कृष्णसख्याची जडली बाधा भाग 8

रंजना आणि अवीची गोष्ट आता एका नाजूक वळणावर जाईल.



कृष्णसख्याची जडली बाधा भाग 8

मागील भागात आपण पाहिले रंजना आणि अवीची मैत्री झाली. त्यानंतर अवीने तिला नकळत काही बदल सुचवले. त्याचवेळी अशी घटना घडली की तिने अवीवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. आता पाहूया पुढे.


"रागाच्या भरात आपण काय बोलून बसलो हे समजून मी पटकन तिकडून निघून आले." हे सांगताना रंजना आजही लाजली.

"हाय मैं मर जावा|" वरद नाटकी हसत म्हणाला.

तेवढ्यात अविनाश ओरडला,"बेट्या आता बाकी गोष्ट नंतर. उद्या हॉस्पिटल आहे आम्हाला."

हॉस्पिटलचे नाव काढताच वरद जरा शांत झाला.

" वरद,काळजी करू नकोस. अभय प्रधान तसा संतुलित माणूस आहे. काही गोष्टी समजावल्या की येईल जागेवर." रंजना शांतपणे समजावत होती.
दोघेही आपल्या खोलीत निघून गेले.


दुसऱ्या दिवशी सकाळीच अर्जंट कॉल आल्याने रंजना लवकर निघून गेली. अविनाश मागाहून हॉस्पिटलला पोहोचला.

रंजना नसल्याने आता अभय आणि त्याच्या बायकोला समजवायचे कठीण काम करायचे होते.

"मे आय कम इन डॉक्टर." तिशीच्या आत बाहेरील एक तरुणी आत येत म्हणाली.
"येस मिसेस प्रधान." दोघांना अवीने आत बोलावले.

दोघेही अवघडलेल्या स्थितीत बसले होते.

"आता मी जे सांगतो त्याचा नीट विचार करा. आजवर तुम्ही एकत्रित आनंदी होता ना? मग एक कागदी अहवाल सगळे कसे बदलू शकतो?"

"डॉक्टर पण जर मी पुरुष म्हणून सक्षम नाही तर काय अर्थ आहे ह्या सगळ्याला?" अभय हताश होऊन बोलत होता.

" पुरुष म्हणून सक्षम असणे म्हणजे काय? फक्त शारीरिक सुख? मग ह्यापूर्वी ते मिळत नव्हते का? तुम्हाला काय वाटते मिसेस प्रधान?" अवीने विचारले.

"डॉक्टर,मीही तेच समजावते आहे ह्यांना. पण त्यांना ते पटतच नाही. तू स्वतंत्र होऊन पूर्ण हो असे म्हणतात." ती जरा थांबली.

"अभय,शेवटच्या चाचणीचे रिपोर्ट आठ दिवसात येतील. तोवर फक्त तुम्ही बरोबर रहा."

अवीने खूप छान समजावून त्यांना घरी पाठवले. तेवढ्यात दुपारचा डबा घेऊन वरद स्वतः च हॉस्पिटलला आला.


संध्याकाळी तिघेही एकत्रित घरी आल्यावर वरद पुन्हा सुरू झाला,"बाबा पुढे काय झाले? तुम्ही लग्न केलेत ना?"

"आयुष्य इतके सोपे नसते." अवी हसत होता.

" मी कबुली दिल्यावरही अवी काहीच बोलला नाही. त्यानंतर तो मला अनेक गोष्टीत मार्ग दाखवत गेला. वर्ष संपले आणि मी सुट्टीला घरी आले. माझ्यात झालेला बदल पाहून आईला समजले. ती माझ्या फक्त नजरेतून सगळे आजही ओळखू शकते.

आईला अवीबद्दल सगळे सांगितल्यावर ती एकच वाक्य बोलली,"शिक्षण पूर्ण झाल्यावर मग बाकी सगळे."

माझ्या मनावरचे ओझे उतरले. मी आता अवी अवतीभवती असावा म्हणून घोटाळत असे. सतत त्याच्या घरी जात असे.

अवी,उद्या नाटकाला जाऊया? असे विचारल्यावर तो फक्त हो असे उत्तर दिले. मी असे अनेक प्रसंग घडवून आणत होते. मला अवीने त्याचे प्रेम व्यक्त करावे असे वाटत होते.

अवी मात्र माझ्याशी सहज वागत बोलत होता. असेच एक दिवस अवीच्या घरून निघताना माझी वही तिथे विसरली. वहीत मी कविता लिहून माझ्या भावना मांडत असे.


त्यातील एक कविता मी शेवटच्या पानावर लिहिली होती.
कृष्णसखा नावाची.

" वरदचे डोळे चमकले,"आई,बाबा मला म्हणून दाखवा ना."

अवी हसत म्हणाला,"रंजू तिची कविता म्हणेल आणि मग मी माझे उत्तर."


कळी उमलते किरणांच्या अलगद सुकुमार स्पर्शाने,
तशी फुलते अभिसरिका तुझिया अवचित येण्याने.

मुग्ध किशोरी माझ्यामधली होई अवखळ प्रेमिका.
प्रीत उमलते मनात माझ्या,समोर दिसतो कृष्णसखा.

सूर अनामिक दुरून येतो,मनात वाटे हुरहूर.
कसे व्याकूळ मन हे माझे,उगाच दाटे काहूर.

मन धावत जाते क्षितीजापार,मी होऊन जाई राधिका,
प्रीत उमलते मनात माझ्या समोर दिसता कृष्णसखा.

अंगी रोमांच फुलते माझा,तू भवताली असताना,
किती करावे प्रयास राजसा,मनास माझ्या जपताना.

नको धरुस रुसवा,मी तुझीच वेडी प्रेमिका,
प्रीत उमलते मनात माझ्या,समोर दिसता कृष्णसखा.


कविता वाचून संपली आणि रंजनाचे डोळे अश्रूंनी भरले होते.

"मॉम,किती गोड शब्द आहे,कृष्णसखा."

रंजना हसली,"हो,असाच आहे अवी. माझ्यातल्या अबोध,मुक्त मुलीला अभिसारिका बनवून तो थांबला नाही. माझ्यातले मी पण जपत,फुलवत राहिला.माझा मार्गदर्शक बनून."


"बाबा तू काय उत्तर दिलेस यावर? हो म्हणालास ना?सांग ना लवकर." वरद उत्साहात विचारत होता.

अवी थोडासा शांत झाला होता.

काय असेल अवीचे उत्तर? त्याने होकार दिला असेल?
वाचत रहा.
कृष्णसख्याची जडली बाधा.
©®प्रशांत कुंजीर.


🎭 Series Post

View all