May 24, 2022
ललित

कृष्णसखा - १. मुग्धा

Read Later
कृष्णसखा - १. मुग्धा

**(तसा प्रत्येक भाग जरी वेगळा असणार आहे. शीर्षकही वेगळे असणार आहे तरी ... मनीचा \"कृष्णसखा\" हे या ललित लेखनातलं समान सूत्र आहे. आपल्या मनातूनच वावरणा-या या नीळ कृष्णसख्याबद्दल जाणून घ्यायला आवडेलच ना! )


?कृष्णसखा - १.
मुग्धा
ले.©️ सौ.पूनम राजेन्द्र.


"मम मनी कृष्णसखा रमला Sss..."
अंSss
सीए चं ऑफिस म्हणजे चोपड्या फाईल्स आणि टॅली करणे हे समीकरणच. आर्टिकलशिपसाठी मुग्धा नुकतीच या ऑफिसात रुजु झाली होती. कॅल्सीवर टोटल्स करत ट्रायल बॅलन्स टॅली करण्याची धडपड चालू होती.

तेवढ्यात कानावर खणखणीत आवाजातलं हे गुणगुणणं आलं. खुदकन हसू उमटलं. चला म्हणजे सरांनी करायला घेतलेली बॅलन्सशीट टॅली झालेली दिसतेय तर.
तेवढ्यात सरांचा आवाज आलाच. चला रेS भुका नाही का लागल्या. चला आपापल्या शिदो-या घेऊन या. टोटल खाऊन पोट भरणार असाल तर तसंही सांगा. त्याला आमची ना नाही. फक्त आणलेली शिदोरी आमच्या ताब्यात द्या म्हणजे कसं आम्ही तुमच्या वाटणीच्याही उदरभरणाला सुरूवात करतो. काय कळलं!!

टॅलिंगचा ताण निरसून वातावरण प्रसन्न शिडकाव्याने हसू लागलं. टेबलवरच्या चोपड्या सरकत जाऊन एकेकाचे डबे विराजमान होऊ लागले. मस्त रंगतदार मेन्यू लांबलचक टेबलावर ठाण मांडून बसला. \"कृष्णसखा रमला\"ची मघाची धून मनात गुणगुणू लागली.
सगळ्यांच्या मनातला कृष्णसखा मात्र एकीकडे कुणी काय आणलंय याचा अंदाज घेत त्यातून आपल्या आवडीचं वाढून घेत गप्पांसह आस्वाद घेण्यात रमून गेलेला. हंंSs , सख्याचा गोपालकाला हा जसा!

आज जणू कृष्णसख्याचाच दिवस होता. मुळात खोडकरच तो. हळूच त्याने एका प्रश्नाचा चेंडु टेबलवर सरकवलाच. कृष्णासाठी एखादी गोपिका व्हायला आवडेल, राधा व्हायला आवडेल की रुक्मिणी!

मला तर कृष्ण व्हायला आवडेल. मुग्धा चटकन बोलून गेली आणि स्मार्ट आन्सर म्हणत टेबलाने मस्त टाळ्या झेलल्या.
खरं तर मुग्धालाही स्वतःच्याच अनवधानाने आलेल्या उत्तराचं नवलच वाटलं.

यथावकाश लग्नं झालं. ते ऑफिसही सुटलं. संसाराच्या रासक्रीडेत रमलेल्या मुग्धाच्या मनात क्वचित कधीतरी हा प्रसंग डोकवून जायचा. तिचं मन रासक्रीडेत मनापार रहाणा-या कृष्णसख्याचा वेध घेऊ पहायचं. पण ते तेवढ्यापुरतंच, तेव्हाच्या मुग्ध मनाच्या कल्पनेला डोळे मिचकावून पहात, हसून परत कामात गुरफटून जायची.

पण, एकदा अगदी अवचितच
"अगं ईश्वराने दिलेले सिग्नल कळणं हे चांगलंच आहे. पण ईश्वरच होऊन रहाणं हे सगळ्यात चांगलं आहे बघ!" हे वाक्य फोनवरून ऐकलं आणि तिच्या मनाने कृष्णसखा होण्यासाठीचा तो कौल मानला. हो तर, किती वर्ष रास खेळवत ठेवून शेवटी कृष्णसख्यानी गुरूमाईच्या रूपाने कौल दिला होता. रासक्रीडेत खरंचंच कृष्णसखा अवतरणार होता.
त्यावेळी तिच्याकडून गेलेलं उत्तर अनवधानाने नव्हतं तर! ते जाणवून तिचं मन आता तिच्या कृष्णसख्याचं स्वागत करण्यामधे मुग्ध होऊन गेलं.


---

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now