Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) अंतिम भाग -१५

Read Later
कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) अंतिम भाग -१५


विषय - कौटुंबिक कथा

शीर्षक -कृष्ण सखी  -अंतिम भाग (भाग १५)

शाळा चालू झाल्यामुळे कृष्णाची सकाळपासूनच गडबड चाललेली.  त्याच्या सोबतच सर्वांचीच धावपळ चालू होती.  सुरज आपला कृष्णाच्या मागे मागे करत होता. सखीने डबा तयार केलेला . आरव ची लुडबुड सकाळपासूनच तिच्या मागे होती. आई माझ दप्तर..आई माझे कपडे..आई माझी वही..आई माझा पेन..आई माझी बाटली.. आई माझा डबा...आई ऽ हे कुठे आहे? ते कुठे आहे ? त्याची भूणभूण तिच्या मागे चालूच होती.

त्याचं बघता बघता शाळे साठी घराबाहेर निघणाऱ्या कृष्णाच्या हातात डबा देत ती बोलली,


"वेळेवर जेवा."

"सुट्टी झाल्यावर जेवेण."

"तेच बोलती , वेळेवर जेवा..."
ती हसली.

"बरं"
तो ही हसला.

कृष्णा बाईक वर बसला.  त्याला उगाच वाटलं की दारात सखी त्याला बाय करायला उभी असेल बुद्धीला पटत नव्हतं पण तरी सुद्धा त्याने मागे वळून पाहिलं तर सखी खरोखर दारात उभी होती .
त्याने पाहिल्यावर ती गालात हसली आणि तिने हात हात वर करून बाय केलं. त्याने तिला आपसूकच स्माईल दिली . जातो म्हणून खूणवलं.  हेल्मेट घातला आणि निघून गेला.    कृष्णा गेल्यानंतर सखी ने आरवच आवरलं आणि त्याला सुद्धा शाळेत पाठवलं.  त्याच्यासोबत सुरज सुद्धा बालवाडीत गेला .‌संध्याकाळी जेव्हा कृष्णा घरी आला तेव्हा दोघांची नजरा नजर झाली. ती  त्याच्याकडे पाहून गालात हसली.  तिला पाहून त्याला एकदम प्रसन्न वाटलं. त्याचा दिवस भराचा शिण निघून गेला.

     तिने त्याच्या हातातील बॅग घेतली आणि पाण्याचा तांब्या दिला.

त्यांच्यामध्ये न बोलताच एक प्रकारचा संवाद होत होता. सोनाबाई सुद्धा त्यांच्या प्रगतीवर खुश होत्या.

त्याचा दिनक्रम ठरलेला.  सकाळी सखी च्या हातचा नाष्टा , नंतर तिनेच भरलेली शाळेची बॅग घेऊन निघायचा. निघण्याआधी तिच्याकडे पाहून हसायचं आणि शाळेत जायचं . शाळा सुटल्यावर त्याला एक हुरहूर लागलेली असायची. 

घरी सखी वाट पाहत असेल याची...!
तिला भेटण्याची...!

कधी उशीर झालाच तर तिच्यापेक्षा त्यालाच कसतरी व्हायचं . तिने विचारायच्या आधीच तो कारण सांगून मोकळा व्हायचा .कधी बाईक मधील पेट्रोल संपलं.. तर कधी नाना भेटला..  तर कधी शाळेतच जास्तीचं काम निघालं.. तर कोण्या विद्यार्थ्याला दवाखान्यात न्यायचं होतं. घरी गेल्यानंतर तिचं त्याच्याकडे पाहून हसणं त्याला घरी आल्याचं समाधान द्यायचं.
तो त्याचाही न कळत सखीला त्याच्या काळजात जागा देऊन बसलेला.

सखी --

लग्न झाल्यापासून हे घर आणि या घरची माणसंच तिच आयुष्य बनलेली.  सोनाबाई - ज्या वरवर  कोणालाही खाष्ट सासूबाई वाटतील  पण त्यांचा प्रेमळ पदर सखीने पाहिलेला . तिला त्यांच्या प्रती खूप आदर होता.

     सुरज -  एक दहा वर्षांचा मुलगा आपल्याला आई म्हणून स्वीकारेल की नाही ? ही धाकधूक तिच्या मनात होती पण सूरजने पहिल्याच दिवशी तिच्या मनातील ही शंका दूर केलेली आणि आता तर सुरज आपलाच मुलगा आहे याच अविर्भावात ती सुद्धा वागत होती .


     रंगी- एक मुक जनावर . पण सखीला पाहिल्यावर ती सुद्धा हंबरत होती . तिने रंगीला मायेने गोंजारल्यावर ती सुद्धा गळ्यातील घंटा हलवत होती. आणि आपल्या मालकीणीकडून लाड करवून घेत होती.

आणि कृष्णा - त्याच्या तरं भोवती सखीचं मन दिवसभर घुटमळत होत. तो घरातून जाण्याआधी मनाला लागलेली हुरहूर तो परत येईपर्यंत तशीच असायची . पहिलं फक्त तो घरात असावा.. तिच्या अवतीभवती असावा असं  तिला वाटायचं.


     बघता बघता लग्नाला सहा महिने उलटून गेलेले. या सहा महिन्यांत कृष्णा आणि सखी मध्ये सहजता आलेली.‌ पहिलं फक्त कृष्णा अवतीभवती असावा असं तिला वाटायचं  पण हल्ली यापेक्षाही जास्त वाटू लागलेल.

     तिचा स्वभाव अबोल त्यामुळे शब्दांपेक्षा तिची नजरच जास्त बोलायची .  हल्ली सोनाबाईंनी ही आरव आणि सुरज या दोन्ही नातवंडांना बाहेर त्यांच्याजवळ झोपायची सवय लावलेली.  त्या रोज रात्री त्यांना गोष्टी सांगायच्या . त्यांच्यासोबत हसायच्या . थोडी मस्ती करायच्या.  त्यामुळे मुलांनीही आपल्या आई-बाबां जवळ झोपण्याचा हट्ट लगेच सोडला.

दोघांनाही एकांत भेटल्यावर सखी ची अंगाई बंद होऊन  दोघांच्या गप्पा चालू झाल्या.  गप्पांमध्ये कृष्णाच जास्त बोलायचा . त्याला कोणीतरी ऐकणार भेटलेलं . बाराच्या ठोक्यापर्यंत दररोज त्यांच्या गप्पा चालायच्या . बारा वाजले की सखी ,

"राहिलेल्या गप्पा उद्या मारूया का?"

असं बोलायची.  कारण पुन्हा त्याची झोप पूर्ण होणार नाही आणि दिवसभर शाळेत  मुलांना सांभाळता सांभाळता नको होईल.  या काळजीने मनात असतानाही ती गप्पांना पूर्णविराम द्यायची.

आजही बाहेर मुलं झोपल्यामुळे घरात शांतता झालेली आणि आत मध्ये सखी खिडकीजवळ उभी राहून बेडवर बसलेल्या  कृष्णाचे शाळेतील किस्से ऐकत होती.

"कधी कधी वाटतं तुम्हाला सुद्धा शाळेत  घेऊन जावं"
तो हसत बोलला.

"तिथं येऊन मी काय करणार?"

"असं का ?
शाळेमध्ये सुद्धा बऱ्याच गमती जमती होत असतात.  मग घरी येऊन मी तुम्हाला तेच सांगणार,  यापेक्षा असं वाटतं तुम्हालाच घेऊन जावं."

त्याच्या बोलण्यावर सखी हसली.
"असं वागलं तर लोक काय म्हणतील माहितीये?"

"काय म्हणतील?"

"म्हणतील की ... ..!"
ती बोलता बोलता थांबली.

"काही नाही जाऊ द्या."
आणि तिने नजर चोरत खांद्यावरचा पदर व्यवस्थित घेतला.


तो बेड वरून उठला आणि तिच्या जवळ येत तिच्याकडे एकटक बघत बोलला,

"हेच बोलतील ना,  की कृष्णा ला बायको शिवाय अजिबातच करमत नाही."

तिने खाली बघतच पदर  बोटाला गुंडाळत हो म्हणून मान हलवली.

तो गालात हसत तसाच चालत तिच्याजवळ आला.
"म्हणाले तर म्हणाले ..
खरच तर आहे."

आणि सखीने एकदम त्याच्याकडे पाहिलं.
त्याची तिच्या वर प्रेमाने रोखलेली नजर पाहून तिने लाजून पुन्हा नजर खाली झुकलेली.

"सखू ऽ ऽ ऽ "
तो प्रेमाने बोलला.

आणि तिने हळूहळू त्याच्याकडे पाहिलं.

त्याने एकदा तिच्या खांद्यावरील पदरा कडे पाहिलं. जो एकांतात त्याला खटकायचा. तो पुन्हा तिच्या डोळ्यात बघत प्रेमाने बोलला,

"मला एक खरं सांगाल?"

"काय?"
ती सुद्धा डोळ्यात पाहत..

"मी तुम्हाला इतका परका वाटतो का?
की एकांतात कटाक्षाने तुम्ही माझ्यासमोर खांद्यावरून पदर घ्यावा?"
कृष्णा जरा दुखऱ्या स्वरात बोलला.


"नाही क्रिश ऽ न... तस अजिबात नाही .
तुम्ही मला परके नाही."
सखी तळमळीने बोलली.

"पण तुम्ही वागतात तशा..  आताही पहा हातात कसा घट्ट पकडून ठेवलाय तो पदर..

माझी नजर तुम्हाला खटकली का कधी?
किंवा माझ्या एखाद्या स्पर्शामध्ये तुम्हाला कधी वासनेचा गंध जाणवला ?"

कृष्णा खूप गंभीर होऊन बोलत होता.  त्याचे शब्द सखीला लागत होते . तिच्या मनात तसं कधीच नव्हतं आणि त्याने किती गैरसमज करून घेतलेला.  तिच्या डोळ्यात पाणी आलं. हे पाहून तो लगेच बोलला,

" तुम्हाला दुखवायच नव्हत मला सखी..
पण बोलल्याशिवाय सुद्धा राहवलं नाही."

" तस नाही क्रिश्ऽ न .. मी तुम्हाला कसं सांगू ?  तुम्ही माझ्यासाठी काय आहात ?  उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी फक्त तुमचा विचार करत असते .

आणि राहिला प्रश्न या पदराचा तर ...!"
असं म्हणत सखीने खांद्यावरून पदर काढला.

कृष्णाची नजर तिच्या खांद्यावर गेली.  तिच्या खांद्यावर जागोजागी भाजलेल्या च्या खुणा होत्या.

"हे काय आहे ? आणि कसं भाजलं ?"
त्याने आश्चर्याने विचारलं.

"हेच प्रश्न नको असतात  मला ...हेच प्रश्न त्रास देतात मला .. कारण हेच प्रश्न मला पुन्हा भूतकाळात घेऊन जातात . या फक्त खुणा नाहीत माझा भूतकाळ आहे क्रिश् ऽ न... माझ्या पहिल्या लग्नाच्या काळ्या आठवणी "

असं बोलत सखीने चेहरा  ओंजळीत पकडला आणि ती रडायला लागली.

"सखी प्लीज,  तुम्ही रडू नका..  सॉरी ."

तरीसुद्धा सखी तशीच रडत होती.

"सखी " असं म्हणत त्याने तिच्या चेहऱ्यावरचे हात बाजूला केले . सखी खाली बघूनच डोळ्यातून पाणी काढत होती . त्याने तिचे डोळे पुसले आणि हनुवटी वर करत बोलला .

"भूतकाळापासून पळायचं नसतं सखी..
जे आहे ते स्वीकारा ‌ भूतकाळापासून पळल्यावर भूतकाळातली भूत मानगुटीवर बसतात . यानंतर तुम्ही खांद्यावरून पदर घेणार नाही आहात.
जे आहे ते आहे."

यावर सखी काहीच बोलली नाही.

" काय म्हटलं मी सखी ?
उद्यापासून तुम्ही खांद्यावरून पदर घेणार नाही आहात . माझ्या सखी खूप स्ट्रॉंग आहेत. " असं बोलत त्याने पुन्हा तिचे डोळे पुसले.

"माझ्या सखी ?"
ती त्याच्याकडे पाहत बोलली.

"जसा आरव तुमचा..  तसाच सुरज माझा ..!
आणि सुरज ची आई सुद्धा माझी..!
तो गालात हसला आणि सखी थोडी लाजली.

आणि सवयी ने तिने पुन्हा पदर खांद्यावरून घेतला. की लगेच...

" सखी ????"

त्याने बोलताच तिने जीभ चावली आणि पदर खांद्यावरून काढला.

"खरंतर हे डाग पाहिल्यावर आठवणी त्रास देतात. आणि मला नको त्या त्रासदायक आठवणी
क्रिश् ऽ न  "
सखी बारीक चेहरा करून बोलली.

ती असं बोलतच तो अजून एक पाऊल तिच्याजवळ आला आणि हलकेच तिला जवळ घेत बोलला,

" आठवणी आपण बनवायच्या असतात सखी ."
असं म्हणत त्याने तिच्या खांद्यावरच्या  व्रणांवर ओठ टेकवले आणि सखी शहारली.  त्याच्या ओठांच्या  स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे येत होते . तिने अलगद त्याला मिठी मारली आणि त्यानेही तिला घट्ट मिठीत घेतलं.

"क्रिश् ऽ न मला एक वचन द्याल ?"
ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलली.

"माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमची साथ हवी आहे.  मला दुसरं काही नको ."
असं बोलताना तिचे डोळे पुन्हा पाणावले.

त्याने तिला मिठीतून मोकळे केलं .

"हेच वचन मला तुमच्याकडून हवं आहे सखी..
आरू गेली..  मी आरवसाठी जगलो . आता ही दुसरी आरू सोडून जाण्याचा मी विचार सुद्धा सहन करू शकत नाही."
असं बोलत कृष्णाने पुन्हा तिला घट्ट मिठीत घेतलं.

त्यांची पहिली मिठी ..!!
त्यांच्या प्रणयाची सुरुवात ...!!
तो पहिला स्पर्श....!!
तो  भावनांना आलेला आवेग...!!

सगळं सगळं दोघांच्या आयुष्यात आधीही झालं असलं तरी सुद्धा त्या क्षणी दोघांसाठी पुन्हा नव्याने सुरुवात झालेली.

दोघांनीही एकमेकांना मनापासून स्विकारलेल.
त्याने तिला मिठीतून पुन्हा मोकळे केलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवणार तोच सखी ने मान फिरवली.

"सखी ???? "
तो आश्चर्याने..

आणि ती खिडकीकडे बघत हळू आवाजात..
"खिडकी उघडी आहे."

त्याने गालात हसत खिडकी बंद केली आणि तिला उचलून घेत तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्याच्या मानेल हातांचा वेढा देऊन सखी सुद्धा त्याच्या रंगात रंगून गेली.

दुसरेपणाचा शिक्का असून सुद्धा त्यांनी नव्याने एकमेकांना स्विकारत ... पुन्हा नवीन नात्याला एक संधी देत , स्वतःला आपल्या जोडीदाराला मनापासून समर्पित केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या एका नवीन आयुष्याची खरी सुरुवात झाली.‌


समाप्त..

©® प्रियांका सुभा कस्तुरी

जिल्हा - सातारा, सांगली

.......

(इरा वरची पहिलीच कथा मालिका असून कथेला तुम्ही खूप प्रेम दिलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. साहित्याच्या रूपाने भेटत राहू..
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//