Login

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 7

रंजना नकळत प्रेमाची कबुली देणार.



कृष्णसख्याची जडली बाधा भाग 7
मागील भागात आपण पाहिले की आईच्या पत्रानंतर रंजना अवीला टाळायला लागते. त्याचवेळी कॉलेजमध्ये होणारे मानसिक टाँट आणि छळ यातून तिला नैराश्य येते. अविनाश तिला वाचवतो. आता पाहूया पुढे.


"माझ्या घरी चल",अविनाश शांतपणे म्हणाला.
"काय? तुझ्या घरी तेही रात्री?" मी ओरडले.

"ओरडू नकोस. आता तू मरून नरकात जाणार होतीसच माझे घर त्यापेक्षा निश्चित चांगली जागा आहे."

"तुला काय माहित मी नरकात जाणार रे! मी जाते हॉस्टेलवर." रागावून मी उत्तर दिले.

" रेक्टरला काय सांगशील? त्या आत घेतली का?" मागून आलेला प्रश्न ऐकून जागेवर थांबले आणि गुपचूप त्याच्या शेजारी येऊन उभी राहिले.

अवीचे घर पुण्यातच होते. आम्ही घरी पोहोचलो. आजीने दार उघडले,"आलास! मला वाटलं आज म्हातारी एकटीच झोपणार."

"काय? अग आई,बाबा आणि तुझी लाडकी कुमुद कुठेय?"

आजी चिडून म्हणाली,"दोन दिवस सगळे लग्नाला..." इतक्यात आजीचे लक्ष बाहेर संकोचून उभ्या असलेल्या रंजनाकडे गेले.

"अग बाई, मैत्रीण का? किती गोड आहे ही." आजी तिला आत घेत बोलत होती.

"अवी तिचे केस बघ माझेही केस असेच होते बर. पण तू काय करतेस? कुठे राहतेस?"

"ती हॉस्टेलवर राहते. आज तालमीला उशीर झाला." अवीने उत्तर दिले.

आजीने तिला कुमुदच्या खोलीत नेले. "इथे जरा फ्रेश हो! मी आलेच."

आजी बाहेर निघून गेली. थोडे संकोचून मी कपडे बदलले. नंतर आजीने जेवायला हाक मारली. मुगडाळ खिचडी अप्रतिम झालेली.

"अवी ही पोरगी छान आहे हो! नाहीतर तुझ्या त्या इतर मैत्रिणी नटव्या."

हे ऐकताच मीही खुदकन हसले.

"त्याला आजच्या काळाप्रमाणे राहणे म्हणतात आजी." अवी मला पाहून बोलला.

मी खूप दमले होते. सरळ आजीबरोबर जाऊन झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी आजिबरोबर स्वयंपाकघरात गेले.

आजीला म्हंटले,"आजी,मस्त आंबोळ्या करू का?"
"तुला स्वयंपाक येतो."आजीला प्रचंड आनंद झाला.
मी होकारार्थी मान डोलावली.
पण आजीने मला पूजेला फुले आणायला बाहेर पाठवले.

मी फुले तोडत असतानाच अचानक दारात रिक्षा थांबली. माझ्याच वयाची एक मुलगी आणि दोन मध्यमवयीन माणसे उतरली.

मी त्यांना ओळखले आणि पटकन बोलले,"काकू मी घेते सामान."

ते तिघे आत आले आणि कुमुद म्हणाली,"आजी, दाद्या बाहेर या. मला न विचारता वहिनी आणली कशी?"

ते ऐकून मी चिडले,"ओ काय बोलताय! ते मला काल काही कारणाने इथे रहावे लागले. असल्या खडूस बरोबर कोण लग्न करेल?"

शेवटी मी हळूच म्हणालेले वाक्य कुमुदने ऐकले आणि ती माझ्या गळ्यातच पडली,"तू आजपासून माझी मैत्रीण. काही लोकांपुढे गोंडा न घोळता बाणेदार राहणारी वहिनीच मला हवी आहे."


तेवढ्यात आई आणि बाबांनी तिला जरा दटावले. मग मी कसाबसा पाहुणचार घेऊन कॉलेजला आले. त्यानंतर मात्र कुमुद आणि माझी गट्टी जमली. अवीच्या घरी येणे जाणे वाढले.

एक दिवस अवी मला म्हणाला,"रंजना,देश तसा वेष. ही म्हण तुला माहित आहे का?"

मी चिडून म्हणाले,"राज्यात टॉपर होते मी सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत."

"ते फक्त पुस्तकात. प्रत्यक्षात सगळा उजेडच."
"हा! हे लई होतंय. जास बोलता बर." मी जीभ चावली.

अवी माझ्या जवळ आला,"जरा थोडे बदल करून तर बघ. नाहीतर पिल्लाचा राजहंस होणार कसा?"

मी पटकन पळून बाहेर गेले. तो जवळ आल्यावर माझे श्वास नकळत वाढले होते.


अवीचे वाक्य दिवसभर माझ्या डोक्यात घोळत होते. शेवटी मी मनाचा हिय्या करून माझ्या मैत्रिणीला सांगितले.

तशी ती खोखो हसत सुटली,"अग हेच गेले आठ महिने मी सांगतेय. चल आज तुला पहिला धडा देते. पुण्यातील खरेदी पंढरीचे दर्शन घेऊन."


जवळपास पाच तास खरेदी करून आम्ही परत आलो. दुसऱ्या दिवशी छानसा नवीन पॅटर्नचा पंजाबी सूट,त्यावर मॅचींग कानातले,चेहऱ्यावर हलका मेकअप असे छान तयार होऊन मी कॉलेजला गेले. सगळेजण आज गप्प बसून पहात होते.

तेवढ्यात अविचा मित्र डॉक्टर पराग म्हणाला,"आईए मेहेरबा, बैठीए जानेजा| ..... किसका जला आशिया बिजलीको ये क्या खबर|"

मी खोटे रागावत त्याला म्हणाले,"पराग,काय रे? असे काय करतोस."

तेवढ्यात हिना मला शोधत पळत आली,"रंजू यार किधर है तू? चल लवकर."

मी तिच्याबरोबर बाहेर आले. "काय झाले हिना? अशी काय करतेस?"


तिने दाखवले तर समोर दोन धटिंगण अवीची कॉलर धरून त्याला मारत होते. उपचार करताना चूक झाली असे धमकावत होते.

मी सरळ ओढणी कंबरेला बांधली आणि कोपऱ्यातील सफाई करायची काठी उचलली. लाठीचे माझे प्रशिक्षण कामाला आले.


दोघांना यथेच्छ बडवत असताना मी बोलून गेले,"तुमची हिंमत कशी झाली. माझ्या अवीला हात लावायची."


तोवर सुरक्षा कर्मचारी आले. बाकी सगळे सोपस्कार झाले. पण माझ्या तोंडून माझे रहस्य निसटले होते.


अवीचेसुद्धा रंजनावर प्रेम असेल का? रंजनाची आई हे मान्य करेल का?
वाचत रहा.
कृष्णसख्याची जडली बाधा.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all