखिल म्हणाला. आता त्याला काय उत्तर द्यावं ते तिला कळेना.

" मी....... ते..... ते....." तिच्या भाबवण्याने त्याला हसु यायला लागलं पण त्याने तसं दाखवलं नाही. 

" आणि काय आहे तुझ्या हातात....?? " तो तिच्याजवळ जात म्हणाला.

" नाही काही नाही... " तिने मागे पिशवी लपवली. एव्हाना त्याने तिच्या हातातली पिशवी घेऊन त्यातला डबा बाहेर काढला. त्यात लाडु होते. त्याने हळूच त्यातला एक लाडू तोंडात टाकला.

" वा... मस्त केलेत हा सासूबाईंनी लाडू... " तो हसला. अंतराला जरा हायस वाटलं. 

" म्हणजे तू बघितलस आम्हाला.. प्लिज आई अप्पांना यातलं काही सांगू नकोस...." तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. 

" अग वेडाबाई. मी का सांगेन कोणाला. राजस तुझा सक्खा भाऊ आहे. तू कधीही भेटू शकतेस त्याला. " निखिल

" मला वाटलं तू रागावलास की काय." ती त्याला बिलगली.  "बाबांनी अप्पांचा खूप अपमान केलाय. मलाही नाही आवडलेलं ते. राजसचा खूप जीव आहे माझ्यावर म्हणून येतो मला भेटायला. सगळं सांगतो. पण कोणी बघितलं तर म्हणून बाबांपासून लपून भेटतो.आईला माहीत आहे. तिनेच आज लाडू पाठवले. आणि हे बघ राजसने मला त्याच्या पहिल्या पगारातून काय आणलंय.." तिने उत्सुकतेने त्याने दिलेला बॉक्स निखिलला दाखवला. 

" हो का. मस्तच. " तेवढयात लाईट गेले. बाहेर पाऊस वाढायला लागला. ढग गडगडू लागले. तशी तिला ऋत्विची आठवण झाली.

" पिल्लू.....?? " तिने त्याच्यापासून बाजूला होत विचारलं.

" सगळे ताईकडे गेले आहेत. आईचा फोन आला होता मगाशी. बहुतेक आपलं सकाळी झालेलं भांडण तिने ऐकलं वाटतं. म्हणूनच काहीतरी युक्ती काढून सगळ्यांना तिकडे घेऊन गेलेय वाटत.. " तो तिला जवळ घेत म्हणाला. 

" म्हणजे... आपण दोघेच आहोत.... " ती शहारली.

" येस मॅडम... " त्याने तिला जवळ घेत हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले. इतक्यात वीज चमकली आणि ती घाबरून पुन्हा त्याच्या कुशीत शिरली. 

" अरे, भिजला आहेस तू.. कपडे बदल. सर्दी होईल नाहीतर.." ती बाजूला होत म्हणाली.

" तू काय उन्हातून आलेयस असं वाटतंय का तुला..?? " त्यावर दोघेही हसले.

आधी त्यांनी मेणबत्ती शोधून लावली.कपडे बदलून ती त्याचं डोकं पुसत होती तर निखिल तिला गुदगुल्या करून छळत होता. मधेच तीला जवळ ओढत होता.त्याच्या स्पर्शाने ती मोहरत होती.  तिने तोपर्यंत झकासपैकी पिठलं भाकरीचा बेत केला. बाहेर रिमझिम पडणारा वळीवाचा पाऊस आणि शहारा आणणारा गारवा अनुभवत ते दोघे जेवले. खूप दिवसांनी कँडल लाईट डिनर !!! त्यानेही मग तिला आवरायला मदत केली. तिला घेऊन तो रूममध्ये आला. काळोखामुळे तिला अजुनच भीती वाटत होती. ती त्याला अधिकच बिलगली. त्याने आपले हात तिच्याभोवती लपेटले आणि तिला जवळ घेतलं. खुप दिवसांनी त्यांना असा मोकळा वेळ मिळाला. मिठीची ती उबदार माया त्या दोघांनाही वेड लावत होती. अंतराला तर या अशा मिळालेल्या क्षणाचं किती अप्रूप वाटत होतं.

स्वप्नींही नव्हते दिसले

क्षण अवचित कोठुन आले..

हे सर्व खरे.....?? 

इतुकेच खरे......

तिचं मन गुणगुणत होतं. त्याच्या ऑफिसच्या कामाचा स्ट्रेस आणि घरातली कामं जबाबदारी सांभाळता सांभाळता थकलेली ती हळूहळू एकमेकांच्या मिठीत शांत होत गेले. चिडचिड करून , वाद घालून न मिळालेले असे क्षण आज अवचितच आले होते. दोघेही त्या प्रेमात आकंठ बुडाले होते. बाहेरचा पाऊस केव्हाच थांबला होता. पण जाण्यासाठी ओल्या मातीत प्रेमाचा सुगंध पसरवुन गेला होता..

समाप्त...

© ® सायली विवेक