Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी नविन नात्याचा प्रारंभ

Read Later
कृष्ण सखी नविन नात्याचा प्रारंभ


"राज्यस्तरीय करंडक स्पर्धा"

विषय - कौटुंबिक कथा

शिर्षक - कृष्ण - सखी ( नविन नात्याचा प्रारंभ)

"आई बाबा कधी येणाल..?
सांग ना कुटे गेले बाबा ?"

लहानग्या सुरज चे नेहमीचे प्रश्न चालू झालेले.

आणि ती नेहमी प्रमाने त्याला थातूरमातूर उत्तर देत होती,
"तुझे बाबा कामावर गेलेत."

"कुटे कामावल.. मुंबईला का गावाला?"

किती चौकस होता तो.. तिला क्षणभरासाठी त्याचं कौतुक वाटलं. पण् बापाच्या प्रेमासाठी किती तडफडतोय तो !
हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती स्वतः ला सावरत बोलली,

"खूप खूप लांब गेलेत."

"मग मी पण ज्याऊ त्यांच्याकडे"
तो निरागसपणे बोलला.

तिने लगेच सुरजच्या ओठावर बोट ठेवलं .
ती थोडी भावुक झाली,
" असं नाही बोलायचं बाळा."

लगेच तिथेच असणार्या सुरजच्या आजीने त्याला जवळ घेतलं आणि समजावत बोलल्या,
"लवकरच तुला नवीन बाबा येणार आहेत मग त्यांच्यासोबत खूप खेळ..
चालेल ना ?"

"नवीन बाबा.. मज्जा ..!
पण ते खेलतील का माज्यासोबत ? "
त्याला उगाच प्रश्न पडला.

आणि तिच लक्ष सुरज च्या प्रश्नाने वेधून घेतलं.

आजीने सुरज ला मांडीवर घेतलं आणि मायेने म्हणाल्या,
"तुझे नवीन बाबा तुझे खूप लाड करतील.
ते तुझ्या पहिल्या बाबा पेक्षा सुद्धा छान आहेत."

तिने लगेच तिरप्या नजरेने आपल्या आईला पाहिलं.
पण् ती काही बोलू शकली नाही.

तिच्या आईने म्हणजे सुलभाताईंनी सुरजला अंगणात खेळायला पाठवलं. तो गेल्यावर त्या आपल्या लेकीला समजावत बोलल्या,

"सखू , नाना म्हणत होता पोरगा खरंच चांगला आहे. आता तू नाही म्हणू नकोस . तुझं स्वतःचं घर असावं. हक्काचा माणूस असावा एवढीच इच्छा राहिलीये आता."

"इतकं सोप्पं असतं का पुन्हा नवीन खोपा करणं ?"
ती भाऊक होत बोलली.

"अग पक्षी सुद्धा आपलं पहिलं घर तुटल्यावर दुसरं घरटं करतातच की मग आपण तर माणस आहोत ."
त्या पुन्हा तिला समजावत स्वयंपाक घरात गेल्या.

आणि सखी आपल्याच विश्वात हरवली.. ती स्वतःशीच बडबडल्यासारखी बोलली,
"पक्षी पहिल घरट मोडल्यावर पुन्हा घरटं करतात पण आपल्या जोडीदारासोबत ..!"


तिचं बोललं सुलभाताईंनी ऐकलं.
सखीच्या  मनःस्थिती त्यांना एक स्त्री म्हणून कळत होती पण थोडा वेळ गेल्यावर सगळं ठीक होईल याची त्यांना खात्री होती .

सखीचा उद्या बघण्याचा कार्यक्रम होता.
त्यामुळे आज त्या खूप गडबडीत होत्या.


      दुसऱ्या दिवशी सकाळची जेवण खावण उरकल्यावर नाना  घाई घाईत आला.
उत्साह त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होता. नाना म्हणजे लग्नासाठी मध्यस्थी केलेली व्यक्ती ! आणि सखीच्या भावाचा खास मित्र.

आज बघण्याचा कार्यक्रम त्याच्या खास मित्राचा होता . सखीच्या घरच्यांनी त्या मुलाला  अजून पाहिलं नव्हतं पण नाना ने  त्या मुलाची म्हणजे त्याच्या मित्राची एक आदर्श छबी सखीच्या घरच्यांचा नजरेसमोर आधीच उभी केलेली .

    नवरा मुलगा मित्र आणि नवरी मुलगी मित्राची बहीण त्यामुळे नाना दोघांनाही खूप जवळून ओळखत होता.  नाना ला खात्री होती या दोघांचं वाळवंटी आयुष्य हे दोघे एकत्र आल्यावर .. एकमेकांच्या साथीने नक्कीच हिरवळेल.

तर असा हा नाना घाईघाईत घरात आला आणि आपल्या मित्राला आवाज दिला ,

"सागर अरे झाली का तयारी? "

सागर नानाचा आवाज ऐकून लगेच बाहेर आला,
"हो हो झाली तयारी..
पण पाहुणे कधी येणार आहेत?"

"अरे मी तिकडेच जातोय आता ..
त्यांच्यासोबतच येतो."

सागर ने नानाला बाजूला बोलावून घेतलं आणि साशंक मनाने बोलला,

"नाना तू माझा खास मित्र !
तुझ्यावर विश्वास ठेवून आपल्या सखीसाठी लग्नाचा विषय मी पुन्हा काढला.  तिला सुद्धा तिच्या मनाविरुद्ध तयार केलं.
मुलगा खरच चांगला आहे ना स्वभावाला ?
तो घेईल ना तिची काळजी ?
नाहीतर मला माझी बहीण जड नाही."


"अरे वेडा आहेस का सागर?
सखी तुझी नाही माझीच बहीण आहे.
तिच चांगलं व्हावं याच उद्देशाने मी हा लग्नाचा घाट घातलाय आणि विश्वास ठेव जसा तू जवळचा तसाच कृष्णा माझ्या जवळचा.

मुलगा विश्वासातला आहे .
नको काळजी करू ..
मी घेतो सगळे जबाबदारी!"
नाना सागर ला समजावत बोलला.

"थँक्स यार,  बरं देणे घेण्याचा कसं काय ?
बोलणं करताना तू सुद्धा मध्ये बोल ."

"ते तरं मी बोललोच नाही त्यांच्यासोबत..
पण त्यांच्या काही अपेक्षा नसेल इतकं ओळखतो मी त्यांना..
आणि मी आहेच की
मी आजच बोलून घेतो त्यांच्यासोबत."

"तेच सगळ्यात महत्त्वाचं !
देण्या घेण्या वरून लग्न मोडतात .
माझी बाजू तुला माहितीये .
खाऊन पिऊन सुखी आम्ही .
माझी बायका-पोरं , आई ,सखी आणि सुरज सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर ..त्यामुळे बॅलन्स तितकासा नाही . हा पण सखी च लग्न मी माझ्या परिने लावून देऊ शकतो . तिला आंदण म्हणून जे द्यायचं ते देऊ शकतो पण गरजेपेक्षा मोठी झेप मला झेपणार नाही."
सागर ने त्याची बाजू मांडली.

"अरे माहितीये मला सगळं ..
ते बघतो मी ..तू नको काळजी करू..
जा आता तुझंही आवर ..
मी त्यांच्यासोबतच येतो ."
असं बोलून नाना ज्या घाई घाईत आलेला.
त्या घाई घाईतच गेला.

सुलभाताईंनी पोह्यांची सगळी तयारी आधीच करून ठेवली आणि त्या बाहेर पुस्तक वाचत बसलेल्या  सखीला बोलल्या,

"सखी तू ही जा ..तयार हो.. !"

सखी ने तसच शांत चेहऱ्याने आपल्या आईकडं पाहिलं.  तिचा चेहरा शांत असला तरी डोळ्यात खूप सारे प्रश्न होते.

"मी कशाला तयार होऊ?"

"असं काय करतेस ?
आपलं ठरलय ना नवीन सुरुवात करायची ?
मग आता सगळ्याचीच नवीन सुरुवात असं समज.. तुझ्या आयुष्यालाच नवीन सुरुवात होतीये.
मागच झालं ते सगळं सोडून दे..
नवीन स्वप्न बघ ..नवीन विचार कर."
सुलभाताई पुन्हा तिला समजावत बोलल्या.


"सगळं इतकं सोप्पं असतं का आई?"
तिचा पुन्हा थंडपणे प्रश्न.. !

सुलभाताई तिच्या शेजारी बसल्या आणि तिच्या केसावरून मायेने हात फिरवत तिला समजावत बोलल्या,

"सोप्पं नक्कीच नाही बाळा पण एकट्याने आयुष्य काढणं खूप अवघड असतं.  जे मी भोगलं ..
जे मी अनुभवलं ते तुझ्या वाट्याला नको यायला. एकटेपणा खूप वाईट !
आपल्या हक्काचा माणूस असणं किती गरजेचं असतं हे एकटेपण आल्याशिवाय नाही ग कळत.
गेली चार वर्षे तू सुद्धा ते अनुभवतीयेस ..
जसं वय वाढत जातं तसा एकटेपणा पोखरून काढतो ग बाळा."


सखी चे डोळे पाण्याने भरले.
"मला खरंच कळत नाहीये..
मी काय करू ? "

सुलभातईंनी सखी चे डोळे पुसले आणि तिचा हात हातात घेत प्रेमाने बोलल्या,

"तू नको जास्त विचार करू बाळा..
जे तुझ्या नशिबात आहे ते तुला भेटणारच आहे. प्रत्येकाला आपल्या हिश्याच आभाळ मिळतं. त्या आभाळात त्याची त्याची दुःख असतात ,
आनंदाचे क्षण असतात,  प्रेमाचे क्षण असतात .. तुझं सुद्धा हक्काचं आभाळ तुला नक्की मिळेल."

  "पण माझं मन तयार होत नाहीये. पुन्हा दुसरं लग्न करण्यासाठी .....!"
ती गहिवरून बोलली.


त्यांनी पुन्हा तिचे डोळे पुसले आणि तिला प्रेमाने विचारलं,
"तुझ्या सुरज ला बापाची गरज आहे .. आहे की नाही?"

तिने \"हो\" म्हणून मान हलवली.

"मग बस् !!
सध्या तू इतकाच विचार कर बाकी गोष्टी आपोआप घडत जातील .
सगळ वेळेवर सोडून दे .. ठीक आहे?"

तिने डोळे पुसत पुन्हा होकारार्थी मान हलवली.
  आणि सुरज कडे पाहिलं सुरज मघापासून आरशात बघून केस विचारत होता.

" बाबा येणाल .. बाबा येणाल !"
तो एकटाच बडबडत होता . फक्त बाबा येणार या कल्पनेने लहानग्या जीवाला किती आनंद झालेला.. ते त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं.


सखी उठली आणि तयार व्हायला आतल्या खोलीत गेली.  मनात खूप सारे प्रश्न .. खूप साऱ्या शंका कुशंका होत्या . नवीन जोडीदाराबद्दलच्या !!


इतकं सोप्पं असतं का पुन्हा परपुरुषाला.
एका अनोळखी व्यक्तीला नवरा म्हणून स्विकारण?
पुन्हा त्याच्यासोबत नवीन खोपा तयार करणं?
पहिल्या वेळेस \"पदरी पडलं आणि पवित्र झालं\"
अस माणून कोणत्या ही अपेक्षेशिवाय  संसार करण्याचा प्रयत्न केला मी ..पण आता पुन्हा ??
कसं जमेल मला ? माझ्या बद्दल ची आईची, दादाची काळजी कळतीये पण एक स्त्री म्हणून हा निर्णय खूप अवघड वाटतोय मला.. !

नाना म्हणत होता ,
\"त्यांना एक मुलगा आहे \"
त्याची आई होईन मी ..
चांगली सून होण्याचा सुद्धा प्रयत्न करेन..
पण ...बायको ???
ते जमेल का मला ?? आणि ते सुद्धा मला बायको म्हणून स्वीकारतील ??
त्यांच्या पहिल्या बायकोच्या आठवणी पुसून टाकतील??
काय विचार करतीये मी .. आठवणी कुठे पुसता येतात ? त्या तर मनाच्या कोपऱ्यात तशाच पडून राहतात . मी तरी कुठे पुसणार आहे आठवणी?
मला जमणार आहे का ते?
आणि तसही फारशा आनंदाने बहरलेल्या माझ्या आठवणी आहेतच कुठे ??
फक्त वर्षाचा संसार !!
सगळ्यांना समजून घेता घेताच वर्ष निघून गेल आणि वर्षा सोबत तो सुद्धा निघून गेला. जाताना आई होण्याचा सुख तेवढं देऊन गेला .\"

ती पुन्हा नाही म्हणून सुद्धा त्याच आठवणींमध्ये हरवली.  तेच विचार तिच्या डोक्यात येऊ लागले.

"सखी झालीस का तयार ?"
आईचा आवाज आल्यावर ती पुन्हा भूतकाळातून वर्तमानात आली.
आणि मनाशी  काहीतरी ठरवत ती स्वतःशीच बडबडली,

"मी आज स्पष्टपणे बोलणार ..
जर त्यांच्या मुलासारखं माझ्याही मुलाला त्यांनी स्विकारलं तरच माझा होकार असेल. "

तिला तिचा पहिला बघण्याचा कार्यक्रम आठवला. तेव्हा सुद्धा ती खुश नव्हती.  कारण तिला शिक्षण पूर्ण करायचं होतं पण स्थळ चांगलं आलं म्हणून घरच्यांनी घाई केली.  मुलगा सगळ्यांना आवडला म्हणून तिने होकार दिलेला.

तिची पहिल्या ही मुलाबद्दल फारशी अपेक्षा नव्हती. आणि आजही तिची नवरा म्हणून कसली अपेक्षा नव्हती.  पण मनात कुठेतरी वाटत होतं.

\" दिसायला कसाही असला तरी चालेल पण मला समजून घेणार असावा !\"
कारण जोडीदार जेव्हा समजून घेत नाही तेव्हा किती त्रास होतो हे तिने अनुभवलेल.!

……….


स्थळ : पळसवाडी

"नाना , अरे निघूया ना आपण?"

सोनाबाई उत्सुकतेने बोलल्या.

"हो पण कृष्णाला सुद्धा आपल्या सोबतच येऊ दे."

"नाही तुम्ही व्हा पुढे.. मी आलो मागून ."
कृष्णा शांतपणे बोलला.

"कुठे जातोय आपण ?"
आरव ने आनंदाने उड्या मारत विचारलं.

"तुला नवीन \"आई\" आणायला जातोय."
नाना मुद्दामून आई या शब्दावर जोर देत बोलला. तस कृष्णाने त्याच्याकडे तिरप्या नजरेने पाहिलं.

"बर काकू तू माझ्यासोबत चल ..
कृष्णा तू आमच्या पाठी पाठी ये."

नाना बोलल्यावर कृष्णाने नजरेने \"हो\" म्हणून खूणावलं.

"आज आईला भेटायचं ?
कुठे राहते ती ?
मी सुद्धा राहू का तिच्यासोबतच ?
आपण तिला घरी घेऊन येऊ का ?"
आरव ची बडबड घराबाहेर जाईपर्यंत चालूच होती. त्याची त्याच्या आईसाठी ची ओढ पाहून कृष्णा लग्नाला तयार झालेला आणि नानाने सुद्धा आरव च कारण पुढे करूनच कृष्णाला लग्नासाठी तयार केलेल.

कृष्णा ने बाईकची  चावी घेतली आणि जड पावल्याने घराबाहेर पडला. डोक्यात खूप सारे विचार होते . खूप सारे प्रश्न होते पण स्वभावानुसार सगळं काही स्वतःमध्येच साठवून तो वरून शांत होता त्याचं स्वतःशीच दोन दिवस चाललेल,

\"हे लग्न फक्त मी आरवसाठी करतोय.
कारण त्याला आईची गरज आहे . मी त्याच्यावर अन्याय नाही होऊ देऊ शकत पण जी व्यक्ती माझ्या आरची आई असेल त्या व्यक्तीला एक माणूस म्हणून रिस्पेक्ट नक्कीच देईन मी ..
कदाचित बायको म्हणून मी नाही स्विकारू शकत  ..
पण तिला हे मी कसं सांगू  ? एका अनोळख्या मुलीशी पुन्हा संसार उभा करायचा ...??
एका अनोळख्या व्यक्तीला जोडीदार म्हणून स्विकारायचं ..इतकं सोप्पं असतं का?\"

कृष्णा सुद्धा स्वतःच्याच विचारात हरवून नानाच्या गाडीच्या पाठी पाठी निघाला.

ते दोन जीव फक्त आपल्या मुलांसाठी नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तयार झालेले.
पण त्या दोन जीवांना हे ठाऊक नव्हतं त्यांचा एक निर्णय त्यांच आयुष्य बदलणार होता.
त्यांना भरभरून जगायला शिकवणार होता.

टू बी कंटिन्यू..

जिल्हा - सातारा, सांगली.


© प्रियांका (सुभा) "कस्तुरी"
१३/०८/२०२२
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//