कृष्णसखा - ६ पसारा.

ज्याच्या निर्मितीचे मुळ आनंद आहे.

**(तसा प्रत्येक भाग जरी वेगळा असणार आहे. शीर्षकही वेगळे असणार आहे तरी ... मनीचा  "कृष्णसखा" हे  या ललित लेखनातलं समान सूत्र आहे. आपल्या मनातूनच वावरणा-या या नीळ कृष्णसख्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल ना! )

कृष्णसखा - ६.

पसारा

ले.©सौ पूनम राजेंद्र.

घरभर ढीगभर पसारा, ओह्ह!  बापरे!!


घरातला प्रत्येक कोपरा पसा-याने वेढलेला. घरातला तो  एवढा पसारा मांडून त्याकडे पहात राहिलेली माझी मैत्रीण ईशा. कधी आवरणार पुटपुटत एकीकडे आवरत होती. 

माझ्याकडे नजर जाताच ईशा म्हणाली,  पाहते आहेस ना?  केवढा हा पसारा या आमच्या  तिन खणीतला,  बाप रे! आता घर बदलायचं घेतलं तेव्हा समजलं! किती काय भरलेलं आहे ते.

अगं, नको असेल ते दे की सोडून. नव्या जागी नव्याने घे काही.

माझं बोलून संपत नाही तोच डोळे मोठे करून बघितलं.

मग डोळे मिचकावत म्हणाली. सगळं लागतं हो आम्हांला. नवीन घेतलं म्हणून जुनं नाही टाकवत बाई!
कुणी आपल्याच माणसांनी वस्तुरूपाने, प्रेमाने दिलेल्या आठवणी आहेत. त्यातली काही माणसं अजून आहेत तर काही फक्त आठवणीत आहेत. एवढ्या पसाऱ्यात त्यांची एक आठवण अडचण कशाला वाटून घ्यायची!! राहू दे बाय त्यांनाही सुखाने आपल्यासह.

असं आहे होय. राहू दे हो बाय मग तुमच्यासह त्यांनाही. तू म्हणतेस तसं सु-खा-ने. असं म्हणत मस्त हसलो.

मग छानपैकी तिला चहा करून दिला आणि पुन्हा तिला तिच्या आणि तिच्या आपल्यांच्या आठवणी पॅक करण्यासाठी तरतरीत करून दिलं.

ईशा म्हणजे आमच्याच बिल्डींगमधे, वरच्या मजल्यावर राहणारी माझी मैत्रीण. वरच्या मजल्यावरचं घर बदलून आमच्या शेजारच्या जागेत रहायला येत होती. म्हणजे वन बीएचके मधून टू बीएचके मधे.

एक रूम आणखी मिळाली, थोडा आणखी पसारा वाढवण्यासाठी. आता जेव्हा टू मधून थ्री मधे जातील तेव्हा आणखी एक रूम वाढलेली असेल नाही पसारा वाढवायला.

हा... हा...

असो. किती पसारा असं जरी म्हणत असली तरी , खरंतर ईशा या पसा-याच्या  निमित्ताने उलगडलेल्या आठवणींच्या आनंदात रमलेलीच दिसत होती. 
तिला तिचा तो पसारा आनंदाने सांभाळताना आणि ऊत्साहाने आवरताना पाहून मनात आपोआपच तरंग उमटले.  खरंच आपणच किती वाढवत रहातो असा पसारा.  काही  लागणाऱ्या  तर  ब-याचशा न लागणा-या वस्तूंचा.  काही ना काही बहाणे असतातच. कधी आपल्यांच्यासाठी तर कधी आपल्यांच्या आठवणींसाठी वगैरे वगैरे. जणू काही आपल्यासाठी आपल्याला काहीच नको असतं! खरंच खरं असतं का हे? की हा पसाराच कधी आनंदरूप होऊन रहातो! कारण यातील एकेक वस्तू तिच्या ठायी स्मृतीगंधाचा साज सजवून राहिलेली असते.

खरं तर एक सिकंदर आपल्यातही असतोच नाही का दडलेला? इतिहासातल्या त्या सिकंदराला, जग जिंकून जेता म्हणून मिरवायची आंस होती. त्या आशेवर सतत संघर्षरत राहिलेला तो. पण शेवटी जाताना जग नाही जिंकू शकलो, ही बोचरी अपूर्णता घेऊनच जावं लागलं बिचा-याला.
देह अदृश्य झाला त्याचा पण जणू राहिलाय का तो वस्तीला प्रत्येकाच्या मनांत? कदाचित थोडा अधिक शहाणा होऊन!
कारण कुणी एकटा जग जिंकू शकतो ही संकल्पना मोडीत गेलेली पचवलीये ना त्याने. हं Ss ... आता जीवनभर पूर्ण करत रहावी लागेल अशी एखादी कल्पना तो घोळवत नाही बहुधा.

पण  म्हणजे असं कुठे आहे की तो इच्छा घोळवत नाहीये. तसंही इच्छा असणं वाईटच, असं कुठे आहे? खरं तर या  जगाची उपजही परमेश्वराच्या इच्छेतून आहे असं मानलं जातं. ज्याच्या निर्मितीचे मुळ आनंद आहे. परमेश्वर तर  पूर्ण आहे. पूर्णातून पूर्णाचीच निर्मिती होते.  म्हणजेच त्याच्यासारखाच त्याने निर्मिलेला जगाचा पसाराही पूर्णच आहे. या पसा-यामधे तो नाही, असं काहीच नाही. आपणही याच जगाचे घटक. आपल्या संवेदनशील मनात वसणाराही तोच तर आहे.

तोच तो नटखट कृष्णसखा. शुभ इच्छांचे संकल्प घेणारा. पूर्तीचे समाधान घेणारा. संकल्प ते पूर्ती या प्रवासात वस्तूरूप वास्तुरूप आठवणरूप आनंदपसारा मांडणारा.

उगाच नाही ईशाही तिच्या वस्तुरूप आठवणींच्या पसा-यात आनंदात दिसत होती.

घरच्या पसा-यातल्या ईशाच्या मनातला कृष्णसखा आणि जगाच्या पसा-यातला जगदीश्वर सखा. व्यष्टी आणि समष्टी. निखळ आनंदरूपच. खरंय ना!




🎭 Series Post

View all