Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी (नविन नात्याचा प्रारंभ) भाग -२

Read Later
कृष्ण सखी (नविन नात्याचा प्रारंभ) भाग -२
कृष्ण सखी (नविन नात्याचा प्रारंभ) भाग -२

नानाची गाडी थांबल्यावर कृष्णाने ही गाडी थांबवली. कृष्णा नाना सोबत अंगणात आला. नाना त्यांच्या साध्या घराकडे पाहून सांगत होता,

" हे लोक मुंबईलाच असतात. फक्त गर्मी चालू झाल्यावर हवापालट म्हणून गावाला येतात. त्यामुळे घर साधंच आहे."

"काही हरकत नाही. आपणही साधेच आहोत."
कृष्णा अंगणात खेळणाऱ्या लहानग्या सुरज कडे बघत बोलला.

नानाने सुरजला आवाज दिला,
"सुरज इकडे ये, बघ मी कोणाला घेऊन आलो ?"

सुरज लगेच धावतच नानाकडे आला.

"अजून लग्न ठरलेलं नाहीये त्यामुळे आधीच नाती जोडू नको. "
कृष्णा सुरज कडे बघायचं टाळत नानाला सूचकपणे बोलला.

"तू गप रे .. !"
नाना कृष्णाला हसत बोलला आणि..

"सुरज हा बघ तुझा बाबा."
नाना सुरजच्या कानात हळूच बोलला.

तसा लहानगा सुरज कृष्णाला बारकाईने पाहायला लागला. तो शांत झाला. सुरज चा उतरलेला चेहरा पाहून नानाने लगेच विचारलं,

"काय झालं सुरज?"

सुरज तोंडातच पुटपुटला,
"बाबा माज्याशी बोलत नाई.
माझज्याकडे बघत नाई. "

कृष्णाने त्याचे बोबडे बोल ऐकले. त्याला खूप गोड वाटलं. त्याने सुरज कडे तिरक्या नजरेने पाहिलं.
एक गुटगुटीत, रंगाने गोरा  दिसायला आकर्षक असा मुलगा नाना ने उचलून घेतलेला.

"किती वर्षांचा आहे?"

"चार "
नानाने माहिती पुरवली.

"माझ्याकडे ये !"
कृष्णाने हात केल्यावर सुरज लगेच कृष्णाकडे गेला आणि त्याच्या गळ्याला हातांचा वेढा देऊन त्याला घट्ट मिठी मारली. कृष्णाने त्याच्या पाठीवरून मायेने थोपटल .

'सुरज लगेच कसा माझ्याकडे आला? हे कोड कृष्णाला पडल.'याच उत्तर फक्त नानालाच ठाऊक होत.

कृष्णाला सुरजच्या पाठीवरून मायेने थोपटताना पाहून सोनाबाई आणि नानाने एकमेकांना खुणावलं. दहा वर्षे लग्नाला नकाराची घंटा देणारा आपला मुलगा लग्नाला तयार झाला हीच सोनाबाईं साठी खूप मोठी गोष्ट होती आणि त्यासाठी त्यांनी नानाच खूप वेळा कौतुक सुद्धा केलेल.

"पोरगं इतकं देखणं ! तर आई किती देखणी असेल ?" सोनाबाई बोलल्यावर कृष्णा ने आपल्या आईकडे पाहिलं .

"दिसण्यापेक्षा माणसानं देखणं असावं."
कृष्णा पुन्हा सूचक बोलला.

"आसल आसल ..तू आधीच तिच्याबद्दल मनात काही बाही भरवू नकोस."

"मी कशाला तुझ्या मनात काही भरवू?"

"माझ्या न्हाई रे , तू तुझ्याच मनात काय भरवू नगस आसं बोलले मी."
सोनाबाई हसत बोलल्या आणि नाना सोबत घरात गेल्या. कृष्णा लहानग्या सुरजला घेऊन अंगणातच उभा होता. सुरज चे प्रश्न संपत नव्हते,

"तू माझा बाबा ना?"

सुरज या प्रश्नावर काय उत्तर द्यावं कृष्णाला कळेना तो गोंधळला.

"सांग ना ?"

त्याचा निरागस चेहरा आणि चेहर्यावरील निरागस भाव पाहून त्याचं मन राखण्यासाठी कृष्णा हसत बोलला,
" हो मीच तुझा बाबा !"

"कुटे गेलेला तू ?"
त्याच्या मानेला हातांचा वेढा देऊन सुरज गाल फुगून बोलला,

"आई बोलते , तू खूप खूप लांब गेलेला."

किती निरागस असतात लहान मुलं.. त्यांच्या निरागसतेनेच ते एखाद्याला कमी वेळेत आपलंसं करतात.
कृष्णा त्याचे चेहर्यावरील हावभाव आणि बोबड बोलणं ऐकतच राहिलेला.इकडे आत मध्ये सोनाबाई आणि नाना लाकडी सोफ्यावर बसलेले. स्वयंपाक घरातून पोह्यांचा सुगंध दरवळत होता सोनाबाई मनातच बोलल्या,

'मुलगी सुगरण आहे म्हणायची...!'

नानाने आधीच कल्पना दिलेली. मुलगी बघायला फक्त कृष्णा आणि त्याची आई येईल. वडील नाहीत आणि भावकी मधील तो कोणालाही बोलवणार नाही.

सागर (सखीचा भाऊ) आणि सागरची आई कृष्णाला बघण्यासाठी आतुरलेले. सागर ने नानाला खुणवलं,

' कुठे आहे मुलगा? '

नाना हसत बोलला,
"सुरज सोबत खेळतोय."

त्याचं बोलणं ऐकून सागर आणि सागर ची आई हसले .

"म्हणजे मुलांची आवड आहे तर !"
सुलभाताई हसत बोलल्या.

लगेच नाना ने त्यांचं वाक्य उचलून धरलं,
"हो तसा त्याचा दररोज संबंध मुलांसोबत येतोच. कारण तो मराठी शाळेत शिक्षक आहे. "

"परमनंट की ????"
सागर ने साशंक मनाने विचारलं.

" तु निश्चिंत रहा .. आपल्या सखूला काही कमी पडणार नाही."
नाना हसत बोलला.

ते दोघे बोलतच होते इतक्यात कृष्णाचे मामा आले. ते आल्यानंतर त्यांनी सरळ मुद्द्याला हात घातला ,
"मुलगी कुठे आहे?"

"मी आले तिला घेऊन.. पोहे करतीये."
सुलभाताई गडबडीने स्वयंपाक घरात गेल्या.

"पाहुणे कधी चे आलेत . झाले का पोहे ?"
त्यांनी स्वयंपाक घरात जात हळू आवाजात विचारलं.

"झालेत "
सखी चा शांत आवाज..

सुलभाताईं नी लगेच मघाशीच पुसून ठेवलेल्या प्लेट घेतल्या आणि पोहे भरत बोलल्या,

"कमरेचा पदर काढून डोक्यावरून घे आणि तयार हो."
तोपर्यंत मी पोह्यांच्या प्लेट भरते.

"मी काही नवीन नवरी आहे का डोक्यावरून पदर घ्यायला?"
सखी जरा त्रासून बोलली.

"मोठ्यांच्या समोर जातीयेस म्हणून म्हटलं डोक्यावरून पदर घे.. आणि चेहरा हसरा ठेव."
सुलभाताई त्या पोह्यांवरून शेव भुरभुरत शांतपणे बोलल्या.

आणि पोह्यांचा ट्रे सखीच्या हातात देत तिला समजावत बोलल्या,
" तुझ्या मनाविरुद्ध आम्ही काही करणार नाही. शेवटचा निर्णय तुझा असेल ,आता शांत मनाने बाहेर चल."

सखी सुलभाताईं सोबत बाहेर आली . नाना, सोनाबाई , मामा तिघांनाही ओळीने पोहे दिल्यानंतर तिने सागरला ही पोह्यांची प्लेट दिली. सोनाबाईंना देखणी आणि शांत चेहर्याची सखी खूप भावली.
नाकी डोळी नीटस, मुंबईत राहिल्यामुळे रंगाने उजळ. तिला पाहून सोनाबाईंना विश्वास बसला नाही की, तिला चार वर्षांचा मुलगा आहे. सोनाबाईंनी तर तिला सून म्हणून स्विकारल ही !

समोर बसलेल्या सखीला मामांनी विचारलं,
"नाव काय म्हटलं?"

"सखी "
ती हळू आवाजात बोलली.

'हा प्रश्न नवऱ्या मुलाने विचारला आहे.' असा तिचा ग्रह झाला. तिने हिंमत करून एक नजर समोर पाहिलं आणि तिच्या काळजात धस्स झालं. समोर पंचेचाळीशी उलटलेला, मध्यमवण्याचा गृहस्थ बसलेला. तिने स्वतःला सावरत भिरभिरलेल्या नजरेने खाली पाहिलं .


त्यानंतर तिला तिथली चर्चा ऐकायलाच आली नाही. ती उठून आत मध्ये गेली. तिच्या डोळ्यांत आपसूक पाणी आलं.

'दुसर लग्न म्हणून काय माझ्यापेक्षा, माझ्या वयाच्या दुप्पट माणसाशी मी लग्न करावं ? नाही... मी नाही लग्न करणार..!
हा असा जोडीदार ??'
तिचे डोळे भरून आले आणि ती तिथेच खाटेवर बसली.

'जोडीदाराचं सुख माझ्या नशिबात नाहीच का?'
या प्रश्नाने तिच्या काळजात कालवा कालव झाली. तिने डोळे पुसत स्वतःलाच समजावलं,

'कदाचित नाही !!
जोडीदाराच सुख माझ्या नशिबात नाहीच !'

आणि कसलातरी एकदमच आवाज झाला. तिने लगेच मान वळवून आवाजाच्या दिशेनं  पाहिलं आणि पाहतच राहिली.


थोड्यावेळापूर्वी :

सखी पोहे देऊन आत मध्ये गेल्यावर सोनाबाई नानाच्या कानात हळूच कुजबुजल्या,

"आर ती आली आणि गीली बी ..कृष्णा बाहेर काय करतोय ? कामदाराला बोलव की, त्या दोघांनी एकमेकांना बघायला पायजे का नग?"

नानाने त्यांना खुणेनेच शांत राहायला सांगितलं आणि बाहेर उठून गेला. तो पुढच्या दोन मिनिटात कृष्णाला घेऊनच आला. आत मध्ये आल्यावर कृष्णाने सुरजला खाली ठेवलं आणि तो नानाच्या शेजारी बसला.

कृष्णाला सागर आणि सुलभाताईंच्या एकसारखं बघण्याने कसंतरीच वाटलं. तो उगाच इकडे तिकडे पाहू लागला. नानाने ओळख करून दिली,

"हा कृष्णा माझा मित्र... पण् भावा सारखा आहे.

आणि कृष्णा हा सागर ..हा सुद्धा मला तुझ्या सारखाच आहे आणि या सुलभा काकू."

कृष्णा आणि सागर ने चेहऱ्यावर स्मित आणून एकमेकांना ' नमस्कार'  बोलले. सोनाबाईंनी स्वतःचं ट्रे मधील पोह्यांची प्लेट कृष्णाच्या हातात दिली आणि हसत बोलल्या ,

"यकदा खाऊन बघ.. झ्याक झालेत."

'आई पण ना .. अशी बोलते जणू ती तिच्या माहेरी आलेय .'कृष्णा पोह्यांचा चमचा तोंडात टाकत मनातच बोलला.

त्याच्या जिभेवर पोह्यांची चव रेंगाळली आणि काळजात कोणाची तरी आठवण आली .
तीच चव ...! किती वर्षांनी आज पुन्हा जिभेवर रेंगाळलेली. त्याने तिच्या आठवणीतच सगळे पोहे संपवले. कृष्णा पोहे खाई पर्यंत नानाची बडबड चालू होती मग मामाच बोलले,

"तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत बोलून घ्या म्हणजे पुढची बोलणी करायला आम्ही मोकळे..
काय वहिनी बरोबर ना ?"
मामा सुलभाताईं कडे बघून बोलले.

"बरोबर !
मी सुद्धा हेच बोलणार होते . या दोघांची पसंती महत्त्वाची ! "

ते बोलत तर होते पण 'ती' तिथे नाही हे कृष्णाच्या लक्षात आलेल.
कृष्णाची नजर तिला शोधत होती. हे नानाने बरोबर ओळखलं. नाना उठला आणि कृष्णाच्या हाताला पकडून त्याला उठवत बोलला,

"चला तुम्ही दोघे बोलून घ्या ! "

कृष्णा नाना सोबत ओटी वरून त्या खोलीपर्यंत आला . दरवाजात नाना कृष्णाला हळू आवाजात बोलला,

"तुला जे काय बोलायचं आहे.. ते मोकळेपणाने बोल. म्हणजे पुढची बोलणी करायला."

कृष्णाने नानाकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच 'हो'  म्हणून खुणावल.

नाना गेल्यावर कृष्णा खोलीत डोकावत आत मध्ये येत होता की दरवाजातच उंच चौकटी मुळे तो अडखळला आणि त्या आवाजाने सखीने मागे पाहिलं आणि ती पाहतच राहिली.

पांढरा शुभ्र इन केलेला शर्ट.. ब्लॅक पॅन्ट वर उठून दिसत होता.  निमगोऱ्या रंगावर तो शर्ट तसा खुलूनच दिसत होता. अर्ध्या कपाळावर आलेले केस.. चेहऱ्यावर हलकीशी दाढी मिशी ,त्या गोल चेहर्यावर शोभून दिसतं होती.
त्यानेही गोंधळून समोर पाहिलं आणि तो बोलायचं विसरला.

टू बी कंटिन्यू..

© प्रियांका सुभा कस्तुरी
१५/०८/२०२२
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//