Mar 04, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कृष्ण सखी ( नवीन नात्याचा प्रारंभ) भाग-७

Read Later
कृष्ण सखी ( नवीन नात्याचा प्रारंभ) भाग-७


विषय - कौटुंबिक कथा

शीर्षक - कृष्ण सखी (नवीन नात्याचा प्रारंभ) भाग -७

मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी आलेले कृष्णा आणि नाना सखीची वाट पाहून कंटाळतात. त्यानंतर सखी येते.

आता पुढे ----


  "गाडीचा प्रॉब्लेम होता तर तुम्ही नानाला सांगायचं ना .. तुम्हाला न्यायला आला असता तो."
कृष्णा शांतपणे तिच्या कडे पाहत..


"प्रत्येक वेळी नानाला त्रास देण मला बरोबर नाही वाटत."
ती सुद्धा त्याच्याकडे बघत..


"नाना आपलाच तर आहे ..
त्यात त्रास कसला?"


"तरीपण माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मला नाही आवडत."


"मग स्वतःला त्रास झाला तरी चालेल ?"
कृष्णा गालात हसत बोलला.

"असं काही नाही ."
ती सुद्धा गालात हसली.

"तसंच आहे म्हणून तुम्ही इतका वेळ गाडीची वाट पाहत बसला, पण नानाला बोलावून घेतलं नाही."

ती थोडीशी  हसली . त्याच्याकडे अस एकटक पाहणं तिला अवघडल्यासारखं वाटू लागलं.  ती नजर चोरून इकडे तिकडे पाहू लागली. तिने नजर चोरल्यावर त्याच्या लक्षात आलं मघापासून आपण तिच्याकडेच पाहतोय.  लगेच कृष्णा तिरपा उभा राहिला आणि समोर पाहत बोलला,

"आता कसा आहे सुरज?"

आणि तिने खाली बघतच उत्तर दिलं,
"बर आहे आता"

"कधी गरज लागली तर हक्काने सांगा ."
तो समोर बघतच बोलला.

तिने त्याच्याकडे एक नजर पाहिलं आणि खाली बघत होकारार्थी मान हलवली. समोर बघत असल्यामुळे त्याच्या ते लक्षात आलं नाही .

'कदाचित ती चुकीचे समजेल'
हा विचार करून त्याने हलकेच नजर तिच्यावर टाकली आणि पुन्हा बोलला,

"पुन्हा सुरज आजारी पडला ..
त्याच्यासाठी काही इमर्जन्सी आली तर हक्काने सांगा असं बोललो मी."

"हो म्हटले ना मी ."
तिचा पुन्हा बारीक आवाज

त्यांनी पुन्हा तिरप्या नजरेने तिच्याकडे पाहिलं,
" कधी हो म्हटला."

"आत्ताच"

तो समोर बघूनच हसला,
"मला धडधडीत ऐकायला येत अस वाटायचं पण आत्ता असं वाटतंय मी बहिरा आहे.  इतक्या लहान आवाजात तुम्ही बोलता , की तुमचं बोलणं ऐकायलाच येत नाही."

तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं आणि ती सुद्धा गालत हसली.
"आरव बर आहे ना ? तो सुद्धा आलाय का?"

तिने इकडे तिकडे बघत विचारलं.

"नाही त्याला नाही आणलं."

ती पुन्हा खाली बघतच उभी राहिली कदाचित भेटायला बोलावलं असेल हा विचार तिच्या मनातला मनात आला आणि कृष्णा आपण कशाला आलोय हेच विसरला . तो तसाच खिशातच घालून समोर बघत उभा होता . मधूनच हलकीशी नजर तिच्याकडे धावत होती.

   कानामध्ये छोटी फुले सोडली तर तिच्या अंगावर एकही दागिना नव्हता.  साधी कपाळाला टिकली सुद्धा नव्हती , ना चेहऱ्यावर मेकअप चा लवलेश,  तरीसुद्धा तिच सौंदर्य पाहणाऱ्याला आकर्षित करत होत.  जातीच्या सौंदर्याला लागतच काय ? रस्त्यावरून जाणाऱ्या पुरुषी नजरा तिच्याकडे मागे वळून पाहत होत्या.  एरवी या नजरांचा तिला राग यायचा पण आज त्याच्यामुळे तिला सुरक्षित वाटत होतं.

नाना दोघांनाही दुकानातून पाहत होता कृष्णा पाठमोरा उभा होता तर त्याच्याकडे फिरून खाली बघत साडीच्या पदराला बोटाने गुंडाळत सखी उभी होती. त्या दोघांना पाहून  नाना स्वतःशीच बडबडला,


"वर्ष लागल तुम्हा दोघांना समोरासमोर आणायला पण आता असं वाटतंय माझा निर्णय बरोबर होता.  दोन अपूर्ण व्यक्ती एकमेकांना पूर्ण करतात हेच खरं."

पाच मिनिटांचा दोघांना एकांत दिल्यावर नानाने आतून  हसत आवाज दिला,

"कृष्णा सखीला घेऊन आत मध्ये ये.  नाहीतर तिथूनच निघून जाल आणि मी इथे एकटा राहीन."

कृष्णाने नानाकडे डोळे मोठे करून पाहिले आणि नजरेनेच गप्प बसायला खुणवलं.

नानाने हसतच खांदे उडवले ,
"मी तर असाच आहे....!"

"आत मध्ये कशाला? "
सखी सराफाच्या दुकानाकडे बघत गोंधळली.

"चला आत मध्ये गेल्यावर कळेल ."
तो शांतपणे बोलला आणि तिने पुन्हा होकारार्थी मान हलवली आणि आपली पर्स सांभाळत पदर खांद्यावरून घेत ती  दुकानामध्ये गेली. तिच्या पाठी कृष्णा गेला.

नाना  सराफाला बोलला,
"मंगळसूत्रांची डिझाईन दाखवा."

त्याचं बोलणं ऐकून सखी ने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि तशीच नजर कृष्णावर फिरवली.
तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून कृष्णा शांतपणे बोलला ,

"तुम्हाला आवडेल ती पसंत करा."

"पण…???

मी …???  म्हणजे.. .????

पण् नकोच !!"
ती खाली बघत पदराचा टोक पकडून आपला गोंधळ लपवण्याचा प्रयत्न करू लागली.

"काय झालं?"
नानाने विचारलं.

तिने खाली बघूनच नकारार्थी मान हलवली .

तिच्या पसंतीने मंगळसूत्र घेणं ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती . आजवर कोणत्याच बाबतीत कोणीच तिला तिची पसंती कधी विचारलीच नव्हती. त्यामुळे ती खूप गोंधळलेली.

कृष्णाने नानाला खुणेने विचारलं,
'काय झालं यांना?'

नानाने खांदे उडवले,
'माहित नाही .'

सराफवाने सात-आठ डिझाईन वरती काढून ठेवल्या आणि चष्म्यातून सखीकडे पाहू लागला. त्याची सुरुवातीला सहज तिच्यावर पडलेली नजर तिच्या स्त्री सौंदर्याकडे धाव घेऊ लागली. हे कृष्णाच्या नजरेतून सुटलं नाही  आणि त्याला सराफाचा भयंकर राग आला.
तो हाताची थाप सराफाच्या समोर मारत बोलला,

"दुकानात येणारे तुमचे ग्राहक असतात आणि ग्राहक  देवा समान असतात.  तुम्ही देवालाच घाणेरड्या नजरेने पाहणार का?"

तस नाना आणि  सखीने कृष्णाकडे पाहिलं.  दोघांनाही अंदाज आला, काय झालं असेल?  आणि पुन्हा दोघांच्या नजरा सराफाकडे वळल्या.  सराफ  चपापला,

" अहो नाही !
काय बोलताय तुम्ही ?
माझ्या मनात पण तसलं कधी येत नाही."

"मग इथून जाईपर्यंत नजर यांच्यावर गेली नाही पाहिजे . नाहीतर आम्ही जातो."
कृष्णा रागात बोलला.

सगळ्या प्रकार लक्षात येऊन सराफाचा लहान भाऊ लगेच पुढे आला आणि तो विनवणीच्या सुरात बोलला,

"जे झालं त्यासाठी मी माफी मागतो पण तुम्ही जाऊ नका.  तुम्हाला काय हवं ते मी पाहतो."
आणि त्याने भावाला जायला खुणवल.

"नाही अशा ठिकाणी आम्हाला खरेदी करायचीच नाही ."
कृष्णा बोलल्यावर त्या सराफाच्या भावाने हात जोडले.
दुकानात अजून दोन गिऱ्हाईक होती. तो हात जोडून बोलला,

"आमच्या दुकानाचं नाव खराब होईल .
प्लीज तुम्ही जाऊ नका. कदाचित तुमचा गैरसमज झाला असेल."

त्याच्या या वाक्यावर कृष्णाने त्याच्याकडे रागात पाहिलं . त्याच्या चेहऱ्यावरचा राग पाहून त्या सराफाच्या भावाने त्याचा वाक्य पुन्हा माघारी घेतलं,

"नाही म्हणजे दादाची नजर घसरली असेल पण मी माफी मागतो. प्रकरण वाढायला नको."

त्याला इतकं रागावलेला पाहून सखीच बोलली,

"तुम्ही शांत व्हा ना प्लीज...!"

तिचा नाजूक आवाज आणि
बोलण्याची टोन ऐकून...

\"तू शांत हो ना ऽ प्लीज\"

असाच आवाज त्याच्या कानी पडला आणि त्याचं काळीज धडधडलं. त्याने झटक्यात तिच्याकडे पाहिलं . एका क्षणाला तिथे आरती उभी आहे असाच त्याला भास झाला.

"तुम्ही रागवू नका ना प्लीज."

ती पुन्हा त्याच टोन मध्ये बोलली आणि कृष्णा ने तिच्याकडे भांबावल्या सारखा बघत होकारार्थी मान हलवली.

लगेच नाना कृष्णाच्या खांद्यावर हात ठेवत बोलला,
"लगेच रागवत जाऊ नको कृष्णा.. थोडा शांतीने घेत जा " आणि हळूच त्याच्या कानात बोलला ,

"बघ ती घाबरली..!"

कृष्णाने नानाकडे पाहिल आणि "ठीक आहे" असं तोंडात पुटपुटला.

"मॅडम , तुम्ही बघा तुम्हाला कोणती डिझाईन आवडते ..फक्त पसंत करा.".. सराफ अदबीने बोलला

"तुम्हाला आवडेल ते घ्या ."
ती कृष्णाला उद्देशून खाली बघतच बोलली.

"आमच्या पसंतीने घ्यायचं असतं तर तुला कशाला बोलावलं असतं.. तू बिनधास्त पसंद कर."
नाना तिला समजावत बोलायला.


"तुम्ही संकोच बाळगू नका ..कोणती डिझाईन आवडते ते पहा."
कृष्णा बोलल्यावर सखी ने सगळ्या बॉक्समधील मंगळसूत्रावरून नजर फिरवली. सगळे मोठे मोठे आणि भरलेले होते. प्रत्येक मंगळसूत्र हे चार पाच तोळ्याच्या पुढचं आहे हे तिच्या लक्षात आलेलं.

"यातील काही नको."

"तुम्हाला दुसरी डिझाईन हवी आहे का?"
कृष्णाने आश्चर्याने विचारलं.

"मला साधंसं चालेल."
ती खाली बघतच बोलली.

"तुम्हाला नक्की कसा हव मॅडम ते सांगाल का?
मी डिझाईन दाखवतो ."
सराफ पुन्हा विनयाने बोलला.

"त्याच्यामध्ये काळे मनी जास्त असतील असं दाखवा."
तिने खाली बघतच सांगितलं.

काळे मनी जास्त असलेल्या सराफाने काही डिझाईन्स दाखवल्या. सखीला त्यातील दोन आवडल्या. ते दोन्ही बॉक्स कडे आळीपाळीने पाहत होती.

"या दोन"

"ओके "
सराफाने बाकीचे बॉक्स ठेवून दिले .

"कोणते हवे?"
त्याने पुन्हा विचारलं.

तिने कृष्णाकडे पाहिलं,
" या दोन्हीतील कोणते घेऊ?"

"तुम्हाला आवडेल ते घ्या."
त्याचा सरळ उत्तर..

"मला कळत नाहीये ..
बघा ना एकदा ."
तिची बोलण्याची टोन कृष्णाला बेचैन करत होती. त्याने मानेनेच बघतो असं खूणवलं आणि दोन्ही बॉक्स पाहिले. दोन्ही डिझाईन छान होत्या. जेमतेम एकसारख्याच होत्या .फक्त एकीला खाली दोन मोठ्या वाट्या होत्या तर दुसरीला एक पान होतं. त्याने दोन मोठ्या वाट्या असलेली डिझाईन सखी पुढे ठेवली,

"ही पहा..!"

"चालेल..!"

"यामध्ये बनवायला टाका."

"सीजन चालू असल्यामुळे आम्ही घडणावळ घेत नाही. आठ दिवसांनी भेटेल."

"ठीक आहे आता अंगठ्या दाखवा." कृष्णा

नानाला तर कल्पनाच नव्हती की तिला अंगठी सुद्धा घ्यायची आहे.

"अंगठी नको " ती संकोचून..

तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो बोलला,

"तुमच्या बोटामध्ये बसेल आणि तुम्हाला पसंत पडेल अशी घ्या."

सखी थोडी नाना जवळ सरकली आणि हळू आवाजात बोलली,

"नाना आता मंगळसूत्र घेतलं न?
मग अजून कशाला खर्च ?
तू सांग त्यांना नको मला अंगठी."

"तो बोलतोय तर घे ना."

"नको नाना ..
तू सांग त्यांना."

त्या दोघांची चाललेली खुसूर पुसून बघून कृष्णा न बघितल्या सारखं करत बोलला,

"अंगठी तुमच्या पसंतीने घ्या..
नानाच्या नको."

नाना लगेच बोलला,
"आता मंगळसूत्र घेतलं ना?
मग अजून कशाला हवी अंगठी?
उगाचच खर्चात खर्च..!"

त्याच्या या बोलण्यावर कृष्णाने त्याच्याकडे डोळे वटारून पाहिलं,

"तू गप्प बस..!"

आणि सखीला थोडा नरमाईने बोलला,
"तुम्ही बघा"

सखी तशीच पदराच डोकं बोटाला गुंफत उभी होती. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि कपाळावर हलकीशी आठी आणत बोलली,

"नाना बरोबर बोलला."

"एक गोष्ट किती वेळा सांगायची ??
अंगठी बघा म्हटलं मी."
कृष्णा नजर रोखून बोलला.


टू बी कंटिन्यू..

©® प्रियांका (सुभा) "कस्तुरी"
२३/०८/२०२२

जिल्हा -

सातारा, सांगली


(तुमचे लाईक आणि कमेंट लेखकाला प्रोत्साहन देतात. त्यामुळे माझ्याच नाही..इरावरील कोणत्याही साहित्याला आवर्जून लाईक आणि कमेंट करतं जा. धन्यवाद)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//