Mar 04, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 11

Read Later
कृष्णसख्याची जडली बाधा भाग 11कृष्णसख्याची जडली बाधा भाग 11

मागील भागात आपण पाहिले की अवीने प्रेमाची कबुली देताना रंजनाला सगळे सांगितले. त्यानंतर आता रंजना काय निर्णय घेईल?रंजना आणि अविनाश दोघेही स्तब्ध झाले. वरद फक्त दोघांकडे पहात होता. कितीही झाले तरी विवाहाच्या मध्यातून सुरक्षित प्रजनन आणि लैंगिक सुख यांची शाश्वती मिळत असते. परंतु यातील एक उद्देशच पूर्ण होणार नाही. तरीही समोरच्याला स्वीकारायचे आहे. इतका अवघड निर्णय कसा घेतला असेल दोघांनी.


वरद मनातील विचार थांबवू पहात होता. इतक्यात हॉस्पिटलमधून एक तातडीची केस आल्याने रंजनाला जावे लागले.

" मी निघते. वरद आणि तू बोला. आपला मुलगा पुरुष झालाच आहे. तो त्याच्या बायकोचा सखाही व्हायला हवा. प्लीज टॉक मॅन टू मॅन." असे म्हणून रंजना निघून गेली.


आता अविनाशच्या समोर होता एक मुलगा आणि एक पुरुष. त्याला आपल्या मुलाशी बोलायचे होतेच आणि त्याच्यातील पुरुषाला समृध्द करायचे होते.

" कॉफी घेणार?" अवीने विचारले. वरद हो म्हणताच अवी कॉफी घेऊन आला.


"बाबा,तुला सांगावे वाटत असेल तरच आपण बोलू." वरद शांत होऊन बोलला.

" वरद,पुरुष ही ओळख आपल्या समाजात लैंगिक सामर्थ्य आणि मुले जन्माला घालायची क्षमता याच्याशी जोडलेली आहे. त्यामुळे आपल्या मनाची जडणघडण तशीच असते. एक डॉक्टर असूनही माझे मन परिस्तिथी स्वीकारू शकत नव्हते. त्यामुळे मला मार्ग दिसत नव्हता.

त्यादिवशी संध्याकाळी रंजनाला मिठीत घेतल्यावर मला उत्तेजना जाणवल्या आणि मी त्यासाठी सक्षम आहे हे सुध्दा समजले. तरीही माझे मन सतत बैचेन होते.

त्यानंतर आठवडाभर रंजना आणि माझे बोलणे झाले नाही. परीक्षा सुरू झाल्या. कदाचित रंजनाने मला नाकारले अशीच माझी समजूत झाली. एकीकडे मला दुःख होत होते. दुसरीकडे तिला पूर्ण आयुष्य जगायचा हक्क आहे हे समजत होते. शेवटचा पेपर संपला. मी बाहेर आलो.

समोर रंजना उभी होती. तिच्या मोहक डोळ्यात तेच हसू घेऊन.

"डॉक्टर,माझ्याबरोबर येशील?" तिने विचारले.


मी होकारार्थी मान हलवून बरोबर चालू लागलो. नेहमीच्या ठिकाणी गेल्यावर चहा सांगून ती शांत माझ्याकडे पहात म्हणाली,"अवी,गेले अनेक दिवस मी ह्या विषयावर असलेले सर्व मेडिकल जर्नल वाचले आहेत. मला एक संदर्भ सापडला आहे. त्यानुसार विर्यात शुक्राणू नसले तरी वृषणात असू शकतात. ते मिळवायची पद्धत शोधली आहे."


ती हे सांगत असताना मी शांत होतो."पण रंजू, वृषणात ते असतीलच असे नाही ना? समजा नसलेच तर?"


दहा सेकंद शांतता राहिली."समजा तू डॉक्टर नसतास आणि तुला हे सगळे समजले नसते तर लग्न झाल्यावर काय केले असतेस तू?" माझ्याकडे उत्तर नव्हते.

"रंजू,आजही समाज आजही दोष स्त्रीमध्ये आहे असे समजतो. तुला प्रचंड त्रास होईल."

"अवी,काहीही झाले तरी माझा निर्णय पक्का आहे. मला तुझ्या बरोबर आयुष्य घालवायचे आहे. एक नर आणि मादी फक्त शरीर सुख आणि प्रजनन करतात. पण एक सखा आयुष्य सुंदर आणि समृद्ध करतो. मला माझा सखा हवाय सोबत. आपण सोबत यावर काम करू. डॉक्टर म्हणून उपाय शोधू. त्यातून येणाऱ्या पिढ्यातील अनेक अविनाश सुखी होतील."रंजना थांबली.


मी एकदाच तिच्याकडे पाहिले."तू घेतलेल्या निर्णयात आजपासून तुझ्यामागे हा अविनाश कायम उभा असेल."

आम्ही दोघे बाहेर पडलो. हार्ट सर्जन व्हायचे तिचे स्वप्न तिने किती सहज सोडले. मग तिचा विश्वास राखून तिचा कृष्णसखा व्हायचे धनुष्य पेलायचे असा मी निर्धार केला."अविनाश थांबला.

"बाबा,पण मग पुढे माझा जन्म आणि इतर सगळा प्रवास कसा केला तुम्ही? कारण जवळपास एक दशक गेल्यावर माझा जन्म झाला."

"तो प्रवास तुला रंजना बरोबर असताना सांगायला आवडेल. आणखी एक अभय प्रधानला बाहेर भेटायला बोलाव. मला त्याच्याशी बोलायचे आहे."


पुढे अविनाश आणि रंजना कसे सामोरे जातील? मेडिकल उपचार आणि सामाजिक प्रश्नांना कशी उत्तरे देतील. ह्या सगळ्यातून त्याचे प्रेम कसे उजळून निघेल?


वाचत रहा.
कृष्णसख्याची जडली बाधा.
©®प्रशांत कुंजीर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//