Feb 22, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 1

Read Later
कृष्णसख्याची जडली बाधा भाग 1


कृष्णसख्याची जडली बाधा भाग 1

"वरद,अरे उठ लवकर. निटच्या पेपरला वेळेवर पोहोचायला हवे."
डॉक्टर अविनाश आपल्या अठरा वर्षांच्या लेकाला उठवत होता.

तेवढ्यात आतून रंजना ओरडली,"काय एवढी घाई आहे. जाईल की त्यो वेळेवर."

असे म्हणून तिने जीभ चावली.

वरद अंथरुणातून ओरडला,"जगात भारी कोल्हापुरी."


अविनाश प्रचंड अस्वस्थ झाला होता. त्यालाच जास्त टेन्शन आले होते.

तेवढ्यात रंजना नाष्टा घेऊन आली,"अवी,तू इतका का अस्वस्थ होतोस रे? हुशार आहे आपला लेक."

अविनाश रंजनाचा हात हातात घेऊन म्हणाला,"तू आहेस म्हणून आज हे दिवस दिसत आहेत. नाहीतर आज मी कुठे असतो. संपले असते सगळे."


रंजना त्याच्या हातावर थोपटत म्हणाली,"तुला आपले कॉलेजचे दिवस आठवतात अवी. त्यावेळी तू नसतास तर आज मीसुद्धा कुठेतरी अशीच हरवून गेले असते."ह्या गप्पा ऐकणारा वरद खाकरून म्हणाला," ओय होय मेरे रोमिओ जुलियट. मला एकदा तरी ऐकायचीच आहे सगळी स्टोरी."

रंजना त्याच्या पाठीत धपाटा घालून ओरडली,"आवर बाबा. नाहीतर तुझ्या बाबाला बी.पी.ची गोळी द्यावी लागेल मला."


"रंजू,येतो ग!" असे म्हणून दोघे बाप लेक बाहेर पडले.

पाठमोऱ्या अविनाशकडे पाहून रंजनाच्या मनात विचार आला,"अजूनही तसाच आहे हा. अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवशी भासला तसाच."


मग मात्र तिने आठवणींना अडवले नाही. मनाचे पाखरू केव्हाच उडून पोहोचले होते एकोणीसशे नव्वद सालात.

बारावीच्या परीक्षेत बोर्डात झळकली आणि आईने पाहिलेले स्वप्न पूर्ण करायला रंजनाने एम. बी. बी. एस. साठी प्रवेश घेतला.


पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॉलेजचा पहिला दिवस. मधून पडलेला भांग,पाठीवर रुळणारी शेपटी,चेहऱ्यावर कोणतेही प्रसाधन नाही अशा अवतारात तिने कॉलेजच्या आवारात प्रवेश केला.


शहरी वातावरण,भाषा,भव्य कॉलेज पाहून रंजनाला जरा दडपण आले. हातातील साधी पिशवी सांभाळत ती खाली मान घालून चालत होती. अचानक धाडकन डोके आदळले आणि समोरून शब्दांचा मारा सुरु झाला.

"अरे बघून चालत जा. लक्ष कुठे असते? डोळे फुटलेत का?"


आता मात्र रंजना चिडली." अय एकतर तुमी मला धडकला आन वर बोलताय व्हय."

"अरेरे काय ही भाषा? काय हे बोलणे." समोरून उत्तर आले.

" हा,भाषेवर जायचं काम नाय. जगात भारी कोल्हापुरी समजला का!"


एवढे होईपर्यंत रंजना बॅग सावरत उभी राहिली. समोर एक अतिशय देखणा आणि तितकाच गोड मुलगा उभा होता."क्षण थांबून इथेच रहावा,
मज सहवास तुझा घडावा.
तुज पाहताना सख्या रे,
मनी प्राजक्त असा फुलावा.


मनात कविता सुचलेली पाहून रंजना खुदकन हसली.

ते पाहताच मिस्टर हँडसम चिडला,"ओ मिस, हसताय काय? आणि मुळात तुम्ही इथे करताय काय?"

तिच्याकडे अपादमस्तक पाहत हसत तो म्हणाला,"कुठून कुठून लोक येतात पुण्यात कोणास ठाऊक?"


हे ऐकले आणि रंजना चिडली,"अय पुणेरी,समजता काय? जगात भारी कोल्हापुरी."


हे सगळे ऐकायला तो थांबलाच नाही. रंजना मात्र त्याच्या गोड हसण्यात हरवली.

किती गोड हसतो ना!

तेवढ्यात त्याची पुढील वाक्य आठवून मोठ्याने स्वतः शी म्हणाली,"खडूस कुठला."


तितक्यात फोनची रिंग वाजली आणि विचारांची तंद्री तुटली. हॉस्पिटलमधून फोन होता. तातडीने जावे लागणार होते.


आज रंजना एक निष्णात प्रसूती आणि वंध्यत्व निवारण तज्ञ असली तरी तिला ह्या शाखेकडे वळायचे नव्हते. परंतु त्यालाही कारण ठरला हाच गोड खडूस.हा खडूस कोण असेल? रंजना त्याला आवडली असेल का? तिने अभ्यासाचे क्षेत्र निवडायचे काय कारण असेल?
वाचत रहा.
कृष्ण सख्याची जडली बाधा.

©®प्रशांत कुंजीर.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//