Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग -१३

Read Later
कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग -१३


शीर्षक - कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग १३

सखी फोटो कडे एकटक पाहत होती आणि कृष्णा नकळत तिच्याकडे एकटक पाहत होता. फिक्कट पिवळ्या रंगाची साडी आणि तसाच काहीशा रंगाचा तिच्या खांद्यावरून आलेला पदर , ती सावरून बसलेली. हातात फोटो घेऊन एकटक फोटोला पाहताना तिचा चेहरा किती शांत वाटत होता.

ती जशी तिथून उठली तशी कृष्णाने तिच्या वरची नजर चोरली‌ ती बेडच्या एका कोपऱ्यात फोटो ठेवून खोलीच्या बाहेर गेली आणि कृष्णाने मोकळा श्वास घेतला. त्याने तो फोटो घेतला आणि पुन्हा भिंतीवर लावणार इतक्यात फोटो वरील पाण्याच्या दोन टपोऱ्या थेंबांनी त्याचा लक्ष वेधून घेतलं.

" पाणी ???

कसं??"

तो आश्चर्याने बोलला आणि नजर दरवाजावर गेली तोपर्यंत सखी नजरेआड झालेली.

" म्हणजे सखी रडल्या ??
पण का ? आणि मला कसं कळलं नाही ?
यांचं काहीच कळत नाही ." तो स्वतःशीच पुटपुटला.

त्याने फोटो घाई घाईत भिंतीवर लावला आणि तिच्याशी बोलायला ओटी वर आला पण ती स्वयंपाक घरात होती. स्वयंपाक घरातून बांगड्यांचा आवाज आल्यावर अंगणात जायला वळलेला तो स्वयंपाक घराच्या दाराशी आला . तो तिला बोलणार इतक्यात सखीने खांद्यावरचा पदर खाली सोडला आणि माठातील पाणी काढू लागली. पाठवून दिसणारी तिची नाजूक काया , पाठच्या गोल गळ्यातून दिसणारी तिची गोरी पाठ,  आणि पहिल्यांदाच झालेल ओझरत कमरेच दर्शन त्याने एक नजर पाहिलं पण आपण काहीतरी चुकीचं करतोय ही भावना अचानक त्याच्या मनात आली आणि नजर चोरत तो तिरपा उभा राहिला.

"अहंम्म अहंम्म.."

पाणी पिता पिता सखीला तो पाठी असल्याची जाणीव झाली . तिने ग्लास एका हातात धरत पटकन पदर खांद्यावरून घेतला. आणि मागे वळून पाहिलं .
तो दरवाजामध्ये तिरपा उभा होता .

"काही हवं का?"

"हो"
एकच शब्द..

"काय हवंय?"

"उत्तर"

"कसलं उत्तर?"

"मघाशी तुमच्या डोळ्यात पाणी का आलं?"
त्याने स्पष्टपणे शांत आवाजात विचारलं.

आणि ती चमकली.
'यांना कसं कळलं
आणि काय सांगू ? '
ती मनातच बोलली.

तिच्याकडे न पाहताच त्याने पुन्हा विचारलं,

"मी काहीतरी विचारलं तुम्हाला?"

" हा... ते ... ते ... नाही आलं डोळ्यात पाणी."
ती कशीतरी बोलली.

खोटं कानावर पडताच त्याने रागात तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या नजरेने ती बिथरली.

"मी ... मी खरच सांगतीये... !"
ती स्वतःला सावरत बोलली पण् तो तिच्याकडे पाहतच एक पाऊल पुढे आला आणि आपोआप त्याचा आवाज थोडा चढला,

"मला खोटं आवडत नाही ."


साडीचा पदर बोटाला गुंडाळत ती घाबरून मनातच..

'अरे देवा का आलं डोळ्यात पाणी ?
मलाच माहीत नाही..
यांना काय सांगू? '

त्याला तिच्याकडून उत्तराची अपेक्षा होती आणि ती तशीच खाली बघत बोटांनी पदर गुंडाळत होती.

"मी प्रश्न विचारल्यावर विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं नाही तर मला राग येतो. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं का नाही ?"
तो जरा रागातच बोलला.

आणि तिने घाबरून त्याच्याकडे पाहत हो म्हणून मान हलवली.

'पण मी विद्यार्थी नाही ..'
हे तिला बोलायचं होतं पण तिची हिंमत झाली नाही.

"खरंच किती हट्टी आहात तुम्ही ?
का मुद्दा म्हणून मला तसं दाखवता ."
तो जरा वैतागून बोलला.

आणि ती पुन्हा तशीच बोलली जे आधी बोललेली, "नाही हो , मी जराही हट्टी नाही."

'कृष्णा वाचव मला ! '
ती म्हणतच कृष्णाचा धावा करू लागली आणि बाहेरून आवाज आला,

"येऊ का आत?"

"विचारून का येतोस ?
तुझंच घर आहे ."
असं बोलत कृष्णा स्वयंपाक घरातून बाहेर ओटीवर आला आणि नाना पायातल्या चपला काढून हसतच आत मध्ये आला. कृष्णा ने लगेच नानाच्या हाताला पकडून आतल्या खोलीत नेलं आणि त्याला जरा वैतागून बोलला,

" नाना त्यांना  शेवटचं सांगून ठेव. जे आहे ते स्पष्ट बोलत जा ."

नाना आश्चर्याने बोलला,
"कृष्णा तू आता सखी सोबत भांडत होतास??"

"गप्प बस !
भांडण्यासाठी दोन माणसांनी बोलावं लागतं.
त्या माझ्याशी बोलतच नाहीत."
कृष्णा नानावर भडकला.

"म्हणजे ती तुझ्यासोबत भांडत नाही हा तुझा प्रॉब्लेम आहे ?"
नाना हसत..

"च्या मारी !
तुला सांगतोय काय तू बोलतोय काय ?
नाना डोक्यावर पडलास का?"
कृष्णा चांगलाच तापला.

नाना आपलं हसू आवरत घेत कृष्णाला शांत करतं बोलला,
"अरे हो हो ... इतकं रागवायला झालं काय?"

"मघाशी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं.. मला नाही आवडणार त्यांच्या डोळ्यात पाणी!"

कृष्णा  रागात बोलला असला तरी त्याच्या
बोलण्याच्या मागे त्याच्या मनात फुलतं असणार प्रेमांकुर नानाला दिसत होतं.

पण् सखी च्या डोळ्यात पाणी ?
या विचारानेच नाना सुद्धा अस्वस्थ झाला.

"बघतो मी "
अस बोलून नाना ने बाहेर येत सखीला आवाज दिला,

"सखी, कुठं आहेस तू ?"

"रंगी जवळ आहे मी"
सखी चा मागच्या बाजूने आवाज आला.

नाना दिंडीच्या दरवाजातून गोठ्यात गेला. तिथूनच सोनाबाई झाडाखाली खाटेवर पडलेल्या दिसतं होत्या. मुलं दिसत नसली तरी त्यांचा आवाज येत होता आणि सखी रवंथ करीत बसलेल्या रंगीला गोंजारत तिच्या पुढ्यात बसलेली.

"कशी आहेस सखी?"

नाना पायरीवर बसत बोलला.

"मस्त..तू कसा आहेस नाना?"

"टकाटक.."
नाना हसत आणि

"सखी मला खरखर सांगशील?"
नानाने हळू आवाजात विचारलं.

"काय ?"
सखीने मागे वळून पाहिलं.

"तुझ्या डोळ्यात पाणी का आलं?"
नाना ने काळजीने विचारलं.

आणि सखी ने पुन्हा रंगी गाईवर नजर फिरवली.

'यांनी नानाला पण् सांगीतलं..आता काय सांगू नानाला?'

सखी मनातच..

"काकू काही बोलली का?
हे बघ , तसं असेल तर मी आधीच सांगतो, काकू मनाने निर्मळ आहे. फक्त तिची प्रेम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे."
नानाने अंदाज लावला.

"तसं काहीच नाही नाना"

"मग काय आहे?
सांग की !

एक मिनिट, तुला तुझ्या माहेरची आठवण येतीये का?"

काही तरी उत्तर देणं अपेक्षित होतंच
त्यामुळे नानाच्या अंदाजाला  सखी ने होकार दिला.

"हो आईची आठवण येतीये."


"सागरला सुट्ट्यांचा प्रॉब्लेम होता त्यामुळे ते चार-पाच दिवसात लगेच मुंबईला गेलेत नाहीतर तुझं तिकडे जाणं झालं असतं."
नाना सखीला समजावत बोलला.

"तू नको काळजी करू नाना..
मी ठीक आहे आता ..

चल पोहे करते."

"नाही नको, जेवून आलोय आत्ताच..
तुझं चालू होते."

असं बोलत नाना आत मध्ये आला . कृष्णा ओटीच्या पायरीवर बसून विचारांमध्ये हरवलेला की नाना येऊन शेजारी बसला.

"काही बोलल्या का ?"
कृष्णाने डायरेक्ट मुद्द्याचा विचारलं.

"तिला तिच्या आईची आठवण येतेय."

कृष्णाने कपाळाला हात लावला .
"हे मला सांगायला काय झालेलं?"

"तुला घाबरली असेल ती."
नानाने अंदाज लावला.

कृष्णा थोडा सरळ बसत बोलला,
" नाना जरा माझ्याकडे नीट बघ."नाना कृष्णाला निरखून बघत बोलला,
"काय बघू?"

"मला शिंगे फुटलेत का?
हे बघ."

नाना हसायला लागला.
" कदाचित तुझी शिंगे फक्त सखीलाच दिसत असतील." असं बोलत तो अजूनच हसायला लागला.

कृष्णा चेहऱ्यावरील एकही रेषा न हलवता गंभीर स्वरात बोलला,
"तुझ्या विनोदावर मी खूप हसलो."

त्याचा चेहरा आणि डायलॉग ऐकून तर नाना अजूनच असायला लागला आणि हसतच नाना बाईकवर टांग टाकून निघूनही गेला.

कृष्णा थोड्या वेळ तिथेच बसला नंतर तो सुद्धा दिंडीच्या दरवाजाजवळ आला आणि शांतपणे बोलला,

"चला"

रंगीला गोंजारता गोंजरताच सखीने मागे वळून पाहिलं. तिच्या कपाळावरची आठी ने त्याला प्रश्न विचारला,

कुठे ??

"काम आहे ."
तिचा चेहरा वाचून त्यांनी उत्तर दिलं आणि तो आत मध्ये आला. त्याच्या पाठोपाठ सखी ही आली. कृष्णाने बाईकची चावी घेतली आणि अंगणात येऊन सोनबाईंना आवाज दिला,

"आई आम्ही आलो."

सखी दारातच उभी होती. लग्नानंतर दोघे पहिल्यांदाच बाहेर कुठेतरी जात होते. मुलींमुळे त्या दोघांना एकांत असा भेटलाच नव्हता. कृष्णा स्वतः सखीला घेऊन बाहेर जातोय हे बघून सोनबाई आनंदाने खाटेवर उठून बसल्या,

" जा जा ..मी बघते पोरांना."
त्या हसत बोलल्या.

लगेच आरव आणि सुरज धावत गाडी जवळ आले. "मी पण येणार.. मी पण येणार ."
त्यांच चालू झालं.

"अरे आम्ही कामासाठी जातोय. तुम्हाला गाडीवरून फिरवून नंतर आणतो ."
कृष्णा त्यांना समजावत होता .

तेवढ्यात सोनाबाई आल्या आणि दोन्ही नातवंडांना च्या कानात काहीतरी सांगितलं आणि दोघांनाही घेऊन खाटेवर जाऊन बसल्या. सखी अवघडल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. तिने हळू आवाजात विचारलं,

"आपण कुठे बाहेर जातोय का?"

"तुम्हाला अजून हा प्रश्न पडलाय? "

त्याने मान तिरपी करून तिच्याकडे पाहिलं

"म्हणजे मी तयार सुद्धा झाले नाही म्हणून विचारलं." सखी अडखळत बोलली.

"तुम्ही अशाही छान दिसत आहात ."

त्याच्या तोंडून नकळत आलेलं कौतुक ऐकून सखीला बरं वाटलं.. ती गालाच्या कोपऱ्यात हसली.

"चला बसा आता?"

"बाईकवर??"
असं बोलताना गालाच्या कोपऱ्यातल्या हसू गायब झालं आणि तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले.

'किती इरिटेट करतात . कितीही ठरवलं रागवायचं नाही तरीसुद्धा राग येतो .'
कृष्णाने तळ हातामध्ये चेहरा झाकला आणि मनातच त्यांच चालू झालं.

" म्हणजे मी बसते ."
सखी मनाचा हिय्या करून बोलली आणि स्टॅन्ड ला पकडून बाईकवर बसली. नेहमीसारखाच खांद्यावरून पदर होता.

बाईक चालू झाल्यावर सखीचा हळूच आवाज,
"सावकाश घ्या."

"बरं"

बाईकच्या आरशात सखीचा उडणारा पदर पाहून कृष्णाने मान हलवली आणि बाईक एका बाजूला उभी करत बोलला,
" जरा खाली उतरा ."

"आता कशाला?"
तिला पुन्हा बाईकवर बसायचा कंटाळा आलेला.

"उतरा पटकन."

सखी खाली उतरली तो पुढे बघतच बोलला ,
"बाईक वर बसताना पदर नेहमी कमरेला खोचत जा."

सखीने स्वतःच्या खांद्याकडे पाहिलं.
खांद्यावरचे डाग कोणाला दिसू नयेत म्हणून तिचा पदर नेहमी खांद्यावर असायचा पण त्याचं बोलणंही बरोबर होतं . तिने पदर कमरेला खोचला . बाईकच्या स्टॅन्ड ला पकडून पुन्हा बाईकवर बसली.

बाईक एका वळणावर थांबली .

"उतरा आता. "

सखी बाईक वरून उतरली . ती इकडे तिकडे पाहत होती ‌. तिला काहीच कळेना.
इथे कशाला आलोय?

"चला"

त्याने सांगितल्यावर ती सुद्धा काही अंतर राखून त्याच्यासोबत चालू लागले. एक चढण चढल्यावर छोटीशी टेकडी आली. तिथे गेल्यावर कृष्णा टेकडीवर बसला. दिवस मावळतीकडे झुकत होता त्यामुळे सूर्यप्रकाश असून सुद्धा त्याची तीव्रता जाणवत नव्हती.

तो बसल्यावर सखी सुद्धा थोडं अंतर राखून बसली . कृष्णाने मोबाईल काढला आणि तिच्यासमोर धरत बोलला,

" तुमच्या आईला कॉल करा म्हणजे व्हिडिओ कॉल करा.. तुम्हाला बरं वाटेल."

सखी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. तो इतक्या लांब फक्त व्हिडिओ कॉल वर बोलण्यासाठी आलेला ! तेही तिचा विचार करून ...
फक्त तिच्यासाठी... !!

एक क्षण पुरेसा असतो प्रेम करण्यासाठी ..!! एक क्षण पुरेसा असतो कोणावर तरी जीव जडण्यासाठी !!

सखीच्या मनात त्या क्षणी कितीतरी भावनांनी जन्म घेतलेला. आश्चर्य , आनंद यासोबत भूतकाळातल्या टोचलेल्या टाचण्यांवर मलम लावलं जात होतं . तिच्या डोळ्यात हलकसं पाणी तरळल आणि तो पुन्हा बोलला,

"समजू शकतो मी ,
लग्न झाल्यापासून तुम्हाला माहेरी जायला भेटलं नाही आणि तुमचे माहेरचे सुद्धा आले नाहीत. आपल्या इथून फक्त बोलता येतं . ते सुद्धा रेंजमध्ये मध्ये जाते . नेटवर्क तर बोलायलाच नको. त्यामुळे तुम्हाला इथे आणलं. इथं तुम्ही तुम्हाला हवं तितका वेळ व्हिडिओ कॉल वर बोलू शकता आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तेव्हा आपण इथे येऊ.
घ्या मोबाईल."

सखी त्याच्याकडे पाहतच गालात हसली.

" तुम्ही खूप चांगले आहात क्रिश् ऽ न...!"

ती नकळत बोलून गेली आणि तो गालात हसला .
तिने मोबाईल घेतला आणि आईला कॉल केला.
तो असतानाही ती तिच्या आईसोबत बराच वेळ बोलत होती. तिला बोलताना प्रायव्हसी मिळावी म्हणून कृष्णा तिथून उठून थोडा लांब जाऊन चालत लागला.

आई सोबत , वहिनी सोबत बोलल्यावर सखीने फोन ठेवला आणि ती तिथेच बसून कृष्णाला पाहत होती.

टू बी कंटिन्यू..

©® प्रियांका सुभा "कस्तुरी"
०६/०९/२०२२

जिल्हा -सातारा, सांगली

(तुमच्या समिक्षा लिहायला प्रेरणा देतात.. धन्यवाद)ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//