कृष्णसख्याची जडली बाधा भाग 6

रंजना आणि अविची कथा आता कोणत्या वळणावर जाईल?

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 6

मागील भागात आपण पाहिले की अविनाश आणि रंजना एकमेकांकडे नकळत ओढले जाऊ लागले. त्यांची ही ओढ प्रेमात कशी बदलेल. चला पाहूया पुढे.


"हॉस्टेलवर परत आल्यावर मी मुठीत पकडुन आणलेले घड्याळ पाहिले. घड्याळ दुरुस्त केले होते. आईने दिलेले घड्याळ नीट झालेले पाहून माझे डोळे आनंदाने भरून आले. हे घड्याळ नीट केल्याबद्दल मला आता अवीचे आभार मानायचे होतेच.

पण घड्याळ माझ्या खोलीतून त्याच्याजवळ कसे गेले? याचाही शोध लावायचा होता. तेवढ्यात रेक्टरने बोलावल्याचा निरोप आला. घाबरत ऑफिसमध्ये गेले. आईचे पत्र आले होते. शिक्षिका असलेली माझी आई. पत्र वाचले आणि जाणीव झाली की आपण इथे फक्त अभ्यास करायला आलोय. आपल्या आईने सोसलेल्या कष्टांची जाणीव ठेवायला हवी. पत्र वाचताना चुकार अश्रू ओघळलेच." रंजना एकदम शांत झाली.

अविनाश हळूच उठून तिच्याजवळ बसला आणि पुढे बोलू लागला."माझ्या कानात सांगायला रंजू वाकली तेव्हा माझे वाढेलेले श्वास तिला कळू नयेत यासाठी मी आटापिटा केला. ती गेल्यावर मात्र मन उदास झाले. नकळत मला तिची ओढ वाटू लागली.

विचार करत असताना अचानक अंजू आली,"अवी,तुला घरी सोडले आहे. चल मी येते बरोबर."

आम्ही घरी गेलो. आई बाबांना खोटेच काहीतरी कारण सांगायचे अंजुला बजावले. घरी आल्यावर झोपताना मला तिच्या रेशमी केसांचा तो हळूवार स्पर्श सतत आसपास जाणवत होता."


अविनाश सात आठ दिवसांनी कॉलेजला आला. मी त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष करून निघून गेले. तेवढ्यात पुढे कॉलेजच्या भिंतीवर एक अस्ताव्यस्त मुलीचे चित्र काढलेले होते आणि खाली काहीतरी लिहिले होते.

मी जवळ जाऊन पाहिले. माझ्या दिसण्यावर,भाषेवर वेगवेगळ्या पद्धतीने टीका केली होती.

मी पुढे जाणार एवढ्यात मागून आवाज आला,"ये काकूबाई, वेणीला तेल किती किलो लागते."


मागे वळून पाहिले तर काही मुलांचा घोळका हसत होता. मी जाब विचारायला गेले.

त्यातील एकजण म्हणाला,"म्हणजे तू काकूबाई आणि गावंढळ आहेस तर?"

असे म्हणून सगळे खि खी हसत निघून गेले. त्याच वेळी समोर. अविनाश आणि त्याचा ग्रुप येताना दिसला. मी खाली मान घालून निघून गेले.

त्यानंतर हळूहळू आत्मविश्वास हरवू लागला. आपण खरच गावंढळ आहोत. आपल्याला काहीच येत नाही. हे सगळे पक्के मनात बसू लागले. रंजना बोलत असताना तिच्या डोळ्यांत पाणी होते.

तरीही ती पुढे सांगू लागली,"लवकरच सांस्कृतिक महोत्सव सुरू होणार होता. अवी त्या कमिटीचा प्रमुख होता. आता तर काय सगळीकडे उधाण आले होते.

अशातच फर्स्ट टर्मचा निकाल आला. नेहमी अव्वल येणारी मी चक्क नापास झाले होते. आईचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. आपण काहीही करू शकणार नाही. आता आईला काय उत्तर देणार? त्यापेक्षा हे जीवनच संपवून टाकले तर? क्षणात त्या नकारात्मक विचाराने माझा ताबा घेतला.


"काय? मॉम तू...माझा विश्वासच बसत नाहीय." वरद तिला विचारत होता.

तेवढ्यात डोळे पुसून रंजना म्हणाली,"हो,आज मागे वळून पाहताना मलाही विश्वास बसत नाही. पण त्याच प्रसंगाने मला माझा सखा भेटला.


मी तंद्रीत चालत टेरेसवर गेले. नुकतीच रिहर्सल संपवून सगळे खाली गेले होते. मी कठड्यावर पाय ठेवला आणि डोळे बंद करून स्वतः ला पुढे झोकून दिले.

इतक्यात विजेचा झटका बसावा अशा वेगाने माझा हात मागे खेचला गेला. मी कठड्यावरून खाली पडले. समोर अविनाश उभा होता आणि त्याचे डोळे आग ओकत होते.

त्याने फक्त एकच वाक्य उच्चरले,"आता ह्या क्षणी इथून माझ्याबरोबर चालायचं."


मी तशीच उठले आणि त्याच्या मागे चालू लागले. अविनाश मला खाली घेऊन आला. कॉलेजसमोर एक फुलवाला होता. एका हाताने अपंग असूनही तो जिद्दीने काम करत असे.

अविनाशने तिकडे बोट दाखवले आणि म्हणाला,"धावताना पडलात तरी हरकत नाही. पण उठून पुन्हा पळायची जिद्द हवी. तिकडे लांब कोल्हापुरात ती आई राबत आहे आपली मुलगी डॉक्टर झालेली पाहायला आणि तू असे पळून जाणार?"


मला प्रचंड रडू आले. मी स्वतः ला अविनाशच्या मिठीत झोकुन दिले आणि मनसोक्त रडले."

"हो ना! अरे आख्खी शर्टाची एक बाजू भिजलेली." अवी मिश्किल हसत म्हणाला.

"ह्या सगळ्यात एक गडबड झाली. हॉस्टेल बंद झाले. आता मी जाणार कुठे?"

"अविनाश आता ह्या रात्री मी राहू कुठे?"

"एक ऑप्शन आहे. तुला चालत असेल तर." रंजनाने होकारार्थी मान हलवली. "माझ्या घरी चल."


रंजना अविनाशच्या घरी जाईल का? पुढे ही गोष्ट कोणत्या वळणावर जाईल.
वाचत रहा.
कृष्णसख्याची जडली बाधा.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all