Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

कृतार्थतेचे अश्रू

Read Later
कृतार्थतेचे अश्रू

कथेचे नाव : कृतार्थतेचे अश्रू..
विषय : आणि ती हसली.
स्पर्धा : राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा.., मुंबई संघ 


आपल्या कुशीत गाढ झोपलेल्या त्या निरागस मुलीकडं  सुमती बघत राहिली. कसलं घनदाट जावळ होतं तिच्या डोक्यावर. तिच्या कडे बघता बघता तिला आपल्या सगळ्या मरणप्राय वेदनांचा विसर पडला. त्या वेदनांच्या बदल्यात निसर्गाने आपल्याला केव्हढं मोठं वरदान दिलं आहे. हे तिला जाणवलं आणि ती एकदम सुखावली. कसल्या कसल्या भावना काळजात दाटून आल्या. छाती एकदम भरून आली. तिला जाणवलं की आता ती आई झाली होती. फक्त आई. हाताची घट्ट मुठी बांधलेल्या त्या बाळाने झोपेतच थोडी हालचाल केली. कसलं स्वप्न बघत होती लबाड कुणास ठाऊक. मधेच हलकसं स्मित तिच्या ओठांवर फुललं. त्या मुलीला तिने अलगद जवळ घेतलं. सगळ्या शरीरातून अथांग सुखाची  एक लहर पसरत चालली आहे असं तिला वाटलं. बाळाच्या त्या नुसत्या स्पर्शाने तिला पान्हा पाझरत होता. बाळाला नुसतं छातीजवळ घेतल्या बरोबर ती  लबाड पण नेहमीचीच गोष्ट असल्या सारखी डोळे मिटून दूध प्यायला लागली. सुमतीनेही अतीव सुखाने डोळे मिटून घेतले. सगळ्या  जगातलं सुख आपल्या जवळ आलं आहे आणि त्याला फक्त जपायचं, त्याच्या वर प्रेम करायचं ही एकच भावना तिच्या मनात दाटून आली. त्याचबरोबर केंव्हा एकदा ही गोड बातमी सुरेशला म्हणजे आपल्या नवऱ्याला सांगतो असं तिला झालं होत. पण डॉक्टरांनी तिला मोबाईल वापरायला परवानगी दिली नव्हती म्हणून तिने तिच्या वडिलांना सुरेशला ताबडतोब बातमी द्यायला सांगितलं होतं.

दुपारचे दोन वाजायला आले होते. सुरेश अजून भेटायला आला नव्हता. ती विचार करायला लागली. काय झालं असेल बरं त्याला. कसला राग आला असेल बरं ? आपण बाप झालोय याचा आनंद नाही का झाला त्याला. की ही बातमी त्याला अजून कळलीच नसेल. ऑफिस मध्ये काम असेल जास्त, कदाचित येईल थोड्यावेळाने.

असा विचार करून कूस बदलून ती झोपून गेली. थकवा खूप आलेला होता. जाग आली तेंव्हा संध्याकाळ होऊन गेली होती.पलंगाच्या बाजूला तिचे आई बाबा डबा घेऊन आले होते. तिने अलगद हसून त्यांच्या कडे बघितलं.

" बाबा, सुरेशचा पत्ताच नाही. तुम्ही कळवलं नव्हतं का ? अजून पत्ता नाही त्याचा. " ती मलूल आवाजात म्हणाली.

" अरे बेटा, मी तर लगेच फोन केला होता त्यांना. लगेच येतो असे तर म्हणाले होते ते . काहितरी अर्जंट काम निघालं असेल त्यांना."

ती नुसतीच फिक्कट हसली. खिडकीतून बाहेरच संध्याकाळच काळोखाकडे झुकणार आभाळ बघत राहिली. वेळ पुढे सरकतच होता. घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते. पूर्ण दिवस निघून गेला. रात्र गेली. पण ना सुरेश आला ना त्याच्या घरचं कोणी पाहायला आलं. क्षणभर तिला विषाद वाटला. माझ जाऊ द्या. मी परकी आहे. पण ही मुलगी तर तुमची आहे ना.तिला भेटायला तर यायलाच हवं होतं. असे विचार तिच्या मनात येवून डोळ्यात पाणी येई , पण त्या बाळाकडे बघितलं की कोणी येवो ना येवो तिला लगेच कशाचंच काही वाटतं नसे. तिचं स्वतःच आणि तिच्या बाळाचं एक जग निर्माण झालं होतं. जिथं कोणालाच थारा नव्हता.

दहा दिवसानंतर हॉस्पिटल मधून सुमती बाळाला घेऊन  घरी आली. तरिही सासरच्या माणसांचा पत्ता नव्हता. तिने फोन केला, तर तो उद्या नक्की येतो म्हणाला. आणि आलाच नाही.तिने पुन्हा फोन केला  तर त्याने उडवा उडवीची उत्तर दिली.

एक दिवस त्याने न येण्याचं कारण सांगितलं. तेही तिने दहादा फोन करून त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, " सुमती आई बाबांना मुलगी झाल्याने अजिबात आनंद झाला नाही. त्यांना वंशासाठी मुलगाच हवा होता."

" कोणत्या काळात वावरतो आहे सुरेश तू. मुलगा किंवा मुलगी होणं कोणाच्या हातात असतं रे. त्यांच एक जाऊ दे, पण तुलाही वाटत नाही का की आपल्या मुलीला पाहावं. जवळ घ्यावं. लाड करावे . आणि मुलगा होण आणि मुलगी होण हे सर्वस्वी नवऱ्याच्या गुणसूत्रांवर अवलंबून असत हे माहित आहे ना तुला "........सुमतीला  बोलण्याच्या नादात आपला फोन पलीकडून कट करून टाकला गेलेला आहे हेही समजलं नव्हतं.समजलं तेंव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. तिला हेच समजत नव्हतं की तिला मुलगी होण्यात तिचा आणि तिच्या त्या बाळाचा काय दोष होता. नंतर त्या आपल्याच विश्वात दंग असलेल्या मुलीकडे बघता बघता तिला सुरेशच्या अभागी पणाची कीव आली.

त्याचं क्षणी एक अपूर्व निर्धार तिने केला. काहीही हो, कोणी साथ देवो न देवो, या बाळाला मी मोठं करेल.

आणि खरंच तसंच झालं. तिच्या सासरचं कोणीच भेटायला आलं नाही. दिवस भराभर पुढे सरकत होते. वर्ष होऊन गेलं. बाळंतपणा नंतर सुमती सासरी गेलीच नाही.

काळ पुढे सरकत होता.लोकांच्या बोलण्याला काही सुमारच नव्हता. कोणी म्हणायचं ही मुलगी चांगल्या पायाची नाही. तर कोणी सुमतीच्या वागण्याला नावं ठेवायचे . कोणी काही तर कोणी काही.

हळू हळू सुमतीच्या लक्षात आलं की आपण आपल्या कुटुंबावर भार होतं आहोत.ज्या घरासाठी आपण हे घर सोडलं त्या घरानं आपल्याला त्यांच मानलं नाही आणि या घरानं आपला लग्नाच्याच दिवशी निरोप घेतला होता. आता आपण इथे पण पाहुणीच  आहोत. पाहुणी शब्द पण परवडला असता आपण आता इथे फक्त ओझं आहोत. ठीक आहे. जर एकटं राहणं हेच आपलं प्राक्तन असेल तर आपण निर्भयपणं ते स्वीकारायलाच हवं.माझ्या मुलीला मी एकटी मोठी करून दाखवेल. कुठला आवेश तिच्यात संचारला होता कुणास ठाऊक. तिने एका दवाखान्यात परिचारिकेची नोकरी मिळवली. आणि एक दिवस आपल्या मुलीला घेऊन एकटं राहण्याचा निर्णय घेतला. थोडे दिवस तिला माहेरची मदत घ्यावी लागली. पण सुमतीची मुलगी मुळातच एवढी समजूतदार होती की कोणालाच तिचा त्रास होत नसे.

किती दिवस गेले होते हे तिनं मोजणं सोडून दिलं होतं.
तिची मुलगी मोठी होत होती. आपली मुलगी खूप हुशार आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आली. सगळ्या समाजाला तोंड देत देत तिची मुलगी दहावीला पोचली. बोर्डात तिच्या मुलीला जेंव्हा जिल्ह्यात सगळ्यात जास्त मार्क पडले. तेंव्हा तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. ती जिथं कामाला होती तिथल्या डॉक्टरीण बाईंना देखील तिचं खूप कौतुक वाटतं असे. त्या देखील सुमतीला मुलीच्या अभ्यासा साठी जमेल तशी मदत करत असत. शिवाय तिला बऱ्याच स्कॉलरशिप मिळाल्या होत्या. तिच्या मुलीला डॉक्टर बनायचं होतं, जी निव्वळ अशक्य गोष्ट होती. पण जेव्हा बारावीत पण मुलीने मेरिट सोडलं नाही तेव्हा ज्या गोष्टी निव्वळ अशक्य वाटत होत्या त्या सहज नजरेच्या टप्प्यात दिसायला लागल्या होत्या. मुलीला मेडिकलला ऍडमिशन मिळाली. समाजातील अनेक सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी तिच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला. पण जो हात धरून तिने सात जन्माची स्वप्न पाहिली होती तो हात कधीच पुढं आला नाही.

काही काळ गेला. आणि एक दिवस सुमतीची मुलगी डॉक्टर झाली. आता ती एका डॉक्टरची आई होती. तिच्या कठोर तपस्येला अखेर फळ मिळालं होत.

मागं वळून बघता बघता, अचानक सुमतीला कळलं की किती काळ असा अंगावरून सरपटत गेला. की आपल्याला कशाची जाणीवच राहिली नाही. केव्हढं मोठं अंतर आपण एकट्याने कापलं आहे. आता काही दिवसांनी हे आपलं पिल्लू असच एक दिवस लग्न करून निघून जाईल आणि मग पुन्हा अंगावर येईल तो जीवघेणा एकटेपणा. ती निव्वळ सुन्न होऊन गेली.

अचानक तिला जाणवलं की मुलगी काहीतरी सांगते आहे.

" आई, मला अमेरिकेत एका युनिव्हर्सिटीत पुढच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली आहे. मला पासपोर्ट तयार करावा लागेल. आई रागावणार नसशील तर एक  गोष्ट सांगू का. मी आता तुझ्या पासून  इतक्या लांब जाणार पण आई, तुला माहित आहे की मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही. म्हणून मी एक ठरवलं आहे. तू नाही तर नाही, पण या पुढे फक्त तुझ्या नावासोबत राहायचं. म्हणून मी आता पासपोर्ट बनवेल त्या वर माझ्या कधीच न पाहिलेल्या वडिलांचं नाव टाकण्या ऐवजी मी तुझंच नावं टाकणार आहे. लवकरच मी भारतात परत येईल आणि तूझ्या सोबत शेवट पर्यंत राहून स्त्री भ्रूण हत्ये विरुद्ध कार्य करून तू आणि मी भोगलेल्या यातने पासून पीडित स्त्रियांना मदत करेल "

ऐकता ऐकता, सुमतीला  आपला लढा संपल्याची जाणीव झाली. एकाच वेळेस आपण आईची आणि वडिलांची भूमिका पूर्णपणे यशस्वी पणे निभावल्याची जाणीव झाली. आणि कृतार्थतेन तिने मुलीला पोटाशी धरले आणि हमसाहमशी रडायला लागली आणि रडता रडता ती अचानक हसायला लागली.

--- दत्ता जोशी
मुंबई

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Datta Joshi

Senior Pharmacy Officer

मी खूप सुंदर दिसतो असं मला वाटतं .मराठी कथा, कादंबरी, विनोदी कथा कविता, लिहायला आवडतात.इंग्रजी साहित्य, बंगाली साहित्य , मराठी साहित्य खूप आवडते.कोविड काळात कोविड योध्दा म्हणून काम केलं. रवींद्र संगीत प्रचंड आवडत.

//