कृतार्थतेचे अश्रू ( भाग एक )

पुरुष एखादे वेळेस आई आणि वडिलांची भूमिका पार नाही पाडू शकत पण मनात आणलं तर स्त्री या दोन्ही भूमिका सहज पार पाडू शकते.


कृतार्थतेचे अश्रू ( भाग एक )

विषय: तिचं आभाळ


आपल्या कुशीत गाढ झोपलेल्या त्या निरागस मुलीकडं  भूमी बघत राहिली. कसलं घनदाट जावळ होतं तिच्या डोक्यावर. तिच्या कडे बघता बघता तिला आपल्या सगळ्या मरणप्राय वेदनांचा विसर पडला. त्या वेदनांच्या बदल्यात निसर्गाने आपल्याला केव्हढं मोठं वरदान दिलं आहे. हे तिला जाणवलं आणि ती एकदम सुखावली.


कसल्या कसल्या भावना काळजात दाटून आल्या. छाती एकदम भरून आली. तिला जाणवलं की आता ती आई झाली होती. फक्त आई. हाताची  घट्ट मुठी बांधलेल्या त्या बाळाने झोपेतच थोडी हालचाल केली. कसलं स्वप्न बघत होती लबाड कुणास ठाऊक. मधेच हलकसं स्मित तिच्या ओठांवर फुललं. त्या मुलीला तिने अलगद जवळ घेतलं. सगळ्या शरीरातून अथांग सुखाची एक लहर पसरत चालली आहे असं तिला वाटलं. बाळाच्या त्या नुसत्या स्पर्शाने तिला पान्हा पाझरत होता. बाळाला नुसतं छातीजवळ घेतल्या बरोबर ती  लबाड पण नेहमीचीच गोष्ट असल्या सारखी डोळे मिटून दूध प्यायला लागली. भूमीनेही अतीव सुखाने डोळे मिटून घेतले.

सगळ्या जगातलं सुख आपल्या जवळ आलं आहे आणि त्याला फक्त जपायचं, त्याच्या वर प्रेम करायचं ही एकच भावना तिच्या मनात दाटून आली. त्याचबरोबर केंव्हा एकदा ही गोड बातमी सुरेशला म्हणजे आपल्या नवऱ्याला सांगतो असं तिला झालं होत. पण डॉक्टरांनी तिला मोबाईल वापरायला परवानगी दिली नव्हती म्हणून तिने तिच्या वडिलांना सुरेशला ताबडतोब बातमी द्यायला सांगितलं होतं.

दुपारचे दोन वाजायला आले होते. सुरेश अजून भेटायला आला नव्हता. ती विचार करायला लागली. काय झालं असेल बरं त्याला. कसला राग आला असेल बरं ? आपण बाप झालोय याचा आनंद नाही का झाला त्याला. की ही बातमी त्याला अजून कळलीच नसेल. ऑफिस मध्ये काम असेल जास्त, कदाचित येईल थोड्यावेळाने.

  असा विचार करून कूस बदलून ती झोपून गेली. थकवा खूप आलेला होता. जाग आली तेंव्हा संध्याकाळ होऊन गेली होती.पलंगाच्या बाजूला तिचे आई बाबा डबा घेऊन आले होते. तिने अलगद हसून त्यांच्या कडे बघितलं.

" बाबा, सुरेशचा पत्ताच नाही. तुम्ही कळवलं नव्हतं का  ? अजून पत्ता नाही त्याचा. " ती मलूल आवाजात विचारलं .

" अरे बेटा, मी तर लगेच फोन केला होता त्यांना. लगेच येतो असे तर म्हणाले होते ते . काहितरी अर्जंट काम निघालं असेल त्यांना."  वडील म्हणाले.त्यावर ती नुसतीच फिक्कट हसली.

खिडकीतून बाहेरच संध्याकाळच काळोखाकडे झुकणार आभाळ बघत राहिली. वेळ पुढे सरकतच होता. घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते. पूर्ण दिवस निघून गेला. रात्र गेली. पण ना सुरेश आला ना त्याच्या घरचं कोणी पाहायला आलं. क्षणभर तिला विषाद वाटला. माझ जाऊ द्या. मी परकी आहे. पण ही मुलगी तर तुमची आहे ना.तिला भेटायला तर यायलाच हवं होतं. असे विचार तिच्या मनात येवून डोळ्यात पाणी येई , पण त्या बाळाकडे बघितलं की कोणी येवो ना येवो तिला लगेच कशाचंच काही वाटतं नसे. तिचं स्वतःच आणि तिच्या बाळाचं एक जग निर्माण झालं होतं. जिथं कोणालाच थारा नव्हता.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all