कृत्रिम किंवा नैसर्गिक -कसे असावे नाते?

The beauty of relation lies in its flow of naturalization

कृत्रिम किंवा नैसर्गिक- कसे असावे नाते?

नाते हे भावनांनी बनलेले असते, त्यात मन गुंतलेलं असते. मग जिथे भावना आल्या, मन आले आणि त्यामुळे आलेली समर्पिकता  याला खरच आणि खरच कुठल्याही नावाची किंवा लेबल ची गरज  आहेच का?

आपल्या आजूबाजूला अशी कित्येक नाती आहेत की ज्याला नाव आहे पण त्यात ओलावा नाही ती फक्त नावालाच आहेत मग त्याला नाते तरी म्हणणे हे योग्य का अयोग्य?

नाते हे फुलत जाते, ते गुंतते आणि गुंतवत ही जाते, कधी कसे हे कळत सुद्धा नाही आणि जेव्हा ते लक्षात येते तेव्हा नकळत अपेक्षा निर्माण होतात पण बंधन नाही.
बंध जुळतात ते मनाचे! 
बंधन निर्माण झालेच तर ते आपण स्वतःला घातलेले असतात  कारण आपण समर्पित झाले असतो. 
 खऱ्या भावनांना नावाची गरजच पडत नाही. 

जीव गुंततो, वेड लागले म्हणजे तरी नक्की काय तर  त्या व्यक्तीचा कायम विचार मनात असतो, त्या व्यक्तीची कायम काळजी वाटते त्या व्यक्तीच्या सुखासाठी आनंदासाठी आपण प्रयत्न करतो मग त्यात वाईट ते काय ?
एखाद्या प्रिय व्यक्तीच्या उत्कर्षासाठी स्वतःला वाहून दिले तर यात कुठला स्वार्थ आला?
आनंद असतो तो त्या व्यक्तीच्या सहवासात! आनंद असतो तो त्या व्यक्तीच्या सोबतीत!
 सुख समाधान असते ते त्या व्यक्तीच्या सोबत असण्यात! 
आनंद असतो तो त्या व्यक्तीने स्वीकारले ह्या भावनेत, 
नात्यात कधी देणे किंवा घेणे असे कधीच नसते ते दोन्ही व्यक्तींने स्वनिर्णयाने एकमेकांना समर्पित होणे ह्याला कदाचित प्रेम म्हणतात.

 शब्द असोत अथवा नसोत, डोळे बोलतात, भाव सांगतात आणि कृती करून दाखवते. 
आनंद त्यालाच द्यावासा वाटतो जो जवळचा वाटतो कारण या सगळ्यामधे जे सतत कार्यरत आहे ते मन... जे दिसत नाही पण सगळ्याचेच मुळ ते आहे.

ती अशी किंवा तो तसा हे बोलणे सोपं आहे पण तो कसा हे तिला आणि ती कशी हे त्याला माहिती असते म्हणून तर जे अबोल असते, त्याचे पण अस्तित्व असते!
मान्य असते  ते मन, ते स्वप्न, ती भावन, ती सोबत आणि तो सहवास ज्याची बरोबरी कुठेच आणि कशीच आणि कोणत्याही  वस्तू सोबत ही होतच नाही.
वस्तू, पैसे हे क्षणभंगुर आहे, वास्तव सत्य हे सगळं त्या भावना आहेत, जे प्रेम आहे आणि एकमेकांचा जसा आहे तसा केलेला स्वीकार असतो!

एकमेकांना अलिखित स्वीकारणं यापेक्षा खोलवर आणखी काही असूच शकत नाही कारण त्यामागे कुठलीही स्वार्थाची भावनाच नसते. 
तो विश्वास पराकोटीचा असतो, ती स्वतः स्वीकारलेली जवाबदारी असते जी पुरी केली तर आनंद आणि नाही केली तर प्रत्यक्ष जाब विचारणारा कोणीच नसतो. 
हे सगळं त्या भौतिक जगाच्या फार आणि फार पलीकडील आहे. ज्याचं त्यालाच हे कळते हे नक्की! 

 पण ज्याला हे कळतं तो खरंच आणि खरंच नशीबवान असतो. 
जे नाते नैसर्गिक स्वरूपात फुलत जाते त्याने सगळ्याच कृत्रिम सीमा या कधीच पार पाडलेल्या असतात कारण त्यात केवळ एकच भावना रुजू असते ती म्हणजे आपल्या व्यक्तीला सतत आनंदी ठेवण्याची!

©®अमित मेढेकर