कृष्णसखा - ५ 'इक ले दुजी डाल'

प्राची, तुला निवडीला छान वाव आहे बरं!
**(तसा प्रत्येक भाग जरी वेगळा असणार आहे. शीर्षकही वेगळे असणार आहे तरी ... मनीचा  \"कृष्णसखा\" हे  या ललित लेखनातलं समान सूत्र आहे. आपल्या मनातूनच वावरणा-या या नीळ कृष्णसख्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल ना! )

कृष्णसखा - ५.

इक ले दुजी डाल
(ले.©️सौ. पूनम राजेंद्र.)

प्राची आता नववीतून दहावीत जाणारी. अभ्यासात हुषारच पण चित्रकलेत विशेष रुची असणारी. मेंदी काढण्यात नंबर वन. चित्रकलाच नव्हे तर सजावट आणि स्वैपाकाचाही शौक असणारी. ऋचाची चिमुकली पण स्मार्ट सख्खी शेजारी.

अरे वाह, एवढीएवढीशी म्हणतां म्हणतां दहावीत आली की गं तू. मग दहावीनंतर पुढे काय करायचं ठरवलं असशील ना गं!

तुझी चित्रकला तर खूप छान आहे. मग फाईन किंवा कमर्शियल आर्ट, आर्किटेक्चर की आणखी काही वेगळं?

अगं तिला खाण्याची आणि खिलवण्याचीही खूप आवड आहे. त्यामुळेच हाॅटेल मॅनेजमेंटचाही विचार चालू आहे. प्राचीची आई पटकन बोलून गेली.

हो. अगदीच पटतंय. खरंच आवड आहे तिला. परवा खूप छान बनवलेला ढोकळा. जाळीदार आणि लुसलुशीत. ऋचाने मनापासून दाद दिली. 

तेवढ्यात प्राचीने तिने नुकतेच काढलेले सुभाषचंद्र बोस यांचं स्केच ऋचाला दाखवलं.

अरे वा  , मस्तच आलंय की गं. स्केचिंग आणि शेडींग तर एकदम सही. सगळं कसं बाई छान छान जमून जाते आमच्या प्राचीला. चित्रकलेत एक्स्पर्टच आणि पाककलाही उत्तम.
प्राची, तुला निवडीला छान वाव आहे बरं!
आता फक्तं तुला ठरवायचं आहे , तुला यापैकी काय करायला अधिक आवडेल?

तेच तर ना मावशी, या निवडण्यावरून गोंधळ आहे नुसता. हाॅटेल मॅनेजमेंट घेऊ की  चित्रकला. तेवढ्यात प्राचीचे बाबा  ऑफीसमधून आले. घरात शिरता शिरता त्यांच्या कानावर संवाद गेलाच होता. तिच्या चेहऱ्यावर उमटलेला गोंधळही त्यांच्याकडून टीपला होता.

हे बघ, माझं मत तरी हाॅटेल मॅनेजमेंट घ्यावं असं आहे. पण पाहू, कदाचित करीयर कौन्सिलिंग करून घेऊयात. पुढे जाऊन 'तुमच्यामुळे घ्यावे लागले' असं नको वाटायला. काय प्राची, चालेल ना?

अगं कसंय नं, एक कबीरवाणी आठवली बघ. प्राचीचे बाबा म्हणाले.
"चिंटी चावल ले चली । बीचमे मिल गई दाल ।
कहै कबीर दो ना मिले । इक ले दुजी डाल ।।"
म्हणजे मुंगी तिला मिळालेला तांदळाचा दाणा घेऊन घराकडे जात असते. तर वाटेत तिला डाळ दिसते. ती डाळही तिला हवीशी वाटत असते. आता दोन्ही घेऊन जाणं तिला काही पेलवणारे नसते. कितीही चलबिचल झाली तरी, तिला डाळ किंवा तांदुळ यापैकी एक टाकून देऊन , एकाचीच निवड करून पुढे जावं लागणार असतं.

तसं आपल्यालाही ड्रॉईंग की हाॅटेल मॅनेजमेंट अशी निवड करायची आहे. खरं नं? त्यासाठी हल्ली कौन्सिलिंगची सोय छानच झालेली आहे. तर मदत घेऊयात त्यांची.

तशी प्राचीच्या चेह-यावरची दुविधा थांबली. खुषीत हसली ती. हो. खरंच, करीयर कौन्सिलिंगच करून घेऊयात.

प्राचीच्या चेह-यावरची खुषीची झलक पाहिली आणि ऋचालाही लगेच फरक जाणवला.  गोंधळलेली प्राची आणि उत्साही प्राची केवढा फरक!

खरंच जीवनात नेहमी समोर येणारे प्रश्न हे असे पर्यायाच्या उपलब्धीवरून ठरतात नाही?  पर्याय जेवढे अधिक तेवढा निवडीला वाव अधिक. तेवढा  'हे की ते' किंवा 'असं की तसं' चा उडणारा गोंधळ अधिक. बहुतेकदा अशा दुविधेत अडकत रहात असतो आपण, नाही?!
प्राचीसारखंच,  माझ्यावरूनही  नक्कीच याचं उत्तर 'हो' सांगू शकेन. ऋचा स्वतःशीच हसली.

तेव्हा असं वाटायचं, अरे, माझ्याच बाबतीत असं नेहमी कसं घडून येतं. नेहमी निवड करावी लागते. काय गौडबंगाल हे!

पण जीवन जसं जसं पुढे जात राहिलं  तसं मग लक्षात यायला लागलं. एकटी मीच नाही तर 'मी' नावाचं मानवी मन  या 'दुविधा' नामक गौडबंगालात नेहमीच अडकत आलं असावं. म्हणून तर या  विकल्पांवर मोजक्या आणि नेमक्या शब्दातली ही कबीर वाणी आली.

" कहै कबीर दो ना मिले, इक ले दुजी डाल". 

अशा दुविधेत, दोनपैकी एक निवडून, दुसरं शांतपणे सोडून द्यावं. असं सुचवणारी ही टीप्पणी , मौलिकच नाही!

प्रत्येक वेळी निवड तर करावीच  लागते. लहानपणी ही निवड आपल्यासाठी कुणा वडीलधा-यांनी केलेली असते. जसजसे मोठे होत जातो तसे या निवडीतले  क्लेश अधिक जाणवत जातात. कारण ही निवड आपल्याला करायची वेळ येते. एकदाच नव्हे तर वेळोवेळी येत रहाते.
खाणंपिणं, रहाणं, नोकरीं, व्यवसाय, जोडीदार, अध्यात्म सगळ्याच ठिकाणी ही निवड लागू होत रहाते.

पण खरंच, आजकाल अशा कौन्सिलिंगची बरी सोय झालीये.
जणू त्यांच्यामार्फत म्हणजे त्रयस्थ होऊन कृष्णसखा प्रत्येकाला त्याच्या योग्य मार्ग दाखवत रहातो आहे.

नाहीतर या दुविधेत सापडून मन भिर भिर भिरभिरत रहातं. गोंधळात गोंधळ घालत रहातं.

कबीराने अगदी सोप्या रितीने या दोह्यात  मुंगीच्या खाण्याच्या निवडीतून ते मांडलंय. ते एकदम पटतंच.
जीवन सहजसोपं होण्यासाठी अशा कौन्सेलर नामक कृष्णसख्याच्या सहाय्याने \"इक ले दुजी डाल\" मंत्र सिद्ध करून घ्यावा हेच खरं!

म्हणजे पुढे जाऊन ,ते दुसरं निवडलं असतं तर , या गोंधळी कल्पनेच्या भोव-यात मन अडकणार नाही. गोंधळाच्या भोव-यात अडकलं नाही तरच मन प्रवाही राहतं आणि जीवन उत्साही.

ऋचाला नवल वाटलं, गुरूवचनं त्यांचं काम कसं अचूक करत असतात! ती असतातच इतकी मार्मिक की आपल्यातल्या विवेकाला हलवतात.  मनाला 'इक ले दुजी डाल'ची दिशा दाखवणा-या कृष्णसख्यापर्यंत नेऊन पोचवतात. ज्यांच्या योगे आपल्यातल्या गोंधळाला तटस्थपणे पाहण्याची दृष्टी मिळते आणि गोंधळाला पूर्णविराम मिळतो.

तर असा गोंधळ संपल्यावर लख्ख हसणा-या प्राचीकडे पहात अशीच आनंदी रहा हो म्हणत, ऋचाही प्रसन्नतेने तिच्या घराकडे वळली





🎭 Series Post

View all